स्वातंत्र्याच्या अमृतवर्षी देखील मांगगारूडी समाजाची अद्यापही प्रगती झालेली नाही. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मागासवर्गीयांमधील मांगगारुडी समाज वास्तव्यास आहे. मात्र आजही हा समाज उपेक्षित अवस्थेत जगत आहे, यासाठीच सामाजिक जाणिवेतून आज आझाद मैदानावर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यात आले आहे. समाजाच्या एकजुटीचे आज दर्शन झाल्याने सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. आपल्या अनेक मागण्यांपैकी काही मागण्या निश्चितच पुर्ण होण्याच्या दिशेने आहेत असा विश्वास मांगगारुडी समाजाचे राष्ट्रीय नेते अमर कसबे यांनी मोर्चाला संबोधित करताना दिला. मांगगारूडी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज मुंबईतील आझाद मैदान येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मागील अनेक वर्षापासून समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी आपण आंदोलने करीत असून यापुढेही आपण समाजाच्या विकासासाठी काम करीत राहणार आहोत. मात्र या मागे माझा काही स्वार्थ असल्याचे समाजातील अनेक नेते बोलत आहेत. त्यांना मी सांगू इच्छीतो की आज आझाद मैदानावर मोर्चाकरिता लावलेल्या या भल्यामोठ्या बॅनरमध्ये माझे नाव आहे का ते पहावे, तसेच मोर्चाच्या निमित्ताने आपल्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्याकरिता गेलेल्या शिष्टमंडळात कोण कोण गेले आहे हे पहावे. या मोर्चाच्या तयारीकरिता आपण दिवसरात्र झटत आहोत. अतिशय कमी कालावधीत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक संघटनांच्या नेत्यांनी हा मोर्चा होऊ नये म्हणून प्रयत्न केले. मात्र समाजाच्या भल्यासाठी काही होत असेल तर आपण माघार घेत नाही, भले त्यामध्ये आपले नाव आले नाही तरी चालेल मात्र समाज महत्त्वाचा आहे. म्हणूनच आज हा लाखोच्या संख्येने समाज या मोर्चामध्ये सहभागी झाला असल्याचेही कसबे म्हणाले,
या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भेट देऊन त्याच्याशी चर्चा केली व पुढील चर्चेकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात घेऊन गेले. यावेळीही सकारात्मक चर्चा झाली. लवकरच याबाबत बैठकीचे आयोजन करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
राज्यभरातील हलाखीचे जीवन जगणाऱ्या बेघर मांगगारुडी कुटुंबियांना 50 हजार घरकुले मिळावीत, मांगगारुडी हि पोट जात नसून शासननिर्णय प्रमाणे 47 व्या क्रमांकावर स्वतंत्र जात म्हणून तिची नोंद आहे.त्यामुळे आम्हाला शासनाने पूर्ण वेगळ्या जातीचा दर्जा द्यावा. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात पोट जात म्हणून मांग गारुडी जातीची नोंदणी केल्यामुळे आमच्या समाजाला कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.शिवाय जातींचे दाखले,घरकुल योजना आणि नोकऱ्यांमध्येही लाभ मिळत नाही याच साठी आम्हाला आमचे स्वतंत्र अस्तिव मिळावे अशी मागणी करीत २४ मार्च रोजी सकल मांगगारुडी समाज आझाद मैदानात धडकला.
राज्यभरातून तसेच गुजरात आणि कर्नाटक येथून महामोर्चात आलेल्या बांधवांनी जय शिबारी,जय भवानी जय शिवाजी,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय लहुजी अशा ढोल ताशांच्या गजरात घोषणा देत आझाद मैदान दणाणून सोडले.हा महामोर्चा विधानभवनावर धडकणार होता परंतु पोलीसांनी परवानगी फक्त आझाद मैदानात दिल्याने मोर्चा आझाद मैदानात स्थिरावला असे आयोजक अमर कसबे म्हणाले.
