ठाण्यात पुन्हा मृत्यूचे तांडव....
एका रात्रीत छत्रपती शिवाजी रुग्णालयात तब्बल १७ रुग्ण दगावले
चौकशी समिती नेमण्यात येणार -
१० ऑगस्ट रोजी पाच जणांना आपले जीव गमवावे लागले असल्याने ठाणे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना वरदान ठरत असलेल्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय आता मृत्यूचा आगार बनला असल्याची चर्चा ठाण्यात जोर धरू लागली आहे, त्यातच या प्रकरणाला एक दिवस उलटला नाही तोच काल एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर क्षमता, अपुरा कर्मचारी वर्ग आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे हे रुग्णालय आता मृत्यूचे आगार बनत चालले असल्याची चर्चा ठाण्यात जोर धरू लागली आहे. एकच रात्री मृत्यू झालेल्या 17 पैकी 13 रुग्ण हे आयसीयूमधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. रुग्णालय प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला असून, काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने तर काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. मात्र सिव्हिल रुग्णालय बंद झाल्यापासून ठाणे जिल्ह्यातील सर्व रुग्ण इथेच येत असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सदर घटनेवर प्रतिक्रिया देतांना म्हणाले, मी या प्रकरणाची सकाळीच माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव यांच्याशी चर्चा झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई सातत्याने संपर्कात होते. वेगवेगळ्या दिवशी दाखल झालेले रुग्ण आहेत. आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. जो अहवाल येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल, रुग्णालयात वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण आले होते. काही खासगी रुग्णालयातूनही आले होते. गंभीर स्थितीत त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्या सर्व गोष्टी त्यांनी माझ्या कानावर घातल्या आहेत. तरीसुद्धा झालेली घटना दुर्दैवी आहे आणि त्याची सखोल चौकशी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. हे प्रकरण नेमकं कशामुळे झालं आहे, याच्या मुळापर्यंत आम्ही जाणार असल्याचे सांगितले. तसेच याबाबत चौकशी समिती तयार करण्यात आली असून, अहवाल मागवला आहे. अहवाल येताच नक्की कारवाई होईल. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री गिरीश महाजन हे दोघे ही यावर लक्ष ठेऊन आहेत. तसेच मी सातत्याने या घटनेची माहिती घेत आहे. मी स्वतः तिथल्या आयुक्तांशी बोलत असल्याचे मंत्री तानाजी सावंत म्हणाले. वैद्यकीय शिक्षण या अंतर्गत ते हॉस्पिटल येते. तरी सुद्धा मृत्यू हा मृत्यू आहे. नेमकी कशामुळे ही घटना घडली याचा अहवाल एक ते दोन दिवसात येईल.
मला जेव्हा-जेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन येतात, तेव्हा लगेच मी हॉस्पिटलमध्ये येतो. पण माझ्या हातात प्रशासनाची चावी नाही, मला अधिकार असते तर लगेच डीनचे कानशिल लाल केले असते, असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संपूर्ण प्रकारावर आपला राग व्यक्त केला. बाजूला माणसं रडत असतात, सात तास बॉडी बेडवर पडलेली असते तरी डीनच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत नसल्याचे आव्हाड म्हणाले. ठाण्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आत जाण्याचा रस्ता मोठा आहे, पण हॉस्पिटलच्या आतमधून बाहेर येण्याचा रस्ता फक्त वरती आहे, या सर्व प्रकरणांनंतरही ठाण्याच्या प्रशासनाला जाग येत नसल्याची खंत आव्हाडांनी व्यक्त केली.
ठाण्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्सेस कमी आहेत, डॉक्टर्स कमी आहेत, याची जबाबदारी कोणी स्वीकारणार की नाही? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे. गरीब लोक फक्त मरण्यासाठी जन्माला येतात का? ठाण्यात फक्त रंग-रंगोटी, लायटिंग करण्याचं काम झालं, त्यात 400-500 कोटी रुपये घातले असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. महिनाभरात त्या लाईट्स बंद पडल्या तरी चालतील, त्यांची बिलं काढली की यांचं काम झालं, असंही ते म्हणाले. ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत हे आमचं भाग्य आहे, ठाण्याला एवढं मोठं पद मिळतं आणि प्रतिष्ठेचा माणूस मिळाला आहे, पण हृदयाच थोडं ममत्व, थोडी माया, गरिबाबद्दल थोडीशी आपुलकी असायला हवी, असा खोचक उपदेश आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना केला. यापूर्वी 10 ऑगस्टच्या रात्री याच रुग्णालयात 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्यांची मोठी कमतरता असल्याने उपचाराअभावी या सर्वांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. 5 मृत्यूंनंतर तरी मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यायला हवी होती, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं शहर असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, पण त्या पूर्ण होत नसल्याची खंत आव्हाडांनी व्यक्त केली.
तीनच दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अनागोंदी कारभार समोर आला होता. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णालयातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली. यामध्ये एका रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने, उलटी झाल्याने एका रुग्णाचा, एक अज्ञात आणि एका रुग्णाच्या पायाला गळू झाला होता. तर एका गरोदर मातेचे मृत्यू झाला होता. आणि आता पुन्हा एकदा रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा, मुख्यमंत्र्यांची ठाणे महानगरपालिका, त्यात असलेली वर्षानुवर्षांची सत्ता आणि त्याच महानगरपालिकेचे हे छत्रपती शिवाजी हॉस्पिटल, त्याच रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांना आपले प्राण गमावावे लागणं ही अतिशय धक्कादायक बाब आहे. गेल्याच महिन्यात मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात सुपर स्पेशलिटी कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन केले होते, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे, मात्र हे करत असताना सर्वात जुने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दुर्लक्षित झाले आहे का असा प्रश्न शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते चंद्रभान आझाद केला आहे.
