Top Post Ad

*एक धर्म दोन मंत्र*


वेदोक्त आणि पुराणोक्त हा वाद महाराष्ट्राला काही नवीन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर कायमच हा वाद वर उफाळून येत असे. महाराष्ट्राच्या आठवणीतून हे कधीच जाऊ शकत नाही की, सनातन मनुवाद्यांनी महाराजांना शूद्र लेखत महाराजांच्या राज्याभिषेकाला नकार दिला होता. तेव्हा गागाभट्टांना आणून महाराजांनी राज्याभिषेक करुन घेतला आणि दुसरा राज्याभिषेक हा शाक्त पद्धतीने केला. हे वेदोक्त आणि पुराणोक्त प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न जरी केला तरी आजच्या पिढीला तितका समजण्यासाठी व समजून घेण्यासाठी वेळच नाही. वेद हे अतिप्राचीन आहेत. तर पुराण हे साधारण इ. स. 1500 पूर्वीचे आहेत (Before Christ).
वेद हे पूर्वीपासून लोकांना माहिती आहेत. काही सनातन्यांनाच त्याचा अभ्यास करण्याची परवानगी होती आणि त्यामुळे वेद हे त्याकाळी सर्वसामान्यांपासून लांबच राहीले. कारण, सर्वसामान्यांना संस्कृतही शिकता येत नव्हतं. तेव्हापासून पुजेच्या दोन पद्धती निर्माण झाल्या. त्यामध्ये एक पुराणोक्त पद्धती आणि दुसरी वेदोक्त पद्धती. वेदोक्त पद्धतीने पुजा ही काही जणांनाच लागू होईल असं सनातन मनुवाद्यांच म्हणण होतं. जर ज्यांना वेदोक्त लागू होतं त्यांच्या व्यतिरीक्त म्हणजे जवळ-जवळ 97 टक्के लोकसंख्येला पुराणोक्त पुजा लागू होईल असं त्यांच म्हणणं होतं.
हे लक्षात घेण्यासारखं आहे की, महाराष्ट्रामध्ये राज्य करणारे अनेक राजे होऊन गेले. पण, बहुतांशी राजे हे या मातीतील नव्हते. भारतातही अनेक राजे होऊन गेले. त्याच्यातील पहिले घराणे ‘नंद घराणे’ हे ब्राम्हण नव्हते. उर्वरीत राजे हे बहुसंख्यांक ब्राम्हणच होते. महाराष्ट्रात पण, अशीच परिस्थिती होती. आणि पहिल्यांदा एक क्षत्रिय राजा शपथविधीच्या लायक झाला. त्याने स्वत:च साम्राज्य तयार केलं. आणि त्याच्यावर छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा इथल्या सनातन मनुवाद्यांनी त्यांना शूद्र म्हणून हिणवत त्यांना राज्याभिषेक नाकारला. त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतरचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. पण, त्यानंतर पेशवेंनीच जवळ-जवळ 1818 पर्यंत छत्रपती संभाजीराजे यांच्यानंतर मराठ्यांची गादी सांभाळली आणि 1840 पासून तर त्यावर अधिकच घट्ट पकड केली.
विश्वनाथ पंत ते बाजीराव हा काळ जरी पेशवेंच्या हातात होता तरी ते मराठा गादीशी अतिशय प्रामाणिक होते. पण, नंतरच्या काळात ते घडलं नाही व इथल्या सनातन्यांची समाजावरची पकड आणखी मजबूत होत गेली. शाहू महाराज पंचगंगेकाठी स्नान करीत असताना तिथे उपस्थित असलेले नारायण भट हे तिथे जे मंत्र म्हणत होते तेच संस्कृत पंडीत राजाराम शास्त्री भागवत ऐकत होते आणि त्यांनी शाहू महाराजांना सांगितले की, हा पंडीत जे मंत्र म्हणत आहे ते मंत्र तुम्हांला लागू होत नाहीत. तुम्ही क्षत्रिय कुलवतंस आहात आपल्याला वेदोक्तमंत्र लागू होतात पुराणोक्त नाही संतप्त झालेल्या छत्रपती शाहू महाराजांनी वेदोक्त पद्धतीने तुम्हांला मंत्र म्हणावे लागतील अस म्हटलं. नारायण भट यांनी नकार दिला. पुढे हे प्रकरण पुण्याला गेलं. पुण्यालाही वेदोक्त पद्धतीने करता येणार नाही असा निर्णय झाला आणि शेवटी हे प्रकरण तेव्हाचे व्हॉईसरॉय लॉर्ड कर्जन यांच्या दरबारात गेलं. लॉर्ड कर्जन यांच्यासमोर अनेक जणांनी वाद विवाद केले. खुद्ध छत्रपती शाहू महाराजांनीही वाद विवाद केले आणि त्यामध्ये ठरलं वेदोक्त हे क्षत्रिय राजांना लागू होणार. उर्वरीत क्षत्रिय समाजाबद्दल काय निर्णय झाला याबाबतचे दाखले सापडत नाहीत. याचा अर्थ त्यांचे म्हणणे स्पष्ट होते की, या युगामध्ये दोनच वर्ण आहेत. एक सनातन मनुवादी आणि बाकी सगळे शूद्र. सयाजीराव गायकवाडांबरोबर देखिल हेच झालं आणि परवा कोल्हापूरच्या राणी संयोगिताराजे यांच्याबरोबर देखिल हेच झालं.
