विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल लिहिताना आणि बोलताना दोन ऐतिहासिक चुका सुधारल्या पाहिजेत. त्यातली पहिली चूक म्हणजे त्यांच्या हालअपेष्टांचे उदात्तीकरण. या हालअपेष्टांचे उदात्तीकरण करण्याचे कारण नाही, कारण सावरकरांनी हा मार्ग स्वत:च चोखाळला होता आणि त्यांच्याप्रमाणेच इतर सर्वच क्रांतिकारकांनीही. एकदा आपल्या आयुष्यातल्या पर्यायांची निवड आपण केली की त्याला आपणच जबाबदार असतो, ह्याची जाणीव सावरकरांना असणारच आणि त्यामुळे आपणही ती जाणीव ठेवण्याची गरज आहे. सावरकरांना कुणी साधं आयुष्य स्वीकारल्यामुळे अंदमानात पाठवले नव्हते. ना लोकांनी ना ब्रिटिश सरकारने. त्यांनी स्वीकारलेल्या आयुष्याचा तो अपरिहार्य भाग होता.
सावरकरांच्या मूल्यमापनातील दुसरी चूक आपण टाळली पाहिजे, ती म्हणजे सावरकरांची तुलना आपण त्यांच्या समकालीन किंवा आजच्या कोणत्याही साधेसरळ आयुष्य जगणाऱ्या माणसांशी करता कामा नये. तसे न करता त्यांच्याप्रमाणेच ज्यांनी क्रांतिकारी आयुष्य निवडले होते, त्यांच्याशीच त्यांची तुलना करायला हवी. एखाद्या क्रांतिकारकाची तुलना त्याच्यासारखेच क्रांतिकारक किंवा स्वातंत्र्यसैनिकाचे जीवन जगणाऱ्या व्यक्तीशी होऊ शकते, एअर कंडिशनमध्ये बसून लिहिणाऱ्या व्यक्तीशी नव्हे. या बाबतीत अश्या तुलनेने नंतर सावरकरांना फारसे गुण देता येत नाहीत, हेच खरे सत्य आहे.जरी त्यांच्या भक्तांना आवडलं नाही तरीही. सर्वसाधारणपणे सावरकरभक्त मुद्दाम सावरकरांची तुलना तुलनेने शांत जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी करतात.
वास्तवात, सावरकरांच्या सोबत, अगोदर आणि नंतरही शेकडो स्वातंत्र्यसैनिक अंदमानातील सेल्युलर तुरुंगात मारले गेलेत, अनेकांचे छळ झाले. यातले बहुतेक बंगाल प्रेसिडन्सी आणि बंगाल प्रांतातील होते. समकालीन तिथे दहदंडाने गेले त्यांची संख्या साधारणपणे 173 होती. इतर हजारो शिक्षा भोगत मेले. संन्यालसारख्या स्वातंत्र्यसैनिकांना तर दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा झाली. इतरही अनेकांचा अपरिमीत छळ झाला. परंतु त्यातल्या कोणीही ब्रिटिशांकडे माफी मागितली नाही, त्यांच्यासमोर गुडघे टेकले नाही आणि यातल्या कोणाचीही सुटका झाली नाही.
1,हृषीकेश कांजीलाल 2.बरेंद्र घोष 3. नंद गोपाळ 4. विनायक सावरकर 5. सुधीरकुमार सरकार या क्रांतिकारकांनी 1913 मध्ये दया याचिका केली होती. सावरकरांची ही दुसरी दया याचिका होती. (ज्या याचिकेत 1911 साली अंदमानमध्ये आल्यावर अवघ्या सहा महिन्यात सावरकरांनी केलेल्या दया याचिकेचा उल्लेख आहे.) वरील पाच कैद्यांपैकी फक्त सावरकर आणि बरेंद्र घोष यांनी आपला क्रांतिकारक भूतकाळ पुसून टाकण्याची विनंती केली. इतर तिघांनी फक्त मानवतावादी वागणूक मिळावी अशी मागणी केली. त्यातही फक्त सावरकरांनी पुढे संपूर्ण आत्मसमर्पण केलं. याचे सारे रेकॉर्ड्स ब्रिटिशांनी स्वातंत्र्यानंतर खूप काळाने हळुहळु खुले केलेत.
