Top Post Ad

राष्ट्र सेवेचा एक मार्ग स्पर्धा परीक्षा

१. यूपीएससी (UPSC) सिविल सर्विसेस : संघ लोकसेवा आयोग - नागरी सेवा 

सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचे मूल्य बर्‍याचजणांना समजत नाही. त्यापैकी एक म्हणजे युपीएससी (UPSC) ची परीक्षा. ब्रिटिशांच्या सुरुवातीच्या राज्यात केवळ युरोपीय लोकांना ज्या सेवेत प्रवेश मिळे. पुढे म्हणजे १८५७ चे स्वातंत्र्य समरानंतर ही सेवा भारतीयांनापण उपलब्ध करून देण्यात आली परंतु अशा जाचक अटी ठेवल्या की अत्यल्प प्रमाणात भारतीय येथे यावेत. या परीक्षा देण्यासाठी इंग्लंडला जावे लागे. त्यावेळी परीक्षेला आयसीएस (ICS) म्हणून ओळखले जायचे. सत्येन्द्रनाथ ठाकूर (टागोर) हे पहिले भारतीय ही परीक्षा उत्तीर्ण झाले नेताजी सुभाषचंद्र बोस ही परीक्षा चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. राष्ट्रीय सभेच्या (काँग्रेस) सुरुवातीच्या मागण्यांपैकी एक मागणी या परीक्षा भारतात घ्याव्या ही होती. १९२२ ला ब्रिटिश पावले आणि १९२२ मध्येच प्रयागराज (तेव्हाचे अलाहाबाद) येथे पहिल्यांदाच ही परीक्षा घेण्यात आली. आता स्वतंत्र भारतात या परीक्षा महाराष्ट्रातही घेतल्या जातात. पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण परिक्षेला सामोरे जाण्याचेही आणि उत्तीर्ण होण्याचेही कमी आहे. म्हणून हा लेखन प्रपंच 

पात्रता : वय - ज्या वर्षी परीक्षा देणार त्या वर्षातील एक ऑगस्टला न्यूनतम 21 पूर्ण. अधिकतम वयोमर्यादा गटानुसार भिन्न आहे. खुला गट 32 वर्ष, अनुसूचित जाती 37 वर्ष, ओबीसी 35 वर्ष,

शिक्षण : युजीसी (UGC) मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातील कोणत्याही शाखेचा पदवीधर. पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थीही वयोमर्यादेत बसत असतील तर परीक्षा देऊ शकतात. upsc.gov.in या संकेतस्थळावरून परीक्षेसाठी अवेदन भरावे. स्त्रीयांसाठी परीक्षा शुल्क नाही. पुरुषांसाठी शंभर रुपये परीक्षा शुल्क असते. 

किती वेळा परीक्षा देता येते ?

ही परीक्षा खुल्या गटातील विद्यार्थी सहा वेळा देऊ शकतात. ओबीसी नऊ वेळा. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती 21 ते 37 वयोमर्यादेत प्रत्येक वर्षी देऊ शकतात. 

परीक्षेचे स्वरूप काय असते ?

तीन टप्पे असतात. 

१. पूर्वपरीक्षा २. लेखी मुख्यपरीक्षा ३. व्यक्तिमत्व चाचणी 

१. पूर्वपरीक्षा - ही बहुपर्यायी प्रश्न या स्वरूपाची असते. यात पेपर १ आणि पेपर २ असा समावेश असतो. 

पेपर १ : यात १. इतिहास २. भारतीय स्वातंत्र्य लढा ३. भूगोल ४. जीवशास्त्र ५. रसायनशास्त्र 

६. भौतिकशास्त्र ७. अर्थशास्त्र ८. पर्यावरण ९. राज्यशास्त्र १०. सद्यपरिस्थिती या विषयांचा समावेश होतो. साधारणत: बारावी इयत्तेपर्यंतच्या प्रश्नांचा समावेश असतो. 

पेपर २ : यात १. आकलन उताऱ्यावर चे प्रश्न २. अंक गणित ३. तर्कशास्त्र ४. विश्लेषण शास्त्र 

५. सांख्यिकी ६. संवाद ७. नेतृत्व गुण इत्यादी विषयांचा समावेश होतो. 

