शनिवारी ठाण्यात ‘वारी मानवतेची, वारी समानतेची’
ओबीसी एकीकरण समिती, महराष्ट्र, ओबीसी प्रतिष्ठान आणि मराठा सेवा संघ, ठाणे यांंच्यावतीने ठाणे शहरातील कोर्ट नाका येथे शनिवार 12 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत ‘वारी मानवतेची, वारी समानतेची’ हा या सोहळ्याचं आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यात माउलींच्या पालखीचं अश्वरिंगण सोहळा व टाउन हॉल येथे ज्येष्ठ पत्रकार, कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचं सुश्राव्य कीर्तन पार पडणार आहे. यावेळी, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे, नाशिक, नगर या जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायातील नामवंत मंडळी एकत्र उपस्थित राहून एक ‘अद्भूत सोहळा’ ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. या सोहळ्यात ठाणेकर नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक मराठा सेवा संघ,ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे व ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल वाघोले यांनी केले आहे. अगदी पंढरपुरच्या वारीत होतो त्याप्रमाणे आणि ज्या वारकर्यांना विठुरायाची आस असते त्यांच्यासाठी ‘याचि देही याचि डोळा’ असा अभूतपूर्व ‘वारी मानवतेची, वारी समानतेची’ सोहळा ठाणेकरांना पहायला, अनुभवायला मिळणार आहे.
--------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा होता. हा संपूर्ण सोहळा राजकीय स्वार्थासाठी हायजॅक करण्यात आला. मानाच्या दिंड्या व वारकरी यांना जाणिवपूर्वक अपमानास्पद वागणूक देण्यात आली. काही अधर्मी लोकांनी जाणिवूर्वक हा गोंधळ निर्माण केला. त्यातून रेटारेटी झाली व वारकऱ्यांना पोलिसांचा मार खावा लागला. याआधी त्र्यंबकेश्वरात जाऊन तेथील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न देखील याच प्रवृत्तीने केला होता व आता आळंदीत वारकऱ्यांशी अरेरावी केली. महाराष्ट्राच्या इतिहासात वारकरी संप्रदायावर पालखी सोहळ्यात असा लाठीमार झाला नव्हता. ‘युगे अठ्ठावीस’ विटेवरी उभ्या राहिलेल्या पांडुरंगाच्या समचरणावर प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्ती लीन होतो. हीच खंत त्यांच्या मनात कायम सलत आहे. त्यासाठीच हा सारा आटापिटा आहे.
फोडा, झोडा आणि राज्य करा, खरंतर ही निती या देशात इंग्रजांनी वापरली असं म्हणतात. हे अर्धसत्य आहे. ही निती इंग्रजांना सांगितली कुणी हे शोधणं आज गरजेचं आहे. या नितीचे उद्गाते कोण असतील तर या देशावर हजारो वर्षापासून राज्य करीत असलेले विदेशी आर्य. याच लोकांनी ही निती समस्त आशियाखंडातील बहुजन वर्गाला असंघटीत करण्यासाठी वापरली. आणि आपली सत्ता अबाधित ठेवली. ती आजही अबाधितच आहे. आजही त्याच नितीने बहुजन वर्गावर हे विदेशी लोक राज्य करत आहेत. अठरापगड जातीत या बहुजन वर्गाला विभागून त्यांनी आपला सत्तेचा अंकुष येथे रोवला तो आजपर्यंत कायम आहे. या अंकुषाला जेव्हा इंग्रजांनी छेद द्यायला सुरुवात केली तेव्हा चले जाव आंदोलनाने जोर धरला. त्या आधी अनेक आंदोलने झाली मात्र त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. ती आंदोलने मोठी होऊ दिली नाही.
इंग्रजांच्या दरबारी कारकूनगिरी करणाऱ्या या मंडळींनी फितुरीने ही आंदोलने दडपली. ही मंडळी कोण होती? त्या काळात बहुजन वर्गाला शिक्षणाची बंदी होती. मग शिक्षित वर्ग कोण तर हा विदेशी आर्य. मग हाच वर्ग खऱ्या अर्थाने इंग्रजांची चाकरी करीत होता. इथल्या बहुजन वर्गाला कायमस्वरुपी गुलामगिरीत ठेवण्यासाठी इंग्रजांना माहिती पुरवत होता. म्हणूनच आदिवासीं जमातीतून अनेक क्रांतीवीर निर्माण झाले. पण पुढे जाऊन ते समाजाचे नायक बनू नये म्हणून त्यांचे कार्य दडपण्याचे काम बेमालुपणे या लोकांनी केले. मात्र कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आज इतिहास लोकांपुढे येत आहे. हा वेगळा भाग आहे की, त्यातून बहुजन समाज आजही शहाणा होत नाही. अन्यथा महापुरुषांची अवहेलना करणाऱ्या भीडेप्रवृत्तीला केव्हाचेच ठेचले असते. इंग्रजांनी इथल्या बहुजन वर्गाला शिक्षणाचे दारे खुली केली. त्यावेळीच या विदेशी आर्य लोकांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली. धार्मिकतेच्या ओझ्याखाली दबलेल्या बहुजन समाजाला या गोष्टी कधीच समजलेल्या नाहीत. किंवा तो समजून घेण्यास असमर्थ ठरला आहे. म्हणूनच इंग्रजांच्या आधी आलेल्या या विदेशी आर्यांची गुलामगिरीविरोधात तो बंड करून उठत नाही.
