Top Post Ad

स्वधर्मी लोकांना इथलेच लोक गुलाम करत होते!

 


 दास प्रथेचा पहिला सविस्तर उल्लेख मनुस्मृतीत दिसतो. मनुस्मृतीनुसार (८/ ४१०/१४) सात प्रकारचे दास असतात, लढाईतून जिंकून आणलेला, उपासमारीमुळे दास झालेला, दासीपुत्र, विकत घेतलेला, भेट मिळालेला, वडिलांपासून आलेला, शिक्षेमुळे दास झालेला. वा. कृ. भावे यांनी पेशवेकालीन महाराष्ट्र या नावाचे पुस्तक १९३५ साली लिहिले. त्या पुस्तकात 'दास आणि दासी' असे एक प्रकरण आहे. या प्रकरणात ते कुणबीण ( मराठी कागदपत्रात कुणबीण हा शब्द ‘स्त्री-दासी’ या अर्थाने येतो. 

तत्कालीन लोक दासींना कुणबीणी किंवा बटिक म्हणत.) प्रथेविषयी ते लिहितात की, सरदार, अधिकारी, सावकार, व्यापारी तसेच पुरोहित यांचे घरी कुणबिणी बाळगण्याची प्रथा होती. या घरात काम करणार्‍या कुणबिणी शूद्र जातीतील ( मुंज करण्याचा वैदिक धर्माधिकार नसलेल्या जातीतील ) असत. घरात ठेवल्यानंतर त्या अस्पृश्य जातीतील निघाल्या तर प्रायश्चित्त घ्यावे लागे. काही वेळा घरात पोरगे ठेवीत. हे पोरगे स्त्री वेशात करमणूक करणारे तरुण असत. पोरगे आणि कुणबिणी हे गुलामच असत. कुणबिणींची खरेदी-विक्रीही चालत असे. साठ ते शंभर रुपयांपर्यंत किंमत असे... पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी यांच्याकडेही अनेक दासी होत्या. शाहू महाराजांनी पेशव्यांना पाठविलेल्या एका पत्रात ते सांगतात, "कोकणस्थांच्या आठ-दहा वर्षाच्या तीन-चार मुली पाठवाव्या." पेशव्यांकडे शे-दोनशे कुणबिणी असत. वेदशास्त्रसंपन्न पंडित यांचे घरी एक कुणबीण दोन वर्षे होती. त्यानंतर ती गर्भारशी राहिली आणि नाहीशी झाली.

ना. गो. चापेकर लिखित 'पेशवाईच्या सावलीत' या पुस्तकानुसार, महाराष्ट्रात मनुष्याची खरेदी-विक्री पेशवाईच्या अखेरच्या काळापर्यंत चालू होती. बायकाप्रमाणे पुरुषांचीही विक्री कदाचित होत असे, परंतु हे पुरुष बहुधा मुसलमान असत. 'सिद्दी सुंबरखा ह्याला कर्जीत घेतला होता, तो ९० रुपयांना विकला गेला होता.' बायकांची खरेदी-विक्री फारच मोठया प्रमाणाबर होई, अर्थात त्यात शूद्र स्त्रियांचा भरणा जास्त असे. ह्या अविवाहित स्त्रिया असत, पोरी थोरी कोणत्याही वयाच्या स्त्रिया विकत मिळत. स्त्रियात हिंदूंचा भरणा जरी विशेष असला तरी मुसलमान पोरीही विकत घेत आणि ह्या मुसलमानींनासुद्धा कुणबिणी म्हणत. ५०, ७५, ९०, १०० रुपयेपर्यंत कुणबिणीची किंमत येई, घरकामाकरता तसेंच उत्तरकार्यात दासीदानाकरिता कुणबिणी उपयोगी पडत. 

हरिदास, भिक्षुक, पुराणिक हे सुद्धा कुणबिणी खरेदी करीत. मोठ्या अमलदारांना कमाविसात कधी कधी कुणबिणी मिळत. म्हणजे त्यांच्याकरता पैसे द्यावे लागत नसत. विकत घेतलेल्या वस्तूंप्रमाणेच ‘विकत घेतलेली माणसे’ गहाण ठेवता येत असत/ ठेवली जात असत. बाळाजीपंत नातूंचा गाडेकर नांवाचा नोकर होता. त्याची गंगा कुणबीण गहाण घेऊन तिच्यावर त्याला चिपळूणकरांनी २० रु, कर्ज दिलें होतें आणि तेही इ. स. १८२२ साली म्हणजे ब्रिटिश अमदानींत. भावांमध्ये वांटणी झाली म्हणजे इतर जिनसांप्रमाणे कुणबिणीही वांटून घेत, एकच कुणबीण असल्यास तिची किंमत करून ती ज्याच्याकडे जाईल तो दुसऱ्याला तिची निम्मी किंमत देई, गुलामगिरीतून मुक्त करावयाची झाली तर तिच्यापासून नजर घेत. सणावारी कुणबिणींस पोस्त मिळे; दिवाळीची ओवाळणी मिळे. त्यांना नेसावयास लुगडी व पायांत घालण्यास जोडाही देण्यांत येई. सरकारी कुणबिणी दुसर्‍यास पैसे घेऊन कामास देत.

