Top Post Ad

डाव्या विचारणीसरणीच्या कार्यकर्तीच्या प्रयोगाची चिकित्सा

 


५ मे-२०२३ (शुक्रवार) या एकाच दिवशी यंदा गौतम बुद्ध आणि कार्ल मार्क्स या दोघांचाही 'जन्मदिवस' जुळून यावा, हा एक विलक्षण संयोग होता... त्यातूनच, संजीवजींच्या ९ मे च्या 'चांदोरकरी'तील 'साम्या कोर्डे' या डाव्या विचारणीसरणीच्या कार्यकर्तीने केलेल्या एका छोटेखानी प्रयोगाची चिकित्सा केली जाणं, योग्य ठरावं.

'प्रज्ञा, शील, करुणे'चा प्रसारक, मौलिक ज्ञाता 'गौतम बुद्ध' आणि साम्यवादाचा उद्गाता 'कार्ल मार्क्स'... हे दोघेही वेगवेगळ्या मार्गांनी (कदाचित परस्परविरोधी मार्गांनी) मानवी-कल्याणाच्या प्रवासाला निघालेले; पण, 'गंतव्य-स्थान' एकच असलेले 'पांथस्थ'... दोघंही आपापल्या मूलभूत चि॔तनाच्या मांडणीतून तत्कालीन 'व्यवस्थे'विरोधात विद्रोहाची भूमिका घेऊन उभे ठाकले!  अशी महान व्यक्तित्वं, जेव्हा हजारो वर्षातून एकदा कधि जन्माला येतात व आपल्या वैचारिक-मांडणीचा प्रचार-प्रसार करुन जातात... तेव्हा, त्यांच्या चेतनेच्या प्रभावाने संपूर्ण मानवीविश्वात प्रचंड खळबळ, फार मोठी उलथापालथ घडून येते. तो समाज अंतर्बाह्य बदलून जातो आणि हे वैचारिक संक्रमण, त्यानंतर येणाऱ्या पिढ्यांवरही कायमस्वरुपी आपला प्रभाव टाकून जातं....या दोघात जी साम्यस्थळं आहेत, त्यातलं एक प्रमुख म्हणजे, दोघंही अल्पावधीतच अवघं मानवी विचारविश्व व्यापते झाले आणि अन्याय-अत्याचार-शोषण करणाऱ्या 'व्यवस्थे'साठी एक फार मोठं कायमस्वरुपी आव्हान बनून गेले! 

आज पृथ्वीतलावरील मानवजात, ज्या मानवनिर्मित महासंकटांना तोंड देतेय (ज्यात, अमानुष आर्थिक-विषमतेच्या नंगानाचासोबतच पर्यावरणीय-महासंकटांचाही अग्रक्रमाने समावेश आहे)... तेव्हा, हीच ती दोन व्यक्तित्वं अशी आहेत की, जी आपल्याला फार मोठ्याप्रमाणावर सुयोग्य पथदर्शन करु शकतात. अंतिम मानवी-कल्याणासाठी त्या दोघांच्या परस्पर भिन्न मार्गांचा मेळ कसा घालायचा, त्यांच्यात समन्वय कुठवर कसा निर्माण करायचा, हे आजच्या घडीचं आपल्या पुढचं आव्हान आहे. असं असलं तरी, आपण भारतीय लोकं (विशेषतः, महाराष्ट्रीय माणसं) त्याबाबतीत सुदैवी यासाठी आहोत की, आपल्याकडे 'छत्रपती शिवाजीमहाराज' होऊन गेले. बुद्धकाळापूर्वी महाभारताकडे वळलो तर, श्रीकृष्णाचं संपूर्ण चरित्रच, याबाबत मार्गदर्शन करायला आपल्या गाठी आहे. श्रीकृष्ण काय किंवा शिवछत्रपती काय... या दोघांनीही जनकल्याणार्थ जी प्रासंगिक 'धोरण-लवचिकता' दाखवली, ती लोकविलक्षणच होय. 

उपरोल्लेखित 'चांदोरकरी'च्या संदर्भात, सर्वात महत्त्वाचा मुद्दा तोच आहे. गौतम बुद्धांनी माणसाला आणि मानवी-कल्याणाला (म्हणूनच, ते स्वतःला 'कल्याण-मित्र' म्हणवून घेत, जो प्रसंगी अत्यंत कठोर वचनं पण जनहितार्थ कुणाला ऐकवत होता) प्रथम प्राधान्य दिलं... समोर येणारा माणूस, समोर येणारा प्रसंग याला त्याच्या लेखी इतकं महत्त्व होतं की, त्यांच्या हितासाठी त्यांनी कधि आपल्या तत्त्वाला, सिद्धांतांनाही मुरड घातली आणि अनेकप्रसंगी विरोधाभासी प्रतिपादन करण्याचा दोष पत्करला. 

