Top Post Ad

'कपाळमोक्ष' करुन घेण्यात 'हिंदुत्वा'ची धन्यता मानणार


 _स्वातंत्र्याच्या अमृतकाळात 'अनंताकडून अनंता'कडे प्रवास घडवणारा कोकणी-निसर्गसुंदरतेचा 'अमृतपथ' सोडून... तथाकथित विकास-प्रकल्पांच्या 'विनाशकारीपथा'वर, क्षणभंगुरतेच्या अटळ प्राक्तनाचा भाळी टिळा लावून आलेल्या, या कुठल्या प्रवासासाठी आपण निघालोय...

_बारसू-सोलगाव तेलशुद्धीकरण-प्रकल्प कोकणावर लादत... 'तमसो ऽ मा ज्योतिर्गमय' किंवा 'अहम् ब्रह्मास्मि' तसेच 'अवघे विश्वचि माझे घर', हा 'भारतीय-अध्यात्मा'चा महन्मंगल वैश्विक-पाया, एकीकडे लाथाडायचा आणि दुसरीकडे अयोध्येतल्या राममंदिरासारखी 'हिंदुत्वा'ची बुजगावणी उभारण्याची नौटंकी करायची?_

_आपण भारतीय लोक खरंतरं, ईश्वराचा शोध घेणारे कमी आणि मुमुक्षूवृत्तीने 'मोक्षा'सारख्या अवकाशव्यापी, आकाशगामी संकल्पनेसाठी धडपडणारेच जास्त असताना... 'बारसू-सोलगाव तेलशुद्धीकरण-प्रकल्पा'सारख्या विनाशकारी प्रकल्पांची कास धरत, अंति 'कपाळमोक्ष' करुन घेण्यात 'हिंदुत्वा'ची धन्यता मानणार आहोत?_

रामाची म्हणा अथवा परशुरामाची म्हणा, कोकणभूमि ही कुठून कशी निर्माण झाली, या इतिहासाचं तसं काही फारसं महत्त्व नाही. भारताने कधिही इतिहासाची फारशी पर्वा केलेली नाही. तो असतो, फक्त घडून गेलेल्या घटनाक्रमाचा धूळ खात धूसर होत गेलेला, एक काळाचा विस्तीर्ण पट. पाश्चात्यांमध्ये 'मुमुक्षू धारणा' नसल्यानेच त्यांना वाळूत चोच खुपसून बसलेल्या शहामृगासारखं इतिहासाचं जतन करण्याचं फार वेड, अगदी विकृतीकडे वळण्याइतपत!

पण, "निसर्गसुंदर कोकणाच्या रुपाने जी काही 'अनुभूती' पिढ्यानपिढ्या साक्षात आपल्यापुढे उभी आहे, तोच परब्रह्माचा अद्वितीय साक्षात्कार आहे. जैवबहुविविधतेनं व्यापलेली आणि खाडी-समुद्रकिनारे, नदीनाले, विहीरी-तलाव यांनी नटलेली... कमालीची निसर्गसुंदर कोकणभूमि ही, स्वतःचं एक परमात्म्याचा लौकिक-पारलौकिक असा दुहेरी व दुर्मिळ संकेत आहे आणि तेच, कोकणी चिरंतन-सत्य आहे"! *आपल्या हृदयाच्या कडेकपारीतून त्या निसर्गसौंदर्याचं आपल्याला नुसतंच केवळ प्रेम नाही; तर, अगदी वेड लागलं पाहीजे...* तोच, आपल्यासाठी 'अमृता'चा शोध, तेच 'चिरंतन तत्त्व' होय!

या कोकणाच्या अनुपम सृष्टीसौंदर्याचं डोळ्यात तेल घालून संरक्षण-संवर्धन करणं, हीच खरीखुरी 'धार्मिकता' आणि तेच खरं भारतीय-अध्यात्म आहे, हे ज्यादिवशी आपल्याला उमगेल, तो खरा सुदिन होय. या विशालदृष्टीने परमात्म्याला एकदा जाणून घेतलं की, जैतापूर अणुप्रकल्प किंवा कालचा नाणार अथवा आजचा बारसू-सोलगाव रिफायनरी प्रकल्प तर सोडाच... पण, शाडूची माती व नैसर्गिक रंगांऐवजी, निसर्ग-पर्यावरणाला घातक अशा प्लॅस्टर ऑफ परिसमधून व हानिकारक रासायनिक रंगांच्या प्रयोगातून घडवलेल्या गणपतीबाप्पाच्या मूर्तिसुद्धा, आपल्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करत्या होतात, ही या जाज्वल्य भारतीय-अध्यात्माची अंगभूत ताकद आहे!

