Top Post Ad

चळवळीला फुटीचा शाप... अनेक गटा-तटात समाज व चळवळ विभाजित


  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्नांनी समाजात चेतना निर्माण करून नवसमाज घडविण्यासाठी संघटनाचे जाळे विणले. येथील व्यवस्थेला आव्हान निर्माण झाले. व्यवस्था खिळखिळी होऊ पाहत होती. आलेल्या मरगळीचा कसा मुकाबला करायचा. हर प्रकारच्या युक्त्याचा वापर करून फौलादी संघटनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करित होते. परंतु डॉ. आंबेडकरांच्या कुशल नेतृत्वाने त्यांच्या प्रयत्नावर पाणी फेरले. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना संधी चालून आली. त्यांनी बाबासाहेबांचे चरित्र लेखन करून, काव्यरचना करून आंबेडकर विचारात सर मिसळ करण्याचा प्रयत्न केला. १९५६ च्या नंतर मोठ्या प्रमाणात ब्राम्हणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर लेखन केले. अदभूत चमत्कारांचा वापर आंबेडकरी विचाराला फाटा देण्याकरिता उपयोग केला. त्यांनी ज्या अंधश्रद्धांना दैव वादाला ईश्वरवादाला नाकारले त्याचाच उपयोग करून समाजाला संभ्रमित  करून चुकीच्या दिशेने वळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 

त्यानंतर समाजातील नव तरुणांनी लेखनाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आघाडी उघडून प्रस्थापित साहित्याला जोरदार आव्हान उभे केले. त्याचवेळी ब्राम्हणी व्यवस्थेने प्रसार माध्यमातील आयुधे वापरून आपले जाळयात ओढण्यास सुरूवात केली. साहित्य क्षेत्रातील पुरस्कार वाटून काही लोकांना मोठे केले. मानसन्मान मिळाल्यामुळे उपकाराच्या ओझ्याखाली येऊन ते ब्राम्हनी व्यवस्थेचे वाहक बनले. संघटित शक्तीला विभाजित करून चळवळीला कमकुवत करण्याच्या दृष्टीने डावपेच आखून, आपले जाळे पसरविले. ह्या गळाला जो लागला त्याचा मोठ्या प्रमाणात उदो-उदो करून खरा आंबेडकर तत्वचिंतक, विचारवंत, साहित्यिक, कवी असल्याचा भास निर्माण करून अशांना हवा भरून तयार करण्यात आले. त्यांनी आपणच चळवळीचे खरे मार्गदर्शक असल्याचा आव आणला. काही काळाकरिता समाज आकर्षित झाला. परंतू जेव्हा ह्यांचा ढोंगीपणा लक्षात आला त्यावेळेस त्यांना ठोकरले, त्यांचे नेतृत्व अमान्य केले. चळवळीला फुटीचा शाप असल्यामुळे अनेक गटा-तटात समाज व चळवळ विभाजित होऊ लागली. संघटना विभाजित झाल्या मुळे ह्या विचाराला कमकुवत करण्यासाठी या चळवळीतील म्होरक्याला हातासी धरून हळूहळू ब्राम्हणवादाला खतपाणी घालण्या करिता प्रत्येक व्याख्यानात ब्राम्हणांनी आंबेडकरांना मदत केल्याचा देखावा निर्माण करतात. 

एक गोष्ट दृष्टी आड केली जाते की, ती कायस्थ प्रभू समाजाची मंडळी होती. (सहस्त्रबुध्दे , चिटणीस , ठाकरे इ . कायस्थ होते.) ब्राम्हणी व्यवस्थेत कायस्थांना हीन, शूद्र लेखले होते. म्हणून हा समाज ब्राम्हण समाजावर नाराज होता. लेखनीच्या क्षेत्रात कायस्थ समाज वरचढ असून सुध्दा ब्राम्हण त्यांना दर्जा देण्यास तयार नव्हता. त्यामुळे बाबासाहेबांच्या चळवळीला ह्यांनी साथ केली आहे. हा मुद्दा बाजूला सारून ब्राम्हणांनी मदत केली असी हाकाटी केली जाते. ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध आक्रोश वाढू नये, ह्यासाठी हे संथगतीचे विषप्रयोग केले जात आहे. बाबासाहेबांचा ब्राम्हणाला विरोध नव्हता. ब्राम्हण्यांना विरोध होता हे जन-मानसावर बिंबविण्याच्या सातत्याने प्रयत्न केला जात आहे. कोणताही विचार व्यक्तीशिवाय व्यक्त होऊ शकत नाही. ब्राम्हणवादही व्यक्तीशिवाय दिसू शकत नाही. ज्यावेळी पुरोगामी असो की प्रतिगामी आपल्यापरीने त्याचे विश्लेषण करून शब्दांचा हेर-फेर करून त्याचे संरक्षण केले जाते. 

