सिद्धार्थ बुद्ध विहार कमिटी, भारतीय बौद्ध महासभा व त्रीरत्न बौद्ध महासंघ यांच्या वतीने आषाढी पौर्णिमा तथा गुरुपौर्णिमा तसेच वर्षावास निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ठाणे कोपरी पूर्व येथील सिद्धार्थ बुद्ध विहार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रा विजय मोहिते यांनी उत्कृष्ठ धम्मप्रवचन दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बौद्धाचार्य भगवान डेंगळे गुरुजी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून धम्मप्रवचनकार नित्यबोधी, आबासाहेब चासकर, अशोक भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसीतकुमार आणि मनोज गरुड यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक बनसोडे, दीपक जगताप,संजय गांगुर्डे, यांनी प्रयत्न केले.
मानव कल्याणाचा जीवन मार्ग धम्म म्हणजे भगवान गौतम बुद्धांचा शोध आहे, धम्माला भगवान बुद्धांनी शास्ता म्हटलेलं आहे, असे मत प्रा विजय मोहिते यांनी आपल्या व्याख्यानात मांडले.ते पुढे म्हणाले की, एकदा सिद्धार्थ गौतम विहार करीत असताना सिद्धार्थाला पाहून किसा गौतमी उत्स्फूर्तपणे बोलली की, किती शांतपूर्ण असतील सिद्धार्थाचे माता पिता, हे ऐकून सिद्धार्थाने तिच्याकडे आपल्या गळ्यातील आभूषणं भिरकावली तीला वाटले सिद्धार्थ माझ्याकडे आकर्षित झाले असावे, पण तसे नसून सिद्धार्थाने विचार केला की,किसा म्हणते माझे जन्मदाते अवर्णनीय शांत सुंदर आहेत,तर मीही तसाच असीम शांतीपूर्ण असेल त्याक्षणी सिद्धार्थाने आत्मपरीक्षण आत्मशोधाला स्वतःला पारखायला स्वजागृतीला सुरुवात केली, तेथेच किसा गौतमी गुरुमार्गदर्शीका ठरली, म्हणूनच तीला सिद्धार्थाने आभूषणं दिली, तो आत्मशोध धम्मशोधाचा धागा आहे, म्हणूनही धम्म भगवान बुद्धांचा शोध आहे,
संपूर्ण देशात फिरुनही आपणास संस्कृतनगर मराठीनगर हिंदीनगर, पाहायला ऐकायला मिळत नाही,पण पाली शब्द असलेली अनेक ठिकाणं, आपल्या आजूबाजूला सापडतात,जसे पालीहिल आहे, या सर्व बुद्धकालीन खानाखुणा आहेत, मुंबईत म्हातारीचा बुट म्हणतात ते महाथेरी बेट आहे, असे अनेक बुद्धकालीन शब्द अपभ्रंशाने बदल झालेले दिसून येतात, बुद्ध पर्वात आजच्या आषाढी पौर्णिमेला फार महत्त्व आहे, बुद्धांची संबोधी प्राप्ती,महाभिनिष्क्रमण, आणि धम्मचक्क पवत्तन, या आषाढी पौर्णिमेला घडलेल्या घटना आहेत,
बुद्धांच्या संबोधी प्राप्तीनंतर लगेचच भटकंती करणारे दोन बंजारा म्हणजे आत्ताचे वंजारी तपस्सू आणि भल्लीक हे भेटले, तेव्हा भगवान बुद्धांनी खरेतर सर्वप्रथम संपूर्ण जागृतीची संबोधी प्राप्तीची हकीकत त्यांना सांगीतली, बुद्ध वचन ऐकून तपस्सू आणि भल्लीक यांनी भगवंताला वंदन करून मधाचे दोन लाडू स्विकारण्याची विनंती केली, म्हणून आपला वंजारी समाज भगवान बुद्धांच्या धम्माचा पहिला श्रावक आहे, प्रथम अनुयायी आहे, बाकी सर्व नंतर आहेत, असेही प्रा.विजय मोहिते यांनी आपल्या व्याख्यानात स्पष्ट केले,
अश्वघोष हे बुद्धाचे चाहते असल्याने बुद्धचरित्र लिहिणारे जगातील पहिले विद्वान होते त्यांनी संस्कृत मधून लिहिलेले बुद्धचरित्र अप्रतिम आणि अतिशय लालित्यपूर्ण व ओघवत्या शैलीने लिहिले असल्याने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर अश्वघोष यांनी लिहिलेले बुद्धचरित्र वाचून प्रभावित झाले, अश्वघोष यांनी लिहिलेल्या बुद्धचरित्राचा आधार घेऊन नव्या रुपात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची निर्मिती केली अशीही माहिती प्रा. विजय मोहिते यांनी यावेळी सांगीतली
0 टिप्पण्या