याचा एक सरळ परिणाम असा झाला की, यातल्या असंख्य ब्रिटिशांसमोर माफी न मागणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी कुणीही स्वत:च्या छळाच्या कहाण्या बोलून किंवा लिहून सांगू शकले नाहीत. स्वातंत्र्यासाठी खरेखुरे बलिदान दिलेले अनेक जण अनाम राहिले त्याचे हेही कारण होते. सावरकरांपेक्षा अनन्वित छळ सहन करणारे इतर सर्व क्रांतिकारक तुरुंगात होते, पण त्यांनी ब्रिटिश सरकारकडे माफी मागून आपली सुटका करून घेतली नाही आणि परत येऊन ते स्वत: आपले चरित्र, स्वत:चे ‘काळे पाणी’ लिहू शकले नाहीत. ना त्यांना तिकडे कुणी चरित्रकार भेटला. त्यामुळे संन्याल असो किंवा इतर कोणताही राजबंदी; ज्यांनी ५० -५० वर्षं छळ सोसला, त्यांची बलिदानकथा आपल्यापर्यंत पोहोचूच शकली नाही.
आता यावरही एक असा मुद्दा सावरकरभक्तांकडून पुढे केला जातो, की ‘माफी मागणे’ हा सावरकरांचा गनिमी कावा होता. मुळात, गनिमी काव्यासाठी कुणी पाच वेळा माफी मागत नाही. सावरकरभक्त नेहमी खुबीने सावरकरांचा ब्रिटनमधला एकच माफीनामा पुढे करतात, पण सावरकरांनी प्रत्यक्षात पाच माफीनामे दिले होते. सावरकरांनी बाहेर येण्यासाठी संपूर्ण आत्मसमर्पण केले होते.एवढेच नव्हे, ब्रिटिश राजवटीचे प्रेम,आदर,आणि परस्पर मदतीचे संबंध प्रस्थापित करण्याचे नम्र प्रयत्न करण्याचे लेखी दिले. “Such an empire as is foreshadowed in the proclamation wins my hearty adherence” ।म्हणजे “उद्घोषणेत पूर्वचित्रित अशा या साम्राज्याचे मी मनापासून पालन करतो” या शब्दात सावरकरांनी संपूर्ण आत्मसमर्पण केलंय. त्यामुळे सावरकरांच्या माफीनाम्याचा सिलसिला हा गनिमी कावा अजिबातच नव्हता. ते संपूर्ण कळवळून केलेलं आत्मसमर्पण होतं. इतर शिक्षा भोगत असणाऱ्या क्रांतिकारी सहप्रवाशांशी प्रतारणाच ती.
सावरकरभक्त सावरकरांचे उदात्तीकरण करताना एक गोष्ट लक्षात घेत नाही. ती म्हणजे सावरकरांचे सहकारी क्रांतिकारक माफी न मागितल्यामुळे बाहेर येऊ शकले नाहीत. त्यामुळे आपला छळ ते मांडू शकले नाहीत, सांगू शकले नाहीत. त्यांच्या झालेल्या या छळावर सावरकरांच्या माफीनाम्यांने मिळवलेला हा “विजय” आहे.
