बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्याचे दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहू महाराजांनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. खेड्यापाड्यांतील मुलांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळावी यासाठी त्यांनी कोल्हापुरात वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नाशिक, पुणे, नगर, नागपूर आदी ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू महाराज हे देशातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन हे त्यांनी आपले जीवित कर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूमही जारी केले.
सामाजिक सुधारणांबरोबरच शाहू महाराजांनी शेती व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपूरी, जयसिंगपूर यासारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहू महाराजांनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. हजारो राजे झाले, मात्र माणसातला राजा, राजातला माणूस हाच आणि असा सन्मान लाभणारा राजा म्हणजे राजर्षि शाहू महाराज!
वारसा नेमका कशाचा असतो हे लख्खपणे समजलेला राजा.! महाराष्ट्रातल्या आदिवासी, डोंगराळ, दुर्गम, ग्रामीण भागातल्या शाळा 'परवडत नाहीत‘ म्हणून नादान राज्यकर्ते बंद करायला निघतात तेव्हा तब्बल शंभर वर्षापूर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा कायदा मंजूर करून अंमलात आणणारा हा राजा. शिक्षण व्यवस्था भांडवली हातात देऊन बटिक करायला राज्यकर्ते आतुर झालेले आहेत तेव्हा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात बहुजनांच्या शिक्षणासाठी बोर्डिंग, शाळा उघडायला सढळ हस्ते मदत करणारा हाच राजा. संपूर्ण मुंबई इलाख्याचे शिक्षणाचे बजेट होते त्यापेक्षा जास्त तरतूद आपल्या राज्यात करून ते पैसे शिक्षणावर खर्च करणारा खरा शिक्षणमहर्षी !! जेव्हा दलित समाजातल्या माणसाला घोड्यावरून मिरवणूक काढली म्हणून मारहाण केली जाते तेव्हा शंभर वर्षापूर्वी दलित माणसाला आपल्या गावात हॉटेल काढून देऊन तिथे चहा प्यायला जाणारा या राजाबद्दल काय सांगावं.
ऑनर किलिंग सारखा हिडीस प्रकार बोकाळलेला असताना, पोटच्या लेकरांचे जीव घेणारे हैवान असताना शंभर वर्षापूर्वी आपल्याच घरात मराठा धनगर विवाहाबाबत पुढाकार घेऊन साकार करणारा राजा. मुलींच लग्नाचं वय कायद्याने वाढवून, सज्ञान मुलांना स्वतःच्या लग्नाचा हक्क कायद्याने देणारा तोही १०० वर्षांपूर्वी, दूरदृष्टी असलेला राजा.! जेव्हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फीचे पैसे सरकारने दिले नाहीत म्हणून पदवी प्रमाणपत्र मिळायला अडवल जात तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे उभा राहणारा राजाला प्रत्येक जण सलामी देतोच. महाराष्ट्रात लेकीबाळी हंडाभर पाण्यासाठी पाच पाच किलोमीटर पायपीट करतात तेव्हा दूरदृष्टी दाखवून धरण बांधून सिंचनाची सोय करणारा राजा. लोकशाही मार्गाने लोककल्याणकारी राज्यव्यवस्था राबवणे अपेक्षित असलेल सरकार भांडवलदारांच्या तुंबड्या भरण्यात दंग होत तेव्हा मर्यादित अधिकार आणि संसाधन असताना लोककल्याण साधणारा राजा. पिढीजात वारसा, संपत्ती काहीही पाठबळ नसताना केवळ ज्ञानाच्या जोरावर संपत्ती आणि अधिकार मिळवता येतो हे सांगणारा राजा. अशा एक ना अनेक अंगानी आपलं राजर्षिपण लोकाभिमूख करणारा हा राजा... त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन....
--- सुबोध शाक्यरत्न (ठाणे)
--------------------------------------------------
0 टिप्पण्या