Top Post Ad

रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे'चा संक्षिप्त लेखाजोखा...


   देशातील लोकशासन आणि राज्यघटना, मोठ्या संकटात सापडलेली असताना व देशात 'आर्थिक-विषमते'चा स्वैर नंगानाच सुरु असताना... 'समतेचा संदेश' देणाऱ्या व 'राज्यघटनेचा शिल्पकार' असलेल्या महामानवाच्या जयंतीनिमित्ताने आपल्या रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे'चा (Vampire-State System) मांडलेला हा संक्षिप्त लेखाजोखा...

काँग्रेसने सत्तर वर्षात अगदी 'रामराज्य' निर्माण केलं, असं काही झालं नाही... पण, सात वर्षात MSME क्षेत्र संपवून व मूठभर बड्या भांडवलदारांना देश व देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था पद्धतशीररित्या 'आंदण' देऊन, अयोध्येत दगडावीटांचं 'राममंदिर' बांधू पहाणाऱ्या मोदी-शहा भाजपाई सरकारने, देशात 'रावणराज्य' मात्र जरुर निर्माण करुन दाखवलंय...!!! मोदी-शहा भाजपा-सरकारची आर्थिक धोरणं (विशेषतः, 'नोटबंदी' व करोना-टाळेबंदीचा तमाशा आणि बेमुर्वतखोरपणे लादलेली GST वगैरे), ही देशाच्या अर्थव्यवस्थेला Crony-Capitalism कडे नेणारी असण्याची, या भाजपा सरकारच्या फायद्याच्या दृष्टीकोनातून जी काही मोजकी महत्त्वपूर्ण कारणं आहेत... 

त्यापैकी, महत्त्वाचं एक कारण म्हणजे, त्यांच्याकडून भरमसाठ निवडणूक-निधी (हजारो कोटींचा) सहजी गोळा करता येतो आणि शिवाय, या कानाची खबर, त्या कानाला लागत नाही (त्यासाठी, सोयीचे कायदेही सोयीने बनवून, बदलून घेतले गेलेले आहेत). छोट्या-मध्यम उद्योगांकडून मोठा पैसा गोळा करण्यात, अडचणी हजार आणि बोभाटा फार!

...आणि, सरतेशेवटी भाजपाई 'गुजराथी-लाॅबी' ही, हाडाची पक्की व्यापारी-धंदेवाली! राजकारणाकडे सुद्धा 'समाजसेवा' वगैरे म्हणून पहाणं, त्यांच्या फारसं गावी नसतंच. तो ही त्यांच्यासाठी बक्कळ नफ्याचा 'धंदा'च असतो. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर, महाराष्ट्राची 'महालक्ष्मी' केव्हाचीच गेलीय त्यांच्या ताब्यात आणि आता महाराष्ट्राची 'राजलक्ष्मी' देखील त्यांच्याच ओटीत!

देशातल्या सार्वजनिकक्षेत्रातील अनेक मोठा नफा कमावणारे सक्षम उद्योग-सेवा आस्थापनं/खाणी/बंदरं/विमानतळं-एअर इंडियासारखी विमान कंपनी/रेल्वेसेवा/बँका इ. याच आपल्या खास मर्जीतील मूठभर भांडवलदारांना मोदी-शहा सरकार विकून केव्हाचंच मोकळं झालंय... खलिल जिब्रान तसंही म्हणून गेलेलाच आहे की, जिस देश का राजा बेपारी, उस देश की प्रजा भिकारी"! मग, प्रजेचं काय व्हायचं ते होऊ दे... देश बुडला, पुरता विकला गेला तरी चालेल; पण, आपली आणि आपल्या भांडवलदार मित्रांची 'धन' झाली पाहीजे, फुटेपर्यंत त्यांची पोटं तट्टं भरली गेलीच पाहीजेत... हाच तो, यांच्या राज्यातला खास संवेदनशून्य, हडेलहप्पी व टोकाचा शोषक व्यापारी-दृष्टीकोन व घृणास्पद धंदेवाईक वृत्ती!

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे, सरकारी यंत्रणांना आणि कंपन्यांमधील 'दहशतवादा'ला मोकाट सोडून आणि मोठ्या भांडवलदारांच्या मोठ्या पैशाद्वारे देशभरातल्या लाखो निर्बुद्धांचे कळप बाळगणाऱ्या तथाकथित धर्मसंप्रदायांच्या ठेकेदारांना (संगनमताने एकमेकांचा फायदा करुन देत) हाताशी धरत, जनतेला जातधर्म विषयात (मंदिर-मस्जिद उभारणी, सण-उत्सव साजरे करणं वगैरे) परिपूर्ण अडकवून... शेतकरी-कामगारवर्गासह सरसकट सर्वसामान्य जनतेला पुरतं नाडता येतं, लुटता येतं. अशा कफल्लक स्थितीतील जनतेला सन्मानाने जगण्यासाठी नव्हे; तर, निव्वळ 'तगण्या'साठी आयुष्यभर झगडावं लागतं. या शोषण-अन्याय-अत्याचाराविरुद्ध तिच्याकडून संघटित विरोध होणं, अशा परिस्थितीत जवळपास अशक्य बनवलं गेलेलं असतं. 

