नाचणाऱ्या बायका बघणाऱ्या विविध जातीतील पुरुषांना काय वाटते?? तर नाचणारी बाई तर पाहिजेच, पण .... ती आपल्या पेक्षा खालच्या जातीची पाहिजे ...नसेल तर निदान ती
आपल्या जातीची असता कामा नये !!!
आज पर्यन्त ज्यांनी बायका नाचवल्या त्याच जातीच्या बायकांवर नाचण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्याला जात्यंध पुरुष दुखवतो, म्हणून निदान आडनाव तरी बदला अशी मागणी होत आहे!!
पण या जात्यंध लोकांना हे कळत नाही की आडनाव बदलून लाज वाचणार नाही , मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावे लागणे हेच मुळापासून बंद व्हावे असे का वाटत नाही ?? निदान त्यांच्या स्त्रियांना नाचून पोट भरायची वेळ आली असेल, तर ते त्या जातीतल्या स्त्रियांची स्थिती सुधारायला का पुढे येत नाहीत??
मुळात मुद्दा नाचण्याचा नाही मुद्दा पुरुषसत्तेचा आहे , भारतीय पुरुषांची जाणीव आणि नेनिव ही दुहेरी आहे ते पुरुषसत्ताक तर आहेतच ,पण ते जात्यंध सुद्धा आहेत म्हणून बलात्कारित स्त्री कडे सुद्धा ते अश्याच घाणेरड्या पद्धतीने बघतात, तिची जात शोधतात आणि मग काय काय करायचे हे ठरवतात !! दुसऱ्याच्या जातीच्या बाईवर बलात्कार झाला तर यांना काहीच वाटत नाही आणि जातीच्या बाईवर त्याच्या पेक्ष्या खालच्या जातीच्या पुरुषाने बलात्कार केला असेल तर मग वस्त्याच जाळतात!!बलात्कार हे हत्यार म्हणून सुद्धा वापरतात!!
स्त्रियांच्या बाजूने विचार करणाऱ्या प्रत्येकाने या प्रकारच्या मानसिकतेला प्रश्न विचारायला हवाच ,पण आडनाव बदलून नाचा असे ज्या बाईला सांगितले जातेय तिने सुद्धाया बाबत स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवे !!
संभाजी भगत .....
-------------------
नावात काही आहे की नाही यावर खूप चर्चा झाली. पण आडनावात काही आहे का नाही. तर निश्चितपणे आडनावात खूप काही दडले. आडनावात वर्णश्रेष्ठतावाद आहे.
चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार ब्राह्मणवर्णातील आडनाव ही विद्यामय असावीत. क्षत्रिय वर्णीयांची आडनावे वीरमय, वैशांची आडनावे ही व्यापारमय असावी, तर शूद्रांची आडनावे ही निंदनीय असावीत असे गृहीतक आहे . ढोरगवार पशु शूद्र नारी सब ताडन के अधिकारी ही ओळ ही एका अर्थाने शूद्र स्त्रिया किंवा जनावरे यांना एकाच तराजूत तोलावे अशा आशयाची येते. शूद्र वर्णांमध्ये बहुतांश आडनावे हि पशूंच्या नावावर दिसतात जसे डुकरे, बैले, पारवे हत्तीआंबिरे, मांजरे, निळे , हिरवे ई. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धा नंतर वर्णव्यवस्था तितकीशी जाणवत नाही. मात्र जात व्यवस्थेची दाहकता आजही टिकून आहे ग्रामीण भागात ती विशेषत्वाने जाणवते. त्यामुळे ग्रामीण भागातून स्वतःला आजमावू पाहणारी आणि अत्यंत उपेक्षित व पीडित वर्गातून येणारी नवी पिढी बऱ्याचदा आडनावे बदलून नागरवस्तीमध्ये स्वतःला सिद्ध करू पाहतात. एका अर्थाने अशा पद्धतीने आडनावे बदलून लोकांना राहावे लागते; हे भारतीय समाज व्यवस्थेतील जातीव्यवस्था घट्ट करू पाहणाऱ्यांचा विजयच म्हणावा लागेल. आंबेडकरी चळवळतील अत्यंत ज्येष्ठ साहित्यीक आणि महत्त्वाचे नाव म्हणजे बाबुराव बागुल यांचं "जेव्हा मी जात चोरली होती" हे पुस्तक या अर्थाने प्रचंड महत्त्वाचे ठरते."
