Top Post Ad

देशातील लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही लढा देत आहोत


  राहुल गांधींच्या अमेरिका दौर्‍यातील, बुधवार, दि. ३१ मे-२०२३ रोजीचे स्टॅनफोर्ड विद्यापीठातील भाषण

मला आपल्या ख्यातनाम संस्थेत सन्मानपूर्वक बोलावलंत व बोलण्याची संधि मला दिलीत, याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार... आपल्या संस्थेविषयी मी बरंच काही ऐकलेलं आहे. आपल्यासारख्याच एका संस्थेत मी काही काळ घालवलेला आहे आणि मी इथे असणं, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. "संपूर्ण जग, या संक्रमण काळात कसं बदलतंय आणि या बदलत्या काळाला आपण नेमकं कसं तोंड दिलं पाहीजे व उघडपणे येणाऱ्या, या उलथापालथ घडवू शकणाऱ्या अशांततेच्या काळात, आपला वैचारिक दृष्टिकोन नक्की कसा असला पाहीजे", या विषयावर मला बोलण्यास सांगण्यात आलंय....

आपण काही महिन्यांपूर्वी पर्यंत मी 'खासदार' होतो, असा तुम्ही माझा परिचय करुन देताना आवर्जून उल्लेख केलात... २००४ साली मी जेव्हा राजकारणात उतरलो, तेव्हा आज जे काही आपल्या देशात घडताना मी पहातोय, त्याची साधी कल्पनादेखील मी कधि केली असेल, असं मला वाटत नाही. आजवर जे काही मी कल्पिलेलं होतं, त्याच्या कितीतरी पलिकडे, आपल्या देशात घडताना मी पाह्यलं. एका बदनामीच्या गुन्हेगारी दाव्यात माझ्या कल्पनेपलिकडची अशी दोन वर्षांची म्हणजेच, देशात प्रथमच कुणाला तरी 'सर्वोच्च सजा' फर्मावली जावी, ती शिक्षा मला दिली गेलीय. त्यातून, माझं संसद-सदस्यत्व रद्द करण्यात आलंय. असं काही घडेल, याची मला कल्पनाच नव्हती. मात्र, त्यामुळेच मला संसदेत कार्यरत राहूनही नसती मिळाली एवढी, थेट लोकांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधि मिळाली.

प्रचंड भांडवली आर्थिक-पाठबळाद्वारे व देशातील संविधानिक-बिगरसंविधानिक सर्वच संस्था ताब्यात घेतल्यामुळे निर्माण झालेल्या सत्ताधाऱ्यांच्या संपूर्ण 'वर्चस्ववादी' परिस्थितीशी आम्ही व इतर सारेच विरोधी पक्षीय संघर्ष करीत आहोत. देशातील लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही लढा देत आहोत. राजकारण, हे असं विचित्र असतं... पण, खरं नाट्य सहा महिन्यांपूर्वी घडायला लागलं. लोकशाही, ही संकल्पना काही फक्त, देशातील विरोधी पक्षांशी मर्यादित नसते... तर, विरोधी पक्षांना मदतीचा हात देणाऱ्या देशातील सर्व लोकशाही-संस्थांशी मिळून संबंधित असते. मात्र, या सगळ्याच संस्था, एकतर पूर्णतया ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत किंवा त्यापैकी कुठलीच संस्था निहीत कार्य करत नाही आणि म्हणूनच, आम्ही एक चमत्कारिक निर्णय घेतला. 

राजकीय दृष्टीकोनाचा किंवा संभाव्य प्रतिसादाचा विचार करुन तर बिलकूल नव्हेच; पण, चालायला लागल्यावर आम्हाला कशाकशाला तोंड द्यावं लागेल, याचाही क्षणभर विचार न करता अथवा काय घडेल अथवा घडणार नाही, याची क्षिती न बाळगता... आम्ही, संपूर्ण देश पायी चालत पालथा घालायचं ठरवलं. फक्त, १२५ जणांच्याच चमूसह सुरुवात करायचं आम्ही ठरवलं आणि पहाता पहाता आपण आपल्या देशाविषयी, देशातील लोकांविषयी, राजकारणाविषयी आणि काय महत्त्वाचं, काय बिनमहत्त्वाचं... यासंबंधानं, जो विचार आपण करत असतो ना, त्या आमच्या दृष्टीकोनात अगदी आमूलाग्र बदल झाला!

