स्वातंत्र्यपूर्वीची ही घटना आहे. त्यावेळेस गांधी जीवंत होते. बाबासाहेब केंद्रीय मिनिस्टर होते. तेंव्हाची ही घटना आहे. ही घटना तुम्हाला खैरमोडेंनी, धनंजय कीरांनी वा किंवा ज्यांनी, ज्यांनी बाबासाहेबांचे चरित्र लिहले आहे त्यात सापडणार नाही. पण याचा अर्थ ती घटना घडलीच नाही असा होत नाही. कारण कोणताही चरित्र लेखक हा प्रथम माणूस असतो. त्याच्याही काही मर्यादा असतात. त्याच्या काही भावभावना असतात, भूमिका असतात. त्यामुळे तो चरित्र लिहताना कोणत्या घटना घ्यायच्या आणि कोणत्या नाही घ्यायच्या याची निवड तो स्वतः करत असतो. त्यामुळे त्याने न लिहलेल्या घटना घडल्याच नाहीत, असे समजणेही संयुक्तिक नसते. बाबासाहेबांच्या आयुष्यात अशा कितीतरी घटना अशा असू शकतात की, त्या आजतागायत कोणीही शब्दबद्ध केलेल्या नाहीत. अशीच एक घटना मी आज आपणाला सांगणार आहे. या घटनेला जरी लेखी संदर्भ नसला तरी त्यामागचं सुत्र सांगणे आवश्यक आहे. नाहीतर ही घटना कपोलकल्पित ठरण्याचा धोका संभवतो. तर हे सुत्र म्हणजे आमच्या वरळीत राहणारे शामराव कांबळे नावाचे एक वयोवृध्द गृहस्थ. आज ते हयात नाहीत. ते वरळी बि.डी.डी.चाळीत तीन नंबरमध्ये तळमजल्याला राहायचे. आजही त्यांचं कुटुंब तिथे रहात आहेत. ते तीन नंबरमध्ये आणि मी एकोणनव्वद मध्ये. त्यांचा माझा परिचय झाला महानायक या वर्तमानपत्रामुळे. त्यावेळेस मी दर शनिवारी महानायकमध्ये 'पँथर अटॅक' हे सदर लिहायचो. दर शनिवारी सकाळी सात वाजल्यापासूनच माझा फोन वाजायला सुरुवात व्हायची. असंख्य वाचकांचे फोन यायचे ते अगदी रात्रीपर्यंत. त्यात वाचकांच्या बर्या, वाईट प्रतिक्रिया असायच्या, सूचना असायच्या. एकूण माझे हे सदर दिवसेंदिवस दखलपात्र होत चालले होते. अशाच एका शनिवारी सकाळीच सात वाजता माझा फोन वाजला. समोरुन खरखरता धीरगंभीर आवाज आला, मी शामराव कांबळे बोलतोय! मग शनिवारच्या लेखासंबंधी त्यांनी आपले मत व्यक्त केले की ज्यात माझे भरभरुन कौतुक होते. चांगलं लिहता. असच लिहित रहा. असं बोलून त्यांनी माझी व्यक्तिगत माहिती विचारायला सुरुवात केली. त्यात वय किती, काय करता, कोठे राहता, असे प्रश्न होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे देता, देता मी त्यांना सांगीतले की मी वरळीत राहतो. हे ऐकताच शामरावांच्या तोंडातून आश्चर्योद्गार उमटला. ते म्हणाले, मी पण वरळीतच तीन नंबरमध्ये राहतो. तुम्ही कुठे राहता? मी त्यांना माझा पत्ता सांगीतला. शामराव म्हणाले, मी उद्या म्हणजे रविवारी तुमच्या घरी येतो.
