Top Post Ad

उन्हाळी सुट्टी, आनंददायी सुट्टी


  एकदा का उन्हाळा सुरु झाला की विद्यार्थी आवर्जून वाट पाहत असतात ते म्हणजे सुट्ट्या लागायची. हा काळ प्रत्येक मुलासाठी आनंदाचा काळ असतो. मात्र पालकांच्या दृष्टीने काहीसा आनंदाचा तर आपल्या मुलांना सुट्टीमध्ये गुंतवून कसे ठेवावे या विचाराने काहीसा चिंतेचा असा संमिश्र काळ असतो. बहुतेकदा मोठ्या सुट्ट्यांमुळे मुलांमध्ये कंटाळवाणेपणा येण्याची शक्यता असते म्हणूनच पालकांनी मुलांना या काळात कृतीशील आणि विविध उपक्रमात गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. या सुट्ट्या आनंददायी होण्यासाठी पालक खालील उपक्रम राबवू शकतात. आपली मुले कृतीशील व निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करणे. मोठ्या सुट्ट्यांमध्ये बहुतेकदा मुलांना नेमके काय करावे हा प्रश्न भेडसावतो, या प्रश्नाचे योग्य उत्तर न मिळाल्याने त्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. म्हणून या मुलांना सुट्टीमध्ये पोहणे, संगीत, नृत्य, संग्रह करणे, इ. छंद वर्ग लावावेत. यामध्ये होणाऱ्या शारीरिक हालचालींमुळे ही मुले कृतीशील व निरोगी राहतात. 

 मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे. वाचन ही सर्वांसाठीच विरंगुळ्याच्या तसेच ज्ञानार्जनाच्या दृष्टीने सर्वोत्तम कला आहे. मुलांना रंजक कथा व कादंबऱ्या वाचण्यासाठी प्रोत्साहित करा. त्यामुळे मुलांचे वाचन कौशल्य वाढते. नवनवीन माहिती मिळते. शब्द समृद्धी वाढते. अवांतर माहिती मिळते. तसेच भाषेचे ज्ञान वाढते.

मुलांमध्ये चित्रकला, हस्तकला तसेच इतर विविध कलांची आवड निर्माण करणे. चित्रकला आणि हस्तकला यांच्या माध्यमातून मुलांना नवनवीन गोष्टी तयार करू शकतात. तसेच संगीत, नृत्य, विणकाम, शिवणकाम इ. कला आत्मसात केल्याने मुलांमध्ये सर्जनशीलता निर्माण होते. त्यामुळे मुले नाविन्याचा शोध घेणे तसेच समस्या निराकरण करणे आदी बाबतीत समर्थ बनण्यास मदत होते..

रोजनिशी लिहिणे.- आपल्या मुलांना रोजनिशी लिहिण्याची सवय लावा. रोजनिशी लिहिल्याने लेखन कौशल्य वाढते. एवढेच नव्हे तर मुलांन त्यांचे अनुभव, विचार मत, भावना प्राक्त करण्याचे एक व्यासपीठ प्राप्त होते. रोजनिशी लिहिल्याने मुलांना त्यांच्या स्व ची जाणीव होण्यास मदत होते.

 स्मरणिका (सोवोनियर) तयार करणे.- वर्षभरातील महत्वपूर्ण गोष्टी अनुभव, आठवणी, घटना, छंद, चित्रे, फोटो इ. बाबी संकलित केल्या जाऊ शकतात. स्मरणिका (सोवोनियर) तयार केल्याने मुलांमधील लेखन व वाचन कौशल्य विकसित होते तसेच एखाद्या गोष्टीकडे पाहताना त्याची चिकित्सक वृत्ती वाढीस लागते. वर्षभरातील अविस्मरणीय क्षण, आपण केलेल्या चांगल्या गोष्टी, आपले मित्र, शाळेत शिकलेल्या नवनवीन गोष्टी तसेच अशी एखादी गोष्ट घटना, अनुभव की जी आयुष्यभर लक्षात राहील..

स्मरणिका तयार करताना लेखनाचा भाग संपला की, त्यात छान छान चित्रे काढून, फोटो चिटकवून ती वही सुंदररित्या सजविता येईल. अशा प्रकारे तयार केलेली स्मरणिका आपल्या आयुष्यातील छान छान आठवणींना उजाळा देतील त्याचप्रमाणे पुढील कार्यासाठी प्रोत्साहन देत राहतील.

 पाककला शिकणे.- पाककला ही प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे. पाककला शिकत असताना दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्याने श्रवण क्षमता वाढते एवढेच नव्हे तर बुद्धिमत्ताही वाढते. स्वयंपाक घरात असताना मुलांना तुमच्या देखरेखीखाली निरनिराळे प्रयोग करू द्यावेत. तसेच पाककला आत्मसात केल्याने अन्नाचे महत्व कळते व अन्न वाया जाऊ देऊ नये याची जाणीव होते.