प्रश्न एवढाच आहे की, वेदोक्त आणि पुराणोक्त हे दोन मंत्र समाजाच्या वर्ण व्यवस्थेला मजबूत करतात. वर्णाश्रमामध्ये उच्च वर्णीयांसाठी एक मंत्र आणि खालच्या वर्णीयांसाठी एक मंत्र हे अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात चालू आहे आणि त्याचे फटके अनेकांना बसले आहेत.
मग, हे दोन मंत्र कशाला ? एकच मंत्र असायला हवा. जर आपण म्हणतो की, हिंदू धर्मामध्ये सगळे समान आहेत तर मंत्र दोन कशाला ? जो मंत्र ज्या समुदायाला लागू होतो तो सगळ्या समुदायाला लागू करा. कारण, पुस्तकांमध्ये स्पष्ट दिले आहे की, वेदोक्त एका समाजाला आणि पुराणोक्त बहुसंख्यांक समाजाला. असं कशासाठी ? आपल्याला समाजसुधारणाच हवी असेल तर मग एकच मंत्र सगळ्यांना लागू करा आणि जी काही पुजा अर्चा करायची आहे ती वेदोक्त मंत्रानेच होऊ द्या. मग त्याच्यामध्ये मुंज आडवी येऊ देऊ नका, त्यामध्ये काही चालीरीती आडव्या येऊ देऊ नका तसेच त्याच्यातील वर्णव्यवस्थेमधील वर्ण आडवा येऊ देऊ नका.
वर्णाश्रमाची प्रथा बंद करायची असेल आणि देशामध्ये एकोपा ठेवायचा असेल; तर इथला बारा बलुतेदार असो, इथला अतिशूद्र असो, इथला मराठा असो, इथला समस्त बहुजन असो. त्या सगळ्यांना वेदोक्त मंत्राचे अधिकार देऊन टाकावेत आणि पुराणोक्त बाजूला काढून, जसं कायद्यासमोर सगळे समान आहेत, जसे धर्मासमोर सगळे समान आहेत अशी एक दिशा ब्रम्हवृंदांनी द्यावी आणि त्या प्रकारचा ठराव धर्म संस्थेमध्ये पारित करुन घ्यावा. साधारण लोकांना हे कळतच नाही की, वेदोक्त आणि पुराणोक्त म्हणजे काय ? पण, त्या साधारण लोकांना हे माहीत नाही की, पूर्वीच्या काळी वेद वाचायची देखिल संधी सर्वसामान्यांना नव्हती तसा कायदा होता आणि तो कायदा आजही मनुस्मृतीत आहेत. मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे वेद वाचता येत नव्हते. वेद पाठांतर करता येत नव्हते. किंबहुना संस्कृत शिकता येतं नव्हतं आणि शिकलं तरी मोठी शिक्षा त्या शिकणा-याला देण्याचे अधिकार ज्यांना संस्कृत शिकण्याचे अधिकार आहे त्यांच्या हातात होते. त्यामुळे ही परंपरा पुढे चालू ठेवायची का ? हा प्रश्न आहे. तेव्हा ह्या प्रश्नाचे उत्तर सरळ आहे की, वेदोक्त आणि पुराणोक्त हे बाजूला काढा आणि सर्व समाजाला आता वेदोक्त मंत्रानेच पुजा करण्याचा अधिकार द्या. असा ठराव सगळ्यांनी केला पाहीजे. अशी सगळ्यांनी मागणी केली पाहीजे आणि ब्रम्हवृंदांनी ती स्विकारली पाहीजे. भेदभाव नष्ट करा आणि एक समाजमन असू द्या. सगळ्यांचा धर्म जर एक आहे तर मग, मंत्र दोन कशाला ?
दुर्दैव हे की धर्मांध झालेल्या ह्या लोकं मधल्या काही जाणना कळतच नाही की आपण कोण आहोत आपण वर्णव्यवस्थे मध्ये कुठे आहोत आपला धर्म एक आहे तर मग आपल्याला वेदोक्त मंत्र का लागू नाही
इथल्या मराठा व इतर मागासवर्गीयनी ह्याचा आभ्यास करावा मी म्हणत नाही पण सनातनी मनुवादी तुम्हाला शूद्र समजतात आणि तुम्हाला घेऊन धर्माच्या नावानी राजकारण करतात
श्रुती स्मृती पुराणोक्त… आठवले का
*डॉ. जितेंद्र आव्हाड*
All reactions:
Sanjay Bhalerao, Rahul Subhedar and 1.7K others

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1