Top Post Ad

माता रमाईंकडून कष्ट करणाऱ्या हातांचं बळ घ्यावं....


   साऱ्या स्त्रियांनी माता रमाईंकडून कष्ट करणाऱ्या हातांचं बळ घ्यावं,  तर समाजासाठी स्वत:च्या सुखाचा त्याग करतांना मनामध्ये जराही तक्रारीचा सूर उमटू न देणाऱ्या मनाचं मोठेपण घ्यावं. माता रमाईंचं जीवन म्हणजे साऱ्या मानवी भावभावनांना बाजूस सारून फक्त करुणेने थबथबलेले जीवन! त्यांच्या हृदयातील ही करुणा साऱ्या शोषित समाजासाठी होती. ती फक्त घराच्या चार भिंतींपुरती मर्यादित नव्हती. म्हणूनच तीन मुलगे आणि एक मुलगी अशा चार लाडक्या बाळांना गमावण्याचं दु:ख पचवून रमाईंनी बाबासाहेबांची होता होईल तेवढी जपणूक केली. त्यांना शोषितांसाठी चळवळ उभारायला बळ दिलं. कौटुंबिक अडचणीमध्ये बाबासाहेबांना गुतंवून ठेवलं नाही. या अडचणी स्वत:च्या हिंमतीने सोडविल्या. भले त्यासाठी शेणाच्या गोवऱ्याही थापल्या.  

माता रमाईंच्या त्याकाळच्या गोवऱ्यांची किमंत आजच्या आंबेडकरी समाजाला खूप मोठी आहे. कारण त्यांनीच बाबासाहेबांना मोठं करण्यासाठी आधार दिला. बाबासाहेबांनी उभारलेली चळवळ मोठी करण्यासाठी आधार दिला. रमाईंची चळवळीतली ही मोठी साथ आहे. रमाईंच्या या अप्रत्यक्ष साथीने उभ्या राहिलेल्या चळवळीची फळं आम्ही आज चाखतो आहोत. बहुजन समाजातील स्त्री-पुरुषांना याची जाणीव हवी.  आज भारतीय समाजातील स्त्रिया बाबासाहेबांच्या चळवळीमुळेच शिकून सवरुन स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या बनलेल्या आहेत. आर्थिक स्थैर्याचं सुख अनुभवत आहेत. पण संपुर्ण भारतीय समाज आज या स्थितीला पोचला आहे का? अजूनही ह्या देशात खैरलांजी घडते आहे, अजूनही रमाबाईनगर हत्याकांड राजरोसपणे घडत आहे आणि आरोपी मोकाट सुटताहेत. 

अजूनही खेडोपाडीच नव्हे तर शहरात देखील अत्याचाराची प्रकरण घडत आहेत. स्त्रियांची नग्न धिंड काढली जात आहे. अजूनही देवदासी प्रथांमधून विशिष्ट जातीतील स्त्रीलाचं गावातील धनदांडग्यांसाठी भोगदासी बनविण्याची कारस्थाने सुरूच आहेत. आज या साऱ्यांच्या विरुध्द उभे राहून लढण्यासाठी सशक्त चळवळीची गरज आहे. या चळवळीत फक्त पुरुषच असून चालणार नाही. तर प्रत्येक स्त्रीचा सहभाग असायला हवा. काहींचा सावित्रीमाई फुलेंसारखा प्रत्यक्ष सहभाग तर काहींचा माता रमाईंसारखा अप्रत्यक्ष सहभाग. स्त्रियांच्या सहभागानेच चळवळीला ताकद येते. ती खऱ्या अर्थाने समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचते. म्हणूनच स्त्रियांनी आपल्या जबाबदारीचं भान ठेवायला हवं.  

माता रमाई बाबासाहेबांच्या आयुष्यात आल्या तेव्हा पूर्णपणे अशिक्षित होत्या. पण त्यांनी या महामानवाचं मन समजून घेतलं, त्यांची महान चळवळ समजून घेतली, त्यांची  कर्तव्यं समजून घेतली. कोण म्हणेल या माऊलीला अशिक्षित? आजच्या शिकलेल्या स्त्रियांकडे तरी ही समज आहे का? चळवळीत काम करणाऱ्या आपल्या पतीला समजून घेण्याची कुवत त्यांच्यात आहे का? स्वत: आर्थिक स्थैर्य उपभोगणाऱ्या स्त्रियांनी तरी घरातील पुरुषांना चळवळीसाठी मोकळं सोडायला हवं. घरातल्या जबाबदाऱ्या स्वत: हिंमतीने पेलायला हव्यात. ज्या स्त्रियांमध्ये घराच्या बाहेर पडून काम करण्याची कुवत आहे, त्यांनी तर उंबरठ्याबाहेर पडायलाच हवं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुध्दांचा वारसा दिलाय. त्यातील थेरींचा वारसा आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांनी पुढे न्यायचा आहे. समाजासाठी आपला वेळ, पैसा, बुध्दीमत्ता आणि श्रम उपयोगात आणायचे आहेत. तरच समाज वेगाने पुढे जाईल. पुढच्या पिढीच्या वाटचालीसाठी रस्ता सोपा होईल.  