ठाणे महानगर पालिका आयुक्त व प्रशासन अनधिकृत बांधकामे व भ्रष्ट अधिकारी यांच्यासाठी नियमित चर्चेत असताना आता वेळोवेळी आपल्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडविणाऱ्या पालिका प्रशासनाला याबाबत कोणतेही सोयरसुतक नाही. एका रात्रीत अठरा गरीब रुग्णांचा मृत्यू झाला मात्र रुग्णालय डीन डॉ अनिरुद्ध माळगावकर या वक्तीच्या चेहऱ्यावर कोणतेही गांभीर्य दिसले नाही. उलट मी किती बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरु होता. इतकच काय ठाणे मनपा आयुक्त यांनीही मयत रुग्ण व नातेवाईकांशी तात्काळ संपर्क साधला नसून असंवेदशिलतेचे उत्तम उदहरण दिले आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रथम पोहचणारे मनपा आयुक्त यांनी या प्रकरणाची तत्परतेने कोणतीही दखल घेतली नाही. आधी पाच मृत्यू झाल्याचे आढळून आले तेव्हाच जाऊन स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली होती. त्यानंतर लगेच १८ रुग्णांचा मृत्यू म्हणजे पालिका प्रशासनाची मुजोरगिरी, असंवेदनशीलता दिसून येते. या प्रकाराला पालिका प्रशासन आणि आयुक्त जबाबदार असल्याचे आरोप होत असून ठाणे मनपा आयुक्तांना जबाबदार धरून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.
दररोज शेकडो रुग्णांची वर्दळ असलेल्या ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अनागोंदी माजली आहे. बेड नसल्याचे कारण सांगून रूग्णांना दाखल करून घेतले जात नाही. परिणामी दूरवरून आलेल्या रुग्णांवर उपचार होतच नाहीत. केवळ पंख्याखाली बेड देण्यासाठी चक्क 500 रूपये मागितले जात आहेत. या रूग्णालयात उपचारासाठी गोरगरीब, मागासवर्गीय रूग्ण जात असतात. त्यांचा अप्रत्यक्ष छळच केला जात आहे. ठाणे शहर स्मार्ट केले जात आहे. शहरात ठिकठिकाणी रंगरंगोटी, लाईटींग केली जात आहे. त्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च केला जात आहे. कळवा हॉस्पिटलमध्ये उपचारच मिळत नसल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाईककडून केली जात आहे. एखाद्या रुग्णाला ऍडमिट करायचं असल्यास त्याच्याकडून मोबाईल चार्जिंगचे १००, आयसीयू बेड २०० तर ऑक्सिजन बेड २०० मागितले जात असल्याचा गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाइकानी केला आहे. आता राज्य सरकार दोन दिवसांत अवहाला नंतर प्रकरण शांत झाले की संबधित अधिकाऱ्यावर *क्लीनचिट* किंवा थातूरमातूर कारवाई केली जाईल. ज्याप्रमाणे ठाण्यातील शेकडो अनाधिकृत बांधकामावर केली जाते. पालिका प्रशासनाला याबाबत कोणतीही आस्था नाही. केवळ टक्केवारी कशी मिळेल यातच सर्व अधिकारी वर्ग गुंतलेला आहे. असा आरोप ठाणेकर करीत आहेत.
“मृतांमध्ये एक चार वर्षांचा मुलगा होता. त्याने मोठ्या प्रमाणात रॉकेल प्यायलं होतं. त्यामुळे आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. बाकीचे काही रुग्ण मागील काही दिवसांपासून उपचार घेत होते. कुणी तीन दिवस तर कुणी चार दिवसांपासून उपचार घेत होते. एका रुग्णाच्या डोक्याला मार लागला होता. या अज्ञात रुग्णाचाही मृत्यू झाला. तर अन्य एका रुग्णाच्या मेंदूला ट्रॉमा होता, त्यांचाही मृत्यू झाला. दोन रुग्णांची फुफ्फुसं खराब होती. त्या रुग्णांना संसर्ग होऊन मृत्यू झाला. इतर तीन-चार रुग्णांना मल्टी ऑर्डर डिस्फंक्शन झालं होतं. कुणाला हृदयाची समस्या होती, तर कुणाला अनियंत्रित मधूमेह होता. अशा रुग्णांना वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण त्यांना वाचवू शकलो नाही. आम्ही ५०० बेडच्या रुग्णालयात जवळजवळ ६०० रुग्ण अॅडमिट केले आहेत. येथील डॉक्टर्स २४-२४ तास काम करत आहेत. आम्ही शक्यतो कोणत्याही रुग्णाला परत पाठवत नाही. इकडे येणारा प्रत्येक माणूस गरीब किंवा आदिवासी असतो. ते अनेकदा अत्यावश्यक स्थितीत येतात. ते कसल्याही स्थितीत आले तरी आम्ही त्यांच्यावर उपचार करतो”, - राकेश बारोट, रुग्णालय अधिष्ठाता
0 टिप्पण्या