Top Post Ad

महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचा संपता संपेना खुर्चीचा खेळ


    महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी राज्य सरकारमधले दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० ते ४० आमदारांचा अजित पवारांसह सरकारला पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीकडून आणि त्यातही अर्थमंत्री असलेले अजित पवार यांच्याकडून निधी वाटपात सातत्याने अन्याय होत असल्याची ओरड होत होती. या विरोधात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट बंडाचा झेंडा उगारला. मात्र आता या नव्या राजकीय घडामोडींमुळे शिवसेना शिंदे गटाची कोंडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागेल या आशेवर असणाऱ्या शिंदे गटातील आमदार सत्तेत तिसरा वाटेकरी आल्याने अस्वस्थ असल्याच्या चर्चेने आता जोर धरला असून स्थानिक राजकारणातही राष्ट्रवादीतून सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांच्या स्पर्धेला शिंदे गटाला तोंड द्यावे लागणार आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपाचा विकृत पॅटर्न आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात असून लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु असून सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाचे तोडफोडीचे महाभारत केले आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.  

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर भाष्य करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा जनाधार घटत आहे. हिमाचल प्रदेश व कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या विजयाने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्येही भाजपाचा दारुण पराभव होत असल्याचे चित्र दिसत आहे. देशात व केंद्रातही परिवर्तन करण्याचा जनतेचा इरादा दिसत आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस आघाडीला जनतेचे समर्थन मिळत असल्याचे दिसत असल्याने फोडाफोडीचे राजकारण केले आहे. ईडी सरकार बहुमताचा दावा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाला सोबत घेण्याची गरज नव्हती पण आमागी निवडणुकीत लाज राखण्यासाठी फोडीफोडीशिवाय भाजपाकडे दुसरा पर्याय नव्हता त्याच मानसिकतेतून हा सत्तापिपासू उद्योग केला आहे. 

उद्धव ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्याने हिंदुत्व धोक्यात आल्याचा आव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना केला होता. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असल्याच्या वल्गनाही ते करत असतात. आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटासोबत सत्तेत बसताना शिंदेंचे हिंदुत्व पावन झाले का? याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल. परवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. आता भाजपा, नरेंद्र मोदी व फडणवीस कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या एका गटासोबत सत्तेत बसले आहेत, याचे उत्तरही महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे लागणार आहे. 

कोण-कोणाबरोबर सत्तेसाठी घरोबा करत आहे हे जनतेला स्पष्ट दिसत आहे. जनतेला हे फोडाफोडीचे राजकारण अजिबात आवडलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने जाण्याने काँग्रेस आघाडीवर कसलाही परिणाम होणार नाही उलट काँग्रेस पक्ष जास्त ताकदीने व जनतेच्या विश्वासावर मोठ्या बहुमताने निवडून येईल. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तसेच केंद्रातही सरकार सत्तेत येईल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

भाजपबरोबर गेलेले प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ हे चार नेते ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत. भाजपबरोबर जाण्यात हे महत्त्वाचे कारण असल्याचे बोलले जाते. ईडीचा धाक दाखवून विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात येतो. राष्ट्रवादीच्या नेत्यांपैकी छगन भुजबळ यांना अटक झाली होती. प्रफुल्ल पटेल यांचीही चौकशी झाली आहे. अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळयाचा आरोप आहे. जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीत अजितदादांवर टांगती तलवार आहे. प्राप्तिकर विभागाने या प्रकरणात अजितदादांच्या बहिणींच्या घरांवर छापा टाकण्यात आला होता. हसन मुश्रीफ हे साखर कारखाना घोटाळ्यात अडकले आहेत. त्यांचीही ईडीची चौकशी झाली. मुश्रीफ यांना अटक होणार असे किरीट सोमय्या ठामपणे सांगत होते. भाजपबरोबर गेल्याने चौकशी थंड बस्त्यात जाते हे लक्षात आल्याने भाजपबरोबर जावे असा पक्षातील नेत्यांचा मतप्रवाह होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com