Top Post Ad

२५ लाखांच्या पुरस्काराला चौदा कोटी खर्च


बंद करा असे सोहळे!

सूर्य आग ओकत असताना एकही माणूस जागेवरून उठत नाही, हे आप्पासाहेबांचे आशीर्वाद आहेत. राजकीय शक्तींपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी आहे, त्याचे उदाहरण आपण पाहतोय, असे उदगार भरसभेत राजकीय नेते काढत असतानाच अनेक जण मरत होते. ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला अन् अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. सतत चार ते पाच तास उन्हात बसल्याने १२ ते १५ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण उष्माघात असल्याचे सांगण्यात आले. अनेकांवर वैद्यकीय उपचार करून घरी पाठविण्यात आले. 

नवी मुंबई येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. वास्तविक ही गर्दीच्या कार्यक्रमाची वेळ नसतेच. कार्यक्रम सुरू झाला, त्यावेळी तापमान ३७ अंश सेल्सिअस होते. अशावेळी लोक मरतील नाही तर काय होईल? कार्यक्रमासाठी रणरणत्या उन्हात डोक्यावर छप्पर नसताना तासन् तास बसून राहिल्यामुळे या सर्वांचा उष्माघाताने मृत्यू झाला. हा आकडा अधिकही असू शकतो. आता नेहमीप्रमाणे मदत जाहीर होतेच, पण गेलेल्यांच्या परिवाराचे काय? कार्यक्रमस्थळी अपेक्षेपेक्षा जास्त असा लाखोंचा जनसमुदाय आला होता. एवढेच नव्हे, तर कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या गर्दीच्या तुलनेत पिण्याच्या पाण्याची सोय व वैद्यकीय मदत केंद्र ही व्यवस्था अपुरी होती. 

मृतांच्या नातलगांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत जाहीर झाली म्हणजे सारं काही संपले असे होत नसते. हे सर्व प्रकार थांबलेच पाहिजेत. देशाचा आणि राज्याचा कारभार चालवणारे याबाबतीत विचार का करत नाहीत? उन्हाळ्यात भरदुपारी हजारो लोकांना कार्यक्रमासाठी का बोलावतात? राज्याचे मुख्यमंत्री सवंग लोकप्रियतेसाठी काहीही करतील, पण देशाच्या गृहमंत्र्यांनीही भान ठेवले नाही. अशा कार्यक्रमात भक्तही बेफाम होऊन जातात. अशा कार्यक्रमांना लोकांनीही जाणे गरजेचे असते का? यापूर्वीही अनेक धार्मिक गुरूंच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीत अनेकांचे मृत्यू झाले होते. 

शिंदे-फडणवीस सरकारकडे लोकांसमोर जाण्यासाठी निमित्त हवे असते. ती त्यांची राजकीय गरज आहे. मतांचा गठ्ठा त्यांना समोर दिसत असतो. त्याची शिक्षा मात्र धर्माधिकारी यांच्या भक्तांना भोगावी लागली. अर्थात, लोकांनी कसे वागावे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. गेलेल्या लोकांच्या प्राणाची किंमत पाच लाखांची ठरली आहे. कार्यक्रमासाठी चौदा कोटी रुपये खर्च करण्यात आले. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख म्हणजे एक कोटीहून अधिक खर्च आला. पंधरा कोटींना सरकारला लंबे करून राज्यकर्ते मोकळे झाले. लोकांनीही विचार करण्याची वेळ आली आहे. 

महाराष्ट्र भूषण सोहळा राजभवनात केला असता तरी चालले असते. यापूर्वी हा सोहळा राजभवनातच होत आला आहे. त्यामुळेच लोक आता म्हणतात की, २५ लाखांच्या पुरस्काराला चौदा कोटी खर्च करून सरकारने काय मिळविले? धर्माधिकारी परिवाराने संपूर्ण महाराष्ट्रात आध्यात्मिक कार्य केलेले आहे. भारतातील इतर बाबा-बुवांसारखे आप्पासाहेब हे भोंदू नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ते दरवर्षी आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रम घेतात. मात्र, त्याची कुठेही प्रसिद्धी केली जात नाही. मात्र, नुकताच झालेला कार्यक्रम म्हणजे त्यांचा पूर्णपणे राजकीय वापर केला गेला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आप्पासाहेबांना गौरविले होते. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान केला. यात फक्त राजकारण होते, पण अनेकांचा मात्र जीव गेला. 

