Top Post Ad

भिडे गुरुजींच्या तावडीतून सुटलो त्याची गोष्ट

महात्मा फुले...देशद्रोही, डॉ.आंबेडकर... किस झाड की पत्ती,   शाहूराजे ? ते कसले छत्रपती ?

असे अकलेचे तारे भिडे गुरुजी आपल्या कार्यकर्त्यां पुढे तोडतात. हे कार्यकर्ते फुले-शाहू- आंबेडकर यांना मानणारे ! पण त्यांना गुरुजी बोलतात, म्हणजे बरोबरच असेल, असं वाटायचं. पण २००४मध्ये छत्रपती शिवराय आणि विदेशी लेखक जेम्स लेनचं प्रकरण चित्रलेखातून जाहीर झालं आणि भिडे गुरुजींच्या धारकांत चलबिचल झाली. या तरुणात कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलचा तरुण इंद्रजीत घाटगे होता. भिडे गुरुजींचा राइट हँड.

भीमा-कोरेगाव हल्ला प्रकरणी भिडे एकबोटे यांची नावे चर्चेला आल्यानंतर चित्रलेखाने इंद्रजीत घाटगेंशी संपर्क साधला,त्यांनी दिलेली माहिती संभाजी भिडे यांचे खरं रूप समजून घेण्यास उपयुक्त ठरणारी आहे.

इंद्रजीत घाटगे म्हणतात, 'भिडे गुरुजी महात्मा फुले यांना देशद्रोही, नीच म्हणत डॉ.बाबासाहेब  आंबेडकरांचा तिरस्काराने उल्लेख करत, छत्रपती शाहू महाराजांबद्दल बरं बोलत नसत. हे सारं आम्हाला खटकायचं पण आम्ही भावनेच्या भरात होतो. त्यांच्या गड-किल्ले मोहिमा, एकेरी पद्धतीचा इतिहास ऐकलेला होता. भिडे गुरुजींनी इतिहासाची दुसरी बाजू आम्हाला कळू दिली नाही.

संभाजी भिडे गुरुजींच्या विचारांनी भारावलेले आणि आता वेगळे होऊन शिवराज्य मंचची स्थापना केलेले कार्यकर्ते इंद्रजीत घाटगे आता चाळिशीत आहेत. ते १९९८मध्ये भिडे गुरुजींच्या प्रभावाखाली आले होते. सुरुवातीला भिडे यांच्या कामाशी संपर्क कसा आला, याविषयी इंद्रजीत सांगतात, 'कागलमध्ये सुप्तशार्दूल बालोत्कर्ष संस्था आहे. लहान मुलांसाठी ही संस्था काम करी, संस्थेत काम करणारे आम्ही कार्यकर्ते होतो. लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड होती. कागलजवळच्या सांगाव गावच्या मित्रांनी आम्हाला शिवप्रतिष्ठान आणि गड- किल्ले मोहिमेविषयी कळलं शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या आकर्षणातून आणि प्रेमापोटी आम्ही शिव प्रतिष्ठानच्या कामाला लागलो. स्वतःला महाराजांचे मावळे समजून अहोरात्र तन-मन-धनाने या कार्यात आम्ही मित्र सहभागी झालो. ७-८ वर्ष जीवाचे रान करून काम केलं. स्वतःच्या  कुटुंबाचा विचार केला नाही. आटोकाट प्रयत्न करत भारतमातेच्या एकेक सुपुत्राला प्रतिष्ठानशी जोडत गेलो. त्यासाठी बेळगाव गोव्यापासून, सातार पर्यंत अथक प्रयत्न केले '

१९९८च्या दरम्यान इंद्रजीत घाटगे ह्याच्यासारखे हजारो बहुजन तरुण शिक्षण, कुटुंब या गोष्टींना दुय्यम मानून घरदार सोडून भिडे गुरुजी यांच्या कार्यात सहभागी होत होते. त्यातून शिवप्रतिष्ठान ही संघटना बांधली जात होती. हे काम कसं चालायचं?

