राज्यभरात पत्रकार संघटनांचे निषेध आंदोलन यशस्वी; मुंबईत ५० पत्रकारांना अटक ۔
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असतानाही त्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले वाढतच आहेत. संतापलेल्या पत्रकारांचा संघटनानी सर्वार्थाने कुचकामी ठरलेल्या या कायद्याची होळी केली.मुंबईत हुतात्मा चौकात कायद्याची होळी करण्याचा प्रयत्न करणार्या पत्रकार संघटनाच्या पन्नासाहून अधिक पत्रकारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.यांचे पडसाद राज्यभरात उमटले. पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर, झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच या हल्ल्याला चिथावणी देणारे पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करावी, महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी. इतर मागण्यांसाठी अनेक पत्रकार संघटनांनी गुरुवारी मुंबईत तीव्र आंदोलन केले. आंदोलनापूर्वी हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार संघटनांच्या पदाधिकार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनवर नेऊन समज देऊन सोडण्यात आले.
मात्र पत्रकार संघटनेचे पदाधीकारी आणि शेकडो पत्रकारांनी आंदोलन अधिक तीव्र केले. पत्रकारांनी काळ्या फिती लावून निषेध केला., सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आमदाराला अटक करण्याची आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरला. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि प्रेस क्लबच्या आवारात पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची होळी करण्यात आली.या आंदोलनात मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती, जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघ, मुंबई प्रेस क्लब, बृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट, क्राईम रिपोर्टर्स असोसिएशन, म्हाडा पत्रकार संघ (महाराष्ट्र) पोलिटिकल फोटो जर्नालिस्ट असोसिएशन, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, महापालिका पत्रकार संघ आणि उपनगर पत्रकार संघटना या संघटना सहभागी झाल्या होत्या.
मुंबईत हुतात्मा चौकात आंदोलन करणा-या संदिप चव्हाण, प्रविण पुरो, राजेंद्र साळसकर, दिपक पवार, विनायक सानप, विशाल परदेशी, एस۔एम۔देशमुख, किरण नाईक,शरद पाबळे, दीपक कैटके,राजा आदाटे यांच्यासह अनेक पत्रकारांना पोलिसांनी जबरदस्तीने पोलीस व्हॅनमध्ये कोंबून आझाद मैदान पोलिस ठाण्यात आणून नंतर सोडून देण्यात आले۔तत्पूर्वी एस۔ एम۔देशमुख,संदिप चव्हाण,शरद पाबळे यांनी पत्रकारांच्यावतीने हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले۔
पत्रकारांवरील हल्ले वाढत आहेत, हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकारांचे मित्र आहेत, असे आम्ही मानतो. त्यांनी महाजन यांच्यावर हल्ला करणारे आपल्या पक्षाचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित होते.असे न घडल्याने ११ पत्रकार संघटनांनी आंदोलनाचे पाऊल उचलले. पत्रकार भ्याड हाल्याला घाबरणार नाहीत. उलट अधिक जोमाने हल्लेखोरांविरुद्ध लिहितील. याची किंमत संबंधितांना मोजावी लागेल.
नरेंद्र वाबळे-- अध्यक्ष (मुंबई मराठी पत्रकार संघ)
देशभर पत्रकारांवर हल्ले होत आहेत. प्रेस कौन्सिलपुढे देशभरातून अशा हल्ल्यांची महिन्याला किमान ५० प्रकरणे येतात. हे संतापजनक आहें.प्रेस कौन्सिलची एक सत्यशोधन समिती लवकरच मुंबईत येणार असून संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याची व कोकणातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येची चौकशी करून आपला अहवाल पुढील कारवाईसाठी प्रेस कौन्सिलला सादर करणार आहे.
गुरबीर सिंग-- अध्यक्ष (मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष)
पत्रकार हल्लाविरोधी कायदा हा सक्षम आहे मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही, हे दुर्दैव आहे. गेल्या तीन वर्षांत पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांपैकी केवळ १५ टक्के हल्लेखोरांना या कायद्यांतर्गत शिक्षा झाली. यावरून या कायद्यांसंदर्भात पोलिसांची उदासीनता दिसून येते.
एस. एम. देशमुख---अध्यक्ष (मराठी पत्रकार परिषदेचे व पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती)
0 टिप्पण्या