शाळेत असताना साधारणपणे, पाचवी ते दहावी अशी जवळपास पाच वर्षे शक्य होईल तेव्हा आणि तुंटपुज्या शेतीत पिकेल तेव्हा बाजारात विकण्यासाठी आम्ही, कोथिंबीर आणि भाजी पिकवत असू... सकाळी सात वाजता पोटात एक कप चहा ढकलून, एक किलोमीटर चालत-चालत डोक्यावरून टोपली भरुन कोथिंबीर आणि भाजी घेऊन जायचे, नऊ वाजेपर्यंत जी विकेल ती विकेल, राहिलेली घरी आणून जनावरांना घालायची, मिळेल ते पोटात ढकलायचे आणि दहाला शाळेला पळायचे. पाच वर्षे हा नित्य-नियम झाला होता. दररोज सकाळी गावातील एक श्रीमंत व्यापारी "शुभ्र पांढरी" कपडे घालून मंडईत भाजी घेण्यासाठी यायचा, मुद्दाम आम्हा शाळकरी मुलांकडे त्याचा मोर्चा वळायचा. रोज-रोज तेच प्रश्न आणि तीच घासाघीस, कितीला लावलीस रे एक पेंढी?
_मालक, दोन रुपये ला एक..._
_काय आहे रे त्यात दोन रुपयासारखे? आठ आण्याला दे नाहीतर राहूदे._
दोन मिनिटे घासाघीस करुन दोन रुपयांची भाजी अन् कोथिंबिरीची पेंढी आठ आण्याला घेऊन, वरुन अजून मोड टाक म्हणत तो निघून जायचा. कधी-कधी आता सुट्टे पैसे नाहीत म्हणत उधारीवरच आठ आण्याची भाजी घेऊन जायचा. पुढच्या वेळी आठवण करुन दिली की, रागानेच मागची उधारी हातात टेकवायचा.
सकाळच्या आठ-नऊच्या सुमारास, त्याच्यासारखेच अनेक उच्चभ्रू लोक आमच्याबरोबर घासाघीस करुन भाजी घेऊन जायचे. यामध्ये बहुतेक वेळा आम्हाला शिकवणारे शिक्षकपण असायचे.
दहावीचे वर्ष सुरु होण्याआधीची एप्रिल-मे महिन्यात अशीच पन्नास पैशाने एक-एक पेंढी विकून ५०० रुपये जमवले. दहावीसाठी लागणाऱ्या मोठ्या वह्या आणि काही पुस्तक घेऊन, दोनशे रुपये शिल्लक राहिले. घरातल्यांना न सांगता, एके दिवशी धाडस करुन दररोज पांढरी कपडे घालून भाजी खरेदीला येणाऱ्या दुकानदाराच्या दुकानाची पायरी चढली. पायरी चढतानाच त्याने ओळखले आणि लांबूनच विचारले,
"काय रे काय पाहिजे?"
"मालक एक पॅन्ट-शर्ट घ्यायचा आहे!"
"पैसे आणले आहेत का?"
"होय, भाजी विकून साठवले आहेत..."
"किती आहेत?"
"दोनशे आहेत..."
"दोनशेत कुठे पॅन्ट-शर्ट येतोवे रे!" असे म्हणत कामगाराकडे वळला, दाखव रे याला एखादा साधा पॅन्ट-शर्ट. कामगारानेही नाखुशीनेच एक-दोन पॅन्ट-शर्ट दाखवले आणि बोलला, "हे सगळे चारशे-पाचशेचे आहेत, मालकाला विचार, बघ काय म्हणतात ते!"
"मालक, चारशेचा एक पॅन्ट-शर्ट आहे, तीनशेला द्या की, दोनशे आहेत आता माझ्याकडे, राहिलेले शंभर महिन्याभरात साठवून देतो तुम्हाला!"
"अजून कमवायची अक्कल आली नाही, तोवरच उधारी करायला शिकलास की, चारशेचे कपडे तीनशेला द्यायला, ती काय तुझी भाजी आहे का? अजून दोनशे घेऊन ये आणि मग घे ते कपडे, निघ आता तू नाहीतर, तुझा बाप दिसला की, सांगेन तुझा हा उधारीचा पराक्रम!"
पाठमोरे होऊन पायऱ्या उतरताना दुकानातल्या कामगाराला मालक सांगायला लागला, "देवा, हमालाचा पोरगा हाय, सकाळी मंडईत भाजी विकायला बसलेला असतो..."
कानाखाली सन्नकण वाजवल्यावर जो सुन्नपणा येतो, तसा सुन्नपणा घरची वाट चालताना मेंदूला आला होता. पुढे कितीतरी दिवस ती वाक्यं डोक्यात घर करून बसली होती. "चारशेची कपडे तीनशेला द्यायला ती काय तुझी भाजी आहे का!"
ते राहिलेले दोनशे पुढे दहावीच्या बोर्डाच्या फीसाठी कामी आले, ते वर्ष पुन्हा एकदा जुन्याच ठिगळाच्या पॅन्ट-शर्टवर काढले.
*"गरिबाला स्वतःची छोटी-छोटी स्वप्न पूर्ण करण्यासाठीदेखील घासाघीस करण्याचा अधिकार, ही पांढरपेशी व्यवस्था देत नाही"*
यावरच पुढे आहे रे आणि नाही रे यामधील संघर्ष दाखवणारा, "पॅरासाईट" नावाचा ऑस्करविजेता दक्षिण कोरियन सिनेमा आला. 'नाही रे' वर्गाने स्वतःची स्वप्नेच पाहू नयेत आणि चुकून त्याने पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यास संघर्ष केला तर, ही 'आहे रे' वर्गाची व्यवस्था त्याला कायमची अंधारकोठडीत डांबून ठेवते...
शेतकऱ्यांनो, तुम्हाला कितीही कर्जमाफी मिळुद्या, नाहीतर कितीही अनुदानाच्या खैराती वाटुद्या... जोपर्यंत तुमच्या मालाची किंमत ठरवणारी समाजातली ही, पांढरपेशी उच्चभ्रू जमात जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या आयुष्याची किंमत "दोन रुपयेच" असणार आहे!
आईने दोन वर्षांपूर्वी दर पडला म्हणून, दोन एकर तुरीच्या शेतात तर, यावर्षी अर्धा एकर कांद्यात ट्रॅक्टर फिरवला. ट्रॅक्टर जमिनीत नव्हे तर, एका शेतकरी माऊलीच्या काळजावर नांगराचे फाळ चालवत होता. *शेतकऱ्याचं दुःख समजायला, शेतकऱ्याच्या पोटी जन्माला यावं लागतं, बाकी सगळी उसनी सहानुभूती असते.*
थोडेफार जग पालथे घातल्यावर एवढेच मला उमगलंय, या जगात दोनच जाती, धर्म आणि वर्ण आहेत... शोषण करणारे आणि शोषण होणारे. यातली तुमची जात-धर्म-वर्ण कोणता आहे ???
- डॉ. नानासाहेब थोरात
- ऑक्सफर्ड विद्यापीठ, इंग्लंड.
0 टिप्पण्या