"तुम्हाला या पदयात्रेतून काय बोध झाला", असा प्रश्न मला बरीच लोकं विचारतात. पण, मी नेमका काय बोध झाला, हे मी सांगू शकत नव्हतो. या प्रश्नाचं उत्तर देणं मला कठीण जात होतं. "मी माहितीचा एवढा मोठा साठा जमा करुन बसलोय की, त्याने माझ्यात नेमकं काय परिवर्तन घडवलंय, हे मी नक्की सांगू शकत नाही", एवढंच मी जुजबी म्हणायचो. माझ्या आयुष्यातील तो सर्वात सुंदर अनुभव होता. अर्थातच, तो एक अतिशय वेदनादायी अनुभव देखील होताच. मला मधेच गुडघेदुखीचा चांगलाच त्रास जाणवू लागला होता आणि आमचा तर, ४००० कि.मी. इतकं कल्पनातीत मोठं अंतर, पायी चालून जाण्याचा निर्धार होता. माझी तब्येत चांगल्यापैकी तंदुरुस्त असल्यानं दररोज २५ कि.मी. चालणं, तसं अवघड नसावं, अशी माझी मनोमन धारणा होती... पण, आयुष्यात कसं आणि काय घडतं पहा की, मला सुरुवातीलाच गुडघेदुखी जाणवू लागली होती आणि मग, त्यानंतर अचानक एका क्षणी माझ्यासाठी सगळंच विश्वच अंतर्बाह्य बदलत गेलं... "जणू, आम्हाला आमच्या 'देशाचा आत्मा'च साक्षात भेटत होता", यापेक्षा अधिक चांगलं वर्णन, मी त्या लोकविलक्षण अनुभवाचं करुच शकत नाही... आणि, एका आठवड्यात किंवा साधारण दहा दिवसांनी अगदी आवेगपूर्ण अशा 'एका अनामिक शांति'चा आम्ही अनुभव घेऊ लागलो. 

"शेती का धड चालत नाही, शिक्षणाविषयी आपण असा विचार केला पाहीजे, आरोग्यसुविधा अशी असली पाहीजे, आपण हे असं केलं पाहीजे" वगैरे, आम्ही लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतानाच, आम्ही सारे 'निःशब्द' झालो. याचं कारण, अशा एका बुद्धिमत्तेच्या, व्यावहारिक शहाणपणाच्या संपर्कात.आम्ही आलो होतो की, ज्याची आम्ही कधि साधी कल्पनादेखील केलेली नव्हती किंवा ते तसं अस्तित्वात असेल, हेच आम्हाला अज्ञात होतं.

ज्यांना शिक्षणाचा गंध नाही, असं लोकं म्हणतात... ते शेतकरी आम्हाला एकेक गोष्टी समजावून सांगत होते. त्यामुळे, बुचकळ्यात पडून आम्ही स्तब्ध झालो, निःशब्द झालो आणि हे शेतकऱ्यांबाबत, मोलमजुरी करणाऱ्यांबाबत, छोट्या उद्योजकांबाबत म्हणजेच, जवळपास सगळ्यांच्याच बाबतीत घडत होतं. त्यामुळेच, पदयात्रेत एक सघन शांतता पसरली आणि आम्ही सारे बोलायचंच थांबलो आणि ऐकण्याच्या भूमिकेत आपसूकच गेलो... आम्ही ऐकल्या, त्या अनंत यातनांच्या दर्दभर्‍या कहाण्या!

...आणि, एक अशी कहाणी ऐकली की, ज्यामुळे माझ्या-आपल्या, 'भारत देशाचा आत्मा'च आमच्यापुढे मूर्तिमंत साकार झाला... मी चालत असताना एक तरुण माझ्याजवळ आला आणि माझ्यासोबत चालू लागला. मी त्याच्या खांद्यावर माझा हात टाकला आणि अचानक माझ्या ध्यानात आलं की, त्याला दोन्ही हातच नव्हते. मी त्याला हात नसल्याबद्दल खंत वाटू नये म्हणून, आश्वस्त करु पहात होतो. पण, ते त्याच्या गावीही नव्हतं आणि आम्ही बोलत राहीलो. 'त्याला आयुष्यात काय करायचंय', असं मी त्याला विचारलं... त्यानं माझ्याकडे पाहीलं आणि 'मी मेकॅनिक आहे', असं तो म्हणाला.

