Top Post Ad

पुरोगाम्यांचा जातीयवाद


'ब्राम्हण आणि ब्राम्हणवादाच्या विरोधात बोलणारा प्रत्येक व्यक्ती पुरोगामी असतो' असा गैरसमज हल्ली बळावत चाललेला आहे. हल्लीच्या काळात याचे प्रदूषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीत हमखास दिसून येते. जयंती बाबासाहेबांची आणि फाफटपसारा औचित्य नसलेल्या व्यक्तीचा जोडला जातो. बाबासाहेबांची जयंती असेल तर त्यांनी केलेले कार्य आणि विचार इतके मोठे आहे की निव्वळ ते जरी मांडले तरी वक्त्यांना वेळ कमी पडेल. जयंती जल्लोषात व्हावी, डिजे वाजलाच पाहिजे, गायकांना बोलवले
पाहिजे या अट्टाहासापायी कुठलाही धरबंध नसलेले गाणी गाणारे गायकांना बोलवले जाते आणि या सर्व गोष्टींचा खर्च काढता यावा म्हणून जयंती मंडळातील शहाणे सुरते(???) आयोजक बीजेपी, शिवसेना, काँग्रेस मधील पदाधिकारी, नेते, लोकप्रतिनिधी यांच्याकडून आलेली देणगी/ बिदागी वापरतात. यांना मग आयताच स्टेज मिळतो आपआपल्या मतदारांना भुलविण्यासाठी. जो जास्त देणगी देईल तो चांगला नेता, लोकप्रतिनिधी असा अंदाज बांधला जातो.

या प्रसंगी जयंती मंडळाने बौद्ध, अनुसूचित जाती समूहाच्या किती प्रश्नांना लोकसभेत, विधानसभेत, महानगरपालिकेत, नगरपरिषदेत वाचा फोडली, किती समस्यांचे निराकरण केले हे प्रश्न लोकप्रतिनिधींना विचारण्याचे धाडस दाखवावे. परंतु जयंती मंडळाचे लोक असे करत नाहीत. कारण बरेच आयोजक असणारे काही अपवाद वगळले तर प्रस्थापित पक्षाचे कार्यकर्ते असतात. यानंतरची कडी म्हणजे समतेपेक्षा समरसता साधणारे वक्ते कार्यक्रमात बोलवले जातात. बाबासाहेबानी कोणाची तरी इच्छा पूर्ण करण्यासाठी मनुस्मृती जाळली, संविधान लिहिले, हिंदू कोड बिल लिहिले, आरक्षणाची तरतूद केली असे संदर्भ नसलेले वाक्य फेकले जातात आणि टाळ्यांच्या गजरात सुशिक्षित असलेला आंबेडकरवादी बौद्ध समूह टाळ्या वाजवून या वक्तव्याचे समर्थन करतो हे जास्त भयंकर आहे. अशा रीतीने बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्सव समता साधण्याचा प्रवाह बनण्याऐवजी समरसता साधण्याचा प्रवाह बनतो की काय अशी साधार भीती वाटते. जे पुरोगामी वक्ते कार्यक्रमात बोलवले जातात त्या वक्त्यांनी कधी बौद्धांचे प्रश्न जाहिररित्या अन्यत्र दिलेल्या भाषणात मांडले काय हा प्रश्न आयोजक मंडळी त्यांना विचारायचे विसरूनच जातात.

