Top Post Ad

बुद्धाचे दैविकरण केल्याने धर्म वाढतोय काय ?


 भारतच नव्हे तर जगाच्या पाठीवर कुठे ही गेले तर बुद्धाच्या विचारावर चालणारे लोक आहेत. जगामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झालेला होता. म्हणुनच वेगवेगळ्या ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे बुद्ध हे विश्वव्यापी होते याची प्रचिती येते. तथागत गौतम बुद्ध कोणत्याही एका व्यक्तीची, समुहाची वा धर्माची वैयक्तिक संपत्ती मुळीच नाही. जो समता स्वातंत्र्य बंधुता न्याय मानवी स्वातंत्र्य विज्ञानवाद,  स्विकारून चारित्र्याचे पालन करतो तो बुद्धांचा अनुयायी होतो. बुद्धांचा अनुयायी होण्यासाठी कोणत्याही कर्मकांडाची होम हवनाची गरज नाही. तथागत गौतम बुद्ध म्हणजे अखिल विश्वाला आदर्श जिवन जगण्याचा मार्ग दाखवणारे तथागत बुद्ध आहेत.

 कोणत्याही चमत्काराने किंवा मंत्रोच्चार करून ते अडचणी सोडवत नाहीत तर अडचणी निर्माण होण्याचे कारणे आणि उपाय याचे सांगणारे तथागत बुद्ध आहेत. जगामध्ये कोणत्याही ठिकाणी उत्खनन झाले तर तथागत गौतम बुद्धाच्या मुर्त्या व इतर बौद्ध कालीन वास्तु सापडतात यावरून जगामध्ये बुद्धाचा किती मोठा प्रभाव आहे हे दिसुन येते. भारतात देखील अनेक ठिकाणी ऐतिहासिक व जगप्रसिध्द बौद्ध लेणी आहेत त्यामध्ये मोठमोठ्या बुद्धमुर्ती व तत्कालीन संस्कृती चे वर्णन होईल असे शिल्प कोरलेले आहेत. सम्राट अशोक यांनी देशामध्ये चौऱ्यांशी हजार स्तुप बांधून बुद्धाच्या धम्माचा प्रसार आणि प्रचारच केला नाही तर तो ऐतिहासिक वास्तुने जिवंत सुद्धां ठेवला. मुळ मुद्दा हा आहे. की बुद्ध प्रत्येक ठिकाणी आजही आढळतात. उत्खनन केले की बुद्धच सापडतात. कपट नितीने बुद्ध स्तुप, शिल्प तोडून ते गाडण्याचा प्रयत्न झाला असला तरी बुद्ध हे झाकणारे नाहीत.

 एकीकडे बुद्धाचे नाव व विचार न घेता बुद्धाचा मुर्तीला शेंदूर फासुन, त्यावर कपडे टाकुन मुकुट लाऊन बुद्धाला देव बनवले जाते आणि त्याची पुजा केली जाते. पुजा अर्चा करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे धर्मानुसार ते करायला ही पाहिजे. परंतु बुद्धाची देव म्हणून पुजा करणे हा अधिकार मात्र कोणालाच नाही. कुठे ब्रम्हबाबा तर कुठे देवी म्हणून पुजले जाते. पुर्वीच्या काळी बुद्ध विहारांचे किती मंदिरात बनवून देव बनवले असते ते सोडा पण आजच्या या काळात प्रसारमाध्यमे, ऐतिहासिक पुरावे असताना ही बुद्धाची देव म्हणून पूजा करताना धर्म धोक्यात येत नाही का? तेहतीस कोटी देव असताना आजही बुद्धाच्या मुर्तीची गरज का पडते? एवढे आपले अज्ञान आहे की लोकांना बुद्ध कळूच नये म्हणून त्यांचे दैविकरण केले जाते. बुद्धाचे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नावाखाली वेगवेगळ्या देवांचे नाव देऊन पुजा केली जाते. असे कृत्य करताना ज्यांना धर्माचा गर्व आहे त्यांना काहीच वाटत नाही. 

जे देव आणि माणसे याच्या मधले दूत आहेत तेही काही बोलत नाही. धर्माचा गर्व आहे तर स्वतः च्या धर्मातील देवांनाच पुजा ना बुद्धाला देव बनवून त्याची पूजा करणे यात कोणता गर्व आहे? अंधश्रद्धेत डुबलेली जनता आणि देव यांच्या मध्ये जो दुत आहे त्याने बुद्धालाच देव म्हणून पुजले तर खरा देव त्या पुजाऱ्यावर कोपणार नाही का? बुद्धाची मुर्ती आणि नाव ब्रम्हबाबा, देवी, शिवलिंग असे देऊन पूजा केली जाते तेव्हा ब्रम्हबाबा, देवी, शिवलिंग यांचा अवमान होत नाही का? देवासोबत नेहमी संबंध असणाऱ्या पुजाऱ्यांना देव कधीच सांगत नसतील का अरे तुम्ही बुद्धाच्या मुर्तीची पुजा करता आणि माझ्या नावाने चंदा गोळा करता हे धर्माच्या विरोधी आहे असा संदेश देव देत नसतील का? अनेक लोकांकडे दिव्यशक्ती आहे ती दिव्यशक्ती धर्माचे रक्षण करण्यासाठी दिली आहे असे त्यांचे मत असते मग बुद्धाची चोरी करून देव बनवतात तेव्हा या दिव्य पुरुषांना देवाचा एकही संदेश येत नाही का? धर्माचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला मी शक्ती दिली आणि तुम्ही धर्माचे व देवाणे रक्षण न करता बुद्धालाच देव बनवले असा प्रश्न देव विचारत नसतील का? 