'तो कसा काय मेकॅनिक असू शकतो, त्याला दोन्ही हात नाहीत, हे अशक्यच आहे', असं वाटून तो खोटं बोलतोय, असं तत्काळ माझ्या ध्यानी आलं. 'तू खोटं बोलतोयस', असं मला थेट सांगायचं नव्हतं. म्हणून, मी विचारलं, 'तू कुठल्या कार दुरुस्त करतोस?' तो म्हणाला, 'मी कार नव्हे, मोटरसायकल दुरुस्त करतो'. त्यावर मी, 'कुठल्या मोटरसायकल दुरुस्त करतोस', अशी विचारणा करताच, तो अनेक मोटरसायकल्सची यादीच माझ्यापुढे मांडू लागला. तेव्हा, 'तू कुठल्या मोटरसायकल्स दुरुस्त करतोस, ते मी येऊन पाहू शकतो का', असं विचारताच तो उत्साहानं 'हो' म्हणाला आणि तो आम्हाला सोबत घेऊन, 'केवळ त्याच्या दोन पायांनी, तो मोटरसायकलच्था देखभालीचं काम कसं करतो', ते दाखवू लागला. माझ्या आयुष्यात मी पाहीलेली, ती सर्वात आश्चर्यकारक गोष्ट होती. त्यानं त्याच्या दोन पायांनी मोटरसायकलचं संपूर्ण इंजिन उघडलं व पुन्हा व्यवस्थित बसवलं. मी माझ्या दोन हातांनीही ते काम करु शकत नव्हतो. अशातर्‍हेच्या, अनेक गोष्टी आम्ही पाहिल्या... आणि पाहीला, तो लोकांमधला आणि राजकारणामधला एक 'दुभंग'! 

अमेरिका आणि इतर देशांमध्येही जनता-राजकारण्यांच्या संबधांमधलं, हे 'तुटलेपण' दिसून येतं. लोकांमध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये फार मोठी दरी निर्माण झालेली आहे. लोकं, काही वेगळंच बोलतायत आणि राजकारणात वेगळीच चर्चा चालू आहे. आम्ही हे अनेकदा घडताना पहात होतो आणि त्यातूनच, माझी पायपीट चालू असतानाच, मला गोंधळात टाकणाऱ्या बाबींवर मी सखोल विचार करत होतो. 

आम्ही चालत होतो, तेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं; तर, पोलिस, शासकिय-संस्था, सगळी प्रसारमाध्यमं, समाजमाध्यमं, असं सर्वकाही त्यांच्याकडे होतं. अवघ्या काही आठवड्यात आमचा काही हजारांचा समूह बनला आणि नंतर तर, एक कोटी लोकं आमच्यासोबत चालू लागली व एवढी दमन-यंत्रणा हाती असूनही सरकार काहीही करु शकलं नाही. ते जेवढं जास्त बळ वापरु पहात होते, तेवढा त्याचा कमी प्रभाव पडू लागला. एवढी शक्ति-सामर्थ्य, एवढी व्यवस्था-संसाधनं त्यांच्याकडे असूनही आमचं काहीही वेडंवाकडं होतं नव्हतं. उदाहरण द्यायचं झालं तर, "ते आम्हाला सरळ अंगावर येत रोखून का धरत नसावेत", हा प्रश्न सतत माझ्या मनात फेर धरत होता. त्यांच्याकडे 'सक्ति करण्याची ताकद, शासकिय-सामर्थ्य (Force)' होतं; पण, मूलतः 'शक्ति (Power)' कुठे होती? 'सक्ति आणि शक्ति' या दोन पूर्णतया वेगळ्या बाबी आहेत, हे माझ्या ध्यानी आलं. आपल्यापैकी बहुतेकजण, विशेषतः राजकारणीवर्ग, 'सक्ति'लाच 'शक्ति किंवा बळ' समजून चालतात. त्या एकसमान नसून संपूर्ण वेगळ्याच गोष्टी आहेत. 'शक्ति किंवा बळ', ही एक आपली सक्रिय कल्पनाधीन बाब आहे, ती वर्तमानकाळात मौजूद असते, ती एकरेषीय सरळसोट नसते आणि अंगी 'बळ' तेव्हाच येतं,

