ठाणेकरांना खड्ड्यातील रस्त्यांचा दिलासा अद्यापही मिळालेला नसताना आता महापालिकेच्या वतीने तलावांच्या संवर्धन व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या योजनेतील कामांचा आढावा घेत असताना तलावांची सर्व कामे ही सर्वोत्तम दर्जाची होतील याकडे कटाक्ष असावा, असे निर्देश देतानाच ठामपा आयुक्त अभिजित बांगर यांनी या सर्व कामांचे आयआयटी या संस्थेमार्फत त्रयस्थ लेखापरीक्षण करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. तलावाच्या सुशोभिकरणासंदर्भात झालेल्या बैठकीस नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान, आयआयटीच्या पर्यावरण विभागाचे सहयोगी प्रा. बी. वाम्सी आदी उपस्थित होते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांचे केलेले परिक्षण जाहीर कधी करणार असा प्रश्न आता ठाणेकर विचारत आहेत.
तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील तलावांचे संवर्धन व जतन करण्यासाठी विविध कामे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येतात. याच मालिकेत, केंद्र शासनाच्या माध्यमातून अमृत-२ योजनेतंर्गत एकूण १५ तलावांच्या संवर्धन व सुशोभीकरण या कामांच्या निविदा अंतिम करून कार्यादेश देण्यात आले आहेत. या १५ तलावांमध्ये तुर्फेपाडा, खारीगाव, हरियाली, शिवाजीनगर-कळवा, कौसा, कोलशेत, दातिवली, देसाई, ब्रह्माळा, आंबे-घोसाळे, कचराळी, रायलादेवी, कमल, खिडकाळी व जोगिला या तलावांचा समावेश आहे. यासाठी एकूण ५३.३६ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. त्यापैकी २५ टक्के रक्कम टक्के केंद्र शासन, २५ टक्के राज्य शासन देणार आहे. तर, उर्वरित ५० टक्के निधी महापालिकेचा आहे. या कामाचा कालावधी एक वर्षाचा असून जून-२०२४ पर्यंत सर्व कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील, या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले.
या कामातंर्गत तलावास संरक्षक भिंत, कुंपण भिंत, बैठक व्यवस्था, जॉगिंग ट्रॅक, पदपथ, रेलिंग आदी कामांसह जलशुध्दीकरण व्यवस्था- बायोरिमेडिएशन, एरियेशन मशीन बसविणे, फ्लोटिंग वेटलॅण्ड, विद्युतीकरण, सुरक्षेकरिता सीसीटिव्ही, ध्वनीयंत्रणा यांचा समावेश आहे. तसेच, उद्यानविषयक कामे, लॅण्डस्केपिंग, रंगरंगोटी करणे आदी कामेही होणार आहेत. तलावाच्या सभोवती नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस, ठिकठिकाणी सुका कचरा व ओला कचऱ्यासाठी वेगवेगळे डस्टबीन, सुरक्षा रक्षकासाठी केबीन, निर्माल्य कलश, फायबर ग्लास बोट व आवश्यकतेनुसार सूचना फलक लावले जातील,
तलावांच्या संवर्धन व सुशोभीकरण कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरिक्षण होणार आहे. हे काम आयआयटी करणार आहे. या बैठकीसाठी आयआयटीचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक तलावाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांमध्ये स्थापत्य, विद्युत व पर्यावरण अशी तीन स्वरुपाची कामे आहेत. आयआयटीच्या माध्यमातून या तीन विषयातील तज्ज्ञ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. काम सुरू असताना आणि पूर्ण झाल्यावर या कामांचे लेखापरिक्षण आयआयटीच्या तज्ज्ञांकडून केले जाणार आहे, या कामांसाठी वापरले जाणारे साहित्य, त्याची गुणवत्ता यात कोणतीही तडजोड होता कामा नये. या सर्व तलावांची कामे ही सर्वोत्तम दर्जाची होतील यासाठी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी वेळोवळी पाहणी करावी. तसेच, आयआयटीच्या टीमने काटेकोर लेखापरिक्षण प्रक्रिया करावी असे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले आहेत.
या कामांची अमलबजावणी होत असताना अनावश्यक कॉंक्रिटीकरण करू नये. तसेच, पाण्याच्या आत कोणतेही बांधकाम करू नये. तलावाच्या पाण्यातील जीवसृष्टी आणि परिसरातील वनसंपदा ही सर्व टिकेल. त्यांना कोणतीही हानी पोहोचणार नाही. या पद्धतीने कामे करण्याबाबत दक्ष रहावे, तसेच, कामाच्या ठिकाणी प्रत्येक तलावाच्या कामाची संपूर्ण माहिती, काम पूर्ण होण्याचा कालावधी यांचा फलक कायमस्वरूपी लावावा, तलावांच्या संवर्धनाची कामे सुरू असताना पर्यावरण विषयक सर्व बाबी काळजीपूर्वक हाताळल्या जाव्यात यासाठी 'ग्रीनयात्रा' या स्वयंसेवी संस्थेद्वारे परीक्षण करण्यात येणार आहे. हे काम ग्रीनयात्रा या स्वयंसेवी संस्थेने pro bono (विनामूल्य) पध्दतीने करावे, सर्व तलावांची कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष नियंत्रण हे प्रदूषण विभागाचे असणार असल्याने या तलावांची दैनंदिन निगा देखभाल योग्य प्रकारे राहिल या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच तलावांमध्ये विसर्जित होत असलेल्या मूर्तीबाबत विशेष जनजागृती मोहिम राबविण्याचा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
0 टिप्पण्या