मा. रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय राज्यमंत्री,
नवी दिल्ली.
साहेब, तुमचा हा मायना लिहिताना, खरं सांगू का इतक छान वाटतंय ना की काही विचारू नका. आमचा माणूस दिल्लीत राहतो. केंद्रीय राज्यमंत्री आहे. फारच छान वाटते. अभिमान वाटतो. अतिशय गरिबीतून वर आलेला तरुण राजकीय क्षेत्रात येतो काय, वेगवेगळ्या भूमिका बदलतो काय, आमदार, मंत्री, खासदार, केंद्रीय राज्यमंत्री बनतो काय ? हे सगळे फिल्मी वाटायला लागत. एखादा रामभरोसे दिग्दर्शित चित्रपट असावा तसं काहीतरी वाटतं साहेब. पण ही सत्यकथा असल्यामुळे ते मान्य करावे लागते.
साहेब किती हलाखीत दिवस काढलेत हो आपण. सिद्धार्थ विहार हॉस्टेल, वडाळा, “मुंबई” या ठिकाणी आपण राहत होता. सिद्धार्थ विहार हॉस्टेल आठवतय का साहेब ? अहो आता ते पाडल गेलंय. बरीच वर्षे झाली तुम्ही त्या ठिकाणी फिरकलात सुद्धा नसाल. सिद्धार्थ विहार हॉस्टेल उभारण्यासाठी काय तरी करा की साहेब. जिथे आपली उमेदीचे वर्षे गेली त्यासाठी काहीतरी करा. मोदींना सांगा की ते काहीही करू शकतात.
तुम्ही सिद्धार्थ विहार हॉस्टेलला राहिलात. आपण तिथे राहून मोर्चे आंदोलने की काय केलीत. आदरणीय माईसाहेब आंबेडकर यांच्यासोबत राहून आपण रिपब्लिकन चळवळीत हळूच घुसलात. आपण त्यानंतर असे काही चिटकून बसला की तेव्हाचे आणि आजचे प्रस्थापित राजकीय नेते हे दुय्यमच राहिले साहेब. तुमचं खरंच कौतुक करावं वाटतं. कोणाकडे राहिल्यावर आपल्याला पुढे सरकता येईल याचे सर्वोत्तम राजकीय ज्ञान हे आपल्याकडे आहे. इतके राजकीय ज्ञान महाराष्ट्रात एकाही बौद्ध नेत्याकडे नाही साहेब. जाणीवपूर्वक दलित हा शब्द आपल्यासाठी वापरला नाही कारण आपण आता दलित थोडेच राहिला आहात. म्हणजे कसं माहित आहे का, आपण आत्ता हिंदू बौद्ध आहात. खासदार होताना हिंदू विचारसरणीतून व्हायचे आणि बंगल्याबाहेर सामान काढल्यावर बौद्ध व्हायचे. असो. राजकारणात आल्यावर सगळे चालायचं साहेब.
मोर्चा आंदोलनात सहभागी होता होता आपण शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात डायरेक्ट कॅबिनेट मंत्री झालात. साहेब तिथेच खरा घोळ झाला. तुमच्यातील तो तथाकथित पँथर की काय कायमचा संपला. ( दलित पॅंथर स्थापन होत असताना आपण नव्हता म्हणून तथाकथित). तुम्ही पक्के राजकारणी झालात साहेब .राजकारणी होण्याला आमचा काहीच आक्षेप नाही. प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याच स्वप्न हे अंतिमतः आमदार, खासदार, मंत्री होण्याचच असलं पाहिजे. आणि का असू नये ? सत्ता हीच सर्वश्रेष्ठ असते. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की, सत्ताधारी जमात व्हा. ते काही उगीच नाही. परंतु साहेब, तुम्ही मंत्री झाल्यावर सत्तेची चटक तुम्हाला अशी काय लागली की काही विचारू नका. सत्तेशिवाय तुम्ही राहूच शकत नाही असा संदेश सर्व पक्षात गेला साहेब. खरं सांगा तुमच्या मंत्रीपदामुळे, आमदारकी, खासदारकीमुळे समाजाचे काय बरे झाले हो ? आमचे बाबासाहेब जर नसते ना तर आमची अवस्था काय झाली असती ? आणि तुमची सुद्धा बरं का साहेब.