इंद्रजीत शिवप्रतिष्ठानच्या संघटनेचा विस्तार कसा होई. कार्य कसं चाले याविषयी स्वानुभव सांगतात, 'कागल तालुक्यात आम्ही पायी, सायकलवर जसं जमेल तसं गावोगावी जात असू एकेका गावात चार-पाच वेळा आम्ही गेलो होतो. नंतर चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, गारगोटी, निपाणी, पन्हाळा या कोल्हापूर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या परिसरात गेलो. त्या ठिकाणी बैठका होत. तरुण कार्यकर्ते जोडायचे आणि शिवप्रतिष्ठानमध्ये त्यांना सदस्य करून घ्यायचं. नंतर त्यांना भिडे गुरुजींच्या व्याख्यानांना न्यायचं गड-किल्ले मोहिमेत न्यायचं. गड-किल्ले मोहिमेत सहभागी झालेले कार्यकर्ते भारावून जात आणि शिवप्रतिष्ठानचे पक्के कार्यकर्ते बनत. भिडे यांच्या व्याख्यानात मुस्लीम, दलित द्वेष हे मुख्य सूत्र असे. फुले, शाहू, आंबेडकर यांचा तिरस्कार असे. एकेरी, द्वेषाचा इतिहास तरुणांच्या डोक्यात भरवला जाई आणि त्यांची विचार शक्ती मारून टाकली जात असे.

शिवप्रतिष्ठानमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी फक्त भिडे यांचे आदेश मानून काम करायचं, असा नियम होता. भिडे जे सांगतील ते खरं, बाकी कशाच्याही विषयी प्रश्न, शंका उपस्थित करायची नाही. अशी संघटनेत शिस्त होती आणि आहे.

या कडव्या शिस्तीविषयी इंद्रजित सांगतात, 'शिवप्रतिष्ठानचे सांगलीचे कार्यकर्ते आणि भिडे गुरुजी जी कामं सांगत ती आम्ही इमाने इतबारे करत असू शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा वीरश्रीयुक्त इतिहास भिडे गुरुजी प्रभावी वक्तृत्वातून मांडत. त्यावर आम्ही भुललो होतो. ब.मो पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या प्रती खपवायचा आम्हाला आदेश आला. त्यानुसार आम्ही या पुस्तकासाठी आगाऊ पैसे शिवप्रतिष्ठानकडे जमा करून एक हजार प्रतींची नोंदणी केली. पण सांगलीहून पुस्तक काही येईनात. मग विचारणा सुरू केली, तर टाळाटाळीची हिणकस उत्तरं मिळू लागली. आम्ही लोकांचे पैसे जमा करून भरले होते. त्याबाबत भिडे आणि त्यांच्या सांगली च्या वरिष्ठ कार्यकर्त्यांना काहीच देणं-घेणं, जबाबदारी नाही, हे लक्षात येत गेलं शाहू,फुले, आंबेडकरांबद्दल शिवप्रतिष्ठानच्या वर्तुळात असलेली तिरस्काराची भावना खूपच खटकू लागली. त्याविषयी भिडे गुरुजींना विचारलं की, तिरकस, अपमानकारक उत्तर मिळे भिडे यांना प्रश्न, शंका विचारलेलं आवडत नाही. होयबा कार्यकर्ते आवडतात. हे कळत गेलं. या प्रकाराने घुसमट वाढत चालली होती.

सात-आठ वर्ष इंद्रजीत आणि त्यांचे सहकारी मित्र कार्यकर्ते शिवप्रतिष्ठानमय होऊन गेले होते, त्यांना वरिष्ठांची वागणूक खटकत होती. भिडे गुरुजी आणि त्यांच्या भोवतालच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांचे बोलणे आणि वागणं यातून विसंगती दिसत होत्या. या विसंगती कशा डोळ्यांत भरल्या ?

इंद्रजीत घाटगे सांगतात, 'शिवप्रतिष्ठानचे पंढरपूरचे एक कार्यकर्ते पुण्यात उच्च शिक्षण घेत होते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, शिकायला पैसे नाहीत, म्हणून त्यांचे शिक्षण बंद पडायची वेळ आली. आम्हाला वाटे, भिडे गुरुजींचे एवढं नाव आणि वजन आहे. त्यांना पतंगराव कदम मानतात. कदमांकडून या कार्यकर्त्याला शिष्यवृत्ती मिळवून द्यावी, कदम अशा शिष्यवृत्त्या गरजूंना देत होते. पण त्यांच्याकडे भिडे गुरुजींनी शब्द टाकणं गरजेचं होतं. भिडेच्या एका शब्दावर हे काम झालं असतं. पण गुरुजींनी या प्रकरणात सरळ कानावर हात ठेवले. आपल्यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या कार्यकत्यांसाठी एक शब्द वाया घालवायला ते तयार नव्हते तिथेच आमचा भ्रमनिरास व्हायला सुरुवात झाली. संघटनेच्या कार्यकर्त्यांचं दुःख नेत्याला नसेल, तर ते संघटन कुचकामी आहे. तसा आम्हाला अनुभव आला.