मराठवाडा विदयापीठ नामांतरणाचे आंदोलन सुरू असताना समाजवादी ब्राम्हण हे नामांतर आंदोलनाच्या विरूद्ध आपले मत जाहिरपणे व्यक्त करित होते. समाजवादापासून तर कम्युनिस्टपर्यत सर्वानी डॉ . आंबेडकरांच्या चळवळीला विरोध केला आहे. काही भांडवलशाहीला विरोध केला गेला. परंतु येथील सामाजिक परिस्थितीचे योग्य निदान करण्याचे टाळून केवळ ‌भांडवलशाहीने विरोधी लढा उभारून मूळ व्यवस्थेला हात न लावता ती कायम ठेवण्याचीच भूमिका पार पाडली. जेव्हा बाबरी मस्जिद पाडण्यात आली, त्यावेळी नागपूरच्या ब्राम्हण पोलिस आयुक्तांनी आनंद व्यक्त केला होता. रामलल्लाचे संरक्षण करण्याकरिता प्रत्येक शाखेतील निरनिराळ्या रंगांच्या ब्राम्हणांनी समर्थन केले होते, हे आपल्या निदर्शनास येईल . 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हिंदू व्यवस्थेचा धिक्कार करून त्याला त्यागले, बुद्ध धम्माचा स्विकार केला. तेव्हा जस्टीस भवानी शंकर नियोगी व कुळकर्णी वकील दोघेही सोबत होते त्यांनी २२ प्रतिज्ञा ग्रहण केल्या. परंतु ज्यावेळी हिंदू धर्माचे रक्षण करण्याचा प्रसंग आला. त्यावेळी त्यांनी सेवानिवृत्त होऊन बराच काळ लोटल्यावरही अंगावर काळा कोट घालून मी हिंदू धर्मावर जे संकट आले व बुध्द धम्म स्वीकारण्याची चळवळ फोफावत आहे. तीला रोखण्यासाठी मी न्यायालयात उभा असल्याचा युक्तिवाद केला व बाबासाहेबांनी धम्म दिक्षा दिलीच नाही तर ती राजकीय सभा होती असा निर्वाळा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कोतवालाकरवी दिला. जस्टिस भवानी शंकर नियोगीनी म्हातारपणी ब्राम्हणवादाचे संरक्षण केले. सुरूवातीला आंबेडकरी चळवळीत राहून ह्या चळवळीच्या पाठीत खंजीर खुपसण्यास कमी केले नाही. आरंभी भवानी शंकर नियोगी व कुलकर्णी वकील हिंदू धर्मावर टिकास्त्र सोडीत होते. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. 

 ब्राम्हणांचा कैंवार घेणारे आंबेडकरी
डॉ . बाबासाहेब आंबेडकरांसोबत  असणारे शेवटपर्यंत सोबत  नव्हते तर कोणी समाजवादी झाले तर कोणी कम्युनिस्टाचा मार्ग स्विकारला तर कोणी शेतकरी कामकरी मार्गाचे सोबती झाले. कोणीही रिपब्लिकन पक्षासोबत नव्हते किंवा त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे समर्थन केल्याचे ऐकीवात नाही. परंतु स्वत:ला आंबेडकरवादी म्हणविणारे ब्राम्हण आंबेडकरी चळवळी सोबत होते, हे कंठशोष होईपर्यंत सांगत आहेत. ह्यावरून पाणी कोणत्या दिशेने वाहत आहे, याची कल्पना येते. 

इतिहास हे सांगते की, ज्या ज्या वेळी समतेची चळवळ मजबूत होत होती त्यावेळी विषमतावादी मंडळीनी बुध्दीचातुर्याने त्यात बिजारोपणा करून दूरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ब्राम्हणी व्यवस्था टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून डोळ्यात तेल औतून पाहारा देत असतात. ब्राम्हणी व्यवस्थेचे हित रक्षण करण्याचा ठेका स्वत:ला आंबेडकरवादी म्हनविणाऱ्यांनी घेतला काय? हे वारंवार ब्राम्हण बाबासाहेबांसोबत होते हे सांगून सिद्ध करित नाही काय? आंबेडकरी चळवळीतील स्वत:ला मार्गदर्शक समजणारे बहुजनातील समर्थनकाविषयी शंका निर्माण करून त्यांच्या विषयी गैरसमज  पसरविण्याचा हेतुपुरस्पर प्रयत्न करित असतात. डॉ. बाबासाहेबांनी समतेच्या चळवळीला मदत करित असतील त्यांना सोबत घ्यावे. 