पेपर १ आणि २ दोन्ही २००-२०० गुणांचे असतात. पैकी पेपर एकचे  गुण पुढच्या फेरीतील प्रवेशासाठी विचारात घेतले जातात. तर पेपर दोन मध्ये केवळ उत्तीर्ण होणे, म्हणजे २०० पैकी ६६ हून अधिक गुण मिळवणे आवश्यक असते. अन्यथा उमेदवाराचा विचार केला जात नाही. साधारणत: एक हजार जागा भरायच्या असल्यास पूर्व परीक्षेद्वारे दहा ते चौदा सहस्त्र जणांची निवड होते. परंतु कट-ऑफचे  गुण लगेच घोषित केले जात नाहीत. केवळ निवडलेल्या विद्यार्थ्यांचे क्रमांक संकेतस्थळावर घोषित केले जातात. यानंतरचा टप्पा असतो तो मुख्य परीक्षेचा. 

२. मुख्य परीक्षा : ही संपूर्ण लेखी परीक्षा असते. यामध्ये असणारे पेपर पुढीलप्रमाणे असतात 

१. इंग्रजी - स्वातंत्र्योत्तर भारतात या भाषेची आवश्यकता काय ? असा प्रश्न बुद्धिवान लोकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. पण लगान चित्रपटाच्या खलनायकाच्या तोंडी असलेला 'तूम साला गुलाम लोग' संवाद मनोमन पटतो. स्वातंत्र या शब्दाचा अर्थ निश्चित करणे ते मिळवणाऱ्या पिढीतील काही लोकांना आवश्यक होते. तर स्वतंत्र भारतात इंग्रजी येणे आवश्यक आहे. यामध्ये क्वालिफाईड म्हणजे केवळ उत्तीर्ण होण्यापुरते गुण मिळवायचे असतात. हे गुण एकूण संख्येमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत. 

२. भारतीय भाषा - हा प्रकारही इंग्रजांनी सुरू केलेला व आज आपण सुरू ठेवला आहे. कोणती एक भारतीय भाषा निवडायची आहे. अर्थात तुम्ही नागभूमीचे रहिवासी असाल तर त्यांच्यासाठी इंग्रजी ही भारतीय भाषा म्हणून घेता येते. ही सुध्दा उत्तीर्ण होण्यापुरतीच आहे. तिचे गुण हे एकूण संख्येत विचारात घेतले जात नाहीत

3. निबंध लेखन - येथून पुढचे पेपर कोणत्याही एका भाषेत देता येतात. मराठी भाषा आपण निवडू शकतो. पूर्वी तीन हजार शब्दात चार दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर निबंध लिहायचा होता. आता बाराशे पन्नास शब्दात दोन निबंध (चार पैकी एक) असे दोन संच लिहायचे असतात. निबंध हा एक प्रकारे आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो. मुद्देसूद लिखाण, नवीन कल्पना इत्यादी गोष्टींचा विचार निबंध तपासताना केला जातो. निबंध लेखन २५० गुणांसाठी असते. येथून पुढचे सर्व गुण विचारात घेतले जातात. 

४. २५० गुणांचे चार सामान्य अभ्यासक्रमाचे लेखी पेपर असतात. यामध्ये पूर्व परीक्षेचे विषय असतात. एथिक्स हा नवीन विषय यात आला आहे. यामध्ये दिलेल्या शब्द मर्यादेतच अचूक लेखन करणे अपेक्षित आहे. 

५.  २५० गुणांचे दोन पेपर हे वैकल्पिक विषयाचे असतात. यामध्ये आपण निवडलेला एकच विषय असतो. साधारण पदवी परीक्षा + एक या पातळीवरचे प्रश्न येथे अपेक्षित असतात. सहसा पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेला घेतलेले विषयच येथे घेणे संयुक्तिक ठरते. परंतु तो विषय जर विशेष सूचित नसेल तर प्रशासन, इतिहास, भूगोल, मानववंशशास्त्र अशा विषयांचा विचार करावा. 