बहुजन समाजातील मुलांना त्यांच्या शिक्षणात मदत न करणं, त्यांच्या करिअर, कुटुंबांबद्दल अनास्था दाखवणं असा शिव प्रतिष्ठानचा खाक्या इतरही अनेक प्रकरणात इंद्रजीत आणि त्यांच्या या बनतात. मग शिकायचं का? हा गुरुजींचा सिद्धान्त आहे. या सिद्धान्तावर ठाम राहात गुरुजींनी लाखो बहुजन जातीतली मुलं नादाला लावून त्यांची संघटनेत भरती केली. त्यातल्या अनेकांची शिक्षण अर्धवट सुटली. अनेकांचं करिअर बरबाद झालं. अनेकांवर हिंसाचार, दंगल, निदर्शनं, मारामाच्या या प्रकरणात पोलीस केसेस झाल्या. इंद्रजीत आणि त्यांचे मित्र याला साक्षी आहेत.

याविषयी इंद्रजीत कळवळून म्हणतात, 'खरं सांगू, हा बहुजन मुलांना देशोधडीला लावण्याचा समजून उमजून केलेला डाव आहे. बहुजनांच्या पोरांची आयुष्य मातीमोल करायचा यांचा खरा धंदा आहे. मुस्लीम द्वेष शिकवून बहुजन पोरांना अतिरेकी करण्याचं यांचं कारस्थान आहे.

इंद्रजीत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भिडे गुरुजींच्या ढोंगांचा अंदाज आला होता. पण त्यांना त्यांचा खरा चेहरा जेम्स लेन या विदेशी लेखकाच्या वादग्रस्त पुस्तकाच्या प्रकरणात उघड झाला. या काळातली या कार्यकर्त्यांची घुसमट खूप मोठी होती.

या घुसमटीविषयी इंद्रजीत घाटगे सांगतात, 'जेम्स लेनने शिवाजी महाराजांचे बायॉलॉजिकल फादर दादोजी कोंडदेव आहेत, असा विकृत शोध लावला. पुस्तकांत नोंदवलं. हा शोध लावताना त्याला पुण्यातील काही लोकांनी माहिती दिली. माँसाहेब जिजाऊंची बदनामी होत असताना भिडे गुरुजी चूप, त्यांच्याभोवतीचे शिवभक्त आणि शिवसैनिकही चिडीचूप. गुरुजींनी याबाबत काहीही मार्गदर्शन केलं नाही. त्यांना याबद्दल विचारलं तर, बोलायला टाळायचे या कटातले पुण्यातले ब.मो पुरंदरे, निनाद बेडेकर यांच्याबरोबर गुरुजींची ऊठबस होती, त्यांची पुस्तकं ते आम्हाला आवर्जून वाचायला सांगत गुरुजींची ही लबाडी बघून आम्ही शिव प्रतिष्ठानचा त्याग केला आणि शिवराज्य मंच सुरू केला.

हा बदल त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या अनुभवासह शब्दबद्ध केला. त्याचं पुस्तक प्रकाशित केलय. तेच आज सोशल मीडियातून फिरतंय शिवराज्य मंच या संघटने मार्फत इंद्रजीत घाटगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समाजसेवा सुरूच ठेवलीय, व्याख्यानं, अभ्यासात मार्गदर्शन, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अशी काम ते करतात. आझाद हिंद सेनेतर्फे स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्या एका कुटुंबाचे त्यांनी घर दुरुस्त करून दिलय. भिडे गुरुजींच्या तावडीतून सुटल्यापासून ते शाहू,फुले, आंबेडकर यांचे ग्रंथ अभ्यासतात. त्यावर चर्चा करतात.

