मानवाने जगत असताना आनंद घ्यायचा असेल तर मनाशी प्रामाणिक राहायला हवं. मन नेहमीच चांगलं काय आणि वाईट काय हे सांगत असतं. तुम्हाला तत्कालीन भावनेच्या आहारी न जाता विवेकाने विचार करायला शिकलं पाहिजे. त्यासाठी बुद्धाने सांगितलेल्या ३ प्रज्ञांचा, श्रोतुमय प्रज्ञा ज्यात ज्ञान, माहिती मिळवणे अपेक्षित आहे, चिंतनमय प्रज्ञा ज्यात मिळालेल्या ज्ञानावर मनात चिंतन, विचार करणं गरजेचं मानलंय आणि भावनामय प्रज्ञा ज्यात चिंतनातून उद्भवलेल्या भावनेने कृती करणं इष्ट सांगितलं आहे, यांचा त्याच क्रमात वापर केला पाहिजे; असे आग्रही प्रतिपादन सुप्रसिद्ध पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते किरण सोनावणे यांनी ठाण्यात केले.
ते पुढे म्हणाले, आपलं मन हे टीव्ही चॅनल सारखं आहे. ते तुम्हाला विचारांचे वेगवेगळे पर्याय दाखवत असतं. त्यातून तुम्ही काय विचार निवडून त्याप्रमाणे कृती करता यावरुन तुम्हाला खरा शाश्वत आनंद मिळेल की क्षणिक सुख मिळेल हे ठरत असतं. बुद्ध म्हणतात, स्वतःशी आणि प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीशी मैत्री भावना जपा. कुणाचीही कायिक, वाचिक आणि मानसिक हत्या करू नका. अज्ञान, द्वेष व लोभ ही दुःख होण्याची मुख्य कारणे आहेत. आपल्याला दुःख का होतंय हे समजून घ्या आणि त्या पलिकडे जाऊन आनंद घ्यायचा विचार करा. प्रत्येक माणसात थोडया प्रमाणात का होईना बुद्ध वसत असतो. त्या बुद्धाचे प्रमाण आपण जसे वाढवत नेऊ तसे आपल्याला आनंदाचे द्वार उघडत जाते. बुद्धाची ही शिकवण हाच आनंदाचा पासवर्ड आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष वंदना शिंदे म्हणाल्या आजच्या काळात जेव्हा द्वेषपूर्ण वातावरण पसरवून सामाजिक तेढ निर्माण करत राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न होत आहे, त्याविरुद्ध लढण्यासाठी बुद्धाची शिकवणच कामी येईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन समता विचार प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष सुनील दिवेकर यांनी संभाळले.
या कार्यक्रमाला चंद्रहास तावडे, लिलेश्वर बन्सोड, महेंद्र मोने, जगदीश खैरालिया, प्रा. मीनल सोहोनी, नरेश भगवाने, बिरपाल भाल, प्रमोद दासपुते, नरेश बोहित, पंकज गुरव, प्रवीण खैरालिया, ललित मारोठिया, विनायक, महेंद्र शिंदे आदीं मान्यवरांसह एकलव्य विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 टिप्पण्या