जयसिंगपूर मधील अनेक बौद्धांनी आपली आडनावे भाटिया कुलकर्णी किंवा कर्णिक केलेली आढळतात. तर नागपूरकडे अनेक बौद्धांनी आडनावे पाटील अशी लावलेली आहेत. जळगाव धुळे चाळीसगाव या भागामध्ये भटक्या विमुक्तातील अनेक जात समुदायातील आडनावे ही मूळची वेगळी मात्र नंतर पाटील लावलेली दिसतात. थोडक्यात काय तर हा सगळा आटापिटा जात ओळखली गेली तर कदाचित आपली संधी डावल्ली जाईल की काय या भीतीपोटीचा. यात अजून एक वेगळ्या प्रकारची माणसं पण आहेत की जी मूळ प्रस्थापित आहेत किंवा जी सवर्ण आहेत मात्र त्यांची आडनावे त्यांना काहीशी अडचणीची वाटतात. ...आणि म्हणून आडनावांच्या सोबत ते पाटील असेही बिरूद लावतात. उदाहरणार्थ माझ्या वर्गात माझ्यासोबत शिकणारा एक मुलगा त्याचे संपूर्ण इंजिनिअरिंग पर्यंतचे शिक्षण होईपर्यंतचे आडनाव गाढवे होते. मात्र मागील दोन वर्षात त्याने त्याचे आडनाव गाढवे पाटील असे केले. किंवा एखाद्याचे आडनाव काळोखे असेल तर काळोखे पाटील करणे किंवा कोळसे असेल तर कोळसे पाटील करणे, आवारे असेल तर आवारे पाटील करणे...
गौतमी पाटील प्रकरणात मात्र अजूनच वेगळी गंमत आहे. तिला असलेले पाटील आडनावच काढून टाकायला सांगितले जात आहे. इथे ही बाब उल्लेखनीय आहे की, नृत्यांगना असणाऱ्या माधुरी दीक्षित यांना कधीही दीक्षित आडनाव काढण्याचे सल्ले कुणी दिले नाही किंवा ममता कुलकर्णी यांनाही कुलकर्णी आडनाव काढून टाकण्याचे सल्ले दिले नाही. अगदी माधुरी पवार ला सुद्धा पवार आडनाव काढण्याचे सल्ले दिले गेले नाही.
मग हा सल्ला किंवा ही धमकी गौतमी पाटीललाच का बरे..?
एखाद्या मुलीला, माय माऊलीला तिच्या उदरनिर्वाहासाठी एखादे असे काम करावे लागते की जे काम व्यवस्थेला घृणास्पद वाटते तर याचा अर्थ असा आहे की एक तर तुमची नजर दूषित आहे , ती सुद्धा तुमच्यासारखीच दोन हाताची दोन पायाची माणूस आहे पण तिचं माणूस पण स्वीकारणं तुम्हाला जड जातय किंवा तिला तिथपर्यंत पोहोचायला भाग पाडणारी त्याला जबाबदार तुमची अपयशी अर्थव्यवस्था आहे. आणि हे अपयश झाकण्यासाठी तुम्ही तुमच्या मनगटबळाच्या जोरावर अशी दडपशाही करता..- प्रा सुषमा अंधारे
------------------------------------------
सर्व महिलांना स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळं राज्य आहे. सर्वांनी महिलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कलाकार म्हणून गौतमी पाटील हिच्या पाठीशीही उभं राहिलं पाहिजे, महिलांनी आपले गुण आणि कर्तृत्व दाखविले. महाराणी ताराराणी यांनी ७ वर्षे औरंगजेबाशी लढा दिला, तेव्हापासून महिला सबलीकरण सुरु झालं आहे. शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिलं आहे. कलाकरांना संरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी आहे, - संभाजीराजे भोसले
-------------------------------------------
गौतमी पाटील आडनावा मागे पाटील गॅग अशी लागली जसं काही
नेपोलियन, चंगीजखान, रोमन सम्राज्यावर पाटील चालुन गेला होता. जसं काही उत्क्रांतीच्या पहिल्या लाटेचा मानकरी फक्त पाटीलच राहीला होता. जसं काही चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा पहिला कोणीतरी पाटीलच होता. जसं काही चीनची भिंत, ताजमहाल पाटीलनेच बांधला होता. जसं काही पाटीलनेच सुर्य पृथ्वीभोवती फिरत नसुन पृथ्वी सुर्या भोवती फिरते हा शोध पाटीलनेच लावला होता. जसं काही जगातील आद्य संस्कृतिचा जनक पाटीलच आहेजगाला आपलं लैय देणं लागतं या भ्रमात अजुनही पाटीलच आहे. बरं झालं नोबेलच्या समतुल्य असा काही विश्वभुषण येडझवारत्न पुरस्कार नाही, नाही तर पाटीलने तिथे पण जीवाची बाजी मारलीच असती. जागतिकीकरण खासगीकरण अर्थकारणाने गती बदलुन अर्धे पाटील below poverty line च्या जवळ जवळ पोहचले तरी भिंतीवर लावलेल्या मध्यमयुगीन वाड्यातील तैलचित्रातील character मधून पाटील बाहेर पडायला तयार नाही. पाटलांचा लैय मोठा दैदिप्यमान इतिहास नाही भावा. न कमावलेल्या कोणत्या अब्रुची चिंता पाटील? इतिहास व आजचा वर्तमान तुमच्या अज्ञान अहंकार व मुर्खपणाने खचाखच भरतोय. उन्हाचा मारा खतरनाक वाढला पाटील तुम्ही जरा थंड घ्या - प्रफुल पगारे
0 टिप्पण्या