Top Post Ad

ती माणसं नाहीत... म्हणून तर सरकार त्यांची दखल घेत नाही

 जे लढतात त्यांना लढतच रहावं लागणार !   -- रवि भिलाणे

   


          अप्पा पाड्यातला झोपड्या आगीत खाक झाल्या.पालिकेने आता जनरेटर वगैरे पण आवरलंय.माणसं आता  पुन्हा आगी पेटवून त्या उजेडात आयुष्याचा अंधार दूर सारण्याचा केविलवाणा प्रयत्न करताहेत.मालवणीतल्या अंबुजवाडीत पुन्हा पुन्हा डीमोलिशन केलं जातं आणि माणसं पुन्हा पुन्हा जगण्याला भिडत आहेत.विक्रोळी कन्नमवार नगरातील मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था मोडकळीस आल्यात.तिथल्या भयभीत  जगण्याला दुरुस्तीचा टेकू मिळावा म्हणून माणसं सरकार दरबारी खेटे घालत आहेत.नवी मुंबईतले झोपडीवासी आपल्या जिवंतपणाच्या दाखल्यांची गाठोडी घेऊन दहा बाय दहा जागेसाठी तडफड तडफड करताहेत.उच्च शिक्षणासाठी सरकारनेच मंजूर केलेली फेलोशिप पदरात पडावी म्हणून शिकली सवरलेली पोरं आझाद मैदानाच्या कोंडवाड्यात सकाळीच दाखल होतात आणि संध्याकाळी पोलिसांनी हाकललं की गपगुमान वस्तीवस्तील्या निवाऱ्याचा आसरा घेतात.ज्यांचं जगणच नासवलं गेलं त्या पोरीबाळी, बेकार टुकार पोरं, म्हातारे कोतारे वर्षानुवर्षे न्यायाचा उकिरडा चिवडत बसलेत.एक ना हजार कथा अन हजार व्यथा !

              काही लोक म्हणतात, ती माणसं नाहीत.म्हणून तर सरकार त्यांची दखल घेत नाही.मला वेगळं वाटतं. मला वाटतं ते लढतात म्हणून सडतात.नव्हे,त्यांना सडवलं जातं.ही सगळी माणसं कॅटेगरीतली. होय,त्यांची एक ठराविक कॅटेगरी आहे.लढणाऱ्यांची!त्यांच्याकडे गमावण्यासारखं काही नाही पण कमावण्याची ईर्षा जबरी आहे.शेकडो वर्षे काहीचं नव्हतं पण  काही दशकात त्यांनी बरंच काही मिळवलं देखील.त्यांना अजून खूप काही मिळवायचं आहे.त्यासाठी ते उन्हातान्हात, पाऊसपाण्यात, शेतात, कारखान्यात दिवसरात्र राबतात.शिक शिक शिकतात.गरज पडली तर लगेच रस्त्यावर उतरतात.सत्तेलाच आव्हान देतात.न्याय मागतात.आणि ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठीच हे करतात असं नाही तर ते सगळ्याच गोर गरीब,उपेक्षित वंचितांसाठी एल्गार पुकरतात.स्वतः बरोबर दुसऱ्यांच्या हक्कासाठी पण आवाज देतात.कधी कधी तर ते ज्यांच्यासाठी लढतात ते पण यांना परके समजतात.पण ही माणसं आपल्या तत्वांपासून ढळत नाहीत.घेतला वसा टाकत नाहीत. लढायचं काही थांबत नाहीत.म्हणून सत्तेला ते चालत नाहीत.व्यवस्थेला ते पचत नाहीत.

          म्हणूनच मग त्यांना चिरडलं जातं, भरडलं जातं. घर, दार, काम  धंदा, रोजी रोटी, इज्जत अब्रूसाठी नागवलं जातं. छळलं जातं. शिक्षण,पैसा, मान मरातब या पासून दूर लोटलं जातं.यांच्यासाठीचा राखीव निधी वाट्टेल त्या कामावर ओपनली उधळला जातो.विकासाचा नपुंसक प्रस्ताव बासनात गुंडाळला जातो. तेव्हा कुठे   सत्ताधाऱ्यांना बरं वाटतं. ते करतात तेच खरं वाटतं.

          पण कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा कुठे थांबतो.इथे तर क्रांतिसूर्याने जन्म घेतलाय.त्याच्या लोकशाही,संविधानाची प्रकाशकिरणं तनामनात खोलवर पोहोचलीत. घरादारात,वाडीवस्तीत जागोजागी विखुरलीत.मोर्चा आंदोलनात सामील झालीत.त्यांनीच या माणसांना सांगावा दिलाय...शिका,संघटित व्हा,संघर्ष करा !

             हा आदेश मानून ही माणसं लढत राहतात.आणि म्हणूनचं त्यांना पराभूत करण्याचे,नामोहरम करण्याचे,किमान बेदखल तरी करण्याचे प्रयत्न होत राहतात.सतत ! जागोजागी !! मग यांच्यासमोर दुसरा पर्याय तरी काय उरतो,लढण्याशिवाय ? ठिकठिकाणी,पुन्हा पुन्हा लढतच रहावं लागणार ! 

         नाहीतरी मूडद्यांना कोण विचारतो ?

               --------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com