राज्यातील राजकीय स्थिती लक्षात घेऊन त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठीच शिंदे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता, हे आता उघड झाले आहे. त्यासाठी कोट्यवधींच्या सरकारी जाहिराती प्रसारमाध्यमांना देण्यात आल्या होत्या. यातून त्यांनी त्यांचे स्वत:चे उद्दिष्ट साध्य करून घेतले. अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार द्यायला नको होता. राज्यपालांच्या हस्ते हा पुरस्कार का दिला नाही? शहांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याशी काय संबंध? असे प्रश्न आता विरोधकांनी विचारायला सुरुवात केली आहे. यावरून राजकारण सुरू झाले असून, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. 

याप्रकरणी सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुरू झाली आहे. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र सरकारने केले होते. सरकारमध्ये दम नव्हता, तर मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन का केले? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या सरकारला प्रत्येक गोष्टीचा जबरदस्त इव्हेंट करण्याची सवय लागली आहे. ज्या वातानुकूलित व्यासपीठावरून महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला, त्या व्यासपीठासमोर लाखो लोक जवळपास पाच तास रणरणत्या उन्हात होते. राजकीय स्वार्थाशिवाय एवढी लोकं बोलावली जातात का? राज्यात एका बाजूला तरंगते सरकार असताना दुसऱ्या बाजूला अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकरी पूर्णत: कोसळला आहे. त्यांच्यापर्यंत मदतही पोहोचलेली नाही. गेल्या दोन महिन्यांत तीनदा अवकाळीने बळीराजाला जिवंतपणी मरणयातना दिल्या. त्यावेळीसुद्धा सरकार अयोध्येमधील इव्हेंटमध्ये गुंग होते. या सर्व परिस्थितीचे भान ठेवून महाराष्ट्र भूषण सोहळ्यावरील खर्च आटोपता घेऊन आणि एका सभागृहात हा कार्यक्रम पार पाडला असता तर राज्यावर आणि सरकारवर कोणते आभाळ कोसळणार होते?


  • प्रा. जयंत महाजन
  • निवासी संपादक- दै. लोकनामा
  • मो : ७०३०००८१०१




   श्रीसदस्य उन्हात अन्नपाण्याविना तडफडत होते तेव्हा 'श्रीमंत-श्रीमान' शाही मेजवानी झोडत होते!धक्कादायक सत्य आले समोर.....
खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 42 डिग्रीच्या रणरणत्या उन्हात सात ते आठ तास लाखो श्री सदस्य अन्नपाण्याविना तडफडत उष्म्याचा तडाखा सोसत बसले असताना दुसरीकडे मात्र याच मैदानावरील गारेगार शामियान्यात शाही पाहुण्यांसाठी पंचपक्वानांच्या जेवणावळी झडत होत्या.
असा होता शाही बेत…...
पंगतीत वांग्याचे मसालेदार भरीत, वाटल्या डाळीचे कढीवडे, शेवयांची ड्रायफूट खीर, पाच प्रकारच्या कोशिंबिरी, केशरी भात, पंचामृत लाडू, पुरणपोळ्या, थंडगार पन्हे असा शाही बेत होता. ढोकळा, खांडवी, थेपले, उंधयू अशा गुजराती पदार्थांचीही खास रेलचेल होती. वाढप्यांची कॉर्पोरेट फौज हातात भरलेल्या थाळ्या घेऊन दिमतीला उभी होती.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शंभुराजे देसाई, उदय सामंत, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, प्रकाश सुर्वे आणि भाजप-मिंधे गटाचे नेते या शाही पंगतीचा आस्वाद घेत होते, त्याचवेळी बाहेर उष्माघात आणि चेंगराचेंगरीत अन्नपाण्याविना तडफडून 15 श्री सदस्यांचे बळी गेले.
श्री सदस्यांना उन्हात तडफडत ठेवून 15 जणांचे प्राण घेऊन जनतेचे करोडो रुपये तुम्ही इकडे उधळले का? असा संतप्त सवाल सोशल मीडियातून विचारण्यात येत आहे. शाही भोजनावळीचा हा पह्टो गुरुवारी व्हायरल झाला. त्यानंतर सर्व स्तरातून या प्रकाराचा निषेध होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com