Top Post Ad

वो मिट्टी में मिल जायेगा...


पुरोगामीत्वाचा बुरखा ओढणाऱ्या महाराष्ट्रात आजही तथाकथित गावगुंड आंबेडकरी समाजावर ऐनकेन प्रकारे हल्ले करीत असताना दिसत आहेत. यामागचे नेमके कारण मात्र अस्पष्ट आहे. मागील महिन्याभराच्याही कमी कालावधीत फारच भयंकर घटना घडल्या.  ज्यामध्ये भालेराव सारख्या तरुणाला भररस्त्यात गावगुडांनी मारले. इतकेच नव्हे तर त्याचा भाऊ आणि आईसह कुटुंबालाच मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामागे कारण काहीही असले तरी खैरलांजीसारख्या किंवा भर मुंबईतल्या घाटकोपर सारख्या हत्याकांडामधून आंबेडकरी समाज काही शिकला नाही हे सत्यच आहे. एखादं हत्याकांड झालं की गल्लोगल्ली निषेध मोर्चे निघतात. आंदोलने होतात.  ही आंदोलने देखील तुटक तुटक, प्रत्येक गट-तट आपआपल्या सोईनुसार करत असल्याचे दिसते. हल्ली तर सोशल मिडीयावर निषेधाचे बोर्ड झळकावले की झाले काम. मात्र आपल्या लोकांवरच जास्त हल्ले का होतात तर याला कारण आहे असहायता. 

मात्र याचे कारण शोधायला कुणाकडे वेळ नाही.  आज एकसंघ किंवा ज्याचा दरारा आहे असं म्हणता येईल असा कोणता पक्ष दृष्टीपथात नाही. प्रत्येक गट आम्हीच राष्ट्रीय असल्याचा तोरा मिरवताना दिसतो. आपले नेतेपण जपण्यासाठी ते बाहेरुन समाजासोबत तर आतुन आपल्या फायद्यासाठी जोरदार प्रभाव असलेल्या पक्षासोबत जवळीक साधून आहेत. आज असा एकही गट-तट नाही जो सत्ताधारी किंवा एखाद्या प्रस्थापित पक्षाचा मिंदा नाही. कुबड्यांशिवाय गटनेता चालूच शकत नाही. मात्र त्यामुळे कार्यकर्त्यांचे बळी जातात. बरे हे कार्यकर्ते देखील जाणिवपूर्वक नको त्या गोष्टी करत असतात. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या परिसरातील लोकांशी मिळते जुळते घेऊन चर्चा करून सामोपचाराने मार्ग काढायला कोणीही तयार होत नाही. आपला गटनेता आपल्याला आधार देईल या फाजील विश्वासाने ते परिसरात आपली धमक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. समोरच्यांची शक्ती किती आहे याचा अंदाज न आल्याने आजही हा समाजाचा  बळी जात आहे. 

बाबासाहेबांची जयंती आज जगभरात साजरी होतेय. मात्र जयंतीला असे करायचे आणि तसे करायचे असा खाक्या मिरवल्या जात असतो. त्यामुळे ही प्रस्थापित व्यवस्था आपल्यावर रोष ठेवतात. आपले लोक बोलतात आणि विसरतात आणि मार्गी लागतात. पण इथली प्रस्थापित व्यवस्था गाफील क्षणी आपला सूड घेते, आपल्यावर हल्ला करते अशा वेळी आपल्यासोबत कोणी नसते. आजवरच्या घटनांमधून ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे.  ज्या लोकांकडून जंयतीची वर्गणी घेतो. जोरदार कार्यक्रम करतो. त्यांच्याच सामाजिक भावना डिवचण्याचे काम का करायचे. अशावेळी बुद्ध तत्त्वज्ञानाचा मात्र विसर पडतो. आणि शब्दाला शब्द मारक ठरतात आणि त्याचे रुपांतर वैयक्तीक वैमनस्यात होते.  बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीवेळी घोषणा देतात, हमसे जो टकरायेगा वो मिट्टी में मिल जायेगा. आला रे आला वाघ आला. मात्र जयंती झाली की हे वाघ कुठे असतात हे फक्त समोरच्या विघातक शक्तीला चांगलेच ठाऊक असते आणि ते मग त्याची शिकार करतात.  

