कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू प्रकरणामुळे ठाण्यातील पालिकेच्या आरोग्यव्यवस्थेचे वास्तव समोर येत आहे. कळवा रुग्णालयाची क्षमता ५०० खाटांची आहे. मात्र आजमितीस साथीचे आजार आणि अतिरिक्त रुग्ण संख्येमुळे ती दीडशे-दोनशेहून अधिक झाली आहे. त्यामुळे वॉर्डामध्ये जागा मिळेल तिथे बेड लावून रुग्णांवर उपचार केले जात आहे. एका वॉर्डमध्ये ४९ रुग्णांची क्षमता असताना सध्या ८९ रुग्णांवर एक परिचारिका उपचार करीत आहे. वाढत्या रुग्णसंख्येसमोर मनुष्यबळ व जागाही कमी पडत आहे.
दररोज शेकडो रुग्णांची वर्दळ असलेल्या या रुग्णालयात दररोज ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, दिवा, पालघर, उल्हासनगर, डोंबिवली, जव्हार, वाडा, भिवंडी अशा विविध भागांतून बाह्यरुग्ण विभागात ५०० च्या आसपास रुग्ण येतात. मात्र अपुरा कर्मचारी वर्ग हे सर्वात महत्वाचे कारण या घटनेमागे असल्याची चर्चा येथील रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत. हे रुग्णालय १९९२ पासून अर्थात निर्मितीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे. या ठिकाणी देण्यात येणारी आरोग्यसेवा ही चिंतेची बाब असतानाच, रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या विविध सेवा, रुग्णांना देण्यात येणारी औषधं, रुग्णालयाचा अवाढव्य विस्तार आणि त्यासाठी पाणी-वीज व मनुष्यबळावर येणारा खर्च यांचे कोणतेही नियोजन नसल्याने येथील आरोग्यसेवेचा बोजवारा उडालेला आहे. रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या रुग्णांना सहा-सहा महिने प्रतीक्षा करावी लागते ही बाब अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक तसेच, मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरासाठी अत्यंत लाजिरवाणी अशी असल्याची टीका 'धर्मराज पक्षा'च्या वतीने करण्यात आली आहे.
शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना, तब्बल सहा-सहा महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याचे भीषण वास्तव, प्रसिद्धीमाध्यमांद्वारे उघड झाले असून, शस्त्रक्रियेसाठी सहा महिने प्रतीक्षा करुन, आपल्या जीविताशी खेळण्यापेक्षा, नाईलाजास्तव येथील रुग्णांना, खासगी रुग्णालयांत धाव घ्यावी लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना, कमीतकमी वेळेत उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी काही महिन्यांपूर्वी दिले होते. निवासी डॉक्टरांची संख्या वाढविणे, संगणकीकृत व्यवस्था मार्गी लावणे, याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. रुग्णालयाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊनदेखील, आरोग्यसेवेत सुधारणा होण्याऐवजी, ती अधिकाधिक बिघडत जाऊन, पुरता बोजवारा उडाला असल्याने, याप्रकरणी आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी, 'धर्मराज्य पक्षा'चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर आणि नरेंद्र पंडित यांनी, पत्राद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
दरम्यान, ठाणे शहराच्या मध्यभागी असलेल्या विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) नवीन इमारतींचे बांधकाम सुरु करण्यात आल्याने, तेथील रुग्णांचा संपूर्ण भार हा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर पडत आहे. अशा परिस्थितीत, रुग्णालय प्रशासनाने, अतिरिक्त सोयी-सुविधांनी सुसज्ज असणे क्रमप्राप्त असताना, उलट छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १४ पैकी ४ अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. ठाणे शहरासह, ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातून दररोज १००० ते १२०० रुग्ण, उपचार घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येत असतात. त्यातील ३० ते ५० रुग्ण, दररोज उपचारार्थ रुग्णालयात दाखल (admit) होत असतात. मात्र, त्यांच्यावर योग्य ते उपचार होत नसल्याने, रुग्णालयातील आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे अधोरेखित झालेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आरोग्यसेवा सुस्थितीत आणण्यासोबतच, शस्त्रक्रियेसाठी कराव्या लागणाऱ्या सहा महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी, तात्काळ २४ तासांवर आणावा आणि रुग्णालयात अधिक सुसज्ज आणि अद्ययावत यंत्रणा सुरु करावी, अशी आग्रही मागणी 'धर्मराज्य पक्षा'चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर आणि नरेंद्र पंडित यांनी, आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात शेवटी केली आहे.
यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रशासकीय विभागाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, तिथे उपस्थित असलेल्या माळगांवकर यांनी, सविस्तर माहिती देण्यास असमर्थता दर्शवून, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश हेच याबाबत अधिक खुलासा करतील असे सांगून, तुमच्याशी संपर्क साधला जाईल, असे सांगितले; मात्र, त्यानंतर अद्यापपर्यंत कोणीही संपर्क साधलेला नाही,
या रुग्णालयात असलेल्या सर्वच डॉक्टरांचे आपआपले खासगी दवाखाने असल्याने या ठिकाणी कोणतेच डॉक्टर उपलब्ध नसतात. केवळ हजेरी लावून ते आपल्या खाजगी दवाखान्यात निघून जात असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते अयुब आसार यांनी केला आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने तात्काळ सीसीटिव्ही फुजेट तपासावे, जेणेकरून या ठिकाणी कोणते डॉक्टर आपली सेवा बजावत होते याची माहिती होईल. मात्र प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. केवळ देखाव्याचे आंदोलन करण्यात इथले सर्वच पक्ष आणि लोकप्रतिनिधी गुंतले असल्याने भविष्यात अशा घटना पुन्हा पुन्हा होणार अशी भीती आसार यांनी व्यक्त केली.
0 टिप्पण्या