सावरकर तुरुंगातून बाहेर आल्यावर १९२६ मध्ये सावरकरांचे उदात्त चरित्र (आत्मचरित्र नव्हे!)‘द लाइफ ऑफ वीर सावरकर’ हे पहिल्यांदा बाजारात आले. त्याच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या. अनेक वर्षांनंतर उघड झाले, की या चरित्राचा मूळ लेखक चित्रगुप्त हे दुसरेतिसरे कुणी नसून स्वत: सावरकरच होते. सावरकरांबरोबर तुरुंगात असणारे पण बाहेर न येऊ शकणारे इतर क्रांतिकारक आपली कथा कसे सांगू शकणार किंवा आपले चरित्र कसे लिहू शकणार?हे चरित्र वाचावे असेच आहे. वीर चित्रगुप्त!सावरकरांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर ‘हिंदुत्व’ आणि ‘हिंदूराष्ट्रा’ची एक नवीन फुटीर कल्पना उभी केली, ज्यामध्ये भारतीय मुस्लिमांना सावरकरांनी खलनायक म्हणून रंगवले.
वास्तवात, भारतीय मुसलमानांनी एकंदरीत स्वातंत्र्ययुद्धात कित्येकदा सावरकरांपेक्षा अधिक बलिदान करून हातभार लावला होता. अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत मृत्यू पावलेल्या राजबंदींची नावे वाचतानाही आपल्या हे सहज लक्षात येते. परंतु ब्रिटिशांना मदत करताना हिंदू उच्चवर्णवादाचा झेंडा फडकवत ठेवणारी संघटना उभी करणे, हे सावरकरांना क्रमप्राप्त झाले होते.
सावरकरांच्या कल्पनेतेले हिंदू राष्ट्र हे वरवर पाहता चार्तुवर्णविहीन वाटले, तरी पूर्णत: ब्राह्मणवादप्रधान हिंदू राष्ट्र होते, कारण सावरकरांनी नेहमीच डार्विनच्या ‘बलिष्ठ तोच टिकेल’ या सिद्धांताला समाजशास्त्राच्या दृष्टीने बरोबर मानले होते आणि हिंदूराष्ट्राला ते लागू केले होते. इटलीमध्ये फॅसिझम, जर्मनीमध्ये नाझीझम, भारतात रा. स्व.संघ आणि सावरकरांची हिंदू महासभा या डार्विनच्या जीवशास्त्रीय सिद्धांताला समाजशास्त्रीयदृष्ट्या लागू करणाऱ्या संघटना. अशा वेळेला हिंदू राष्ट्रामध्ये बलिष्ठ म्हणजे टिकला पाहिजे म्हणजे ब्राह्मणवादी उच्चवर्णीय तोच टिकेल. कारण यात ‘इक्विटी’ आणि ‘इक्वॅलिटी’ला वावच नाही. बहुजन आणि दलित कसा टिकेल? एवढेच नव्हे, तर यात मानवतेलाही वाव नाही. किंबहुना ‘Urban Brahmanism’ स्थापन करणे, हाच त्यांचा खरा उद्देश होता.
हिंसा त्या तत्वज्ञानात वर्ज्य नव्हती. परंतु, सावरकरांनी जे हेरले आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे उचलले व राबवले ते फार भयंकर होते.भारतात हूण, शक यांच्यापासून ते बौद्ध धर्मापर्यंत आलेल्या सर्व धर्मांना हिंदू ब्राह्मणवादाने आपल्या पंखाखाली घेतले आणि स्वतःत जिरवून टाकले. आपल्या जातिवादाच्या उतरंडीत त्यांचा नाश करून टाकला. परंतु, प्रथमच ‘Abrahmanic Religions’ने ब्राह्मणवादी हिंदू नेतृत्वाची गोची करून टाकली होती. सुरुवातीला मुस्लिम धर्माने आणि नंतर ख्रिश्चन धर्माने. पैकी ख्रिश्चॅनिटी हा ब्रिटिशांचा धर्म असल्यामुळे सावरकरांना त्याविरोधी काही करणे शक्य नव्हते. त्यामुळे मुस्लिमविरोधी बोलणे, करणे हेच सोयीचे होते, उपयुक्त होते आणि ब्रिटिशांच्या सेवेचे साधनही होते; ज्यातून ब्रिटिशांना हवी होती ती द्विराष्ट्रवादाची संकल्पना जोपासणे शक्य होते.
– राजू परुळेकर
0 टिप्पण्या