 घोषणा जोशात होतात त्यामुळे ज्यांचा मेंदू आजही त्यांच्या ताब्यात नाही अशा समाजाचा रोष ओढवून घेतला जातो आणि त्यानंतर जे घडते ते भयानकच आहे.  मुळात आजही शिक्षणाचा अभाव असल्याने खरं काय खोटं काय हे इथल्या बौद्धेत्तर  लोकांना समजलेच नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हेच जर त्या लोकांना समजले नसतील तर प्रकांड पंडित बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांना काय समजणार. त्यांच्या मेंदूत इथल्या साडेतीन टक्केवाल्यांनी एवढेच भरून ठेवले आहे की हा समाज तुमच्यापेक्षा खालचा आहेत. यांच्यामुळे तुमचे देव बाटतील व तुम्ही नरकात जाल. हे पक्क डोक्यात बसलेल्या लोकांना काय समजणार  तथागत बुद्ध, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले,  राजर्षी शाहू महाराज,  राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई, 

  आजही बाबासाहेबांना मानणारा हा समाज अधिकतम मजुरीची कामे करतो मात्र मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करतो. पण कधी सामाजिक बांधिलकी जपत नाही. आधीच जानवेधाऱ्यांचाच नव्हे तर त्यांच्यासोबत जे स्वत:ला उच्चवर्णिय समजतात या वर्गाचा प्रचंड रोष आहे. त्यांच्या मेंदूत आंबेडकरी समाजाबाबत प्रचंड द्वेष भरून ठेवलेला आहे. आणि शुल्लक शब्दांनी या द्वेषाला खतपाणी घालण्याचे काम होते.  समाजाच्या गोष्टी काही फितूर बाहेर सांगतात. मग त्या फितुर झालेल्याला माहित नसतं की आज ना उद्या त्याच्यावरही असाच अत्याचार होणार आहे. पण तोपर्यंत तो सुखाने फिरत असतो. एकेकाला खिंडीत गाठून संपविण्याचा कारस्थान मागील अनेक घटनांवरून दिसून येत आहे. आता यांचा आधी विचार करायला हवा. परिसरातील सामाजिक स्थितीचा अभ्यास करून मगच लढा. समाजातील राजकीय नेत्यांनी आजपर्यंत कधी आर्थिक बळ दिल्याचे ऐकीवात नाही. निवडणुका आल्या की दुकानदारी करणारी ही मंडळी आपला हिस्सा बरोबर घेतात. पण त्या हिश्श्यातुन समाजासाठी काय मिळतं. तर नाही. गावात एकही किराणा दुकान नसल्याने आपल्यावर बहिष्कार घालुन ही व्यवस्था आपले जगणे मुश्किल करते. नांदेडच्या घटनेने हे आपण पाहिलेच आहे. समाजाचे राजकीय नेते कधी जिल्हाप्रमुखसाठी गाडी किंवा इतर साधने पुरवितात काय. हल्ला झाला तर ताबडतोब भेट देता येईल असे काही उपाय आहेत का?  याचा विचार कधी करणार. उठ सुठ बोल दलिता हल्ला बोल... हे अजून किती दिवस चालणार याचा सांगोपांग विचार करण्याची आज वेळ आली आहे. 

आज आंबेडकरेत्तर समाजाने अनेक सहकारी क्षेत्र काबीज करून स्वत:चा विकास करून घेतला. आणि त्याच बळावर राजकीय क्षेत्रही हातात ठेवलं आहे. सहकारी तत्त्वावर वाडी तेथे दुकान हा प्रयोग राबविला जातो कधी सुपर बाजार संकल्पना राबविली जात आहे. मात्र आंबेडकरी समाजाचं काय तर काही नाही. आता तर सोशल मिडियावरूनही वॉर सुरु झालंय. कधी उलट मेसेज पाठवला तर पाठवणारा कोणाचा आहे हे बघून तसा मेसेजला पाठींबा द्यायचा की विरोध करायचा हे ठरवले जाते. पण समाज म्हणून त्या मेसेजकडे पाहण्याची दृष्टी मात्र आजही आम्हाला लाभली नाही. इथे भावाभावात पटत नाही तर गटा-तटाचं ऐक्य कधी होणार....?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com