नामांतर, रमाईनगर, खैरलांजी, खर्डा येथील घटना, अनुसुचित जातीसाठी, बौद्धांसाठी असलेल्या बजेटमध्ये सातत्याने होणारी घट याविषयी कुणी जाहीररीत्या बोलायला तयार होत नाही. याचे कारण आपले दुभंगलेपण. आपले म्हणविले जाणारे प्रस्थापित पक्षांचे लोकप्रतिनिधी सुद्धा यावर बोलायला तयार होत नाहीत. जे इतर प्रस्थापित पक्षांचे सत्तेची मलाई खाण्याबद्दलचे प्रश्न आहेत ते बौद्धांचे, आंबेडकरवादी समूहाचे प्रश्न असू शकत नाहीत. स्वतःला पुरोगामी म्हणून प्रोजेक्ट करणारा समूह किंवा नेते मुळात धर्मांध किंवा जातीयवादी असतात हे सध्या बार्टीच्या फेलोशिपकरता बौद्ध आणि अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावरून सिद्ध होत आहे. काही मोजके लोकप्रतिनिधी (एक-दोन) वगळले तर कोणत्याही तथाकथित पुरोगामी संघटनेने या संशोधक विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवलेला नाही. वेदोक्त की पुराणोक्त हा आंबेडकरवादी बौद्ध समूहाचा मुद्दा होऊ शकत नाही.

आमचे प्रश्न प्राथमिक शिक्षणाचे, रोजगाराचे, आरोग्याचे आणि उच्च शिक्षणातील सहभागाचे असले पाहिजेत. एवढेच नाही तर जे लोक सरकारी, निमसरकारी सेवेत आहेत त्यांच्यासोबत होणाऱ्या भेदभावाचा सुद्धा प्रश्न आहे. आमचे किती प्राध्यापक पात्रता असूनही प्राचार्य, कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, नॅक असेसर बनले आहेत. आमच्या किती अधिकाऱ्यांना प्रशासनातील महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातात, आमच्या किती अधिकाऱ्यांचा सी आर खराब करून छळले जाते हे मुद्दे आमचे असले पाहिजेत. आमचा मुद्दा धम्मनीतीचा असला पाहिजे. आमचा मुद्दा वयात आलेल्या मुलामुलींवर योग्य धम्मसंस्कार होतात की नाही हा असला पाहिजे.हाच बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रम पत्रिकेवरील अजेंडा असला पाहिजे. समरसता साधणारे, भरघोस मानधन घेऊन आम्हालाच बाबासाहेब शिकवणारे आणि अन्य प्रसंगी कट्टर जातीयवादी भूमिका घेणारे पुरोगामी(???) वक्त्यांना कार्यक्रमाला बोलावणे टाळले पाहिजे.

861 संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यासंबंधी जे नेते, लोकप्रतिनिधी, पक्ष पाठिंबा दर्शवतील, अनुसूचित जातीच्या लोकांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट ठेवतील आणि त्याच कार्यासाठी खर्च करतील त्यांना पुरोगामी समजावे. आज एकही शिवश्री, एकही ब्रिगेडी किंवा राष्ट्रवादी, कॉग्रेसवाला किंवा आम्हाला शेंडी जानव्याचे हिंदुत्व नको म्हणणारा या संशोधक विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शवायला तयार नाही. हे बेगडी पुरोगामीत्व आंबेडकरवादी बौद्ध समूह जेव्हा नाकारेल तेव्हाच तो त्यांच्या उत्कर्षाचा वर्तमानकाळातील आरंभबिंदू असेल. महाराष्ट्र सरकारने नुकताच सरकारी आस्थापनेतील जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जातील हा जी आर काढला आहे. याचा प्रखर विरोध कोणत्याही विरोधी पक्षांनी केलेला नाही.

कारण कंत्राटी पद्धतीत सर्वात जास्त नुकसान अनुसूचित जाती-जमातीतील होतकरू आणि हुशार उमेदवारांचे होणार. ज्या एजंसीमार्फत ही पदे भरली जाणार ती कुणाच्या मालकीची असणार हे सांगायची गरजच नाही. त्याचा विरोध किती पुरोगामी म्हणविणाऱ्यांनी केला हा प्रश्न पुरोगाम्यांना विचारला पाहिजे. जर त्यांनी विरोध केला नसेल तर हे पुरोगामी म्हणून स्वतः ला प्रोजेक्ट करणारे लोक प्रतिगामी आणि जातीयवादी आहेत असे समजायला काही हरकत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com