आज २३ एप्रिल आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. विल्यम शेक्सपिअर, मिग्युअल सर्वांटीस, इंका गार्सीलोसो या जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केला. हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. स्पेनमध्ये मिगेल डे सर्वांटीसच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये युनिस्कोची सर्वसाधारण सभा झाली ज्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.
वाचन संस्कृतीच्या चर्चेविना पुस्तक दिन साजरा होऊच शकत नाही चला तर मग वाचन संस्कृती विषयी चर्चा करू आणि पुस्तक दिन साजरा करू. आजच्या मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांचे वाचन कमी होत चालले आहे. पूर्वी विद्यार्थ्यांमध्ये जशी वाचनाची आवड होती तशी आवड आजच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत नाही. आजच्या सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या युगात पुस्तके वाचण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी कमी होत चालली आहे. साहित्य संमेलनामध्ये पुस्तकांची विक्री कमी होऊ लागली आहे. पूर्वी गजबजाणारी वाचनालये आता ओस पडू लागली आहेत. ग्रंथालयातील पुस्तके वर्षानुवर्षे एका जागेवरून हलत नाही. आजची पिढी सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने पुस्तकांपासून दूर होत चालली आहे. सोशल मीडियाच्या आक्रमणामुळे विद्यार्थी अवांतर वाचन विसरत चालले आहेत.
सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पुस्तक दिनासारख्या उपक्रमांचे आयोजन व्हायला हवे. आजच्या युगात ज्ञान ही खूप मोठी शक्ती आहे याचाच आपल्याला विसर पडला आहे. वाचनामुळे आपल्याला इतिहासाचे ज्ञान, वर्तमानाचे भान आणि भविष्याचा वेध घेता येतो. ज्ञान मिळवण्याचे प्रभावी साधन म्हणजे वाचन. सातत्याने वाचन केल्यावर आपली ग्रहण क्षमता आणि स्मरणशक्ती अधिकाधीक सशक्त होऊन बुद्धिमत्ता अधिकाधीक प्रगल्भ होते त्यातून माणसाच्या विचार पातळीचा चोहोबाजूंनी विकास होतो. वाचनामुळेच माणसाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. वाचनामुळे माणूस सुसंस्कृत होतो. चांगलं वाचल्यावर आणि चांगलं ऐकल्यावर आपले विचार विवेकशील व प्रगल्भ होतात, त्यातून आपली मनोभावना शुद्ध होते. आपली भाषा तसेच वक्तृत्व विकसित होते.
वाचनामुळे आपले व्यक्तिमत्व बहरते. वाचन ही जीवनाला उन्नत करणारी बाब आहे यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलवण्यात वाचनाचा मोठा वाटा असतो त्यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करायला हवे. मनावरचा ताण कमी करण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात रमले पाहिजे. चांगल्या पुस्तकांचा, विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलून जातो. पुस्तकांमुळे कमकुवत मनाला धीर मिळतो त्यामुळे निराशेच्या गर्तेत अडकलेला माणूस हत्या, आत्महत्या करण्यापासून परावृत्त होतो. आजकालच्या तरुणांना खूप ताण असतो हा ताण कमी करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे वाचन.
डॉ बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत पुस्तकाने अशक्त मस्तक सशक्त होते आणि सशक्त मस्तक कोणासमोरही डोळे झाकून नतमस्तक होत नसते. स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग यासारख्या महापुरुषांच्या जीवनाला वाचनामुळेच कलाटणी मिळाली. ऐतिहासिक पुस्तकांमुळे वाचकांच्या मनात राष्ट्रनिष्ठा निर्माण होते. कथा कादंबरी यामुळे वाचकांच्या मनात माणुसकीचा भाव जागृत होतो. काव्य वाचनातून आपल्या मनात संवेदनशीलता निर्माण होते. थोरांची चरित्रे वाचून प्रेरणा मिळते. वर्तमानपत्र वाचल्याने सामाजिक जाणिव निर्माण होते. एकूणच वाचनामुळे माणूस सर्वगुणसंपन्न होतो. त्यांच्यात नैतिक मूल्यांची रुजवण होते. आज वाचनाअभावी समाजातून नैतिक मूल्ये हरवत चालली आहे. त्यामुळे नव्या पिढीने पुन्हा एकदा वाचन संस्कृतीकडे वळणे ही काळाची गरज आहे. आपल्या आणि समाजाच्या भल्यासाठी वाचन संस्कृती टिकवायलाच हवी. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे तरुण पिढीला वाचवायचे असेल तर त्यांच्यात वाचन संस्कृती रुजवायलाच हवे, त्यासाठी पुस्तक दिनासारखे उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरतील.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
------------------
आज आपण व्हाट्सअप, फेसबुक व यासारख्या इतर सोशल मीडिया च्या युगामध्ये पुस्तकाकडे अर्थातच वाचनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व मुळात वाचनानेच आकाराला येत असते. पुस्तकांच्या वाचनातूनच आपल्याला विविध क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करता येते. अर्थातच वाचनाचा प्रत्येकाला व्यासंग असला पाहिजे. आज ग्रंथरूपाने आपल्याला कथा, कवितासंग्रह, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन,चरित्र,आत्मचरित्र इत्यादी ग्रंथ वाचायला मिळतात. सामाजिक जीवन जगत असताना भाव-भावना व्यक्त करण्यासाठी आपण इतरांसोबत मैत्री करत असतो. पुस्तके सुद्धा आपल्या जीवनामध्ये मित्रांची भूमिका निभावू शकतात. पुस्तक सुद्धा आपला खरा आणि विश्वास मित्र असू शकतो. एखाद्या वेळेस आपला जिवाभावाचा मित्र आपल्यासोबत पूर्णपणे व्यक्त होणार नाही पण पुस्तक मात्र आपल्या क्षमतेनुसार आपल्यासमोर पूर्णपणे व्यक्त होत असते. म्हणून पुस्तकाला 'विश्वासू मित्र' म्हटल्यास वावगे ठरू नये. प्रत्येकाने असा विश्वासू मित्र पुस्तक रूपाने जपला पाहिजे.
