शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची केंद्रसरकारवर टिका
राम मंदिरासाठी कायदा करा असे आम्ही सांगितले होते. राम मंदिरासाठी कायदा केला नाही. पण, लोकशाही संपविण्यासाठी कायदा करीत आहेत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात एका कार्यक्रमादरम्यान केला. मी मोदी किंवा कोणत्या व्यक्तीविरोधात नाही. मी हुकूमशाहीच्या विरोधात नक्की आहे.असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने हिंदी भाषी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. ठाण्याचे खासदार राजन विचारे हे या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक होते. या कार्यक्रमाला पक्षाचे लोकसभा खासदार संजय राऊत, राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी, समन्वयक कोकण विभाग विजय कदम, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे, शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे, उपनेते अल्फाफ भाई शेख पप्पु अठवाल यांची विशेष उपस्थिती होती.
तर ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, बेलापूर विधानसभा जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, ऐरोली विधानसभा जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, हिंदी भाषिक ठाणे जिल्हाप्रमुख प्रभाकर सिंग, हिंदी भाषिक मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख राजेश सिंग, हिंदी भाषिक नवी मुंबई जिल्हा प्रमुख संदीप शर्मा, ठाणे महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा मोहिते, नवी मुंबई महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, ठाणे जिल्हा प्रवक्ता चंद्रभान आझाद, प्रवक्ता आनंद दुबे, सहप्रवक्ता किसन आदी मान्यवर उपस्थित होते.
दुसरीकडे असेल तर तो मळ आणि तुमच्याकडे आला तर तो कमळ, असा टोला लगावत भ्रष्टाचाऱ्यांची बुलेट ट्रेन सुसाट घेऊन जाणारा भाजप आता भ्रष्ट जनता पक्ष झाला आहे, अशी टीकाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. विश्वगुरू, महाशक्तीचा प्रमुख अशा नेत्याच्या राजवटीत मणिपुरमध्ये महिलांची अब्रु लुटली जात आहे असे ठाकरे यांनी नमूद करत, देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत. त्यांना काही संवेदना आहेत की नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आधी भारतात बाहेरच्या देशातून मुघल यायचे. बाबरही बाहेरच्या देशातून आला होता. त्यामुळेच तर आपण बाबरी मशीद पाडली. त्यानंतर इंग्रज आले. इंग्रजांशी लढताना आपल्या अनेक पिढय़ा मरण पावल्या. पण आपण लढत राहिलो. शेवटी इंग्रजांनाही आपला देश सोडून जाव लागले. आता आपल्या घरातलेच आपल्या डोक्यावर बसू पाहत आहेत. २०२४ ची संधी हुकली तर रेल्वे सुटली असेच समजावे लागेल. त्यानंतर आपला देश आपल्या हातून निसटून जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
गडकरी रंगायतन बाळासाहेब ठाकरे यांची देण आहे. निवडणुकीवेळी एका सभेत बाळासाहेब ठाकरेंना ठाण्यात नाट्यगृह नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की, ‘तुम्ही शिवसेना सत्ता द्या, मी तुम्हाला नाट्यगृह देतो.’ त्यानंतर ठाण्यात नाट्यगृह झाले. नाट्यगृह आम्ही दिलं पण नाटक काही लोक करत आहे. काहींना वाटते मी म्हणजे ठाणे आहे. पण, नाही… ठाणे आणि शिवसेना यांचं नात आहे… ते पण खरी शिवसेना… खरी शिवसेना यामुळे म्हटलं की बाजारात आता चायनीज मालही येत आहे. असेच काही चायनीज, बनावट, बोगस आणि गद्दार स्वत:ला शिवसेनेपेक्षाही मोठे समजतात. मात्र, ते एवढ्या वर जाऊ शकत नाही, एकमेकांमध्ये भेदभाव करतात, त्याला हिंदुत्व म्हटलं जात नाही. याला चाणक्य नीतीही म्हटलं जाऊ शकत नाही. पण, कुटनिती बोललं जाऊ शकते. ज्या स्वत:च्या स्वार्थासाठी काही लोक वापर करत आहेत,” असं टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
यावेळी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला . काही लोकांना लवकरच ठाणे सोडून पळून जावे लागणार आहे, अशी अप्रत्यक्षपणे टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे. ठाण्याचं नाव काढलं तरी, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगे यांच्या नावाने रोमांचं उभे राहतात. ठाणे शहराचा अर्थ म्हणजे निष्ठा. शिवसेनेला पहिली सत्ता दिली आणि भगवा झेंडा फडकवला, ते ठाणे शहर आहे. गडकरी रंगायतन सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांची देण आहे. याच गडकरी रंगायतनमध्ये तिच निष्ठा, श्रद्धा आणि ताकद आहे. ही गर्दी पाहून मला वाटलं, काही लोकांना लवकरच ठाणे सोडून पळून जावं लागणार आहे. आम्ही ठाण्यात येणार आणि येत राहणार. कारण, हे ठाणे शहर आमचं आहे. कोणीही आम्हाला रोखू शकत नाही. ‘हम तख्त बदलेंगे… ताज बदलेंगे… गद्दारोका राज बदलेंगे’. हा संदेश फक्त ठाणे शहरातून द्यायचा होता. त्यामुळे आम्ही ठाण्यात आलो आहोत, ठाणे हे मर्दांचं शहर होते आणि राहिलं. डरपोकांचं शहर म्हणून ठाणे आम्ही कधीच ऐकलं आणि पाहिलं नाही. आनंद दिघे यांच्याकडे पाहून आम्हाला नेहमी हिंमत यायची. कोणत्याही संकट्याशी सामना करत बाळासाहेब ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून ते उभे राहिले. संकटात पळून जातो, तो नामर्द असतो,” अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
0 टिप्पण्या