स्वतः धर्माच्या व देवाच्या नावाखाली बुद्धाच्या मुर्त्या चोरायच्या आणि वरून धर्माची प्रामाणीकतेची शिकवण द्यायची. इतर बुद्धाच्या मुर्तीला देवदेवतांची नावे देऊन त्याची पुजा करण्याची गरजच का पडावी? प्रबोधनकार ठाकरे यांच्या मतानुसार देव व देवळे सात व्या आठव्या शतकात निर्माण झाली मग त्याअगोदर देव होते तरी कुठे आणि सातव्या आठव्या शतकात मंदीराचे निर्माण कसे झाले याचे स्पष्टीकरण तेच स्वतः देतात कि बुद्ध धम्मातील हिनयान पंथाच्या लोकांनी विहारे बांधून त्यात बुद्धमुर्ती व शिल्प बसवले परंतू धर्मांध व धम्म विरोधी लोकांनी त्याची नासधूस केली आणि त्याचेच देऊळ तयार केले बुद्ध मुर्तीला च शिवलिंग व शंकर म्हणून पुजा करू लागले म्हणून प्रबोधनकार ठाकरे म्हणतात देवळाचा ईतिहास शोधला तर तो विहारात बिनचूक मिळतो याचाच अर्थ विहाराची देवळे बनवली. बर ईतिहासामध्ये जे काही केले ते होऊ द्या पण आता आजही बुद्धाची मुर्ती देव म्हणून पुजने हे बुद्धी, तर्क व धर्म यांना शोभणारे आहे का? 

एखाद्या रंगामुळे धर्माचा अवमान होतो तर धर्माने देव नसलेली मुर्ती देव म्हणून पुजली तर धर्मचा अवमान नाही का? बुद्धाला देव म्हणून पुजताना धर्मरक्षक, दैवी शक्ती वाले चमत्कारिक लोक, देवाचे दुत हे नेमके असतात तरी कुठे? पुजा कोणाचीही करा परंतु देवाच्या नावाने दान मात्र पुजाऱ्यांना च द्या या साठीच तर बुद्धाच्या मुर्तीचा वापर केला जात नाही ना? सर्व धर्मांना एक तत्व असते एक पावित्र्य असते. परंतु जेव्हा आपला धर्म किंवा धर्माचे तत्व चांगले आहे असे म्हणतो आणि धर्मात नसलेल्या मुर्तीची पुजा करतो तेव्हा धर्म आणि त्याचे तत्त्वज्ञान, देव आणि देवाची भक्ती हे सांगुन काय फायदा आहे का?

         आपण आताचा विचार केला तर सध्या ही कुठे ना कुठे बुद्ध मुर्तीला देव म्हणून पुजले जात आहे. मागे अंजिठा लेणीवर देखील तसा प्रयोग करण्यात आला. बुद्ध मुर्तीला कुंकू लाऊन तेथे त्रिशुळ ठेवण्यात आली होती. मुळात असे करणाऱ्या लोकांवर देव कोपत नाही का? अशा लोकांना देव लवकर घेऊन जात नाही का? कारण असे करणारे लोक एकाच धर्माचा नाही तर एक धर्म एक एक धम्म आणि देव असा तिन लोकांचा अवमान करतात. तिन तिन संवेदनशील बाबींचा अवमान करणाऱ्या लोकांना कोणत्याही धर्माच्या लोकांनी सन्मान करणे योग्य आहे का? धर्मतत्वानुसार व माणुसकी नुसार बुद्धाची मुर्तीची देव म्हणून पुजा करणे चुकिचेच आहे. 