कोणी केवळ कोकणात जन्माला आला म्हणून, 'कोकणी' नाही होऊ शकत. त्याचं कोकणावर हाडाचं प्रेम असायला हवं, आपल्या अंतरात्म्याच्या सांदीकोपर्‍यातून कोकणावर नितांत प्रेम असायला हवं... तरच तो खरा कोकणी! कोकण नावाच्या आहत-अनाहत ईश्वरी-संकेताशी तुम्ही तद्रूप व्हायला हवं; तरच, तुम्ही कोकणी. *नुसती भजनं, किर्तनं, दशावतारी नाटकं, बाल्यानृत्यं केल्यानं अथवा अनंतचतुर्दशीपर्यंत टाळगजरात गणेशोत्सव साजरे केल्यानं कोणी 'कोकणी' नाही होऊ शकत...* या निसर्गसौंदर्याच्या अतुलनीय वर्षावात राहूनही जो नुसताच 'ओला' होतो; पण, आतून 'भिजत' नाही, तो कोकणी नव्हेच! 

*'कणाकणानं कोकण' ज्याच्या नसानसात भिनतं, रक्तात भिरभिरु लागतं आणि अंतरात्म्यापर्यंत खोलवर पाझरत थेट अस्तित्वालाच भिडतं... तो खरा कोकणी!*

अन्यथा, 'कोकणातला जन्म' हा एक नुसताच 'गोड अपघात' (खरंतरं,सत्यकठोर शब्दात सांगायचं तर, एक 'दुर्घटना'च होय... जी, 'राणे-कुटुंबियां'च्या बाबतीत घडलीय) मानला जायला हवा. 

'कोकणाचं सृष्टीसौंदर्य आणि कोकणी माणूस', हे 'अद्वैत' आहे. ते एकमेकापासून वेगळं काढलं जाऊच शकत नाही. *कोकणी-हिरवाईला काँक्रिटच्या राखाडी रंगाने आणि खनिज तेल, कार्बनी धुराच्या काळ्या रंगाने रंगवू पहाण्याचा अट्टाहास कराल; तर, कोकणाची भविष्यात राख कराल!* एकदा का या 'रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे'रुपी व्याघ्राच्या जीभेला विविध प्रकल्पांतल्या 'सत्ता आणि मत्ता' यांचं रक्त लागलं की, रोज नव्याने एकामागोमाग एक विकासाच्या नावाखाली 'विनाशकारी-प्रकल्प' कोकणात येतच रहातील... *लाखो-करोडोच्या संख्येने 'परप्रांतीय मुंगळे' सगळीकडे कोकणभर घुसतील. जैन-गुज्जू-मारवाडी 'भांडवली-बाजारबसवे' कोकणाचा मूळ 'बाजार' उठवतील... त्यांच्याकरवी, कोकणाचं 'जैववैविध्य' क्रूरपणे नष्ट केलं जाईल आणि 'एकसुरी रोखीची पिकं' सर्वत्र काढली जातील. 'पैसा आणि उन्मत्तपणा' यांचा करोनापेक्षाही भयंकर संसर्गजन्य 'आजार' कोकणभरात सर्वत्र बेफाम फैलावेल. त्या हडेलहप्पीत कोकणाचा निवांतपणा कधि संपेल, कळणारसुद्धा नाही आणि, मग रोगट कोकण आणि राजस्थानचं रणरणत वाळवंट... रोगट कोकण आणि कोलाहलाने मातलेली निष्प्राण-निर्जीव मुंबापुरी, यातला फरक हळूहळू; पण, निश्चितपणे एका संथगतीने कमीकमी होत जाईल.*

तसंही, ज्यांची 'गिधाडासारखी दुष्ट नजर' गेल्या काहीकाळापासून कोकणाच्या सृष्टीसौंदर्यावर पडत आलेली आहे, ती या निर्मम-शोषक व्यवस्थेतली राजकीय-प्रशासकीय धटिंगण मंडळी, जेव्हा आम्ही जैतापूर-अणुप्रकल्पाविरोधात आमचं सर्वस्व पणाला लावून लढत होतो; तेव्हा, "कुणी कोकणात किंवा अन्य कुठे जन्म घेणं, हा निव्वळ एक अपघात असतो; त्यामुळे विशिष्ट भूभागात जन्म घेता झाल्यानं कुणी तिथला 'निरंकुश-स्वामी' (Absolute Owner) होऊच शकत नाही", अशी संतापजनक मुक्ताफळं बेधडक उधळत होतीच आणि त्याचा सार्थ कडवा प्रतिवाद करत आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवत नेत होतो... कुठेही दडपशाहीपुढे हार न मानता, आंदोलनात नरमाई जराही न आणता! 