माता रमाईंच्या त्यागाचं मोल डॉ. बाबासाहेबांना किती होतं याचीही जाणीव आंबेडकरी पुरुषांना असायला हवी. `बहिष्कृत भारत' या साप्ताहिकात बाबासाहेबांनी रमाईंचं वर्णन पुढील प्रमाणे केलेलं आहे. `प्रस्तुत लेखक परदेशी असतांना रात्रंदिवस जिने प्रपंचाची काळजी वाहिली व जिला ती अजूनही करावी लागत आहे व स्वदेशी परत आल्यावर त्याच्या विपन्न दशेत शेणीचे भारे स्वत:च्या डोक्यावर वाहून आणण्यास जिने मागेपुढे पाहिले नाही अशा अत्यंत ममताळू, सुशील व पूज्य स्त्रीच्या सहवासात दिवसाच्या चोवीस तासातून अर्धा तासही त्याला घालविता येत नाही.' रमाईंच्या निधनाच्या सात वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. 27 मे 1935 रोजी रमाईंचं निधन झालं आणि पहाडी व्यक्तिमत्वाचे बाबासाहेब मुळापासून हादरले. रमाईंच्या हयातीत बाबासाहेबांनी आपल्या पत्नीवरचं हे इतकं अगाध प्रेम तिच्यापाशी बोलून दाखविलं होतं का कुणास ठाऊक? पण हे अबोल प्रेम, ही अबोल निष्ठा 1940 मध्ये लिहिलेल्या `थॉट्स ऑन पाकिस्तान' या ग्रंथातील अर्पण पत्रिकेतून उभ्या दुनियेपुढे जरूर व्यक्त होतं.    

As a token of my appreciation of her goodness of Heart, nobility of mind and her purity of character-- ही या अर्पणपत्रिकेतील काही वाक्ये.  

रमाईंवरचं हे अबोल प्रेम बाबासाहेबांनी त्यांना लिहिलेल्या अनेक पत्रातूनही व्यक्त होतं. पतीपासून कोसो दूर असलेल्या आपल्या पत्नीवरच्या विश्वासाची पावती बाबासाहेबांनी लंडनहून पाठवलेल्या पत्रातून दिली आहे. बाबासाहेबांच्या रमाईंवरच्या या विश्वासाने, आदराने, प्रेमाने आणि निष्ठेने जशा रमाई कितीतरी मोठ्या होतात. तसेच बाबासाहेबही `माणूस' म्हणून कितीतरी मोठे होतात. बाबासाहेबांनी आपल्यापेक्षा कितीतरी कमी शिकलेल्या आपल्या पत्नीला आत्यंतिक आदराने वागविले. रमाईंना ते `रामू' म्हणत. आपल्या `रामू'चा त्यांनी कधीही अपमान केला नाही. बुद्धांच्या स्त्री-पुरुष समानतेचा वारसा अशा पद्धतीने बाबासाहेबांनी जोपासला. आजच्या स्वतला आंबेडकरी म्हणवणाऱ्या पुरुषांनी हा वारसा लक्षात घेणे गरजेचे आहे.

 घराघरात रमाईंचा आदर्श आपल्या पत्नीला सांगू इच्छिणाऱ्या पुरुषांनी स्वत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हा आदर्श स्वतला सांगणे अत्यंत आवश्यक आहे. चळवळीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या स्त्रीला पतीच्या मनातील स्वतबद्दलच्या विश्वासाची नितांत गरज असते. तर घराच्या जबाबदाऱ्या पेलत अप्रत्यक्ष काम करणाऱ्या स्त्रीला पतीच्या मनातील स्वतबद्दलच्या सन्मानाची किवा आदराची नितांत गरज असते. घराघरामध्ये हे सारं सांभाळलं जाईल तर आंबेडकरी चळवळ झपाट्याने पुढे जायला वेळ लागणार नाही. माता रमाईंच्या स्मृतींना उजाळा देतानाच दुसरीकडे प्रत्येकाने आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचा संकल्प करायला हवा. 

अरुणा नारायण.... अहमदनगर

-------------------------------------------------------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com