अजिंठा एक प्रकरण झाले. दुसरे प्रकरण म्हणजे मुंबई येथील कान्हेरी लेणीवर बुद्धाच्या मुर्तीला शंकर मुर्ती समजून पुजा करत होते. जेव्हा जानकर लोकांनी आवाज उठवला तेव्हा या वेळच्या महाशिवरात्रीला पोलीसांनी लोकांना सांगितले कान्हेरी लेणीवर कोणत्याही प्रकारचे शिवमंदिर वा शिवलिंग नाही महाशिवरात्रीला कोणत्याही प्रकारच्या पुजेचे साहित्य आणु नये. तेव्हा पुजेला आवर घालता आला पण धर्माच्या पावित्र्याचे काय? स्वतः च्याच हाताने स्वतः च्याच धर्माचा अवमान करून घेण्यात काय शहाणपण आहे. या अगोदर चेन्नई न्यायालया मध्ये सेलन जिल्ह्यातील एक केस गेली होती तेथेही जुन्या मंदीरामध्ये तथागत बुद्धाच्या मुर्तीची देवसमजुन पुजा केली जात होती. चेन्नई उच्चन्यायालयाने चौकशी चे आदेश दिले पुरातत्व खात्यांनी अहवाल सादर केला आणि अहवालानुसार ती मुर्ती बुद्धाची असून तेथे पूजाअर्चा करता येणार नाही असा निर्णय दिला. 

देवाला कोर्टात नेने आणि तेथे देवाची हार करून घेणे हे कोणत्याही धर्माला शोभणारे नाही. सोमनाथ मंदीराखाली तिन मजली गुफा आढळून आली आणि गुफेमध्ये बुद्धशिल्प व लेणी सदृश्य बाबी आढळून आल्याचा अहवाल पुरातत्व खात्याने सरकारला दिलेला आहे. मग आता ही केस जर कोर्टात गेली आणि अयोध्ये सारखा निकाल लागला तर मंदिर पाडून विहार बांधावे लागेल नाही तर मंदिर जसेच्या तसे पण तेथे धर्मानुसार पुजा अर्चा करता येणार नाही. भुदरगड किल्या जवळ आता पुन्हा बौद्ध गुफा व शिल्प असल्याचे संशोधनात समोर आले आहे. हा देशच नाही जग बुद्धाचे आहे म्हणून सर्वत्र बुद्ध आढळतो.  परंतु स्वतः च्या डोक्यातील मेंदूचा वापर न करता धर्मांध होऊन, अंधश्रद्धा बाळगून बुद्धाला देव म्हणून पूजने आणि नंतर तो देव नसुन बुद्ध आहे असे सिद्ध झाल्यावर पुजा बंद करणे असे केल्यापेक्षा आपण जर मेंदुचा वापर करून सत्य असत्यामधला फरक केला, आणि धर्मांध होऊन धर्माचा गर्व न करता डोळस व तार्किक दृष्टीने बघितले तर मान खाली घालायची वेळ येणारच नाही. बुद्धाच्या मुर्तीला देव म्हणून पुजताना, देवाच्या नावाने दान देऊन पुजाऱ्याला श्रीमंत करताना छाती फुगुन येते. परंतु बुद्धाला बुद्ध म्हणून स्विकारून त्यांचे नाव घ्यायची लाज वाटते. म्हणजे आपण धर्माच्या नावाखाली काय काय सहन करतो. परंतु माणूस म्हणून ज्याचा स्विकार करायला पाहिजे त्याचा स्विकार करत नाही आणि यातुनच आपला बौद्धिक विकास व धर्माच्या बाबतील अंधश्रद्धा दिसुन येते. 

अनेक लोक जे धर्माच्या नावावर पोट भरतात ते म्हणतात आमच्या च धर्माच्या नावाने किंवा धर्मातील चुकीच्या गोष्टी वर का बोलले जाते. आता बुद्ध मुर्तीला देव म्हणून पुजले गेले आणि कोणी बोलले तर तो धर्मविरोधी होणार का? किंवा एखाद्या ठिकाणी बुद्धमुर्तीला देव समजून पुजा केली जाते शिवलिंग समजून पुजा केली जाते आणि ते जर बुद्ध असतील तरी काहीच बोलायचे नाही का? तुम्हाला देवाच्या नावाखाली बुद्धाची पुजा करायला काहीच वाटत नाही पण बुद्धाला बुद्ध म्हणल्यावर राग का येत असावा. अशा प्रकारे अनेक प्रश्न आहेत. आणि अनेक ठिकाणी बुद्ध मुर्तीला देव म्हणून पुजले जाते याचाच गर्व वाटत असेल तर बुद्धाला ज्या देवाचे नाव दिले त्या देवाला काय वाटत असेल याचा विचार करावा. आणि देशात बंधुभाव नांदावा परंतु ऐतिहासिक वास्तुचे विद्रुपीकरण होऊ नये या साठी प्रत्येकाने प्रयत्न करावा. फक्त बुद्धमुर्तीला देव म्हणून पुजले तर धर्म वाढणार नाही. धर्माचे पावित्र्य जपुन व मानसन्मान सुद्धा करता आला पाहिजे. 

  • विनोद पंजाबराव सदावर्ते
  • समाज एकता अभियान
  • रा. आरेगांव ता मेहकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com