तेव्हा, काय किंवा आज काय... तेच 'राणे-कुटुंबिय', स्वतःसाठी व आपल्या बगलबच्च्यांसाठी, पैशाचं अमाप पीक निर्माण करण्यासाठी (त्यांची 'देहबुद्धी' यापलिकडे जाणंही शक्य नाही... जैतापूर अणुप्रकल्प किंवा बारसू-सोलगाव तेलशुद्धीकरण-प्रकल्प, हे भयानकरित्या निसर्ग-पर्यावरणघातकी असण्यामागची खोलवर जाण त्यांच्या अल्पस्वल्प बुद्धीला कुठून येणार?) आपल्या 'बाहुबला'सह व पाशवी पोलिसबळासह आंदोलकांच्या जीवावर उठलं होतं आणि आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही. फरक एवढाच की, तेव्हा ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश करते झाले होते आणि आता काँग्रेस, 'स्वाभिमानी' (फक्त, नावापुरतेच स्वाभिमानी... बाकी, त्या त्या वेळेस जे राजकीय-बाॅसेस असतील, त्यांच्या एका इशाऱ्याने 'स्वाभिमान गहाण' ठेवत, अविचारी कृति करुन मोकळे होणारे) वगैरे वगैरे प्रवास करत आता, 'ईडीपासून कातडी' बचावण्यासाठी 'बीजेपी'त डेरेदाखल झालेत, एवढंच. 'पैशात आणि सत्तेत' सगळी दुनिया मोजणारी, ही अशी राजकारणी धेंडं आणि त्यांना टगेगिरी करत, आर्थिक स्वार्थापोटी पाठींबा देणारे तथाकथित स्थानिक कार्यकर्ते, हे खऱ्याअर्थाने 'कोकणी' नव्हेच... हे जातिवंत कोकणी माणसानं समजून घेतलं पाहीजे. हे अंति कोकणाचे 'मारेकरी' आहेत. कोकणात काँक्रिटची थडगी बांधून नांगर-बैलगाड्या उध्वस्त करत, दिमाखात मारे ट्रॅक्टर-मोटरगाड्या फिरवणारे, हे उन्मत्त राजकारणी, जर स्वतःला कोकणाचे 'विकासपुरुष' म्हणून घोषित करत असतील... तर, त्याची फार मोठी किंमत कोकणाला चुकवावी लागणार आहे, लागतेच आहे.

तरीही जर, *त्यांना आम्ही मतदान करत रहाणार असू; तर, मग 'मतदार' म्हणून आपणही आपला मूळ नैसर्गिक 'कोकणीपणा आणि कोकणी बाणा' भांडवली-बाजारात विक्रीला काढत आपसूकच कोकणावरचा आपला पिढ्यापिढ्यांचा हक्क गमावून बसतो!* 

कोकण काही वेगवेगळ्या जिल्ह्यांचा मिळून बनलेला नाही... ती फक्त, एक प्रशासनिक अथवा राजनैतिक व्यवस्था असू शकते. *कोकण, हे एक 'नैसर्गिक एकक' आहे! म्हणूनच, अतुलनीय निसर्गसौंदर्य मिरवणाऱ्या कोकणात, कुठेही निसर्ग-पर्यावरणावर अपरिवर्तनीय आघात करणारे तथाकथित 'विकास-प्रकल्प' येताच, समस्त कोकणी जनतेनं पेटून उठायला हवं.* पण, दुर्दैवानं तसं चित्र कोकणात कधि दिसत नाही... म्हणजे पुन्हा सर्वांच्याच, मूळ 'कोकणीपणा' विषयी संशय घ्यायला वाव आहेच.

बारसू-सोलगाव रिफायनरीतला धूर सह्याद्रीच्या कडेकपारीत अडकून परतणार, कोकणात दूरवर पसरत जाणार, अवघ्या कोकणाला नासवणार, हे निश्चित... इथे अंबानींच्या हाजिरा येथील तेलशुद्धीकरण-प्रकल्पासारखी भौगोलिक स्थिती नाही. 

