Top Post Ad

घन:श्याम तळवटकर : बाबासाहेबांनी पारखलेले रत्न


मुळात मुंबईच्या फोर्ट भागातील सिद्धार्थ कॉमर्स कॉलेजमधील माझा प्रवेशच घन:श्याम तळवटकरसाहेब यांनी आपल्या सहीने प्राचार्यांना दिलेल्या पत्रामुळे झाला होता. त्यांच्या सहीतील आडनावात शेवटी येणारा 'आर' हा बाबासाहेबांच्या सहीचा त्यांच्यावरील प्रभाव ठळकपणे सांगायचा.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत सहकारी स्मृतिशेष घन:श्यामजी तळवटकरसाहेब यांच्या जन्मशताब्दीचा सोहळा आज (गुरुवार ५ एप्रिल २०२३) दादर (पूर्व) येथील डॉ आंबेडकर भवनात पार पडत आहे. तळवटकर हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष- विश्वस्त, महाड येथील क्रांती स्तंभाचे जनक, 'बुद्ध आणि त्याचा धम्म' या बाबासाहेबांच्या ग्रंथराजचे प्रमुख अनुवादक, बौद्धजन पंचायतीचे सभापती होते.
तळवटकर यांचे सुपुत्र श्रीकांत तळवटकर हे माझे ज्येष्ठ मित्र- मार्गदर्शक. ते सिद्धार्थ आर्ट्स महाविद्यालयात ग्रंथपाल असताना मी सिद्धार्थ कॉमर्स ज्युनिअर कॉलेज (अकरावी) मध्ये विद्यार्थी होतो. अन आंबेडकरी चळवळीत त्या काळात ते पदाधिकारी असलेल्या सुरेश सावंत यांच्या नेतृत्वाखालील ' युवक रिपब्लिकन' या संघटनेत माझा सहभाग होता. श्रीकांतभाऊ यांच्यामुळे
तळवटकरसाहेबांशी झालेला परिचय आणि भेटी या नंतरच्या गोष्टी झाल्या.
मुळात फोर्टमधील सिद्धार्थ कॉमर्स कॉलेजमधील माझा प्रवेशच घन:श्याम तळवटकरसाहेब यांनी आपल्या सहीने प्राचार्यांना दिलेल्या पत्रामुळे झाला होता. त्यांच्या सहीतील आडनावात शेवटी येणारा 'आर' हा बाबासाहेबांच्या सहीचा त्यांच्यावरील प्रभाव ठळकपणे सांगायचा!
पवारभाऊ- तळवटकर भेट
--------------------
घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात मी दहावी म्हणजे एसएससी १९७८ ला स्थानिक टेक्निकल हायस्कुलमधून पहिल्याच प्रयत्नात पास झालो. त्या काळात त्या वसाहतीत एसएससी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण नगण्य होते. त्यावेळी मी, माझा मित्र अनिल केदारेसह काही मोजके उत्तीर्ण विद्यार्थी होतो. पण रमाबाई कॉलनीचे जनक स्मृतिशेष डी बी पवारभाऊ यांनी ' सिद्धार्थ कॉलेजमध्येच ऍडमिशन घ्या' असा सल्ला आम्हाला देतानाच ऍडमिशनची जबाबदारी त्यांनी स्वतः कडे घेतली होती. अन ऍडमिशनसाठी आम्ही एके दिवशी पवारभाऊ यांच्यासोबत निघालो. हार्बर रेल्वेने चेंबूरहून सीएसटी येथे जायचे होते. चेंबूरला टॅक्सीतून उतरताच पवारभाऊ एका स्टेशनरीच्या दुकानात आधी आम्हा दोघांना घेऊन गेले. तिथे स्टील बॉडीच्या दोन महागड्या पेनांची खरेदी करून ते पेन आम्हाला 'भेट' दिले! नंतर ते सरळ 'आनंद भवन' येथील घनश्याम तळवटकरसाहेब यांच्या दालनात आम्हाला घेऊन गेले. 'या दोन मुलांचे ऍडमिशन करून घ्या. माझ्या वस्तीतील आहेत', असे पवारभाऊ यांनी सांगितले.
तळवटकरसाहेब त्यांना म्हणाले,' तुम्हाला तर घाटकोपरहून वडाळा येथील डॉ आंबेडकर कॉलेज जवळ पडेल'. पण ' ही दोन मुले इथेच शिकतील' इतकेच पवारभाऊ यांनी त्यांना आग्रही स्वरात सांगितले. अन आमचे ऍडमिशन झाले.पण पुढील काळात 'शिक्षण की जगण्यासाठी उदरभरण?' असा भेडसावणारा प्रश्न समोर उभा राहिला. मग बारावी पास होताच तीन शिफ्टची नोकरी पत्करणे मला भाग पडले. ती नोकरीही पगारासह दोन वेळच्या जेवणाची विनामूल्य सोय करणारी सेंटॉर हॉटेलची होती.( ते हॉटेल खासगीकरणात २०००-२००३ सालात इतिहासजमा झाले.) त्यातून कॉलेज बोंबलले आणि पदवीधर होणे काही जमलेच नाही.