तुमचं सर्व राजकीय गणितच स्वकेंद्रित आहे. माझं काय ? मला काय ? याशिवाय तुमची राजकीय “राजधानी एक्सप्रेस” पुढे कधी गेलीच नाही. तुमच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत एक किंवा फार फार तर दोन सहकाऱ्यांसाठी दोन चार महिन्यांसाठी आमदारकी, महामंडळाचे अध्यक्ष देण्यापलीकडे तुम्ही काय केले हो ? सतत जयजयकार करणाऱ्या थोड्या बहुत कार्यकर्त्यांचे पोट भरण्यासाठी तुम्ही त्यांना मार्ग दाखविला म्हणजे तुम्ही सर्व समाजाच्या हिताचे समाजकार्य केले असे समजायचे का साहेब ?
साहेब तुम्ही आमच्या समाजाचे अंबानी आणि अदानी बर का . पण तरीसुद्धा तुम्ही व्यक्तिशः किती शाळा महाविद्यालये, वसतिगृहे बांधलीत ? काहीच नाही ना साहेब ? ते डी. वाय. पाटील, पतंगराव कदम यांच्याकडून काही तरी शिकायचे होते ना साहेब. असं कसं ?
राजकीय युती कोणाशी केली पाहिजे यात काहीच वाद नाही. राजकीय युती बाबत आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आपल्याला. दुसरे राजकीय पक्ष कसेही वागू शकतात तर आमच्या माणसाने कसेही कोणाशी युती केली तर आम्हाला वाईट का वाटावे ? साहेब राजकीय युती पेक्षा आपली मूळ विचारधारा पक्की पाहिजे हे महत्वाचे. आता तो तुमचा मित्र पक्ष भाजपाचेच पहा ना. ते काश्मीरमध्ये पाकिस्तान समर्थक मुफ्ती मेहबूबा च्या समवेत सरकार स्थापन करतात. उत्तर प्रदेशात दलित बहन मायावती यांच्यासोबत सत्ता स्थापन करतात. बिहारमध्ये कट्टर भाजपा विरोधक नितीश कुमार यांच्याची सत्ता स्थापन करतात. परंतु परंतु परंतु हे सर्व काही करत असताना ते नागपूरच्या रेशीम बागेशी आपलं नातं काही तोडत नाही. साहेब रेशीम बागेत जाऊन ते सरसंघचालकांच्या समोर खाली बसतात. त्यांचे आशीर्वाद घेतात. चिंतन मनन करतात.
रामजन्मभूमीच्या पायाभरणीला न विसरता बोलावतात. कोणतेही कायदेशीर पद नसताना त्यांना झेड प्लस सिक्युरिटी देतात. आता तुम्ही छातीठोकपणे म्हणाल की, आपल्याकडे अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघा सारखी मातृ संघटना कुठे आहे? तर साहेब हाच खरा प्रश्न आहे की, तुम्ही आत्तापर्यंत अशी संघटना तयार करण्याचा कधी विचार सुद्धा केला नाही ! ज्या आपल्या मूळ मातृ संघटना आहेत त्यांनासुद्धा कधी मोठ्या मनाने मोठे करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट पीपल्स एज्युकेशन सोसायटी मध्ये अशा पद्धतीने घुसला की जशी काय ती सोसायटी तुम्हीच स्थापन केली होती. आता तुम्ही म्हणाल की ही सोसायटी आमच्या सर्वांच्या बापाने म्हणजे बाबासाहेबांनी तयार केली आहे. अहो साहेब, आपल्या सर्वांच्या बापाने स्थापन केलेल्या संस्था किती काळ दाखवायच्या आम्ही ? स्वतःचे काही दाखविणार आहोत की नाही ?
साहेब तुमच्याशी पत्ररुपी संवाद साधण्याचे कारण की, तुम्ही महाराष्ट्र आणि मुंबईद्रोही कंगना रावण ( हा तुमचाच शब्द ) हीची भेट घेतली. कशाला या भानगडीत पडता आपण साहेब ? मोदी शहाच्या तालावर इतक नाचायचं का ? साहेब झोपडपट्टीत, चाळीत, बिल्डींगमध्ये राहणाऱ्या आमच्यासारख्या बौद्धांना फार त्रास होतो ना त्याचा. आता तुम्ही तुमची छबी ही तुमच्या विनोदी वागण्याने संपूर्ण भारतात अशी काही तयार करून ठेवली आहे की आम्ही बौद्ध आहोत असे सांगितले की आमचे सर्वधर्मीय मित्र आम्हाला तुमचेच अनुयायी समजतात. मग ते सुद्धा आमच्याशी विनोदी पद्धतीने बोलतात वागतात. तुम्हाला मनोहर जोशी हे भर संसदेत विदूषक म्हणाले होते. खोटारडे कुठले जोशी. असं कसं स्पष्टपणे म्हणू शकतात ते.