आणि मग दुसर्याच दिवशी रविवारी सकाळीच नऊ वाजता शामराव माझ्या दारासमोर उभे ठाकले. वय वर्ष नव्वद, रंग गोरा, पांढर्या शुभ्र झुबकेदार मिशा, डोळ्यावर जाड भिंगाचा मोठ्या फ्रेमचा चष्मा, पांढरा शुभ्र सदरा लेंगा. एकूण भारदस्त व प्रभावशाली व्यक्तिमत्व होते त्यांचे. मी त्यांना घरात घेतले, पाणी दिले. माझ्या मनात पहिला प्रश्न उभा राहिला की, हा एवढा वयोवृध्द माणूस तीन नंबर मधून रस्ता ओलांडून माझ्या घरी चालत कसा काय आला असेल? तशी त्यांची शरीरयष्टी एखाद्या कसलेल्या पैलवानासारखी उंच, धिप्पाड होती. तरीही या वयात एवढे फिरणे आणि तेही एकट्याने ही कमालच होती. चहापान झाले. कुटुंबाची ओळख करुन दिली. माझ्या दोनही मुलींनी व पत्नीने त्यांच्या पायाला हात लावून जयभीम केला. शामरावांनीही आमच्या कुटूंबाला भरभरुन आशिर्वाद दिला आणि त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रणही दिले.
या दिवसापासून शामराव माझे जानी दोस्त बनले. आमच्या दररोज भेटीगाठी होऊ लागल्या. शामराव आपल्या आयुष्यातील जुन्या घटना मला सांगायचे, बाबासाहेबांविषयीच्या अनेक आठवणी त्यांनी मला सांगितल्या. हळूहळू शामराव आणि माझी मैत्री सगळ्या वरळीला कळून चुकली. शामरावांच्या आठवणींनी मला महानायक मधल्या माझ्या पँथर अटॅकसाठी अनेक विषय मिळवून दिले. या आठवणीपैकीच एक आठवण मी आज तुम्हाला सांगणार आहे. ही आठवण पँथर अटॅकमध्ये यावी अशी त्यांची खुप इच्छा होती. त्यांची ही आठवण मी पँथर अटॅक मध्ये लिहली की नाही, याबद्दल मला आता निटसे आठवत नाही. पण आज या वयोवृध्दाची खुपच तिव्रतेने आठवण झाली. आणि म्हणूनच ही आठवण मी आज तुमच्यासोबत शेअर करायचे ठरवले आहे.
वरळीची जातीय दंगल म्हटली की, आजकालच्या तरुणांना फक्त पँथर काळातील दंगलच आठवते. पण पँथरच्या कितीतरी आधी वरळीत एक जातीय दंगल झाली होती. आणि ती दंगल पँथरच्या दंगलीपेक्षाही कितीतरी भिषण दंगल होती. म्हणजे गांधीने पुणे करारात अक्षरशः बाबासाहेबांना भावनिक ब्लॅकमेल करत त्या पुणे करारावर स्वाक्षरी करायला भाग पाडले होते. हे खरं तर बाबासाहेबांनाही रुचले नव्हतेच. कारण बाबासाहेबांना अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हवा होता. पण गांधी मेले तर माझा दीनदलीत समाज यात हकनाक बळी जाऊ नये, म्हणूनच नाईलाजास्तव बाबासाहेबांनी या पुणे करारावर स्वाक्षरी केलो होती. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी यानंतरच्या काळात या पुणे करारावर कडकडून टिका केली होती.
यानंतर कितीतरी वर्षाने ( आता नेमकं वर्ष आठवत नाही ) गांधी वरळीत आले. त्याकाळात वरळी म्हणजे खरोखरच बाबासाहेबांचा बालेकिल्लाच होता. त्या काळात वरळीत आर. डी. भंडारेंचं साॅलीड नेटवर्क होतं. बि.सी.कांबळेही वरळीतच रहात होते. बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी चव्हाण मास्तरही त्या काळात नगरसेवक.होते. आजही आंबेडकर मैदानात चव्हाण मास्तरांचे बुध्द विहार दिमाखात उभे आहे.
तसाही पुणे करारामुळे गांधीवर बाबासाहेबांचा अनुयायी प्रक्षुब्धच होता..त्यात गांधो जांभोरी मैदानात आले होते. आणि मग वरळीतल्या लोकांनी गांधीला काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. फक्त एवढ्या कारणास्तव मग पोलीस ॲक्शनमध्ये आले. अत्यंत क्रुरपणे आपल्या पोरांची धरपकड सुरु झाली. त्या काळात आपल्या प्रत्येक चाळीच्या तळमजल्यावर एक व्यायाम शाळा असायची. पण या धरपकडीमुळे ती व्यायामशाळाही ओस पडू लागली. पोलीस चाळीत घुसून पोरांना मारझोड करुन ॲरेस्ट करत होते. त्यात इतर समाजाकडून होणारे दगडफेकीचे व सोडा वाॅटरच्या बाटलीफेकचे हल्ले चालूच होते.