 जेव्हा तुम्ही 'सत्या'च्या अगदी नजिक असता. आम्ही 'सत्या'भोवतीच पिंगा घालत होतो; म्हणूनच, ते आम्हाला रोखू शकले नाहीत... आणि, त्यांच्याकडे 'सक्ति लादण्याचं मोठं सामर्थ्य असूनही त्याचं 'शक्ति'त रुपांतरण ते करु शकले नाहीत, हेच मला मनोरंजक वाटतं होतं. 'तुम्ही कधि थांबणार आहात', असं लोकं विचारत असताना, 'आम्ही थेट काश्मीरपर्यंत जाणार आहोत, तोपर्यंत थांबणार नाही', असं आम्ही बजावत होतो.  'तुम्ही काश्मीरपर्यंत जाऊ शकणार नाही', असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. 'अखेरचे चार दिवस जर तुम्ही काश्मीरमध्ये चाललात तर, तुमच्यावर हँडग्रेनेड्स फेकून ते तुम्हाला ठार करतील', असंही ते म्हणाले. 'ठीक आहे, काही हरकत नाही... त्यांना तसं करु देत', असं आम्ही म्हणालो. 'आमच्यावर हँडग्रेनेड फेकणारा माणूस, मला बघायचाय', असं जे मी म्हणालो, ते व्यवस्थेतल्या माणसांना म्हणजेच, सुरक्षारक्षकांना नीट उमगलं नाही. 

तुम्ही सत्याच्या किती जवळ आहात, सत्याच्या संदर्भात तुम्ही किती काटेकोर आहात; यावरच तुमचं आत्मिक-बळ निर्धारित असतं... मग, दुसर्‍या व्यक्तिकडे कितीही 'सक्तिचं सामर्थ्य' असू देत; हा 'सक्ति आणि शक्ति'तला भेदच तुमच्या जीवनात, तुमच्या कामात फार महत्त्वाचा असतो.

...आता, हे माझ्या आयुष्यातले क्षण फार क्षुल्लक आहेत. इतिहासात, ब्रिटीश साम्राज्याशी लढणारा माझा नेता, म. गांधींसारख्यांचे 'सक्ति आणि शक्ति' संदर्भातले महान क्षण तुम्ही पाहू शकाल. म. गांधींकडे कुठलाही 'सक्तिचा प्रयोग वा सामर्थ्य' नव्हतं... त्यांच्याकडे (ब्रिटीशांकडे) सर्वंकष 'सक्ति' करु शकणारी सामर्थ्यवान यंत्रणा होती, लष्करासारख्या एकूणएक सगळ्याच संरचना त्यांच्याकडे होत्या. पण, त्याने फरक पडला नाही. 

अमेरिकेतली 'स्वातंत्र्याची उद्घोषणा', हा इथला आत्मिक-बळाचा, सत्याचा एक क्षण होता! 

दुसर्‍या माणसाकडे 'सक्ति' करण्याचं किती सामर्थ्य आहे, यामुळे फरक पडत नाही. बरं, हे मी सगळंच तुम्हाला का सांगतोय, मी 'सक्ति आणि शक्ति' यातला फरक तुम्हाला का समजावून सांगतोय? ज्या संक्रामक स्थितीचा आपण सामना करत आहोत... त्याच्याशी, या सगळ्याचा काय संबंध आहे?? असो, आपण ज्या संक्रमणावस्थेतून जात आहोत, त्या खरंतरं तीन प्रकारच्या संक्रामक-स्थिती आहेत. एक क्रांति व्यवहारातल्या (वस्तू आणि माणसं यांच्या) गतिमानतेशी निगडीत आहे, एक ऊर्जा-व्यवस्थेशी संबंधित आहे आणि ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहितीचा साठा किंवा संग्रह म्हणतो, त्या संपर्क-यंत्रणेद्वारे एक क्रांति होऊ घातली आहे. अशा तीनही क्रांति एकाचवेळेस घडत आहेत आणि त्याचा सर्वच गोष्टींवर परिणाम होणार आहे. 