आम्ही अनुसूचित जातीच्या 159 प्रवर्गात येत असल्याने आमच्या वाट्याला काहीच येत नाही.त्यामुळे सरकारमध्ये राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही म्हणून आमची मांगगारुडी अशी वेगळी नोंदणी व्हावी. अनुसूचित जातीमध्ये समावेश असलेल्या समाजासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ स्थापन करण्यात आले. यात मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या 12 पोट – जातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य करणेत येते. यात (1) मांग (2) मातंग (3) मिनी – मादींग (4) मादगी (5) दानखणी मांग (6) मांग महाशी (7) मदारी (8) राधेमांग (9) मांग गारूडी (10) मांग - गारोडी व शासन निणर्य संकिर्ण - 2012 / क्र. 31 महामंडळे दि. 22 मे 2012 नुसार (11) मादगी (12) मादिगा या दोन पोट जाती समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.यातून आम्हाला मांगगारुडी या पोटजाती ऐवजी मांगगारुडी स्वतंत्र जात असे अस्तित्व हवे अशी मागणी अमर कसबे यांनी लावून धरली आहे. देश स्वातंत्र्याचा 75 वा हिरक महोत्सव साजरा करतोय पण आजही मांगगारुडी समाज उपेक्षित आहे.
पूर्वी पोटापाण्यासाठी गावोगावी शहरी भागात भटकंटी करीत करणारा मांग-गारुडी समाज आज छोटया छोट्या समूहात नगरात आणि महानगरात पहायला मिळतो.पूर्वीचा अशिक्षित आणि अडाणी म्हणून गणला जाणारा समाज आज बऱ्यापैकी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन आलाय. सुशिक्षित झालेल्या आताच्या पिढीला समाजात आपले सन्मानाचे स्थान हवे आहे. शासकीय नोकरीत आम्हाला चांगली संधी उपलब्ध व्हावी,व्यवसाय शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध व्हावे,समाज मंदिर आणि आश्रम शाळा आपल्याही असाव्यात अशी शितल राखपसरे सरकारकडे मागणी करतात.
आज जरी मोठ्या प्रमाणात आमचे वास्तव्याचे ठिकाण कायमस्वरूपी असले तरीही हा समाज खूपच मागे पडला आहे. सरकारी अधिकारी मांग गारुडी जातींचे दाखले मिळण्यासाठी 1950 चे जातीबाबतच्या नोंदीचे कागदोपत्री पुरावे मागतात. पण ते जातीचे प्रमाणपत्र देणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडे आम्ही दुर्दैवाने सादर करू शकत नाहीत.त्यामुळे भटक्या जमातीतील काही जातीच्या लोकांना ते मागासवर्गीय असूनसुद्धा जातीची प्रमाणपत्रे मिळू शकत नाहीत.ही अडचण दूर करण्यासाठी आमचा सरकारकडे पाठ पुरावा सुरु असून काही अंशी यात यश येत असल्याचे मुरलीधर गायकवाड यांनी म्हटले.
मांगगारुडी समाजाच्या विकासासाठी 500 कोटी रुपये मंजूर करावेत, मांगगारुडी गारुडी समाजाचे स्वतंत्र समाज भवन उभारण्यात यावे,मांगगारुडी समाजाच्या विकासासाठी अभ्यास आयोग नेमण्यात यावा, मांगगारुडी समाजाला मातंग समाजाच्या पोट जातीतून वगळून स्वतंत्र जात जाहीर करावे, मांगगारुडी समाजातील बेघर कुटूंबाला संपूर्ण महाराष्ट्रात 50 हजार घरकुल मंजूर करण्यात यावी,मागासवर्गीय शासकीय कार्यालयात मांगगारुडी समाजातील सुशिक्षित तरुणांना नोकऱ्यां मध्ये विशेष प्राधान्य देण्यात यावे,कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजने अंतर्गत पाच एकर जमीन मांग गारुडी समाजातील भूमीहीनांना देण्यात यावी,मांगगारुडी समाजाचे जात दाखल्यांमधील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात तसेच मांगगारुडी संघटनांच्या शिफारसीवर जातीचे दाखले देण्यात यावेत,समाज कल्याण योजने अंतर्गत मांगगारुडी समाजातील उद्योजक घडवण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात यावा.
मालेगाव येथे आजही समाजातील 700 ते 800 लोकं पाल्यात राहतात जवळच कचऱ्याचे ढीगारे आहेत.कलेक्टर लँडवर आमचे बांधव राहतात. ते मागील 30 ते 40 वर्षांपासून हे निर्वासितांचे जीवन जगतात. नाशिक जिल्ह्यात 7500 लोकसंख्या असल्यामुळे या सर्व बेघर समाज बांधवाना घरकुले मिळावीत अस सचिन लोंढे म्हणतात.
0 टिप्पण्या