बहुजन समाजाला समतेच्या चळवळीत उतरविण्यासाठी त्यांच्यात जनजागृती करून त्यांना विषम व्यवस्था विरोधी बनविण्याचे कार्य करावे असे म्हटले होते. परंतु आज बहुजन समाजातील जागृत आंबेडकरी विषयी शंका निर्माण करुण आपण कोणत्या चळवळींचे वाहक बनत आहोत, याचा विचार होणे आवश्यक आहे. बहुजन वर्ण व्यवस्थेचा गुलाम असून त्याची त्यातून मुक्तता होण्याकरिता प्रबोधन व्हावे. एकमेकांशी भांडणारे पण ब्राम्हणासमोर बटू आंबेडकरवादी चळवळीत मग ते सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय, साहित्यिक हे एकमेकांचे तोंड पाहणार नाही. साधे बोलणार नाही. आपल्या अहंकारात च वावरत असून, माझाच गट खरा असून बाकी सर्व खुजे आहेत. अशी भूमिका प्रत्येक गटाच्या म्होरक्याची आहे.

 त्यामुळे एका ठिकाणी येऊन ऐक्यावर चर्चा होत नाही. ज्यावेळी राजकीय नेतृत्वाला सत्यता हस्तगत करण्याकरिता दलितांच्या मताची आवश्यकता असते. त्यावेळी मजबूरीने राजकीय पक्षाचे ऐक्य केले जाते. रिपब्लिकन पक्षाची एकी फक्त सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी केली जाते. हे  रिपब्लिकन पक्षाच्या एकीकरणाच्या इतिहासावरुन सिद्ध होते. बाबासाहेबांनी संघटनेचा जो धाक देशभर निर्माण केला होता. त्याला सत्तेच्या तुकड्यांनी विभाजन करून कमी केला. तेव्हा जेव्हा भावनिक प्रश्न उकरून काढले जातात. तेव्हा समाज रस्त्यावर उतरण्यास तयार होतो. ही मानसिकता सत्ताधारी लोकांना माहित असल्यामुळे त्याचा खुबीने उपयोग करित असतात. साहित्य क्षेत्रात वावरणारे गट सुध्दा एकमेकांविषयी चांगले बोलत नाहीत, उणीधुनी काढण्यास कमी करत नाही. परंतु ब्राम्हणांनी हाक दिल्याबरोबर सर्व सरळ सूतात आल्यागत त्यांच्या हाकेला 

ओ देऊन त्यांच्या भोवती पिंगा घालत असतात. समविचारी ब्राम्हणेतराविषयी फटकून वागत असतात. ही नीती बदलून समतावादी प्रवाहानी समविचारी लोकांची मोट बांधून समतेचा विचार प्रगल्भ होणे आवश्यक आहे. ब्राम्हणेतरांनी सुद्धा ब्राम्हणी मानसिकतेतून बाहेर येऊन दलित आदिवासी बहुजनांची संघटना तयार करून, ब्राम्हणी गुलामी व ब्राम्हणी राष्ट्राविरुध्द आवाज बुलंद करून नवराष्टाची निर्मिती करण्यास तयार व्हावे. अस्तीनातील सापा पासून सावध राहून त्यांना तिथेच ठेचणे आवश्यक आहे. त्याशिवाय ब्राम्हणी राष्ट्राला आपण पर्याय देऊ शकणार नाही. ह्यासाठी फुले- आंबेडकर चळवळीने आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. ज्या महापुरुषांनी आपले आयुष्य चंदनासारखे झिजविले व समाजात आत्मसन्मान निर्माण केला. स्वाभिमानाने जगण्यास शिकविले त्यांची शिकवण अंगी बाळगून कृतीत उतरविने आवश्यक आहे. त्याच दिवशी समतेचे चक्र गतीमान होईल!

विनायकराव जामगडे
मों  ९३७२४५६३८९ / ७८२३०९३५५६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com