गेल्या खेपेस 'ऊर्जा आणि गतिमानता' क्षेत्रात असेच संक्रमण घडून आलं होतं आणि त्यातून, आपल्याकडे दोन महायुद्धे होऊन गेली. अशा मोठ्या असुरक्षित व अशांततेच्या काळातच तुम्हाला, तुमच्या कल्पनाशक्तिचा उपयोग करावा लागतो. इथे स्टॅनफोर्ड विद्यापीठात येताना, मी यावर विचार करत होतो. तुम्ही यंत्रमानव, कृत्रिम बुद्धिमत्ता यावर संशोधनाचं एकूणच कार्य करत असताना, तुमच्या स्वतःच्याच 'शक्ति'चा, स्वतःच्याच 'आत्मबळा'चा क्षण कुठला होता? 

"चला, आपण चंद्रावर जाऊया", असं जेव्हा राष्ट्राध्यक्ष जाॅन केनेडी म्हणाले, तेव्हाच तो क्षण अमेरिकेसाठी येऊन गेला. तो क्षण, म्हणजे कल्पनाशक्तिचं एक मोठं प्रयोजन होतं आणि त्यातूनच, आज तुम्ही जे प्रचंड काम करत आहात, त्याचा उद्भव आणि विकास झालाय... किंबहुना, त्यातूनच, ते उत्क्रांत झालंय आणि त्या पद्धतीच्याच नातेसंबंधाचा अमेरिका आणि भारत, या दोन्ही देशांनी गांभीर्याने विचार केला पाहीजे. आपल्या जनतेच्या वास्तव परिस्थितीवर आधारितच, तो नातेसंबंध असला पाहीजे. आपल्याला भारतीय लोकांच्या वस्तुस्थितीबद्दल खूपच चांगली समज आहे, आपल्याकडे असलेल्या दारिद्र्याच्या उतरंडी आपणा सर्वांना ज्ञात आहेत आणि आपल्याकडे कसब, कौशल्याचा... आश्चर्याने तोंडात बोट घालायला लावण्याएवढा मोठा संग्रह, साठा आहे. संयुक्त राष्ट्राकडे (अमेरिका) जगातील सगळ्यात अत्याधुनिक व विज्ञानशाखेत अग्रेसर असणारं तंत्रज्ञान आहे आणि दोन्ही देशांमध्ये आपल्यात एक सामंजस्याचा पूल बांधला गेलेला आहे. तो केवळ सामर्थ्याच्या आधारावर उभारलेला पूल नसणं व तो दोन्ही देशातील जनतेच्या वस्तुस्थितीजन्य परिस्थितीवर व ती परिस्थिती पूर्णतया समजून घेण्यावर आधारित असणं, हे महत्त्वाचं आहे. 

भारताकडे काही फार मोठे लाभदायक घटक आहेत. माहितीचा साठा केंद्रस्थानी असणाऱ्या आजच्या जगात, आपल्याकडे जगभरातले सगळ्यात मोठे हस्तांतरणीय स्वरुपाचे माहितीचे संग्रह किंवा साठे (Data) आहेत. तुमच्यापैकी अनेकजण तंत्रज्ञान, संगणक-प्रणालीतील (Software) आपल्या भारतीय कौशल्याचं मूर्तिमंत प्रतिक आहात. तुमच्यासाररखी संधि न मिळालेला, पण तुमच्यासारखेच असलेले बरेच तरुण भारतात मागे राहीलेले आहेत आणि ते खचितच, आपल्या देशाची क्षमता विकसित-वृद्धिंगत करु शकतात. 'जेव्हा फारच अडचणीचे काळ येतात, तेव्हाच संधि उपलब्ध करुन देणार्‍या वेळा पण येत असतात', हाच ठेवा तुमच्या हाती मला आज ठेवून जायचंय. ज्याला मी 'खरीखुरी शक्ति' म्हणतो, त्या 'कल्पनाशक्तिचे प्रयोग' सर्वत्र प्रतिध्वनीत होत रहातील आणि आपली आपल्याबद्दल जी धारणा आहे, त्यात आमूलाग्र बदल घडेल... असा माझा विचार आहे, असं मला वाटतं... धन्यवाद!


