ठाणे जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यात मुख्य तसेच अंतर्गत मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे शहरात काही सखल भागात पाणी साचले होते. तसेच तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आलेले खड्डे पुन्हा पडल्याने कोंडीत भर पडली. वाहतूक कोंडीमुळे नोकरदारांचे हाल झाले.
गेल्या 24 तासात झालेला मुसळधार पावसात शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. अंबरनाथ पूर्व भागातील मुख्य नाला धोकादायक स्थितीत असल्याने या नाल्याने रेल्वे रुळाला देखील आपल्या मगर मिठीत घेतले. या नाल्याच्या पाण्याचा प्रवाह एवढा जास्त होता की अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकांच्या मध्यावर असलेल्या रेल्वे रुळाखालील खडी देखील वाहून गेली आहे. हा रेल्वे मार्ग धोकादायक झाल्याने या ठिकाणची अप आणि डाऊन दिशेकडील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. सोशल मीडियावर संतप्त प्रवासी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडीओ फोटोच्या माध्यमातून ट्रेनचे अपडेट्स शेअर करत आहेत. बदलापूर ते अंबरनाथ मधील रेल्वे रुळाचे काही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, कल्याण, डोंबिवली परिसरात मागील तीन तासात जोरदार पाऊस झाला आहे. विठ्ठलवाडी परिसरात मागील तीन तासात ५७ मिमी तर कल्याण शहरात ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. डोंबिवली परिसरातही मागील तीन तासात ४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई लोकलचं वेळापत्रक कोलमडले असून पावसाचा मध्य आणि हार्बर रेल्वेला मोठा फटका बसला आहे. पनवेल ते बेलापूर दरम्यान वाहतूक ठप्प आहे. तर अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूकदेखील बंद आहे. मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असल्याने सर्वच ट्रेन आता उशिराने धावत होत्या. मुंबईसह ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्यात संतधर पाऊस सुरू आहे अचानक पावसाचा जोर वाढत असल्याने दोन्ही जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या, नैसर्गिक नाले भरून वाहत आहेत. कर्जत, नेरळमार्गे बदलापूर आणि कल्याण तालुक्यातून वाहणारी उल्हास नदी इशारा पातळीवरून वाहते आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी शिरण्यात सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो आहे. आपत्कालीन परिस्थितीत पालिका प्रशासनाची संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेकडून केले जाते आहे.
जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे ठाण्यात काही सखल भागात पाणी साचले होते. पादचाऱ्यांचे तसेच परिसरातील नागरिकांचे हाल झाले. दुपारी पावसाने काहीशी उसंत घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शहरातील मुख्य मार्ग, महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घोडबंदर मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती.
घोडबंदर मार्गावर कासारवडवली, वाघबीळ भागात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचेही या मार्गावर काम सुरू आहे. त्यामुळे मार्गावरोधकांमुळे कोंडीत भर पडत होती. भिवंडी शहरातही रस्त्यांची दैना झाली आहे. रस्त्यावर चिखल आणि खड्डे यामुळे दापोडे, अंजूरफाटा भागात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे कामाहून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. डोंबिवली, कल्याण आणि बदलापूर भागातही पावसाचा जोर कायम होता.
कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील काळू, बारवी, उल्हास नद्यांना पूर आला आहे. या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. या नद्यांचे पाणी परिसरातील गावांमध्ये घुसले आहे. गावांना जोडणारे अंतर्गत पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटून दळणवळण पूर्ण बंद झाले आहे. सर्वाधिक वाहन वर्दळीच्या कल्याण-मुरबाड रस्त्यावरील रायते येथील उड्डाण पूल पुराच्या पाण्याखाली गेल्याने कल्याण-अहमदनगर मार्गावरील रस्ते वाहतूक बंद झाली आहे. अनेक वाहन चालकांनी माघारी परतून शहापूर, सरळगावमार्गे तर काहींनी नाशिकमार्गे अहमदनगरकडे जाण्याचा निर्णय घेतला.
कल्याण-नगर महामार्गावरील रायते गावा जवळील उल्हास नदी दुथडी वाहत आहे. या नदीवरील रायते पांजरपोळ येथील पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. टिटवाळ्या जवळील काळू नदी दुथडी भरुन वाहत आहे. नदी काठच्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने दिल्या आहेत. वालधुनी, उल्हास नदीचे पाणी म्हारळ, कांबा, वरप परिसरात घुसले आहे. त्यामुळे या भागातील ९० कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. म्हारळ, कांबा परिसरात बांधण्यात आलेल्या कल्याण-नगर रस्त्याची उंची तीन फूट उंच वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या गावांच्या हद्दीतून वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याला अनेक ठिकाणी अडथळे आले आहेत. मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक ठप्प होऊ लागल्याने बहुतांशी शाळांनी मुलांची गैरसोय टाळण्यासाठी दुपारनंतर शाळा सोडून देणे पसंत केले.
0 टिप्पण्या