Top Post Ad

यासाठी बुद्धपौर्णिमेचा उत्सव हा लेण्यांवरच व्हायला हवा.


  काही वर्षापूर्वीच अगदी अलिकडेच मस्जिद या मुळच्या मंदीर असल्याचा दावा करीत अनेक तथाकथित संघटनांनी आपली आक्रमकता पाजळायला सुरुवात केली. मस्जिदमध्ये असलेल्या गोलघुमटाला शिवलिंग असल्याचे सांगून मंदीरच असल्याचे भासवण्याचा केविलवाणा प्रकार सुरु झाला. प्रकरण कोर्टात गेले. पुन्हा मंदिर मस्जिदचा वाद सुरु होणारच होता. तेव्हा बौद्ध अनुयायांनी सर्व मंदीरे ही कशी बुद्धविहारे बौद्धांची प्रार्थनास्थळे आहेत हे सबळ पुराव्यानिशी दाखवून देण्याचा पाठपुरावा सुरु केला आणि या धर्मांधवाद्यांची आक्रमकता लयास गेली. त्यानंतर याबाबतच्या बातम्या देखील बंद झाल्या. बौद्ध संस्कृतीचे प्रतिक असलेल्या मोठ्या कष्टाने कोरलेल्या महाराष्ट्रातील जवळपास 400 बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले आहे. काहींचे  नामकरणही झाले आहे.  भारतामध्ये सर्वात प्रथम, सम्राट अशोक यांनी संपुर्ण जम्बोद्विपावरील  डोंगर पर्वतांवर 84 हजार लेणीं कोरून ती दान दिली. त्यानंतर ही शिल्पकला बिहार, ओरिसा, बंगाल, आंध्र प्रदेश मार्गे महाराष्ट्रात आली आणि येथे तिचा उत्कर्ष झाला. भारतात जवळपास 1200 लेणीं आहेत  लेणीं व त्यातील शिल्पकाम आणि शिलालेख हे बौद्ध संस्कृतीची देणं आहे. इ.स. पूर्व 200 ते इ.स. 800 या कालावधीत अनेक राजांनी, व्यापाऱ्यांनी, शेतकरी किंवा सामान्यजनांनी आणि भिक्खू-भिक्खुणींनी या लेणीं कोरून, बौद्ध भिक्खूंसाठी दान दिल्या.  या लेणीं मधील शिलालेखांच्या अभ्यासातून कळते कि प्रत्येक बुद्ध लेणींना तेथील नगराच्या, अथवा भिक्खू संघाच्या किंवा ज्या डोंगरावर कोरली असेल त्या डोंगराच्या नावाने ओळखले जात असे. मात्र सत्तांतर झाल्यानंतर  साधारणत 10 ते 11व्या शतकानंतर, भारतातील विशेषत महाराष्ट्रातील अनेक बुद्ध लेणींवर, इतर पंथीयांनी अतिक्रमण केले. काही ठिकाणी तर संपूर्ण लेणींच विद्रुप करून, तिचे प्राचीनत्व नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला आहे.  अतिक्रमण केल्यानंतर या लेणींमधील अनेक विहारांची किंवा स्तूपाची नासधूस करत, या बुद्ध लेणींचे  नामकरण  देखील करण्यात आले. काही ठिकाणी यांना एकविरा, लेण्याद्री, पालपेश्वर किंवा पांडव लेणीं आणि अशा अनेक नावांनी ओळखले जाऊ लागल्या. हे  नामांतर  साधारणत 18व्या शतकानंतर झाल्याचे दिसते. याला जरी अनेक कारणे असली तरी बुद्ध लेणींवर अतिक्रमण करून या सर्व देवता, लेणींत नंतर स्थापन करण्यात आल्या हे सत्य आहे आणि मग हे स्थान या देवीदेवतांची कसे यांचे माहात्म्य सांगण्राया कथा रचण्यात आल्या.   

