कुस्तीगीर महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात, राजन राजेंचा जोरदार घणाघात..._
"दिल्लीतील महिला कुस्तीपटुंच्या कथित लैंगिक शोषणासंदर्भातील निदर्शनात सहभागी होताना, आम्हाला वेदनाही होतायेत आणि आमच्या अंत:करणातून एकप्रकारची स्फूर्तीदेखील जागृत झालेली आहे. कारण, हे आंदोलन आता, दिल्लीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, ते आता देशभरात पसरलंय. ज्यांनी भारताचा गौरव सातासमुद्रापार नेला, ज्यांचा आम्हाला अभिमान वाटतो, अशा आमच्या महिला ऑलिम्पिकपटूंना, उपोषणस्थळावरुन ज्यापद्धतीने फरफटत नेलं, त्यामागे दिल्ली पोलीस नसून; तर, पडद्यामागून ज्यांनी सूत्रं हलवली, त्यांचं नाव 'दिल्लीश्वर-सरकार' आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे!" अशा शब्दात 'धर्मराज्य पक्षा'चे अध्यक्ष राजन राजे यांनी, आपला संताप व्यक्त करुन, मोदी सरकारवर जोरदार घणाघात केला. कुस्तीगीर महिला लैंगिक अत्याचारविरोधी खेळाडू आणि नागरिक समिती, मुंबई व विविध क्रीडा तसेच सामजिक संघटना यांच्या वतीने दादर रेल्वे स्टेशन समोरच्या सुविधा स्टोअरजवळ आयोजित केलेल्या निषेध आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते.
'मोदी-शाह'पुरस्कृत बेबंदशाहीवर शरसंधान साधताना, राजन राजे पुढे म्हणाले की, "एका बाजूला नव्या संसद भवनाच्या उद्घाटनादिवशी, 'सेंगोल'ची नाटकं करत, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना न बोलवता, त्यांचा घनघोर अपमान करता, माजी राष्ट्रपती कोविंद यांनाही आमंत्रण दिले नाही... अनेक पायंडे तोडलेत, जे आजपर्यंत या देशात कधीही घडलं नव्हतं. पंतप्रधान म्हणून नव्हे; तर, एखाद्या अनभिषिक्त सम्राटासारखा, त्यादिवशी राज्याभिषेक सोहळाच जणू सुरु होता... आणि, त्याचवेळी दुसऱ्या बाजूला, आपल्यावरील झालेल्या अत्याचाराविरोधात दाद मागण्यासाठी बसलेल्या महिला कुस्तीगीरांना, अक्षरशः गुरासारखं फरफटत नेता, ही कुठली लोकशाही?" असा संतप्त सवाल राजे यांनी यावेळी आपल्या भाषणातून उपस्थित केला.
या निषेध आंदोलनाला उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना राजन राजे पुढे म्हणाले, "सचिन तेंडुलकरसारखी मंडळी, अदानी-अंबानी आणि भाजपाई भांडवली-व्यवस्थेच्या ताटाखालची मांजरं झाल्यासारखी वागतातयत, हे दुर्दैव आहे. पण, अशावेळी, १९८३चा विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघ असो किंवा प्रवीण ठिपसेंसारखे बुद्धिबळपटू असोत, त्यांचा अंतरात्मा जागा झाला, ही बाब महत्त्वाची. मोदी-शाहांचं बोलायचं एक आणि करायचं वेगळं असंच चाललंय. "बेटी बचाओ... बेटी पढाओ", म्हणायचं आणि त्यांच्याच खासदाराने महिला खेळाडूंचं कथित लैंगिक-शोषण करायचं? तुमच्यापैकी एकाने तरी, त्याबाबतचे FIR वाचले असतील तर, अंगावर काटा उभा राहतो. आणखी दुसरा कोणता पुरावा हवाय? पोक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवलेला असतानाही, अद्याप बृजभूषण सिंगवर अटकेची कारवाई झालेली नाही. आणि, आतातर, याप्रकरणी खेळाडूंच्या कुटुंबियांवर एवढा दबाव वाढलाय की, अल्पवयीन महिला खेळाडूच्या वडीलांनी तर, पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, "डर के मारे, हम हमारा बयान पिछे ले रहे है"... अशी भीषण परिस्थिती असल्याचं राजन राजे म्हणाले. मिलिंद रानडे यांच्या पुढाकारातून आयोजित, या निषेध आंदोलनात ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, महेंद्र चेंबूरकर, फिरोज मिठीबोरवाला, प्रा. संगीता जोशी, जय कवळी, मनोहर साळवी आणि राजू महाले आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या