या निबंध लेखनापासून ते वैकल्पिक विषयापर्यंत सर्व गुणांची बेरीज करून पात्र ठरलेल्या

 ३:१ प्रमाणात विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व चाचणीस बोलावले जाते. म्हणजे जर एक हजार जागा भरायच्या असतील तर तीन हजार जणांना व्यक्तिमत्व चाचणीत बोलावले जाते. व्यक्तिमत्व चाचणी सामान्यत: पॅनल इंटरव्यू या प्रकारात असते. व्यक्तिमत्व चाचणी ही एका दिवसातच संपते. पण तयारी मात्र दीर्घ काळ करावी लागते. सकारात्मक दृष्टिकोन, नेतृत्वगुण, वैचारिक क्षमता, संयम इत्यादी विविध गोष्टींचा विचार या चाचणीमध्ये केला जातो. निवड प्रक्रिया मुख्य परीक्षा अधिक व्यक्तिमत्त्व चाचणीचे गुण याचा एकत्रित विचार करून विद्यार्थ्यांना निवडले जाते. या नंतर वैद्यकीय चाचणी होऊन मग प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. 

अभ्यास कसा करावा ? कधी पासून करावा ?

अभ्यास शालेय जीवनापासूनच सुरू करणे योग्य. इयत्ता आठवी पासून या परीक्षांची सिद्धता करणे योग्य ठरते. दैनंदिन वृत्तपत्र वाचन विशेषतः संपादकीय पृष्ठांचे वाचन हे लाभदायक आहे. विविध संदर्भ ग्रंथांचे वाचन आवश्यक ठरते. जसे इतिहासाचा अभ्यास करायचा तर आठवी ते बारावी एनसीईआरटीची (NCERT) पुस्तके आर.सी. मुजुमदार लिखित 'भारताचा इतिहास', स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'सहा सोनेरी पाने', इत्यादींचे वाचन उपयुक्त आहे. तसेच अन्य विषयांचे चालू घडामोडींसाठी दैनंदिन वृत्तपत्र वाचन आणि 'इंडिया इयर बुक' अशा पुस्तकांचे वाचन उपयुक्त आहे.

भाषा :

पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एका बाजूला इंग्रजी आणि दुसऱ्या बाजूला हिंदीमध्ये मुद्रित असतात. लेखी परीक्षा कोणत्याही एका भारतीय सूचित असलेल्या भाषेत देता येते. व्यक्तिमत्व चाचणीसाठी ही भाषा निवडीचा पर्याय असतो. फॉरेन सर्विसेसला जायचे असल्यास इंग्रजी भाषा घेणे हितकारक ठरते. 

या परीक्षेसाठी क्लासेस लावणे आवश्यक असते का ?

जर तुम्ही स्वतःला एकलव्याप्रमाणे समजत असाल तर क्लासेस ची आवश्यकता नाही. आज सामाजिक माध्यमांवर भरपूर मार्गदर्शन उपलब्ध आहे. 'सावरकर आय ए एस स्टडी सर्कल' च्या वतीने युट्युब वाहिनी सुरू आहे. तेथे हे मार्गदर्शन निशुल्क उपलब्ध आहे. त्यासाठी वाहिनीवरील प्लेलिस्ट पाहावी. याशिवाय लेखाच्या शेवटी जो दुवा लिंक दिली आहे तेथे परीक्षांपासून ते व्याख्यानं पर्यंत सर्व उपलब्ध आहे.


 जर क्लासेस लावायचे असतील तर पुढील पर्यायांचा विचार करावा. 

१. घरापासून जवळ आहे का ? प्रवासात जास्त वेळ जायला नको 

२. वाचनालय सुविधा उपलब्ध आहे का ? 

३. नियमित चाचणी परीक्षा आणि त्यांचे विश्लेषण केले जाते का ?

४. व्यक्तिमत्त्व विकासासाठी काय परिश्रम घेतले जातात ?

५. वर्गात विद्यार्थी संख्या ३० पेक्षा कमी आहे का ?


महेश गजानन कुलकर्णी,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com