Top Post Ad

“विपश्यना साधना : स्व-शुध्दीची गुरुकिल्ली”


  विपश्यना साधना तथागत भगवान गौतम बुध्दांनी सांगीतलेली चित्तशुध्दीची प्रक्रिया साधी व सोपी आहे.यात मिथ्या,आडंबर व अंधविश्वास नसुन फक्त विज्ञानावर आधारीत आहे. विपश्यना ध्यान साधना ही मन,शांती,आत्मक्लेश, दु:ख: तसेच अन्य विकारांपासुन मुक्ति मिळवुन देणारी भारताची प्राचिन काळापासुन प्रभावशाली ठरलेली ध्यान-साधना पध्दत प्रचलित होती, ती आजही कायम आहे. विपश्यना साधना केवळ सिध्दांत ,कर्मकांड, दार्शनिक मान्यता किंवा गुरु-भक्ति नसुन स्वानुभवावर आधारीत शास्त्र आहेप्रत्येक क्षणाला आपल्या अस्तित्वाला जाणणे आणि प्रज्ञेमध्ये स्थितप्रज्ञ होणे,हे कृतीशिल विद्येचे फलित आहे. चित्त,एकाग्रता ठेवून आणापान करते वेळी श्वासावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, तेव्हा ती अनुभुती आपणांस कळते. जेव्हा आपणांस सत्य स्वयं प्राप्त होते तेव्हा पोकळ मान्यता आणि अनुमानाला काही एक स्थान उरत नाही. हया विद्येमुळे व्यक्तिचा स्वभाव स्वत: बदलायला लागतो.ही प्रक्रिया चित्तशुध्दीवर आल्यानंतर आपोआप कळायला लागते, इतका जबरदस्त प्रभाव विपश्यना केल्यावर कळते. लोभ,राग,चिंता,भय,हिंसा, चोरी, कामुकता तसेच अंमली पदार्थाचे सेवन या सवयीला त्याग करुन संयमशील माणुस तयार होतो.तेव्हा खरं स्वरुप साधक स्वयं अनुभवायला लागतो.या पध्दतीच्या अभ्यासाचा फायदा अशासाठी महत्वपूर्ण आहे की, तिचे लक्ष आपल्या दुषित स्वभावाच्या मुळांपर्यंत जाऊ न देता त्याचा स्वत: अनुभव घेऊन त्यात सुधारणा करणे हे होय.काल्पनिक सांप्रदायिक मान्यतेपेक्षा वेगळी एखादी मान्यता थोपणे या विद्येच्या उद्देशाच्या पुर्णत: विरुध्द आहे.विपश्यना साधना महाकारुणिक आणि महावैज्ञानिक गौतम बुध्दाच्या शिकवणुकीचे हदय स्वरुप आहे. ही शिकवण मानवकल्याणार्थ सार्थक ठरलेली आहे. 

   या साधनेमुळे सम्यक सम्बुध्दीच्या ठिकाणी असा पुर्ण समतोल साधला गेला होता. हे मन तटस्थ असुनही लवचिक होतं. निर्धार या निश्चयाचा महामेरु असणारं हे बुध्दमन कर्तव्य कठोर असुनही कोमल आणि करुणामय बनलेलं होतं. हे मन सुदृढ,एवढं सजग सतर्क राहत असे की, कुठलाही विकार-विखार दुरुनच डोकावून दुर पळून जात असे. पूर्ण चित्त शुध्द तथागताच्या निर्मल मनाला कुठलाही अमंगल विचार-विकार कधीच स्पर्श करीत नसे. तथागताने हा मानवी सर्वोत्तम सर्वोच्य अवस्था प्राप्त केली ती “मनाची साधना” केल्यामुळे अर्थात ध्यानसाधनेच्या योगानेच त्यांनी प्रथम चित्ताची एकाग्रता साधली. पण चित्ताची एकाग्रता साधणे हे ध्यानसाधनेचे केवळ फलित नव्हे, तर अंत:करण शुध्दी आणि समतोलापणा साधणे ही साधनेची व्यक्तिमत्व संपन्न करणारी सर्व मंगल हेतूपूर्ती होय. हया साधनेतूनच श्वास (चिंतन-मननातून) नव्या सम्यक ज्ञानाचा साक्षात्कार झाला आणि बुध्दत्व प्राप्त झाले. तेव्हा पासुन सिध्दार्थ गौतम, हे सम्यक समबुध्द झाले. यावरुन लक्षात येईल की, विपश्यना केल्यामुळे माणसाच्या प्रवृत्ती आणि प्रकृतीवर किती परिणाम होणार, हे सांगण्याची गरज वाटत नाही. “जावे त्यांचा वंश, तेव्हा कळे” ही म्हण तंतोतंत लागू पडते. माणसा-माणसात प्रज्ञ, करुणा, मैत्री, संयमशीलता निर्माण करते. कुणाचाही ही विधी आकस करीत नाही. कोणत्याही जाती-धर्माचा असो सर्वांना ही विधी कल्याणकारी आहे.सर्वांचे मंगल व्हावे,यालाच “विपश्यना” म्हणतात. भवतु-सब्ब-मंगलम् !