इंद्रजीत घाटगे यांच्याप्रमाणे विजय पाटील आणि त्यांचे मित्रही वैचारिक मतभेद झाल्याने गुरुजीपासून वेगळे झालेत, कोल्हापूरचे विजय पाटील हेदेखील १९९४ साली झपाटल्यासारखे गुरुजीच्या मायाजालात फसले आणि पूर्ण वेळ कार्यकर्ते झाले होते

विजय पाटील आता चाळिशीच्या उबरठ्यावर आहेत. ते भिडे गुरुजींच्या प्रभावाने झपाटलेल्या दिवसांविषयी सांगतात १९९४मध्ये आम्ही भिडे गुरुजींकडे आकर्षिले गेलो. १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडली गेली. त्यानंतर दंगली, बॉम्बस्फोट झाले देशात मुस्लीम द्वेष वाढवणं हा rss परिवाराचा कार्यक्रम जोरात सुरू होता. आम्ही १७-१८ वर्षांची मुलं होतो. छत्रपती शिवराय, संभाजी महाराज यांच्या प्रेमात बुडालेल्या आम्हाला भिडे गुरुजींनी एका बैठकीत मुस्लीम द्रेषाचे बाळकडू दिलं आणि आम्ही नादावलो. मी तर एवढा नादावलो की गुरुजींचा आदर्श घेऊन अविवाहित राहिलो. रात्रंदिन काम केलं. पण जेम्स लेन प्रकरणानंतर लक्षात आलं की, आम्हाला फसवलं गेलंय. आमची उमेदीची वर्ष वाया गेलीत. माझ्यासारखी अनेकाची ही भावना झाली.

इंद्रजीत घाटगे, विजय पाटील यांची फसवले गेल्याची भावना प्रातिनिधिक आहे. ज्या भागात rssच्या शाखा नाहीत, तिथे rss भिडे गुरुजीसारख्यांना पुढे करून तरुणांना नादी लावतो. हे या दोघांचंही निरीक्षण आहे. इंद्रजीत घाटगे सांगतात, भिडे गुरुजी हे rssचे २५ वर्ष स्वयंसेवक होते, हे त्यांनी आम्हापासून हेतूतः लपवलं होतं. राजकीय भूमिकेचा विषय आला की, गुरुजी म्हणत, राजकारण हा लुच्चा लफंग्यांचा प्रांत. तो आपला विषय नाही, पण गुरुजी मात्र आतून भाजपला मदत करत होते. गुरुजींचा हा कावा आम्हाला नंतर कळला.'

माँ जिजाऊंची बदनामी व शिवरायांच्या इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या ब.मो.पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर भिडे यांचे हितसंबंध उघड झाले. या महाराष्ट्र भूषणला विरोध करणारी शिवसन्मान परिषद सांगलीत सुरू असताना भिडेंचे समर्थक वक्त्यांना मारहाण करण्यासाठी स्टेजवर चढले. तेव्हा त्या समर्थकांना अडवून बदडणाऱ्यांत विजय पाटील पुढे होते. त्याविषयी विजय पाटील सांगतात, 'मी भिडे समर्थकांना अडवलं. तरीही ते घुसखोरी करू लागले, तेव्हा चोपलं. त्यानंतर गुरुजींचा फोन आला. म्हणाले, तू बाजू बदललीस, मला खूप दुःख झालं.

इंद्रजीत घाटगे आणि विजय पाटील या दोघांशीही बोलताना जाणवलं की, एका मोठ्या फसवणुकीच्या भूलभुलय्यातून सुटल्याचं, वेळेवर शहाणे झाल्याचं समाधान त्यांच्या बोलण्यात दिसतं.भिडेंचं तंत्र पोरं धरा, पोरं नासवा संभाजी भिडे यांनी शिवप्रतिष्ठान कसं उभं केलं ? त्यात तरुणांची, विद्यार्थ्यांची भरती कशी केली जाते ? याविषयी पुढे येणारी माहिती खूप अस्वस्थ करणारी आहे. भिडे आणि त्यांचे समर्थक सांगली- सातारा-  कोल्हापूर परिसरातील १५ ते २५ वर्ष या वयोगटातील मुलांना ठरवून शिवप्रतिष्ठानमध्ये ओढतात, त्यांच्या मनात द्वेष पेरतात, मुस्लिमांविषयी तिरस्काराची भयानक भावना भडकवतात. द्वेष आणि तिरस्काराने मन कलुषित झालेले तरुण मग शिव प्रतिष्ठानच्या पालखीचे भोई, धारकरी बनतात,

हे नेमकं घडतं कसं ?

