Top Post Ad

ज्यांना काहीच लाभ मिळत नाही त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचविणे आपले कर्तव्य आहे


   ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याचा निपटारा करण्यासाठी “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” या उपक्रमांतर्गत ठाण्यात 1 सप्टेंबर रोजी दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने शिवसमर्थ माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात हा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देणे, त्यांना मुख्य़ प्रवाहाचा भाग बनविण्यासाठी, त्यांना मानाने जगण्याची संधी देणे, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे, असल्याचे शिनगारे यांनी स्पष्ट केले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, दिव्यांगांना हक्काने व अभिमानाने जगता आले तरच आपल्या कामाची कर्तव्यपूर्तता होईल. ठाणे जिल्ह्यात दिव्यांगांसाठीच्या योजना १०० टक्के राबविण्यात येतील. तसेच दिव्यांग बांधवांसाठी असलेला निधी पुरेपूर व योग्य आणि पारदर्शक पद्धतीने खर्च होईल, याची दक्षता घेण्यात येईल. 

 कार्यक्रमाचे उद्घाटन ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते झाले. आपल्या उद्घाटकीय भाषणात बच्चू कडू म्हणाले, "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागातील दिव्यांगांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या, अडचणी ऐकून घेत आहोत. त्यातून एक सर्वसमावेशक दिव्यांग धोरण तयार करण्यात येईल. हे धोरण दिव्यांगांना सावली देण्याचे कार्य करेल, देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरू केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मागणी मान्य केल्यामुळे हे मंत्रालय अस्तित्वात आले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाच्या ५ टक्के एवढा निधी दिव्यांगांसाठी देण्यात यावा. तसेच महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेने दिव्यांगांसाठी ठेवलेले ५ टक्के निधी खरंच खर्च होतो का, याचा आढावा घ्यावा लागेल. सध्या दिव्यांगांची शिक्षणामधील टक्केवारी कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील मूकबधिर मुलांसाठी इयत्ता १२ वी नंतरच्या शिक्षणाची सोय करायला हवी. ठाणे जिल्हा हा दिव्यांगांच्या सोयी-सुविधा पुरविण्यात अग्रेसर असावा. दिव्यांगांसाठी नवनवीन प्रयोग करणारा जिल्हा म्हणून या जिल्ह्याने नावलौकिक मिळवावा. ठाणे जिल्ह्यातील १०० टक्के दिव्यांगांना युडीआयडी कार्ड मिळावे, यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी. अजिबात चालता न येणारे, झोपून राहणाऱ्या दिव्यांगांची माहिती गोळा करून त्यांच्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याची आवश्यकता आहे. ज्यांना काहीच लाभ मिळत नाही त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. दिव्यांगांच्या पाठीशी प्रशासनाने उभे राहावे, असे आवाहनही कडू यांनी यावेळी केले.

       प्रास्ताविक करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जिंदल म्हणाले की, राज्य शासनाने "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" हे महत्त्वपूर्ण अभियान सुरू केले आहे. जिल्ह्यातील दिव्यांगापर्यंत पोहचून त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. सर्व शासकीय अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांग बांधवांना योजनांचा लाभ देतील यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणारआहे. आजच्या मेळाव्यात ॲमेझॉन ही कंपनी ३०० दिव्यांग बांधवांना नोकरी देणार आहे. जिल्हा परिषद ठाणे व प्रगती अंध विद्यालयाने अंध बांधवांसाठी ब्रेल लिपीमधील पुस्तिका तयार केली आहे. जिल्हा परिषद ठाणे, जिल्हा प्रशासन हे कायम दिव्यांग बांधवांसोबत आहे.

       दिव्यांग कल्याण विभागाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी" उपक्रमाच्या ठाणे जिल्हास्तरीय लाभ वाटप कार्यक्रमात सुमारे ४० ते ५० स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये ठाणे जिल्हा परिषद, नवी मुंबई महापालिका, संजय गांधी निराधार योजना, जात, उत्पन्न प्रमाणपत्र, उपप्रादेशिक परिवहन विभाग, यासह विविध महामंडळे, सहाही महानगरपालिका, नगरपालिका यांचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे लाभ, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, प्रक्रिया आदींची माहिती यावेळी देण्यात आली. दिव्यांग बांधवांसाठी ने-आण करण्यासाठी वाहनांची सोय, पाण्याची सोय, बैठक व्यवस्था, जेवण आदींची सोय करण्यात आली होती. त्यासाठी शासकीय कर्मचारी व स्वयंसेवक मदत करीत होते. विशेष म्हणजे उद्घाटन समारंभ संपल्यानंतर बच्चू कडू यांनी उपस्थित प्रत्येक दिव्यांग बांधवांशी वैयक्तिक संवाद साधित त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

या मेळाव्यात दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती देण्यासाठी विविध शासकीय विभागांचे 50 स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये दिव्यांग कल्याण आयुक्तालय, दिव्यांग आर्थिक विकास महामंडळ तसेच इतर विविध विकास महामंडळेही सहभागी झाली होती. या मेळाव्यात विविध शासकीय योजनांची माहिती, त्यासंदर्भातील अर्ज, केंद्र शासनामार्फत दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या युडीआयडी कार्डसाठी अर्ज भरून घेणे, दिव्यांगासंदर्भातील इतर कागदपत्रांसाठी अर्ज करणे, कर्ज योजनांची माहिती देणे, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज भरून घेणे आदी उपक्रम राबवण्यात आले. तसेच पात्र लाभार्थ्यांना लाभांचे वाटप करण्यात येणार आहे. शासकीय योजनांचे लाभ तसेच स्वयंसेवी संस्थामार्फत दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले. 

    कार्यक्रमाचे उद्घाटन "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी" उपक्रमाचे अध्यक्ष तथा मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, समाजकल्याण अधिकारी संजय बागूल आदी उपस्थित होते. जिल्ह्यात एकूण 6 महानगरपालिका, सर्व पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपालिका यांचाही या मेळाव्यात सहभाग होता. या मेळाव्याच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे दिव्यांग व्यक्तिंना शासकीय योजनेचा लाभ सुलभरित्या मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com