स्वातंत्र्य,समता व बंधुता फ्रेंच राज्यक्रांतीने जन्माला घातलेली या तीन तत्त्वांची ओळख संपूर्ण जगाला पुस्तक रूपाने झाली. थॉमस पेन या विचारवंतांचा प्रभाव महात्मा फुलेंवरती होता.म्हणून महात्मा फुलेंना त्यांच्या विचाराच्याच आधारे येथील शोषणाची नस ओळखता आली. टॉलस्टाय, रुसो यासारख्या तत्त्ववेत्यांच्या विचाराने प्रभावित होऊन महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचे जनआंदोलन आफ्रिकेमध्ये व भारतामध्ये उभे केले होते. क्रांती घडवण्याची ताकद एकंदरीतच पुस्तकांमध्ये असते. आपल्या अनेक महापुरुषांना स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये तुरुंगवास भोगावा लागला. त्यामध्ये प्रामुख्याने लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू, भगतसिंग,विनोबा भावे, साने गुरुजी. या महापुरुषांनी अशाही बिकट परिस्थितीमध्ये मिळेल त्या वेळेमध्ये वाचन-लेखन केले. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये 'गीता रहस्य' हा ग्रंथ लिहून कर्म सिद्धांत सांगितला.महात्मा गांधींनी तुरुंगातूनच अनेक पत्रव्यवहार केले, यंग इंडिया, हरिजन या वृत्तपत्रासाठी लिखाण केले. 1942 च्या चलेजाव आंदोलनामध्ये भाग घेतल्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरूंना तुरुंगवास झाला व त्यांना नगरच्या तुरुंगात ठेवण्यात आले. अशाही नैराश्याच्या परिस्थितीमध्ये नेहरूंनी "द डिस्कव्हरी ऑफ इंडिया"हा ग्रंथ लिहिला. भगतसिंगाने सुद्धा तुरुंगवासामध्ये अनेक ग्रंथांचे वाचन करून ग्रंथ लिहिले.या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये 1933 ला साने गुरुजींना सुद्धा शिक्षा झाली व त्यांना नाशिकच्या तुरुंगात ठेवण्यात आले. मिळेल त्या वेळेमध्ये साने गुरुजींनी आपल्या आईच्या आठवणी 'श्यामची आई' या पुस्तक रूपाने शब्दबद्ध केल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाचे प्रचंड वेड होते. बाबासाहेबांनी जवळपास 22 हजार ग्रंथांचे वाचन केलेले होते. जगाच्या इतिहासातील डॉक्टर बाबासाहेब हे असे व्यक्तिमत्व आहे की, ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधले. आपल्या देशातील या तमाम महापुरुषांना घडवण्यामागे पुस्तकांचा फार मोठा हात आहे. खऱ्या अर्थाने 'पुस्तक हे समाजाचे मस्तक' असते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आज समाज रुपी मस्तक सुधारण्याची वेळ आलेली आहे आणि हे समाज रुपी मस्तक सुधारण्याची ताकद केवळ पुस्तकांमध्येच आहे. 'वाचाल तरच वाचाल' अशी आपल्या समाजाची अवस्था झालेली आहे.
जगाच्या ज्ञानाची कवाडे पुस्तक रूपानेच खुली होत असतात व हे सर्व ज्ञान पुस्तक रूपानेच आपण आत्मसात करू शकतो. वाचनानेच ज्ञानाचे आदान-प्रदान प्रभावीरीत्या होते. वाचनवेडा व्यक्ती जीवनाच्या लढाईमध्ये कधीही पराभूत होऊ शकत नाही. पुस्तक वाचनानेच मन मनगट आणि मेंदू पूर्णतः सामर्थ्यशाली होत असतो. आज आपल्याल महाकाय पुस्तकांचा महासागर लाभलेला आहे. ज्ञानाच्या अथांग सागरातील एखादा 'ज्ञानरूपी थेंब' पुस्तक रूपाने आपण आत्मसात करावा, हीच आजच्या या जागतिक पुस्तक दिनानिमित्त अपेक्षा...
प्रा. रामदास रुस्तुमराव धोंडगे
0 टिप्पण्या