साहेब ही कंगनाबाई संविधान विरोधी आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तिची आरक्षणाबद्दलची भूमिका माहित आहे का ? साहेब ती संपूर्णपणे जातीयवादी आहे हो. तुम्हाला कळत नाही असं समजायचं का आम्ही ? की येडा बनून पेढा खायचा अस काहीतरी आहे का ? अहो साहेब तुम्ही केंद्रीय राज्यमंत्री आहात ना ? म्हणजे संपूर्ण भारताचे मंत्री आहात ना ? मग मंत्र्यांना काही प्रोटोकॉल वगैरे असतो की नाही ? ती बाई तुमच्या बंगल्यावर आली पाहिजे का तुम्ही तिच्या घरी गेले पाहिजे ? साहेब ती बाई मुंबईला पाक व्याप्त काश्मीर बोलली. पाक व्याप्त काश्मीर. साहेब, तुम्ही सांगलीहून मुंबईत येऊन मोठे झालात. सांगलीत आपल्या माणसाला कोणी किराणामालाच्या दुकानावर पुडे बांधायला तरी ठेवले असते का हो त्यावेळी ? मुंबईने तुम्हाला मोठे केले. श्रीमंत करोडपती केले. मग त्या मुंबईचा अपमान तुम्ही कसा काय सहन करू शकता साहेब ?
तुमच्यासमोर ती बाई पाय दुमडून बसते. यावरून तिने तुम्हाला कोणत्या पद्धतीने ट्रीट केले आहे हे समजले का हो तुम्हाला ? मोदी साहेबांसमोर किंवा इथल्या लोकल पेशवे फडणवीसांच्या समोर ही बाई अशी पाय दुमडून बसली असती का हो ? तुम्हाला थोडं तरी काही वाटत नाही का हो ? जीव तुटतो हो आमचा. तुम्ही स्वाभिमान केव्हाच गहाण ठेवलाय पण आम्ही नाही ना ठेवलाय. गरिबीत सुद्धा स्वाभिमानाने वागतोय आम्ही.
आणि हो जाताना तुमचा मुलगा जितला कशाला घेऊन गेलात तुम्ही ? मध्यंतरी तो बालवयातच चित्रपटसृष्टीत शिरल्याचे वाचले होते कुठेतरी. साहेब त्याला बाबासाहेबांची पुस्तके वगैरे वाचायला दिली की नाही ? त्याला किमान दलित पॅंथर आंबेडकरी चळवळ ही थोडीफार तरी कळू द्या. वाचू द्या त्याला. शिकू द्या. त्याला चित्रपटसृष्टीत नक्की जाऊ द्या. परंतु त्याचा ” बेस ” पक्का करा. नागराज मंजुळे बघा. तो आपला नाही. परंतु त्याचा ” बेस ” आपला आहे. जित ने उगाचच कपूर, खान, खन्ना होण्याचा प्रयत्न करू नये. त्याला आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
साहेब त्या कंगना बरोबर तुमची काय चर्चा झाली ? खरे म्हणजे काय डिल झाले याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. ते सर्व पक्षांचे लोक करतात. आमच्या लोकांनी केले म्हणून काय झाले. ते जाऊ द्या साहेब . आमच्या एका डॉक्टर मित्राने काल आम्हाला विचारले की, चळवळीतील कबीर कला मंचची शाहीर, महिला कार्यकर्ती ज्योती जगताप हिला भीमा कोरेगाव केस मध्ये एन. आय. ए. ने तुरुंगात डांबले आहे. साहेब, तुमचे मोदी साहेबांशी चांगले संबंध आहेत. जरा तेवढे जामिनाचे होईल तर बघा ना. प्लीज. आणि हो ती सुद्धा एक महिलाच आहे बरं का.
साहेब तुम्ही शेवटपर्यँत खासदारकी सोडायची नाय. आणि ज्या वेळेस ती तुम्हाला सोडावयाची असे वाटेल त्यावेळेस ती फक्त जित रामदास आठवले यालाच मिळाली पाहिजे. शपथ आहे तुम्हाला माझी.
जय भीम. नमो बुद्धाय. जय भारत.
धन्यवाद.
आपला एक धम्मबंधू
0 टिप्पण्या