डॉक्टर वर्षा शिरगावकर लिखित 'पेशव्यांचे विलासी जीवन' या पुस्तकानुसार, मुलगी कुणबीण म्हणून विकण्याचे मुख्य कारण दारिद्र्य असे. बदकर्म अथवा व्यभिचार केलेल्या स्त्रियांनादेखील कुणबीण बनविले जायचे. ब्राह्मण व मराठा अधिकारी, हरीदास, भिक्षुक, पुराणिक घरात कुणबीण ठेवत. श्रीमंत घरातील कुणबिणीही आपल्या हाताखाली कुणबिणी ठेवीत. भावाभावांत वाटणी झाली तर इतर जिनसाप्रमाणे कुणबिणींचीही वाटणी होई. १८१८ साली पेशव्यांचा पाडाव झाल्यावर गुलामांच्या संख्येचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी राज्यात १५,००० गुलाम होते अशी नोंद आहे.

एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याला भाळून तिला आपल्या महालात उपस्त्री म्हणून ठेवणे, ही प्रथा पेशवाईच्या आधीपासून राजघराण्यात राहिलेली आहे. अशा स्त्रियांना पेशवाईत नाटकशाळा असे संबोधिले जाई. पहिल्या बाजीरावांनंतर ही प्रथा जोमाने पुढे आलेली दिसते. नानासाहेब पेशवे आपल्या दिल्लीतील कारभाऱ्याला पत्र लिहून दहा वर्षांच्या दोन-चार सुंदर हिंदू मुली खरेदी करून पाठवून देण्यास सांगतात. रघुनाथरावाकडे सात स्त्रियांची नोंद आहे. रघुनाथरावाने त्यांना पुण्यात घरे बांधून दिली होती. याशिवाय रघुनाथरावांनी नर्तकी ठेवल्या होत्या. त्यांना महिना १६० रुपये पगार होता. (आजचे ३ लाख) या सात नाटकशाळा आणि नर्तकी यांचा खर्च सरकारी खजिन्यातून चाले. दुसर्‍या बाजीरावाच्या काळात नाटकशाळांवर अचाट खर्च झाला. एका महिन्यात ८०० रुपये नाटकशाळांवर खर्च झाल्याची नोंद दिसते. काही सरदारांच्या बायका बाजीरावाच्या खास मर्जीत होत्या असे दिसते. विवाहित स्त्रियांशी संबंध राखणे आणि नंतर त्यांच्या पतीची त्याबद्दल बढती करणे हे सामान्य होते. ज्या सरदारांनी आपल्या पत्नींस बाजीरावकडे पाठविण्यास नकार दिला अशा सरदारांना बाजीरावाने त्रास दिला. यावरून बाजीरावाचे आयुष्य किती बदफैली झाले होते याची कल्पना येते... नाटकशाळांशी संबंध ठेऊन जर त्यांना मुले झाली तर त्यांना सरसकट शिंदे हे आडनाव दिले जाई. (पृष्ठ ३५)

सन १८६८ मध्ये ना. वि. जोशी यांनी पुणे शहराची माहिती या नावाने एक पुस्तक प्रसिद्ध केले. त्याची पुनरावृत्ती श्री. महाजन यांनी २००२ मध्ये प्रकाशित केली. या पुस्तकानुसार, त्या वेळच्या लोकांची स्थिती म्हटली म्हणजे सुग्रास खावे आणि रिकामटेकड्या गप्पा मारीत बसावे. शूरत्वाविषयी म्हणावे तर ते लोकांस अगदी नव्हते. शेवटील बाजीरावाने लोकांस अगदी नादान करून विषयनिमग्न करून सोडले होते. निर्लज्ज, अशक्त, अविश्वासू आळशी पुष्कळ खाणारे असे केले. जसे एखादे घर कुजके, पडीक, खिळखिळे होते तसे राज्य झाले. जहागीरदार मनास येईल तशी आपल्ये जहागिरीत वर्तणूक करी. रयतेवर जुलूम, लूट, दंगा करीत आपापसांत तंटा करीत. होळकरांचे लुटीची आठवण पुण्यातील लोकांस होती. होळकरांच्या शिपायांनी लोकांच्या घरांत जाऊन पैसा मागावा आणि जर पैसा नाही दिला तर मालकाचे अतिशय हाल करावेत.

 कितीक बायकांनी होळकरांचे शिपाई अत्याचार करतील या भीतीने विहिरीत उड्या मारल्या. राज्य बेकायदा झाले. कोण कोणास लुटील याचा भरवसा नव्हता. शिपाई निरुपयोगी पोटभरू लोक होते. लष्कर बेबंद, बेहिमत झाले. बाहेर पडले म्हणजे रयतेस लुटावयास मात्र तयार. पेशवे शिपायांस पगारही वेळचे वेळेस देत नसत, त्यामुळे लष्कर बेफाम झाले. लोकांचे धर्म आणि नीती अगदी बुडाली होती. रांडेपणाची श्रीमंती, भडवेपणा हलकी कामे मोठ्या लोकांच्या घरी होती. घरातील स्त्रियांची अब्रू जाऊन देणार्‍यास पेशवे चांगला म्हणत. लोकात अज्ञान फार होते. कोणास ठाऊक नव्हते की इंग्रज कोठले. विलायत कलकत्यात आणि कलकत्ता विलायतेत असे म्हणत.

आज हे सगळं वाचताना अंगावर काटा येतो. निग्रो लोकाच्या गुलामगिरीबद्दल तत्कालीन अमेरिकन लोकांना दूषणे देणारी आपली मान यामुळे आपोआपच खाली जाते. कारण, ते  परदेशी, परधर्मीय लोकांना गुलाम करत होते. भारतात मात्र स्वदेशी, स्वधर्मी लोकांना इथलेच लोक गुलाम करत होते!

 Rupali S. Girme

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com