त्यातूनच, सकाळी भेटायला आलेल्या लोकांचं शोषण-फसवणूक करत देवळं बांधणाऱ्या, वरकरणी 'आस्तिक' असलेल्या एका धनिकाच्या, "मी एवढी देवळं बांधली... पण, खरंच जगात देव आहे का?, या प्रश्नाचं उत्तर 'जगात देव नाही' असं; तर, आस्तिकांची आणि देवदेवतांची निर्भत्सना करत गावभर टवाळक्या करत फिरणार्‍या एका 'नास्तिका'ला, त्याचं प्रश्नाचं संध्याकाळी, "जगात देव आहे", असं परस्परविरोधी उत्तर देऊन... त्या दोघांचंही भावविश्वच बुद्धांनी हादरवून टाकलं आणि त्यांच्यात जनकल्याणाच्या दृष्टीकोनातून सकारात्मक बदल घडवून आणण्यास गौतम बुद्ध कारणीभूत ठरले. नियम नव्हे माणूस, कायदा नव्हे माणूस आणि सिद्धांत नव्हे माणूसच अंति महत्त्वाचा. नियम-कायदे-सिद्धांत, हे सगळंच निव्वळ माणसांसाठी आहेत, माणसं त्यांचं अस्तित्व राखण्यासाठी जन्माला आलेली नाहीत... या गौतम बुद्धांच्या कार्यशैलीमुळेच 'बुद्धविचार', जनसामान्यांपर्यंत शब्दशः वार्‍याच्या वेगाने पसरला. 

ओशो-कथनानुसार, गौतम बुद्धांचा 'परमभक्त' असणारा लिंची नावाचा एका झेन साधू म्हणायचा, "गौतम बुद्धांइतका खोटं बोलणारा माणूस मी पाहीला नाही". पण, "त्यांच्या प्रासंगिक खोटं बोलण्याचा उद्भव, हा अपार करुणेतूनच झालेला होता, त्यात संबंधितांचं कल्याण साधलं जावं, हाच निखळ उद्देश असायचा", हे ही लिंची शिष्यांना आवर्जून नमूद करतो. महाभारतात जागोजागी श्रीकृष्ण आपल्याला खोटं बोलताना, कृष्णकारस्थानं रचताना दिसतो... पण, त्यात कधि यःकिंचितही कृष्णाचा व्यक्तिगत स्वार्थ नव्हता, होतं फक्त समिष्टीचं हित, अन्यायी-अत्याचारी प्रवृत्तींचं निर्दालन करुन सर्वांचं कल्याण साधणं. शिवछत्रपतींचा गनिमीकावा किंवा अवघी शिवछत्रपती-राजनिती, ही श्रीकृष्णाच्या या जीवनसंदेशाला धरुनच! याउलट, आपल्याला रामायणातला राम दिसतो अतिसत्यवचनी व तत्त्वाला अवाजवी व अतर्क्य पद्धतीने घट्ट कवटाळून बसताना... त्यामुळेच, तो धड आपल्या कुटुंबालाही न्याय देऊ शकला नाही व परिणामतः, राम व सीता या दोघांनाही आपल्याला आयुष्याची, आपल्याच हातून इतिश्री करावी लागली.

खरं, खोटं देव जाणो; पण, असं म्हणतात की, आपल्या अनुयायांनी अति तर्ककठोर, तत्त्वनिष्ठ व तद्दन पुस्तकी 'साम्यवादी-भूमिका' घेतलेल्या पाहून कार्ल मार्क्स एकदा म्हणाला होता की, "या मार्क्सवाद्यांपासून मला वाचवा!".

तेव्हा, 'पोलिटीकली-करेक्ट' असणं, हे त्या त्या ठिकाणी प्रसंगोपात्त बरोबर असू शकतं... पण, 'पोलिटीकली-कनेक्ट'सुद्धा असणं महत्त्वपूर्ण होय, हे संबंधित मार्क्सवाद्यांनी जाणून घ्यावं... हीच भूमिका संजीव चांदोरकरांची असावी आणि ती योग्यच होय.