किल्ले तयार करणे.- कोणत्याही वयातील व्यक्तीला कागदाचे, कपड्याचे, मातीचे इ. वस्तूंच्या साह्याने किल्ले तयार करणे नक्कीच आवडते. मुलांनी किल्ले तयार केल्याने त्यांची सर्जनशीलता वाढते. शक्यतो दिवाळीच्या सुट्टीमध्ये असे मातीचे किल्ले बनविले जातात व सजविलेही जातात. 

विज्ञानाचे प्रयोग करणे व खेळ खेळणे.- मुलांनी कराव्यात असे अनेक विज्ञानाचे उपक्रम आहेत. उदा. व्हिनेगर व बेकिंग सोडा एकत्र करून काय  होते ते पाहणे. विविध खडकांचे आकार, प्रकार नुसार तुलना करणे, वर्गीकरण करणे. इ. त्याचप्रमाणे विज्ञानाच्या विविध मनोरंजनात्मक खेळ ही उपलब्ध आहेत. अशा प्रकारे विविध खेळ वउपक्रम आपलयाला गुगल च्या माध्यमातून शोधता येतील.

नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे.- जी कौशल्ये मुलांना आत्मसात करावीशी वाटतात. ती आत्मसात करणे. मात्र त्याकरीता प्रत्येक वेळी पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आपले मित्र तसेच यु ट्यूब, गुगल इ. साधनांचा उपयोग करता येईल. पाककला, परदेशी भाषा शिकणे, एखादे वाद्य वाजविणे उदा. गितार, तबला इ. प्रकारची कौशल्ये तुम्ही आत्मसात करू शकतात. 

कुटुंबासोबत वेळ घालविणे.- सुट्ट्यांमध्ये विविध उपक्रमांचे नियोजन करत असताना आपण कुटुंबासोबत वेळ घालविणे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे आपण आपल्या पालकांसोबत अनुभवलेले क्षण अतिशय मौल्यावन असतात. हेच क्षण आपल्याला पुढील काळात प्रेरणा देत राहतात.

फोटो अल्बम तयार करणे.- फोटो अल्बम तयार करण्याची कृती कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकते. तुमच्यासाठी असलेले महत्वपूर्ण फोटो एका वहीमध्ये चिटकवून त्याखाली त्या फोटोबाबतची आठवण नमूद करता येते. यामध्ये विशेषतः वर्षभरातील विशिष्ट कार्यक्रम, प्रेक्षणीय स्थळ भेटी, सण, उत्सव इ. फोटोंचा समावेश करू शकता.

तुमच्या मुलांचा मेंदू सक्रीय ठेवण्यासाठी विविध कोडी सोडविण्यासाठी प्रोत्साहित करा. उन्हाळ्याच्या सुटीत तुमच्या मुलाला सक्रिय आणि व्यस्त ठेवण्यासाठी कोडी हे सर्वात प्रभावी शिक्षण साधनांपैकी एक आहे. उन्हाळ्याच्या सुटीत तुमच्या मुलाला सक्रिय आणि व्यस्त ठेवण्यासाठी कोडी हे सर्वात प्रभावी शिक्षण साधनांपैकी एक आहे. ही परस्परसंवादी शिक्षणाची साधने आहेत ज्याद्वारे मुले विज्ञान, गणित इत्यादींच्या विविध संकल्पना खेळकरपणे शिकू शकतात. मुले, खरं तर, शिकत असताना त्यांना खेळाप्रमाणे सोडवण्याचा आनंद घेतात. जेव्हा मूल एखादे कोडे अचूकपणे सोडवते तेव्हा ते प्रेरणा देते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. शिवाय हे केव्हाही आणि कुठेही कमी वेळात सोडवता येतात. कोडी वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात.

क्रॉसवर्ड पझल, सुडोकू पझल, वर्ड सर्च पझल, इ. अशा प्रकारे कोडी सोडविल्याने समस्या निराकरणास मदत करते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मजा आणि मनोरंजनाचा काळ लहान मुलांना मनोरंजक आणि विविध उपक्रमांमध्ये गुंतवून ठेवल्याने या काळात त्यांना आळस किंवा कंटाळा येणार नाही वरील प्रकारच्या अनेक मनोरंजक उपक्रमांमुळे अनेक कौशल्ये विकसित होतील. तसेच या उपक्रमांमुळे अनैच्छिक शिकण्याची क्षमता वाढवते ज्याद्वारे ते त्यांचे व्यक्तिमत्व तयार करतात आणि सामाजिक कौशल्ये तयार करतात. पालकांनी निःसंकोचपणे आपल्या मुलांना विविध उपक्रमांमध्ये मदत केली पाहिजे आणि त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

अशा प्रकारे आपण आपल्या मुलांची सुट्टी या किंवा या सारख्या इतरही सुंदर उपक्रमांनी वेळ मजेत घालवूया.

  • विवेक जगन्नाथ थोरात... मोबाईल क्र. ९२२४२९६१४३
  • मुख्याध्यापक, विवेक विद्यालय विक्रोळी (प), मुंबई ४०००७९ 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com