इतिहास किंवा पुरातत्त्वशास्त्र हे प्रत्येक गोष्टींचे पुरावे मागत असते. त्यांच्या दृष्टीने श्रद्धा ही एक मान्यता आहे जी मानसिक असते; मात्र ही श्रद्धा पुरावा होऊ शकत नाही. ऐतिहासिक किंवा पुरातत्वीय दृष्ट्या, पांडव होऊन गेले याचा कुठलाही पुरावा अद्यापही उपलब्ध नाही. आता कुठे कुठे त्याचे पुरावे पेरण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जेणेकरून काही काळाने हा घ्या पुरावा असे म्हणायला मोकळे. तरीही बुद्ध लेणींना पांडव लेणीं का संबोधण्यात येऊ लागले? हा मोठा प्रश्न आहे.  प्राचीन काळी पालि भाषेला मागधी आणि प्राकृत भाषेला अर्धमागधी या नावाने संबोधण्यात येत असे. तसेच या दोन्हीही भाषा, राजभाषा म्हणून मानण्यात येत होत्या. मगधाचे राज्य जवळपास संपूर्ण भारतवर्षावर होते आणि म्हणूनच पालि ही या सर्व प्रदेशात बोलली जायची. पालि भाषेत  पंडू  या शब्दाचा अर्थ पिवळा किंवा फिकट पिवळा असा आहे (उदा.पंडुरोग). त्याकाळी सामान्यजणांना, बौद्ध भिक्खूंना,  भिक्खू  म्हणतात हे माहित नव्हते. त्यांना जर कोणी विचारले कि या डोंगरातील लेणींवर कोण राहते, तर त्यांचे उत्तर असे - पंडू वस्त्रधारी राहतात. बौद्ध भिक्खू हे  चीवर  घालतात जे पिवळ्या किंवा गडद भगव्या रंगाचे असते. त्यामुळे या लेणींना  पंडू वस्त्रधारी राहणाऱ्यांची लेणीं  असे नांव पडले.   

कालांतराने अनावश्यक शब्द टाळून या लेणींना  पंडू लेणीं  म्हणायला सुरुवात झाली. पुढे याच पंडू लेणींना, अपभ्रंशाने  पांडू लेणीं   म्हटले जाऊ लागले. याचेच पुढे  पांडव लेणीं  हे नामांतर करण्यात आले. जेव्हा हा शब्द रूढ झाला त्यानंतर हे नांव कसे योग्य आहे, यासाठी आधीच अस्तित्वात असलेल्या पांडवांच्या लोककथेशी या लेणींचा संबंध जोडला जाऊ लागला. या लेणींच्या निर्मितीच्या सुरस कथा जनसामान्यात प्रसारित करण्यात आल्या जसे कि भीमाने गदेने एका रात्रीत हा डोंगर फोडला, किंवा बोधिसत्त्वाच्या शिल्पाला एखाद्या पांडवांचे नांव देणे आणि ते तेथे कसे याचे रसभरीत वर्णन करणे, इत्यादी. या लोककथा अनेक शतके रूढ झाल्याने सामान्य लोकांनी या बुद्ध लेणींना सहजपणे पांडव लेणीं म्हणायला सुरुवात केली. मात्र इतिहासकार, पुरातत्वाचे अभ्यासक देखील आणि आपले इतिहास संशोधन विभाग देखील याकडे डोळेझाक करते तेव्हा इथली धर्मांधता किती खोलवर रुजली आहे याचा प्रत्यय येतो.     

नाशिकची प्रसिद्ध आणि सर्वात प्राचीन वास्तू असलेली बुद्ध लेणीं. शिलालेखानुसार ही लेणीं त्रिरश्मी डोंगरावर कोरली असल्यामुळे तिचे नांव त्रिरश्मी बुद्ध लेणीं आहे. ही लेणीं इ.स.पूर्व 200 ते इ.स. 800 या कालावधीत कोरून बौद्ध भिक्खूंना दान देण्यात आली आहे असे येथील सत्तावीस शिलालेख स्पष्ट सांगतात.  कर्नाटक राज्यातील मंगळूर येथे 6व्या शतकातील विहार असून, त्याच्या जवळच्या डोंगरात असलेल्या बुद्ध लेणीं. प्राचीन काळी कंदरिका नावाच्या बुद्ध विहारात, बोधिसत्त्व अवलोकितेश्वराचे शिल्प होते ज्याचे नामकरण आता लोकेश्वर झाले आहे. मात्र या शिल्पाच्या पायथ्याशी असलेल्या शिलालेखानुसार हे मूळ बोधिसत्वाचे शिल्प असल्याचे प्रमाण मिळते. आता या बुद्ध विहाराचे रूपांतर शैव मंदिरात झाले असून पूर्वीच्या कंदरिका विहाराचे नामांतर आता कद्री मंजुनाथ मंदिर असे झाले आहे.   या व्यतिरिक्त भारतात अशा अनेक बुद्ध लेणींचे अतिक्रमण होऊन नामकरण झाले आहे. कोंकणात व इतरत्रही अशा अनेक बुद्ध लेणीं आहेत ज्यांचे नामकरण झाले आहे.  गंमतीचा भाग म्हणजे या लेणीं कोरण्याचा काळ जर पहिला तर पांडवांनी एवढ्या कमी वेळात, एवढे मोठे भौगोलिक अंतर पार पडून, एवढे डोंगर फोडून, त्यात लेणीं कोरून तेथे किती दिवस राहिले हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अर्थात या प्रश्नांची उत्तरे कुणाही इतिहासकार किंवा पुरातत्व अभ्यासकाकडे नाहीत.  

