Top Post Ad

ठाण्यातील हे कॅन्सर रुग्णालय दिघे साहेबांच जिवंत स्मारक ठरेल - मुख्यमंत्री

 


आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजसेवा, शिक्षण आणि वैद्यक क्षेत्र यात कार्यरत असलेल्या जैन समाजाची जीतो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्टच्या वतीने ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय आणि त्रिमंदीर संकुल उभारण्यात येणार आहे. याचे  भूमिपूजन आज ठाण्यातील बाळकूम येथे आरएसएस प्रमुख डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.       यावेळी केंद्रीय पंचायत राज मंत्री  कपिल पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार,  ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे प्रख्यात वैद्यकीय कॅन्सर तज्ञ डॉ. शैलेश श्रीखंडे,   महसूल, पोलीस व इतर शासकीय विभागातील वरिष्ठ अधिकारी, व्यापार, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर यांची उपस्थिती होती.

 अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "या हाँस्पिटलच्या नावात आनंद आहे. ज्यांनी आयुष्याभर दुसऱ्यांच्या आनंदात आनंद शोधला. दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद दिला. त्यांच नाव ह्या हॉस्पिटलला दिल जात आहे. यापेक्षा आनंदाचा क्षण काय.? दिघे साहेबांच हे जिवंत स्मारक ठरेल. आज कँसर या रोगाचे प्रमाण वाढत आहे आणि म्हणून हॉस्पिटलची गरज आहे. नागपूर मध्ये पण एक हास्पिटल होत आहे, आज इकडे होत आहे याचा आनंद आहे."

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुरुवातीलाच ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलचे निर्माण करण्यात येत आहे, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानले. ते पुढे म्हणाले, या कार्यक्रमाला लाखो सेवा कार्य ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात ते सरसंघचालक पूज्यनीय मोहन भागवत व आध्यात्मिक गुरु दीपक भाई हे उपस्थित आहेत, हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. राजकारणापेक्षा सेवा करणारा नेता म्हणून धर्मवीर आनंद दिघे यांच्याकडे पाहिले जात होते.  जितो ट्रस्टच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. ज्याच्या मागे जितो आणि जैन समाज आहे, त्याच्याकडे संसाधनांची कमतरता भासत नाही. या ट्रस्टच्या माध्यमातून देशभरात मोठ्या प्रमाणात सेवा कार्य होत आहे.

 ते म्हणाले, कॅन्सर रोगामध्ये देशभरात दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 2035 पर्यंत कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होणार आहे. हा रोग जगातील दुसऱ्या क्रमांकाचा किलर रोग आहे. या रोगामुळे फक्त आजारी एकट्या व्यक्तीलाच नव्हे तर कुटुंबातील सर्वांनाच त्रास होतो. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून ठाणे शहरात कॅन्सर हॉस्पिटल होत आहे. आस्थेचे व सेवेचे मंदीर आजूबाजूला होत आहे. या हॉस्पिटलमध्ये आलेला रुग्ण बरा होऊनच जाईल, असा विश्वास आहे. 

     आरएसएस प्रमुख मोहन भागवत आपले विचार मांडताना म्हणाले की, आजच्या काळाची गरज उत्तम शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी आहेत. आपल्या देशात सोयीसुविधांचा अभाव आहे. इच्छा असूनही चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा मिळत नाही. या सुविधा सहज मिळू शकतील अशा अंतरावर असायला हव्यात. सध्याच्या काळात कॅन्सर हॉस्पिटल असणे आवश्यक आहे. मानवाची बदलती दिनचर्या (लाईफ स्टाईल) आणि सायकोसोमॅटिक आजारांमुळे हे सगळे होत आहे. कॅन्सर हॉस्पिटल हे सेवा कार्य आहे. आजच्या जीवनात संवेदना महत्त्वाची आहे. आपण चांगले केले तर आपल्याकडे चांगलेच येईल. आपण चांगले दिले तर आपल्याला चांगले मिळविता येईल. केवळ लाभासाठी काम करण्याची भावना ठेवल्यास लाभ होत नसतो. चांगले केले तरच चांगले होईल, यावर विश्वास ठेवायलाच हवा. सर्वांच्या आयुष्यातून दुःख जाण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. 

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितो एज्युकेशन व मेडीकल ट्रस्टचे अध्यक्ष अजय आशर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी जितो एज्युकेशन व मेडीकल ट्रस्टने विविध क्षेत्रात केलेल्या सेवाकार्याची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून दिली. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य सोयीसुविधांसह सहाशेहून अधिक खाटांचे नियोजन करण्यात येणार असून गरजू कॅन्सरग्रस्त रुग्णांना अत्याधुनिक क्रोटॉन थेरपीचीही सुविधा तसेच रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाईकांसाठी अत्यल्प दरात भोजन व्यवस्था देखील  असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

    कार्यक्रमाच्या शेवटी महेंद्र भाई जैन यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com