कोटी कोटी देव-देवतांची निर्मिती झाली असली तरी वारकरी संप्रदाय आपल्या विठ्ठलभक्तीत कायमच रमला आहे. याकडे सुरुवातीला विदेशी आर्य लोकांनी कानाडोळा केला खरा. कारण धार्मिक सत्ता संपूर्णपणे यांच्याच हातात होती. मंदीरातील बडवे हेच लोक होते. मग वारकरी केवळ दुरून दर्शन घेऊन आपआपल्या घरी निघून जायचे. आणि मंदीरातला मलिदा मात्र यांच्या खिशात जायचा. विसाव्या शतकात या मंदिरातील बडवेगिरी बंद झाली तशी याच लोकांनी प्रति विठ्ठल मंदीराची देखील निर्मिती केली आहे. हे विसरून चालणार नाही. येवढे करूनही वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस अधिकच फूलत चाललेला दिसताच २० शतकाच्या शेवटी शेवटी आणि २१ व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी साई पालखीची टूम काढली. यामध्ये युवकांचा अधिक भरणा असे. या पालखीचं फॅड इतकं वाढलं की, आता प्रति वारकरी संप्रदाय निर्माण होणार असा प्रचारही याच लोकांनी सुरु केला होता. मात्र वेळीच बहुजनांच्या तरुणांना यातली मेख कळली आणि हळू हळू याचं पेव कमी व्हायला लागलं. हा खेळ फसल्यामुळे आता सरळ वारकरी संप्रदायातच घूसून आपले इप्सित साध्य करण्यासाठी या मंडळीचा अधिकाधिक भरणा होऊ लागला. आणि त्याचाच परिणाम वारकऱ्यांवर प्रशासकीय लाठीहल्ला करण्यात झाला. हे खरं तर वारीला बदनाम करण्याचं षडयंत्र होतं. मात्र वारकऱ्यांनी ते तेवढ्यावरच शांत केलं आणि आपल्या पुढच्या मार्गाला लागले. हाच या वारकरी संप्रदायाचा भक्तीमार्ग आहे. म्हणूनच दरवर्षी वारकऱ्यांची संख्या वाढीस लागत आहे. मग याला आपल्या कवेत घेण्याचं नविन कारस्थान सुरु झालं. वारकऱ्यांच्याच मध्ये घुसून आपला वेगळा संप्रदाय निर्माण करण्याचा. ज्यांना कधी वारी काय असते हे ठाऊक नव्हते ते देखील कुणाच्या तरी सांगण्याने यामध्ये सामिल होऊ लागले. ज्ञानोबा-तुकोबाच्या वारीने आजही पंढरपूर दुमदुमते. त्यांच्या जोडीला एकनाथ चोखोबा अशा अनेक संतांच्या आपआपल्या वाऱ्या या ठिकाणी येऊन विसावतात. त्याच ठिकाणी आता या आर्य विदेशीच्या बागलबुवांनी घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे.
हजारो वर्षे मानसिक व शारीरिक गुलामगिरी, शिक्षण, व्यवसाय व इतर मानवी स्वांतत्र्यापासुन बहुजनांना दुर ठेऊन अज्ञान, पांखड व अंधश्रद्धेमध्ये ढकलण्याची प्रक्रिया कायम सुरू आहे. प्रत्येक वेळेस नवीन योजना आखल्या जातात. त्या इतक्या बेमालूम असतात की गुलामी, अंधश्रद्धा, थोतांड, पाखंड याबाबत लोकांना काडीमात्र शंका येत नाही. म्हणूनच या बहुजन समाजात आजही विषमतेची घाण खोलवर रुजली गेली आहे. खरंतर यातून बाहेर येण्यासाठी संत महात्म्यांनी वेळोवेळी उपदेश केला आहे. जो संपूर्ण मानवाचे कल्याण योजतो. मात्र आम्ही त्यांनाही एका समुहात बंदीस्त करून ठेवत आहोत. आज गरज आहे ती समानतेची... आज वारी हवी समतेची, मानवतेच्या कल्याणाची... जो विचार आमच्या संतांनी सातत्याने पेरला इथल्या मातीत रुजवला त्याचा प्रचार आणि प्रसार केला. येणाऱ्या काळात जर आपण या मार्गाने गेलो तर कदाचित वारकऱ्यांवर असे हल्ले होणार नाहीत. अन्यथा आता सुरुवात झालीच आहे.
0 टिप्पण्या