Top Post Ad

हा तर पोलिसांचा अपमान, आनंद परांजपे यांचा शासनावर आरोप

 


 जे पुढारी लोकप्रतिनिधीच्या कोणत्याही परिभाषेत समाविष्ट होत नाहीत. जे नोकर सत्ताधाऱ्यांच्या घरातील भाजी आणण्याचे काम करीत आहेत; त्या  आणि सत्ताधाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकांसह ज्यांना संरक्षणाची गरज नाही; ज्यांना धमकी आलेली आहे किंवा नाही, याची शहानिशा न करताच ठाणे पोलीस आयुक्तालयाने शेकडो जणांना पोलीस संरक्षण पुरविले आहे.  विशेष म्हणजे, या अंगरक्षकांना फुलांचे गुच्छ पकडण्यास लावत आहेत. तसेच, त्यांना चक्क मिठाई आणण्यासाठी दुकानात पाठवले जात आहे. अशा पद्धतीने हे सत्ताधारी ठाणे पोलिसांचा अपमान करीत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत केला.  

 100 पेक्षा अधिक लोकांना जी सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे. त्याची यादी ठाणे पोलिसांनी जाहीर करावी, असे आवाहन  बुधवारी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले. याबाबत अधिकृत माहिती जगजाहीर व्हावी, यासाठी आनंद परांजपे यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज केला आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सदर आरोप केले.  

 कुठल्याही निकषानुसार पोलीस संरक्षणासाठी पात्र ठरत नाहीत, अशा लोकांनीही पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. अगदी स्वीय सहाय्यकांच्या दिमतीला कार्बाईनधारक दोन पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. घरातील भाजीपाला खरेदीसाठी जाणाऱया नोकरालाही पोलीस संरक्षण पुरविण्यात आलेले आहे. पोलीस संरक्षण ज्यांना पुरवण्यात आलेली आहे. त्यांची यादी अत्यंत धक्कादायक असल्याने ठाणे पोलीस ती यादी देणार नाहीत. त्यामुळेच आपण माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन ही सर्व माहिती मागवलेली आहे. 

1 जून 2022 पासून ठाणे आयुक्तालयात जे-जे लोकप्रतिनिधी-केंद्रीय मंत्री,खासदार,  राज्यातील मंत्री, आमदार असतील; यांच्या व्यतिरिक्त माजी लोकप्रतिनिधी, व्यावसायिक व इतर लोक यांना सुरक्षा पुरवण्यात आली असेल तर त्याची तपशीलवार माहिती आपण मागवली आहे. त्यासाठी किती मनुष्यबळ लागत आहे; ज्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे, त्यांनी सुरक्षेसाठी अर्ज केला होता का? संबधित व्यक्तीला खरोखर धमकी आली होती का किंवा तसा अहवाल राज्य गुफ्तवार्ता विभागाने सादर केला आहे का? तसेच, हे संरक्षण सशुल्क की विनाशुल्क पुरविण्यात आले आहे का? अन् हे संरक्षण सशुल्क असेल तर किती जणांनी हे शुल्क अदा केले आहे? कोणाकोणाचे शुल्क जमा करण्यात आलेले नाही आदी स्वरुपाची माहिती आपण ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेकडे मागवली आहे.  

पोलीस संरक्षण ज्यांना पुरवण्यात आले आहे; त्यांच्यामध्ये काही व्यावसायिकही आहेत. त्यांचे व्यवसाय स्वच्छ की 'काळे' हे सर्वांनाच माहित आहे. म्हणूनच आपण ही माहिती मागवली आहे. जर, ही माहिती दिली नाही तर आपण कायदेशीर मार्गांचा अवल़ंब करु! कारण, हा जनतेचा कररुपातून जमा झालेला पैसा आहे. त्यातूनच पोलिसांचे पगार होत आहेत. ज्यांना सुरक्षेची गरज नाही. अशा लोकांना संरक्षण देण्यात येत असून प्रत्यक्ष शुल्क अदा करणाऱ्यांची सुरक्षा काढण्यात येत आहे, अशी टीकाही आनंद परांजपे यांनी केली. 

   आजमितीला ठाणे आयुक्तालयातील  सुमारे 600 पेक्षा अधिक पोलीस हे संरक्षणासाठी पुरवण्यात आलेले आहेत. अनेक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी दबक्या आवाजात मनुष्यबळ कमी असल्याचे सांगत आहेत. विशेष शाखेने अनेक पोलिसांना सुरक्षा कामी तैनात केले असल्याची खंतही हे पोलीस अधिकारी खासगीमध्ये व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रिद धारण केलेले पोलीस खरी माहिती देतील, अशी अपेक्षाही आनंद परांजपे यांनी व्यक्त केली.  

धक्कादायक बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथचे  शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यावर हल्ल्याचे प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे त्यांनी सुरक्षा पुरवण्यासाठी अर्ज केला होता. त्यापोटी त्यांनी 4 लाख 79 हजार 668 रुपये हे शुल्क जुलै ते सफ्टेंबर या तीन महिन्यांसाठी अदा केले आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार गेले अन् अवघ्या 12 दिवसांतच त्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले. हे संरक्षण काढल्यानंतर त्यांचे उर्वरित 3 लाख 80 हजार 662 रुपये परत करण्यात आलेले नाही. म्हणजेच, जी व्यक्ती पोलीस संरक्षणासाठी शुल्क जमा करते; त्या व्यक्तीचे संरक्षण काढण्यात येते आणि ठाण्यात जे माजी नगरसेवक लोकप्रतिनिधीच्या निकषामध्ये बसत नाहीत, त्यांना संरक्षण पुरवण्यात येत आहे, असा आरोप परांजपे यांनी केला.  

अजित पवार यांनी बुधवारी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. आपणही अशीच विनंती करीत आहोत. शेखर बागडे हे जेव्हा कळवा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांचे वर्तन उद्धट, उर्मट आणि लोकसेवेला काळीमा फासणारे होते. लोकप्रतिनिधींशी बोलताना ते अरेरावी केल्या आहेत. याबाबत आम्ही अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत. 

आता भाजपचेच मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तशी मागणी केली आहे. मिंधे गट आणि भाजपाच्या वादाशी आपणाला देणेघेणे नाही. पण, शेखर बागडे हे  वर्तन उद्धट, उर्मट अधिकारी आहेत. आपणाला आशा आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धारीष्ट दाखवतील! ते कोणाच्या आशीर्वादाने मानपाडा पोलीस ठाण्यात बसलेत हे सर्वांनाच माहित आहे. आमचे माजी नगरसेवक कुणाला पाटील यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता. किमान आता तरी चौकशी झाली पाहिजे; लाचलुचपत प्र]ितबंधक खात्यामार्फत चौकशी होत असताना त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले पाहिजे, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे, असेही परांजपे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com