एकेकाळी स्वतः शिवप्रतिष्ठान मध्ये का भूमीत छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज यांच्याविषयी आत्यंतिक प्रेमाची,आणि अभिमानाची भावना प्रत्येकात स्वाभाविकपणे असतेच, तरुण विद्यार्थ्यांत ही भावना वाढवून तिचं भिडे आणि त्यांचे समर्थक मुस्लीम द्वेषात रूपांतर करतात. संभाजी महाराजांची हत्या करणारा औरंगजेब म्हणजे आजचा प्रत्येक मुस्लीम आहे, त्याचा द्वेष- तिरस्कार केलाच पाहिजे. त्याला नष्ट करणं, हे आपलं पहिलं कर्तव्य आहे, इतकी घोर हिंसक भावना तरुण मनात हेतूपूर्वक पेरली जाते. त्यातून अशी उग्र मानसिकता तयार झालेले तरुण दंगली करायला सज्ज होतात. दंगलीत हिंसा केलेल्या अशा शेकडो तरुणांवर गुन्हेगारी स्वरूपाच्या केसेस दाखल झालेल्या आहेत. या कार्यकर्त्यांचं ऐन तारुण्यातील आयुष्य तुरुंग, न्यायालयात येरझारा, खेटा घालताना वाया गेलेल मी पाहिले आहे. बहुजन पोरांचं आयुष्य असं नासवलं जातय,

बहुजन मुलांच आयुष्य नासवण्याचे भिडे-तंत्र कस आहे ? 

मुलांना संवेदनशील वयात पकडून त्यांना कसं घडवलं जातं, हे पाहिलं तर हा खूप सुनियोजित आणि हुशारीने तयार केलेला प्रोजेक्ट आहे, हे लक्षात येतं, त्याविषयी दत्तकुमार खंडागळे सांगतात, 'शिवप्रतिष्ठानचे तीन कार्यक्रम खूप लोकप्रिय आहेत. एक- गडकोट मोहीम दोन-दुर्गा दौड, तीन-छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास. गडकोट मोहीम पाच दिवसांची असते. त्यात हजारो तरुणांना गड-किल्ल्यां च्या सहवासात नेलं जातं. त्या ऐतिहासिक वातावरणात त्यांना द्वेषाचा इतिहास शिकवला जातो. दुर्गा दौडमध्येही हजारो कार्यकर्ते सहभागी होतात. बलिदान मासमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना ज्या दिवशी ठार केलं, त्था दिवसापासून महिनाभर विविध कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमातून आक्रमक हिंसक कार्यकर्ते घडवले जातात.

दत्तकुमार खंडागळे हे १९९५ ते २००१ दरम्यान भिडेंच्या द्वेष तंत्राला बळी पडले होते. ते स्वतःही टोकाचा मुस्लीम द्वेष करीत असत. मुस्लीम माणूस पाहिला की, त्यांना औरंगजेब आठवे. परंतु, २००४मध्ये विदेशी लेखक जेम्स लेन याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजीराजे व राजमाता जिजाबाई यांच्या चारित्र्याची विटंबना करणार्या प्रकरणानंतर संभाजी भिडे आणि त्यांच्या समर्थकांचे खायचे दात दिसले आणि ते त्यांच्यापासून दूर झाले. संभाजी भिडे छत्रपती शिवरायांचा उल्लेख भगवान शिवाजी महाराज असा करतात. शिवरायांची मंदिरं बांधायला सांगतात. शिवरायांसमोर मंत्र म्हणायला लावतात. नैवेद्य दाखवतात. शिवरायांचे दैवतीकरण करण्याचा हा प्रयत्न शिवरायांचा सत्य इतिहास तरुणांना कळू नये, यासाठी असल्याचा संशय दत्तकुमार खंडागळे व्यक्त करतात संभाजी भिडे तरुणांचं करिअर बरबाद करतात. त्यांचं आयुष्य वाया घालवतात,  आतातर ते  स्पष्ट होतंय, पोर धरा आणि नासवा हेच त्यांच तंत्र आहे आणि ते आमच्यासाठी विघातक आहे, याविषयी लोक आता उघड बोलू लागलेत.

मूळ लेखक- राजा कांदळकर


 बहुतांश प्रिंट/इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा भाग वस्तुस्थिती पोहोचवण्यात अपयशी ठरत असला तरी काही मोजके अपवाद आहेत. ज्ञानेश महाराव यांचे चित्रलेखा त्यापैकी एक. भिडे गुरुजींच्या तावडीतून आपण कसे सुटलो त्याची गोष्ट सांगणारा राजा कांदळकरांचा लेख कव्हर स्टोरी म्हणून त्यांनी प्रसिध्द केला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com