त्याच गोष्टीचा फायदा उठवून मग, आपल्याच पक्षाच्या, भ्रष्टाचारातून व पक्षीय सत्तेमत्तेच्या आडोशाने साधलेल्या अर्थकारणातून 'अतिधनाड्य' बनलेल्या राजकारण्यांकडून तसेच, पक्षाने स्वतंत्रपणे वेगळ्या पुरवलेल्या अर्थबळावर, पैशाचं निवडणुकीत व इतर वेळेसही खुबीने जनतेत 'थेट वाटप' करता येतं आणि पक्ष-पदाधिकाऱ्यांची स्थानिक पातळीवर जनतेपुढे 'राॅबिनहूड'ची फसवी प्रतिमा बेमालूम रंगवता येते. सार्वजनिक उत्सवमंडळं, विविध धर्मपंथांना मोठ्या देणग्या, आपल्या चरणी आलेल्या विशिष्ट लोकांना आरोग्यसेवेपासून इतर अनेक सरकारी-खाजगी सेवा मोफत देऊन, शाळा-काॅलेजात प्रवेश मिळवून देऊन अथवा व्यक्तिगत अडीअडचणीत थेट आर्थिक मदत देऊन त्यांना सहजी कायमचं गुलाम तर बनवता येतंच; शिवाय, आपसूकच मोठा 'मदतवीर' म्हणून मोठी जाहिरातबाजीही होते. 

अत्यंत मर्यादित अशा वैयक्तिक पातळीवरच हे सगळं, सरकारला समांतर असं 'मदतीचं अर्थकारण' साधलं जातं; पण, जगण्याच्या आसाला भिडलेल्या जनतेच्या मूलभूत प्रश्नांना (कंत्राटी-कामगार पद्धतीतील 'गुलामगिरी व नव-अस्पृश्यता' नष्ट करणं, सन्मानानं जगता येईल असं 'किमान-वेतन' धोरण आखणं व राबवणं, मस्तवाल भांडवलदारांच्या 'कंपनी-दहशतवादा'ला कठोरपणे आळा घालणं, सार्वजनिक क्षेत्राकडून शिक्षण-आरोग्यसेवा दर्जेदार व किफायतशीर देणे, परवडणारी चांगली घरं उपलब्ध करुन देणं वगैरे वगैरे) मात्र, कायमच वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात... ते मूलभूत प्रश्न जसेच्या तसे, विक्रम-वेताळाच्या कथेतल्या वेताळासारखे वर्षानुवर्ष अधांतरी टांगलेले रहातात किंवा खुंटीला बांधले जातात!

तसेच, स्थानिक पातळीवर मग, प्रत्येक ठिकाणी दादा/भाई/मुन्ना/अण्णा/साहेब/धर्मवीर/कर्मवीर वगैरे खासमखास विशेषणं लावलेल्या अनेक स्थानिक नेत्यांना, याच मोठ्या पैशातून व 'राॅबिनहूड' स्टाईल राजकीय प्रतिमारंजनातून खाजगी गुंडटोळ्या (तथाकथित कार्यकर्त्यांच्या) उभारता येतात, बिनबोभाट चालवता येतात... आणि, त्यातूनच या संपूर्ण समाजावर आपल्या मूठभर भांडवलदार मित्रांच्या साथीने (जेमतेम शे-दिडशे बडे उद्योगपती, त्यातही विशेषतः, अंबानी-अदानी यांच्यासारख्यांच्या हातात संपूर्ण अर्थव्यवस्था जाणिवपूर्वक सोपवत) पिढ्यानपिढ्या सुटू न शकणारी, अशी घट्ट सत्तेची मगरमिठी, या बड्या राजकारण्यांना घालता येते, निवडणुका जिंकता येतात, एवढं हे साधं गणित असतं.

बरं, प्रशासकीय सेवेतील IPS/IAS वगैरे श्रेणीतील ताठ पाठकण्याचे प्रामाणिक अधिकारी; तसेच, न्याययंत्रणेतील रामशास्त्री बाण्याचे न्यायाधीश... ही सगळी षडयंत्रं सहजी उध्वस्त करुन संबंधितांना तुरुंगात पाठवू शकतात. पण, क्षुद्र स्वार्थापोटी व अनामिक भितीपोटी, ही तथाकथित अत्युच्चशिक्षित लोकं... मोठ्याप्रमाणावर आपला आत्मा, आपली सदसद्विवेक बुद्धी एकतर विकून किंवा गहाण ठेऊन बसलेली असतात. त्यामुळे, सगळ्याच सरकारी दमन-यंत्रणा, 'राज्यघटनेला स्मरुन' काम न करता, भितीपोटी अथवा आमिषापोटी या बड्या राजकारण्यांच्या ताटाखालची मांजरं बनणं पसंत करताना दिसतात. अशा अंधकारमय स्थितीत 'शेवटची आशा' म्हणून पहावी... ती न्यायदान-यंत्रणा अतिशय महागडी, सामान्यांना न परवडणारी आणि प्रचंड वेळखाऊ (निदान, अजून तरी न्यायदान-यंत्रणेत, प्रशासकीय-यंत्रणेत सर्रास दिसतात, तशा अपप्रवृत्तींचा तेवढा शिरकाव झालेला नाही, हे भारतीय जनतेचं मोठं नशीब).