ही बातमी उडत, उडत जेंव्हा बाबासाहेबांच्या कानावर पडली तेंव्हा दस्तुरखुद्द बाबासाहेब वरळीत आले. त्यावेळेस सगळा समाज बाबासाहेबांच्या सभोवताली गोळा झाला.त्या सर्वांच्या करुण कहाण्या ऐकताना बाबासाहेबांचे डोळे पाणावले. तिथल्या तिथे बाबासाहेबांनी पोलीस कमिशनरला फोन करुन हा प्रकार त्वरित थांबविण्याचे आदेश दिले. नंतर वरळीतल्या त्या लोकांकडे पाहून बाबासाहेब उद्गारले की, हा खरा माझा बालेकिल्ला आहे. परतताना बाबासाहेबांनी आपल्या लोकांना निक्षून सांगीतले की, तुम्ही अजिबात रस्त्यावर यायचं नाही. पण जर पोलीस चाळीत घुसले तर त्यांना बिलकुल सोडायचं नाही. पुढे काय होईल ते मी बघून घेईल. त्याच्या दुसर्याच दिवशी एक पोलीस चाळीत घुसायचा प्रयत्न करत होता तेंव्हा दोन नंबर मधील एका कार्यकर्त्याने त्याचे एका तलवारीत दोन तुकडे पाडले. नंतर मात्र पोलीसांनी चाळीत घुसून कारवाई करण्याचे बंद केले.
ही घटना घडली त्यावेळेस शामराव कांबळे पस्तीस, चाळीस वयाचे असतील. पण ही घटना जर थोड्या वेळापुरता सत्य मानली तर यातून आपणास बाबासाहेबांचे एक वेगळं स्वभाव वैशिष्ट्य जाणवतं. ते म्हणजे, ठिक आहे की तुम्ही कायदा हातात घेऊ नका. पण जर कोणी तुमच्यावर अती करत असेल तर त्याला अजिबात सोडू नका. २९ मे ला पँथरचा सुवर्ण महोत्सव आहे. मला या घटनेतून बाबासाहेबांमधला पँथर जागृत झालेला दिसला. नव्वदी पार केलेले शामराव जेंव्हा मला ही घटना सांगत होते त्यावेळेस अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिले होते. त्यांचं वय लक्षात घेता यात काही तांत्रिक चुका असूही शकतात. पण ही घटना सांगताना त्यातला प्रांजलपणा मला खुप भाऊन गेला. त्यावरुन ही घटना सत्य आहे, याचे मला प्रत्यंतर आले. शामराव म्हणायचे की, अनेक जण म्हणतात की, आमचा एरिया हा बाबासाहेबांचा बालेकिल्ला आहे. पण दस्तुरखुद्द बाबासाहेबांनी ज्याला आपला बालेकिल्ला म्हटला तो एकमेव बालेकिल्ला हा फक्त वरळी आहे. ठिक आहे. आज या बालेकिल्ल्यातून भलतेच लोकप्रतिनिधी निवडून जात आहेत. याला कारणीभूत आंबेडकरी चळवळीतील फुटीर नेते आहेत. आणि त्याचबरोबर इथली विकाऊ आंबेडकरी जनताही आहे. कधी काळी वरळीच्या या आंबेडकरी जनतेला जाग येईल आणि तिला अनुभुती होईल की, अरे आपण तर या मतदार संघाचे राजे आहोत आणि तरीही आपण परक्यांची लाळ चाटण्यात धन्यता मानत आहोत, तो दिवस आंबेडकरी चळवळीचा सोन्याचा दिवस असेल. त्या दिवशी या वरळीतून फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचा खासदार, आमदार आणि नगरसेवक असेल. तुर्तास जयभीम!
- विवेक मोरे
0 टिप्पण्या