आजचे  संशोधन सांगते कि मुळातूनच या बुद्धलेणीं आहेत आणि त्यातील शिलालेखांनुसार या लेणीं समूहांना काही विशिष्ट नांवे त्याकाळात दिली होती. ज्या दानदात्यांनी अतिशय श्रद्धापूर्वक या लेणीं कोरून बौद्ध भिक्खूंना दान दिल्या, त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी, त्यांनी या लेणींना दिलेले नांव आम्हीं का बरे अंमलात आणू शकत नाही? मुळातच या लेणींना, पांडव लेणीं म्हणायचा अट्टाहास का?  कार्ला लेण्यांमध्येच मंदीर का? बोरिवलीच्या लेण्यांच्या मध्यभागी देखील काही वर्षापूर्वी भव्य मंदीर उभारण्यास सुरुवात झाली होती. मात्र अनेक लेणी संवर्धक मंडळींनी याविरोधात आक्रमकतेने आंदोलन केल्याने ते बंद करण्यात आले. तरीही त्याचे अवशेष अद्यापही त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. कदाचित आमची आक्रमकता लोप पावली की पुन्हा येणाऱ्या पर्यटकांना मंदीराचा इतिहास सांगण्यास मोकळे. मात्र आमचे इतिहासतज्ञ, पुरातत्व अभ्यासक आणि संशोधन मंडळ मात्र डोळे मिटून गप्पच.  पांडवांनी या लेणीं कोरल्या असतील  तर त्यांनी सगळीकडे फक्त भगवान बुद्धांच्याच किंवा बौद्ध संस्कृतीशी निगडित प्रतिमा का बरे कोरल्या असतील? याचा काहीही विचार न करता सध्या तथाकथित धर्मांधवादी लोक या भारतीय संस्कृतीचं पुन्हा एकदा विडंबन करण्याचे योजत आहेत. सम्राट अशोकाने  बुध्द धम्माचा एैतिहासिक ठेवा डोंगराच्या दरी खोऱ्यातून  पाषाणात  चैत्य, स्तूप, बुध्दमुर्ती, शिलालेखात लेणी रुपात कोरुन ठेवला आहे. हा ठेवा सम्राट अशोकानंतर कधी इथल्या धर्मांधवाद्यांकडून छुप्या पद्धतीने तर कधी उघडपणे नष्ट करण्याचा प्रयत्न  होत आहे.  त्या लेणींमधील बुध्दरुपाचं विद्रुपीकरण करुन त्यांना तथाकथित देव देवताचे रुप देऊन अनेक लेणी उध्दस्त केल्या आहेत, करत आहेत. आज त्याचा शोध घेऊन  त्यांचे संवर्धन केले नाही तर येणाऱ्या पिढीला ही बौद्ध परंपरा पहायला मिळणार नाही. त्याचे जतन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहीजे, १ जानेवारी कोरेगाव-भीमा, १४ जानेवारी विद्यापीठ औरंगाबाद, २० मार्च महाड क्रांतिस्तंभ, विजयादशमी नागपूर, अशा तऱ्हेने आता बुद्धपौर्णिमेचा उत्सव देखील आपल्या जवळच्या लेण्यांवरच व्हायला हवा. सम्राट अशोकाच्या काळात ज्याप्रमाणे लेण्यांवर महोत्सव होत होते अगदी त्याप्रमाणे....  




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com