वैचारिक चंगळ
----------
खादाड असे माझी भूक
चतकोराने मला ना सुख
हे कवी केशवसुतांचे शब्द आहेत.
अन माझी वाचनाची भूक तर हायस्कुलपासूनच मोठी होती. सिद्धार्थ कॉलेजात असताना 'ग्रंथपाल' श्रीकांतभाऊ तळवटकर यांच्यामुळे ती भूक अधिकच तीव्र झाली आणि वैचारिक खाद्याची सोय झाली. मग डॉ यशवंत मनोहर सरांचा
'उत्थान गुंफा', अजय रामटेके यांचा 'युद्धाई', गौतम शिंदे यांचा ' प्रवर्तक' अशा काव्य संग्रहांसह तत्वज्ञानाच्या ग्रंथावर तुटून पडायला मला रानच मोकळे मिळाले होते. माझी वैचारिक चंगळ होण्याचे श्रेय निःसंशय घन:श्याम तळवटकरसाहेब यांचेच आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळ्यावर केलेला सत्याग्रह म्हणजे मानवी मूल्ये, मानव अधिकार, मानवी प्रतिषेचा देशातील पहिला संग्राम होता. म्हणून दीक्षाभूमी, चैत्यभूमी, भीमा कोरेगावप्रमाणे दरवर्षी महाड येथेही २० मार्च रोजी जनसागर उसळत आहे. त्याचे श्रेय अर्थातच चौदार तळ्यावर क्रांती स्तंभ उभारणाऱ्या घन:श्याम तळवटकरसाहेब यांचेच आहे. विशेष म्हणजे, महाडच्या त्या क्रांती स्तंभासाठीची प्रेरणा त्यांनी तब्बल ४६ वर्षांपूर्वी म्हणजे आजच्यासारखी मानवंदनेसाठी गर्दी होत नसलेल्या काळात भीमा- कोरेगावच्या विजय स्तंभापासूनच घेतली होती.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या कार्यासाठी माणसांची निवड करण्यात आणि जबाबदारी सोपवण्यात 'रत्नपारखी' होते. त्यांनी तळवटकरसाहेब यांना पक्ष कार्यात न ओढता पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कामकाजाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. तळवटकरसाहेब हयात असेपर्यंतच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कामकाजावर दृष्टिक्षेप टाकला तर बाबासाहेबांची निवड किती अचूक असायची याची खात्री पटते. तळवटकरसाहेबांनी महाड सत्याग्रहाचा रौप्य महोत्सवही साजरा केला होता. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या मागणीला पहिल्यांदा चालना त्यातूनच मिळाली होती.
ऐक्यवादी रिपब्लिकन
----------------
काल वाढ दिवस साजरा झालेल्या काकासाहेब खंबाळकर यांच्या ' बंडखोर रिपब्लिकन' संघटनेप्रमाणे तळवटकरसाहेब यांनीही 'ऐक्यवादी रिपब्लिकन पक्ष' नावाचा गट स्थापन केला होता, हे खरे आहे. पण त्यामागे नेतृत्वाच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा गटबाजीचा उबग आणि आपल्या संकल्पना कृतीत आणण्यासाठी मोकळीक मिळवण्याचा भाग अधिक होता. मात्र त्यांचा ऐक्यवादी रिपब्लिकन गट हा त्यांच्या मित्र वर्तुळापूरताच मर्यादित राहिला होता. लोक पातळीवर त्याचा विस्तार होऊ शकला नव्हता. त्याचे कारण म्हणजे तळवटकरसाहेब यांचा पिंड राजकीय नेत्याचा मुळी नव्ह्ताच. शिवाय, पीपल्स एज्युकेशन सोसायटीतील कामकाजाच्या व्यापामुळे पक्ष कार्यासाठी वेळ वाचवण्यात त्यांना मर्यादा पडल्या होत्या. ते विचारवंत होते आणि संस्थात्मक कार्यात त्यांचा हातखंडा होता. खुद्द बाबासाहेबांनाही पी ई सोसायटीसाठी त्यांची निवड करताना त्यांच्याकडून तीच अपेक्षा होती. त्यांनी संस्थेत कार्यरत असतांना प्रत्येक पदाला न्याय देऊन बाबासाहेबांचा विश्वास सार्थ ठरवला, हे कोणीच अमान्य करणार नाही.
घन:श्याम तळवटकर साहेबांना विनम्र अभिवादन

+++++++++++++++++++++++

■ दिवाकरशेजवळ
divakarshejwal1@gmail.com
=====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com