आपण फक्त, राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराबाबत बोलत रहातो... पण, आज मुंबई-ठाणे-नवी मुंबई-पुणे-नागपूरसारख्या उद्यमशील महानगरांमध्ये-शहरांमध्ये किंवा पर्यटकांची वर्दळ असलेल्या गोव्यासारख्या अनेक महत्त्वाच्या पर्यटनस्थळी... बेकायदेशीर धंदे करणारी, 'सरकारी नीतिनियम धाब्यावर बसवणारी' बडी हाॅटेल्स किंवा इतर आनुषंगिक; पण, उदंड नफा कमवून देणाऱ्या धंद्यांमध्ये (घरबांधणी, शाॅपिंग माॅल्स, खाजगी वहातूक वगैरे त्यात आलंच) प्रशासकीय सेवेतील बड्या अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या बेनामी किंवा जवळच्या नातलगांच्या भागिदार्‍या असतात किंवा काही ठिकाणी धंद्यांमध्ये सरळसोट त्यांची मालकी दिसते (याबाबत माहिती-अधिकारातून व विशेष सूत्रांकडून अशी बरीच रग्गड माहिती आमच्यासारख्यांकडे जमा झालेली असू शकते; पण, सत्प्रवृत्त लोकांच्या हाती सत्ता नसताना, या 'रावणराज्या'तील सत्ताधुंद धटिंगणांना शिक्षा कुठून व कशी होणार किंवा मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार? न्यायालयात जाऊन 'जनहित-याचिका' करायच्या तरी किती आणि वर्षानुवर्ष त्या चालवायच्या तरी किती??). 

हे सगळं आक्रित घडत जातं ते, त्यांनी भ्रष्टाचारावाटे कमावलेल्या अफाट पैशातून आणि 'राममंदिर' बांधू पहाणाऱ्या व उठसूठ 'हिंदुत्वा'च्या नौटंकी बाता मारणाऱ्या 'रावणराज्या'तील राजकारण्यांशी पडद्याआड हातमिळवणी करुनच! शिवाय, बिनदिक्कतपणे आपलीच सरकारी दमन-यंत्रणा आपल्याच हितासाठी राबवून (उदाहरण म्हणून, याच पद्धतीने पूर्वीचे मालक असलेल्या शेट्टी-समुदायाचं हाॅटेल-उद्योगातून जवळपास उच्चाटन झालेलं आपल्याला हल्ली दिसतं). 

याविरुद्ध, आपला जीव धोक्यात टाकून आवाज उठवणाऱ्या व समाजाची सदसद्विवेक बुद्धी जागृत ठेवू पहाणाऱ्या जातिवंत सामाजिक अथवा राजकीय कार्यकर्त्यांना (Conscience-Keepers)... हे 'सत्तेचे ठेकेदार', खोट्यानाट्या गुन्हेगारी खटल्यांमध्ये सतत अडकवून त्यांचं जगणं मुश्किल करुन टाकतात, जेणेकरुन ही 'व्यवस्था' चालवणाऱ्या बड्या धेंडांची सत्तेची व आर्थिक-ताकदीची 'बनी बनायी भट्टी' उध्वस्त होणं तर सोडाच... पण, त्याची एकही वीट कुणाकडून हलवली जाऊ नये, याची डोळ्यात तेल घालून, ते मिळून सारे, दक्षता घेत असतात. त्याकामी, प्रसंगी, अशा कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले होतात किंवा त्यांचे प्रसंगोपात्त मुडदेही पाडले जातात... आम्ही हे सारं गेली काही दशके भोगतो आहोत आणि भोगल्यानंतर लिहीतो आहोत याचं भान, कृपया वाचकांनी बाळगावं, ही हात जोडून नम्र विनंती... 

...कारण, भारतीय अध्यात्म-संस्कृति याचा मूळपुरुष असलेला आमचा राम आणि आमचा कृष्ण, आमच्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेला आमचा शिवाजी, चरख्यावर सूत कातणारा आमचा महात्मा, राज्यघटनेचा शिल्पकार असलेला आमचा महामानव आणि देशात सार्वजनिक क्षेत्राची पायाभरणी-उभारणी करणारा आमचा लाडका चाचा नेहरु... हे सारे आता, फक्त पुतळे आणि तसबिरी यात पुरते बंदिस्त झालेले आहेत, त्यांच्या जयंत्या-मयंत्या जरुर धडाक्यात साजऱ्या होतायतं; पण, त्यांचे विचार या 'रावणराज्या'त व्यवहारातून हद्दपार होत चाललेले आहेत, हे देशाच्या भविष्यासाठी कितपत योग्य ठरेल???

...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com