या देशालाच नव्हे; तर, संपूर्ण जगाला साम्यवाद अथवा कम्युनिझम शिवाय तरणोपाय नाहीच... पण, तो साम्यवाद वा कम्युनिझम येण्यासाठी अनंतकाळ थांबण्याची मार्क्सवाद्यांची अतिसंयत भूमिका, मानवजातीला बिलकूल परवडणारी यासाठी नाही; कारण, आता आपल्या 'कार्बन व रासायनिक-आण्विक प्रदूषण केंद्री' अर्थव्यवस्था व जीवनशैली यामुळे उद्भवलेली 'जागतिक तापमानवाढ' व त्याचंच अपत्य असलेला 'जागतिक-हवामानबदल'... आपल्याला थांबण्यासाठी एवढा देणं, केवळ अशक्यच आहे. मोजक्या काही दशकांचाच वेळ, आपल्या मानवजातीच्या हाती उरलेला असताना, त्यावर तरणोपाय म्हणून असलेली 'कम्युनिस्ट-विचारसरणी' शक्य तेवढ्या त्वरेनं, अगदी युद्धपातळीवरुन जगात अवलंबली जायला हवी असेल... तर, त्याची सुरुवात भारतापासून व्हायला हवी. त्याकामी, जरुर तेवढी व आवश्यक तेवढी, आपल्या लिखित धोरण-तत्त्वांना (फारशी हानिकारक नसलेली) कम्युनिस्टांनी मुरड घालणं, ही काळाची गरज होय आणि तिचं गरज संजीव चांदोरकर अधोरेखित करत असावेत... कदाचित, आज कार्ल मार्क्स पुनर्जन्म घेता झाला तर, नेमकं हेच ठणकावून सांगेल... धन्यवाद!

 राजन राजे ...  अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष


'साम्या कोर्डे' या डाव्या विचारांच्या तरुण कार्यकर्तीने आणि तिच्या सहकाऱ्यांनी, कार्ल मार्क्स यांच्या जन्मदिनी ५ मार्च रोजी, धारावीत “मार्क्स भंडारा” असे नाव देऊन एक सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सोशलमीडियावर त्याची बरीच उलट-सुलट चर्चा झाली, अजूनही होत आहे... “मार्क्स भंडारा : जनकेंद्री मूल्यांना खार न लावता, विशीतील पिढीच्या नवीन प्रयोगांचे/वैचारिक मांडण्याचे, साठीतील मी स्वागत करतो !”...अशी छोटी पोस्ट मी टाकली होती, त्याला अनेकांनी सहमती दर्शवली... पण, ती पोस्ट मार्क्स भंडाऱ्याचे समथर्न किंवा विरोध या बायनरीवर आधारित नव्हती; तर, अधिक खोलवरच्या काही इश्युंना टेबलवर आणण्याचे प्रयोजन होते!  त्यातील महत्त्वाचे म्हणजे, परिवर्तनवादी चळवळी/विचारधारा यामध्ये नवनवीन घुमारे फुटावेत की नाहीत? सगळे म्हणतील फुटावेत; पण, फुटावेत तर त्याची प्रक्रिया काय असेल? अगदी नावीन्यपूर्ण आयडिया घेऊन कोणी कोंब रुजवू बघत असेल तर, त्याची शास्त्रीय विरुद्ध अशास्त्रीय असे एलिटिस्ट निकष लावून भ्रूणहत्या का करावी? 

जमिनीवरचे संघटनात्मक प्रयोग आणि वैचारिक मांडणी यामध्ये नावीन्य आणण्यात, तरुणपिढी किती आणि कसा रोल अदा करु शकते? माझ्या पिढीतील जी साठी आणि सत्तरीत पोहोचली आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया काय असणार?  प्रत्येक नवीन प्रयोग आणि विचार 'पॉलिटिकली करेक्ट' असायलाच पाहिजे, हा आग्रह धरण्याचा अधिकार कोणाला आणि ते कोणाकडून अशा अपेक्षा धरणार? त्यांनी तुम्हाला मानलेच नाही तर?  तरुणपिढी तुम्हाला XXXX मारुन आपापले प्रयोग/विचार मांडू लागली आहेत, ती इतरत्र त्यांची घुसमट होते आहे म्हणून की, त्यांच्यात उर्मटपणा आहे म्हणून?  एका बाजूला 'पॉलिटिकली करेक्ट' असण्याचा आग्रह आणि दुसरीकडे तरुणांमध्ये ओरिजिनल थिंकिंग क्षमता रुजल्या पाहिजेत हा आग्रह, यात द्वंद्व आहे का? पॉलिटिकली करेक्ट बोलण्याच्या प्रचंड दडपणांतून तरुणपिढी न बोलणे पसंत करते. न बोलल्यामुळे/व्यक्त न झाल्यामुळे, त्यांच्या मेंदूचे स्नायू विकसित होण्यात बाधा तर येत नाही ना? वरिष्ठ नेत्यांचे/पक्षाचे धोरणांची 'री' ओढणे एवढेच तर ते शिकत नाहीत ना?  गुंतागुंतीच्या/रक्तबंबाळ करणाऱ्या बाबी आहेत या. भिडायला हवे... कार्पेटखाली ढकलून कोणाचे भले होणार नाहीये हे नक्की !!! 


...संजीव चांदोरकर (९ मे-२०२३)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com