Top Post Ad

तर या टोळीवरही ईडी सोडली जाणार आहे

 


 भाजप आज सत्तेत आहे, आज ना उद्या जाईल. पण या पक्षानं सत्तेची जी नवी वहिवाट घालून दिली आहे ती या देशासाठी पुढची कैक वर्ष त्रासदायक राहणार आहे. विधिनिषेधशून्य राजकारणाचा पुढचा भयंकर अध्याय या पक्षानं सुरू केला आहे. सत्तेसाठी वाट्टेल त्या लांडयालबाड्या करा, पण सत्ता सोडू नका ही संस्कृती आता इतकी रुजली आहे की लोकांना ते new normal वाटतं. भ्रष्टाचाराचा विरोध वगैरे म्हणत हा पक्ष सत्तेत आला, भ्रष्टाचाराचं प्रारूपच बदलून टाकलं आणि भ्रष्टाचार institutional करून टाकला या पक्षानं. इतर पक्ष टेंडरांमध्ये टक्केवारी खात, हा पक्ष अदानीच्या मदतीनं अख्खं टेंडरच खायला लागला. 

आणिबाणीत इंदिरा गांधींनी काही घटनात्मक संस्था बिघडवल्या हे खरंय पण मोदी शहांनी तर चांगली म्हणावी, निर्विवाद म्हणावी अशी एकही घटनात्मक संस्था शिल्लकच ठेवलेली नाही. खोटा प्रचार, खोटे भडकाऊ व्हीडीओ काढून समाजात तेढ निर्माण करणं हा आता गुन्हा राहिलेला नाही, आता त्याला 'चाणक्यनीती' म्हणतात. देशाचे पंतप्रधान अभिमानानं ट्रोल्सना फाॅलो करतात ट्वीटरवर. जो जो भाजप विरोधी तो तो देशद्रोही म्हणणार्‍या टोळ्या तयार केल्या आहेत. आमचे विरोधक नसून शत्रूच आणि तुम्हाला फक्त हरवणार नाही, संपवूनच टाकणार अशी नीचतम राजकीय संस्कृती रुजवलीय या पक्षानं. 

राजकीय पक्षांचा अवकाश पूर्णतः संपवला. भ्रष्टाचार करून भाजपा बाहेर राहिला तर तो भ्रष्ट, भाजपात आला की देशभक्त अशी एक अतिशय धोकादायक वहिवाट या पक्षानं घालून दिली आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं आणि ते ही यशवंतराव चव्हाण जन्मदिनी तर महाराष्ट्राची उदात्त राजकीय संस्कृती या पक्षानं पूर्णतः बरबाद केली. विधानसभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतर पक्षांना धमक्या देतात, आम्हाला तुमच्या भानगडी माहीत आहेत आणि त्या योग्यवेळी काढू अशी थेट राजकीय सौदेबाजी करतात, हे महाराष्ट्रात पूर्वी कधी पाहिलं नव्हतं.

शिवसेनेसारखा पक्ष पूर्णतः पळवला. शिंदे सेना सध्या आनंदात आहे पण हा आनंद क्षणिक आहे. भाजपात आली नाही ही टोळी तर या टोळीवरही ईडी सोडली जाणार आहे. शिवसेनेत फक्त खांदेबदल हा उद्देश नव्हताच त्यांचा, शिवसेना हे नावच संपवायचं आहे. त्यासाठी शिवसेनेच्या अस्तनीतले निखारे त्यांनी ईडीच्या बळावर स्वतःकडे आणले. मुंबई महापालिकेत भाजपाची चूल पेटवून झाली या निखाऱ्यांना पूर्णतः विझवून टाकेल.  संपूर्ण देशभर विध्वंसक राजकारण झालं तेव्हा महाराष्ट्रानं मध्यस्थी करून सुसंस्कृतपणा शिकवला आहे. वाईट प्रसंगी हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री गेलेला आहे पण तो स्वाभिमान न सोडता. आज सह्याद्री गुजरातचा दास झालेला आहे. 

वात शरीरातून कधी ना कधी निघून जातो पण जातांना शरीराची झीज करून जातो. भाजपाही एकदिवस सत्तेतून जाईल पण जातांना घटनात्मक संस्था आणि इथली उदार राजकारणाची परंपरा संपवूनच जाईल. आपल्याला आपला देश टिकवायचा असेल तर यांना सत्तेतून बाहेर काढणं हेच सध्याचं राष्ट्रीय कर्तव्य आहे

 विश्वंभर चौधरी..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com