तसंही, जगाच्या पाठीवर कुठेही असलेले किंवा होणारे तेलशुद्धीकरणप्रकल्प, अणुप्रकल्प, औष्णिक ऊर्जाप्रकल्प किंवा रासायनिक प्रकल्प, हे अंति निसर्ग-पर्यावरण उध्वस्त करणारेच असतात... पण, ते उभारण्यासाठी तुमचं-माझं कोकण, ही सर्वात अयोग्य जागा होय... निसर्ग-पर्यावरणावरावर तो थेट प्रलयंकारी आघातच होय.

कोकणभूमि, ही कोकणी मायलेकरांची पोटाची खळगी भरायला कधिही असमर्थ नव्हती... कालही नव्हती, आजही नाही आणि उद्याही नसेल. पण, आण्विक-रासायनिकदृष्ट्या प्रदूषणकारी व कार्बन-ऊत्सर्जन करणारे विकासप्रकल्प आले की, मग मात्र, भांडवलशाहीतल्या 'पैशाचिक आणि पिशाच्चिक' आदान-प्रदानाखेरीज इतर कुठलाही 'जैविक पर्याय' कोकणी-माणसाला उपलब्ध नसेल. लक्षात घ्या की, कोणत्याही अशा पायाभूत प्रकल्पांमुळे समाजातील ज्या घटकांना (दलाल राजकारणी व प्रशासकीयवर्ग, बडा जमीनदारवर्ग इ.) दीर्घकालीन अथवा अल्पकालीन लाभ होतो, त्यांना प्रकल्पाच्या हानीची फारशी तत्काळ झळ कधि पोहोचत नसते (सरतेशेवटी, पर्यावरणीय महासंकटं सगळ्यांनाच ग्रासणार आहेत)... पण, ज्या समाजघटकांना ती हानी पोहोचते, ते मात्र आयुष्यातून कायमचे उठतात आणि 'व्यवस्थे'तले गुलाम बनतात!

...असो, या प्रदीर्घ लेखाचं-संदेशाचं प्रयोजन, *"अनंताकडून अनंताकडे असा, चिरंतन-अनंत यात्रेचा भारतीय-आध्यात्मिक प्रवास, पंथस्थ म्हणून आपण कुणी विसरुन गेलो असल्यास अथवा आपलं शिवबा-संतांचं जाज्वल्य हिंदुत्व व त्यातील 'आध्यात्मिक-गौरव' आपण विसरुन गेलो असल्यास, त्याचं  स्मरण करुन देण्यासाठी व जे झोपलेले आहेत, त्यांना जागं करण्यासाठी आणि जे  पथभ्रष्ट झालेले आहेत, त्यांना पूर्वपदावर आणण्यासाठीच, केवळ होय"!*

...कारण, *कोकणाच्या विधिलिखिताशी भारतीय विधिलिखित अथवा भारतीय भाग्य जोडलं गेलेलं आहे आणि भारतीय भाग्याशी संपूर्ण जगाचं भाग्य जोडलेलं आहे! आपण कोकणी माणसंच जर हिंदू, जैन, बुद्ध, शीख धर्माने, थोडक्यात, 'भारतीय-अध्यात्मा'ने (ज्यात अनेक मुस्लिम-ख्रिस्ती चिंतक व विचारवंतांनीही मोठी भर टाकलेली आहेच) आजवर हजारो वर्षे तेवत ठेवलेले निसर्गसुंदर 'चैतन्याचे दीप'... निव्वळ रुपये, सोनं-चांदी-हिरेमाणिकांच्या हव्यासाने विझवायला उतावीळ झालो असलो; तर, होणारा अंधःकार फक्त कोकणापुरता सिमित नसेल; तो पुरत्या विश्वात फैलावेल... म्हणूनच,  हे नीट ध्यानात घेतलं पाहीजे की, जो जो कुणी (मग, तो कुठल्याही जातधर्माचा असो) 'विनाशकारीपथा'वर नेणाऱ्या अशा प्रकल्पांना विरोध करतो, तो आपसूकच जातिवंत 'हिंदुत्वा'चा अधिकारी असतो आणि जो प्रकल्प जबरदस्तीने लादतो तो जन्माने हिंदू असूनही असतो, तद्दन 'ढोंगी हिंदुत्ववादी'...  तो भारतीय-अध्यात्माने प्ररित झालेला नव्हे; तर, पाश्चात्य भांडवली-विचारणीने बाधित व रोगग्रस्त झालेला असा 'समाजघातकी' असतो... तेव्हा, सावधान!*

_...राजन राजे ..... अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष... 

भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही 'हरित-पक्ष'...
The First Green-Political Party Of India)_

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com