राहुल गांधींच्या अमेरिकन दौर्‍यातलं, बुधवार, दि. ३१ मे-२०२३ रोजीचं स्टॅनफोर्ड विद्यापीठातलं त्यांचं भाषण एवढं महत्त्वाचं आहे की, त्यात 'गौतम बुद्ध, म. गांधी आणि राहुल गांधींचे पणजोबा पं. जवाहरलाल नेहरु' यांच्या विचारधारेचा 'त्रिवेणी-संगम'  जाणवला. भाषणात राहुल गांधींनी वर्णिलेला त्यांचा खडतर, जीवघेणा संघर्ष आणि आम्ही 'सुल्झर पंप्स (दिघा, नवी मुंबई) या राक्षसी सामर्थ्याच्या 'काॅर्पोरेट-सक्ति' विरोधात, कंपनीतील कामगारविरोधी-व्यवस्थापनाशी गेली तीन-साडेतीन वर्षे करीत असलेला तीव्र संघर्ष... यातला, समान धागा, समान दुवा मला अंतरात्म्यापर्यंत खोलवर जाणवला. शिवसेनेचे सर्वेसर्वा मा. उद्धवजी ठाकरे, ज्या पराकोटीच्या मनस्तापाला सामोरं जात, याच 'राजकीय-सक्ति' विरोधात लढतायत आणि ज्याबाबत, राहुल गांधी मन मोकळं करुन अमेरिकेत बोलताना दिसतायत... ही 'सहसंवेदना' अधोरेखित करणारं  राहुल गांधींचं हे भाषण, सक्षमपणे अनुवादित होऊन प्रवाही व प्रभावी स्वरुपात मराठी जनतेपर्यंत (तसेच खरंतरं, इतर स्थानिक भाषांमध्येही अनुवादित होऊन सर्वसामान्य भारतीय जनतेपर्यंत) जायला हवं... असं मला तीव्रतेनं वाटलं आणि त्या एका सणकीतच तो अनुवाद, आपल्यासमोर मेहनतीने, प्रयत्नपूर्वक मांडतोय... त्याचा स्विकार व्हावा व सदर मराठी-अनुवाद, आपणा सर्वांच्या कृपेनं तमाम महाराष्ट्रात प्रवाहित-प्रसारित व्हावा, ही सदिच्छा, धन्यवाद...
 राजन राजे, अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष}


'मोदी-ब्रँड'ची 'एक्स्पायरी-डेट' पार झालेली, 'हिंदुत्वा'चं कार्ड कर्नाटक-निवडणुकीनंतर 'रिचार्ज' होईनासं झालेलं, निवडणुकीच्या तोंडावर हिंदू-मुस्लिम दंगली पेटवायच्या; नाहीतर 'बालाकोट-स्ट्राईक'सारखी पाकिस्तानवर लुटूपुटीची चढाई करायची... या सगळ्या युक्त्या-प्रयुक्त्या आता वापरुन जुन्या झालेल्या आणि तिकडे मात्र, 'वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा' अशी, भारतासकट इंग्लंड-अमेरिकेपर्यंत, राहुल गांधींची 'प्रतिमा' दिसामाजी वर्धिष्णू' होत चाललेली, बेरोजगारी-अर्धरोजगारी-महागाई दिवसागणिक वाढत चाललेली, महिला-पहिलवानांच्या बृजभूषण या भाजपा-खासदाराकडून झालेल्या लैंगिक-शोषणाने 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा नारा बोंबललेला, देशभरातला शेतकरी-कामगारवर्ग संतप्त, फसलेली नोटबंदी-जीएसटी, घसरलेला रुपया... या सगळ्या विपरीत पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक-२०२४ जिंकण्यासाठी म्हणे, भाजपा-श्रेष्ठींकडून त्यांच्या मातृसंस्थेकडे व १०० कोटीहून अधिक रु. खर्च करुन गांधी-नेहरु घराण्याची, विशेषतः राहुल गांधींची बदनामी करण्यात हयात घालवलेल्या त्यांच्याच 'आयटी-सेल'कडे खास सल्ला मागितला गेला...

...दोन्ही संस्थांकडून एकच उत्तर आल्याचं सूत्रांकडून समजतं, ते उत्तर म्हणजे....

"पेगॅसससारखं छुपं सॉफ्टवेअर वापरुन EVM (Electronic Voting Machine) चं VEM (Vote Earning Machine) मध्ये रुपांतरण करा...!!!"

...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com