गौतम बुध्दाच्या 2500 वर्षानंतर ही विद्या भारतातुप लुप्त झाली. एवढेच नव्हे तर, भारतातून बुध्दवाणीचेही अस्तित्व नाहीसे झाले.शेजारील देशांमध्ये सुध्दा काही कारणांमुळे तिचे शुध्द स्वरुप नष्ट झाले.केवळ म्यानमार (ब्रम्हदेश) मध्येच काही लोकांनी ही विद्या मागील 2000 वर्षापासुन शुध्द स्वरुपात सुरक्षित ठेवली. त्याच श्रृंखलेत 1969 मध्ये पुज्य गुरुदेव दिवंगत सयाजी ऊबा खिन यांच्या तीव्र इच्छे खातर आणि त्यांच्याच आदेशानुसार वर्तमान आचार्य दिवंगत श्री सत्यनारायण गोयंकाजींनी या विद्येला विशुध्द स्वरुपात पुन्हा एकदा भारतामध्ये घेऊन आले. विपश्यना साधना अनेक शतकांनंतर परत आल्यामुळे असे वाटले की, ती इथल्या लोकांसाठी नवीन आहे,परकी आहे. वास्तविकत: ती भारताची प्रमुख साधना पध्दती होती.परंतु त्याचा उहापोह त्याकाळी एवढा झाला नव्हता.परंतु मागील 40 वर्षामध्ये भारताचे हे साकारलेले स्वप्न पुन्हा एकदा पुर्ववत होऊन प्रकाश फैलावत आहे आणि जगातील जवळ-जवळ 90 देशात हा प्रकाश पसरलेला आहे. ऊशिरा कां होईना तो सध्या तरी भारतात स्थिर झाला आहे.

एकाच शिबीरामुळे मनांत साठवून ठेवलेल्या विकारांपासुन पुर्णत: मुक्त होऊ अशी  अपेक्षा बाळगू नये. पण हे खरे की,अधिकांश लोकांमध्ये आजही असा आत्मविश्वास आहे की, विपश्यनेच्या निरंतर अभ्यासाने शारीरिक,मानसिक आणि आध्यात्मिक लाभ तर निश्चितच होतो.त्यामुळे हजारोच्या संख्येने चांगली आणि वाईट लोकं या साधने मध्ये सकारात्मकतेने सामील होऊन स्वत: व कुटुंबाची सर्वांगीण जडण-घडण आपल्या जीवनी स्वच्छंद वातावरणात निर्माण करु पाहताहेत.ताणतणाव,चिंता,भीती इत्यादिंच्या नकारात्मक भावनांच्या स्वभावामध्ये अभाव झाल्याने काही लाभ तर एका शिबीरातुनच दिसायला लागतो आणि सततच्या अभ्यासाने हा लाभ वृध्दिगंत होत जातो. जो विकारांच्या पुर्णत: मुक्ति पर्यंत पोहचवतो.जगभरात राजकिय क्षेत्रातील व्यक्ति,व्यापारी,सरकारी अधिकारी,शिक्षक,विभिन्न संप्रदायांचे धर्मगुरु ई.च्या अनुभवांच्या आधारे हे सांगता येवू शकते की, गुरुदेव आचार्य सयाजी-ऊबा-खिन द्वारा शिकविलेली विद्या जगात क्रांती आणि आपल्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी सक्षम आहे.

भारतात आतापर्यंत 60 आणि जगभरात एकुण 153 विपश्यना केंद्राची स्थापना झालेली आहे. हया केंद्रांमध्ये 1200 पेक्षा अधिक प्रशिक्षित आचार्यांद्वारा ही विद्या जगातील 47 पेक्षा अधिक भाषांमधुन शिकविली जाते. त्या 10 दिवसांच्या दरम्यान पहिल्या टप्प्यात साधक आपल्या सहज स्वाभाविक श्वासाचं निरिक्षण करायला शिकतो. दुसऱ्या टप्प्यात आपल्या शरीरात निरंतर होणाऱ्या संवेदनांना सखोलतेने जाणुन घ्यायला लागतो. साधकाचं लक्ष्य केवळ श्वास आणि शरीर हयांना जाणुन घेणं नाही, तर त्यांच्याशी संबंधित मनाची एकाग्रता हे सुध्दा आहे. असं करतांना मनाला शांती मिळते आणि ते बलवानही बनतं.हया अभ्यासामुळे मनाचे दौर्बल्य कमी होते आणि त्याचे विकार स्वत: निघायला लागतात.त्या विकारांबरोबर त्यापासुन निर्माण होणाऱ्या दु:खांचाही अनुभव व्हायला लागतो.सगळेच संप्रदाय मनाला विकारांपासुन मुक्त करण्याच्या गोष्टी सांगतात परंतु साधारणत: त्याच्यापासुन प्रभावीपणे मुक्त होण्याचा मार्ग दाखवते. परिणामत: साधकाला शिघ्र लाभ होऊ लागतो. म्हणुन बुध्दाची शिकवण जगातल्या इतक्या देशांत शांततामय पध्दतीने पसरली आणि शेकडो वर्षापर्यंत लोकांचे कल्याण करत राहिली आहे. 
जगभरात पसरलेल्या विपश्यना साधनेच्या कुठल्याही केंद्रात साडे दहा दिवसाच्या शिबीरांमध्ये ही विद्या शिकायला कुठलेही शुल्क द्यावे लागत नाही शिवाय जेवण,राहणे ई. चे सुध्दा शुल्क घेतले जात नाही.शिबीर संपल्यानंतर जर एखाद्या साधाकाला वाटले की, मला जसा फायदा झाला तसा इतरांना ही व्हावा,तेव्हा त्यांच्या कडुन स्वेच्छापूर्वक केलेले दान स्विकारले जाते.

प्रविण बागडे
जरीपटका, नागपूर - 14
भ्रमणध्वनी : 9923620919

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com