‘मी सुरुंगांवरून चालून पाहिलेज्वालामुखीवर मी फुलून पाहिले
मी पुनःपुन्हा जहर खाऊन पाहिले
मला नाकारणारे जगणे मी जगून पाहिले
मी
जळत्या सूर्याला उराशी कवटाळून पाहिले
मी सुखांना खूपदा दुखवून पाहिले
खूप जखमांनी घरटी बांधली माझ्यावर
खूपदा मी जगण्याशिवाय जगून पाहिले’’
ही कविता म्हणजे यशवंत मनोहर यांच्या संपूर्ण साहित्याचा आणि जीवनाचा ज्वलंत पासवर्डच आहे. हा परिघाबाहेरच्या अन्यायात जळत्या जगाचा ‘मी’ आहे. “यशवंत मनोहर म्हणजे एक गूढरम्य सर्जनषीलता आहे. निर्मितीक्षमतेच्या त्याच्या रास्त अधिकारात एक चमत्कार आहे; अविष्वसनीय वाटावे असे ते वाङ्मयीन अद्भुत आहे… येरला या गावाच्या मातीतच असे काही गुण असावेत की जेणेकरून तिने आपल्या कुशीतून एका युगसाक्षी प्रतिभावंताला जन्म दिला. एखाद्या अद्ययावत प्रयोगशाळेत येरल्याच्या मातीचे परीक्षण केले पाहिजे.” असे ख्यातनाम समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांनी म्हटले, त्या नागपूर जिल्ह्यातील येरला या छोट्याशा खेड्यात यशवंत मनोहरांचा जन्म मोलमजुरी करून जमेल तसे पोटाच्या आगीला समजावणाऱ्या गरीब आईवडिलांच्या पोटी 26 मार्च 1943 रोजी झाला.
आर्थिक आणि सामाजिक विषमतेने त्यांना लहानपणापासूनच जाळले. शाळेत शिकताना त्यांना सुटीच्या दिवशी निंदणासारखी मजुरीची कामे करावी लागली. पण कळायला लागले तेव्हा या विषमतांचे दुष्ट व्यूह त्यांच्या लक्षात आले. तोवर मुकाटपणे पेटणारे त्यांचे अस्तित्व त्या यंत्रणांच्या विरोधात आक्रंदन करू लागले.
‘‘मी माझ्या सर्वनाशाची माझी कविता
अशी मशालीसारखी हातात घेऊन
पेटवून देईन हा अमानुष चक्रव्यूह’’
(उत्थानगुंफा)
अशा कडाडत्या शब्दात येथील विषमतेच्या रखवालदारांना त्यांनी ठणकावले. हातात विद्रोहाच्या धगधगत्या मशाली घेऊन 1960 नंतर त्यांनी मराठी साहित्यात प्रवेश केला.
गरिबीच्या आणि जातियतेच्या चटक्यांनी यशवंत मनोहर रडत बसले नाहीत. ते पेटून उठले. ते खेड्यातील अंधारात वाहून गेले नाहीत. त्यांनी अमानुषतेशी संघर्ष केला. हजारो वर्षांच्या विषमतेवर, तिच्या तत्त्वज्ञानावर आणि तिचा पुरस्कार करणाऱ्या साहित्य, रूढी-परंपरा अशा सर्व छावण्यांवर त्यांनी निषेधाची आग ओतली.
‘‘मला मान्य नाही
तुमच्या बोटांपुढची दिशा’’
(उत्थानगुंफा)
‘‘जीवनासाठी जीवनाचे आजार नाकारावे लागतील.’’
(उत्थानगुंफा)
अशी जीवनाच्या विरचनेची विद्युतरेषा त्यांनी ओढली.
‘‘हे असे का? आणि आपल्याला वाटते तसे का नाही? ते काय केल्याने तसे होईल? या प्रश्नांनी डोके जळायला लागले. ती आग शमविण्यासाठी मी लेखनाच्या डोहात स्वतःला झोकून देतो. माझी जाणीव अशा प्रश्नांना ठेचाळून घायाळ होते आणि सांडणारे रक्त वेचण्या- जुळवण्यासाठी मी लिहितो. रक्तातील उष्णतेच्या वादळाला वाट करून देऊन मुक्त होण्यासाठी मी लिहितो.
माणसे माणुसकीचा सौंदर्यपिसारा फुलवित जगावित. ती फॅसिस्टांच्या सोनेरी पिंजऱ्यात अडकू नयेत यासाठी मला लिहावेच लागते. माणूस पराभूत होऊ नये, तो जिंकावा यासाठी मी लिहितो.
निर्मितीच्या वेळी जिवाला लागणाऱ्या आगीचे माधुर्य कवटाळण्यासाठी, त्यावेळी मनात उधाणणाऱ्या सुंदर आणि तंद्रोत्कट जगण्यासाठी मी लिहितो.
काही मोलाचे लिहिले जात असताना मनाला जीवनाच्या मर्मांची पालवी येत असल्याचा अनुभव येतो. कंठात करुणा हेलावत राहते. अशावेळी अम्लान सुखाची अपूर्व नक्षत्रे उजळीत येणाऱ्या त्या आसवांसाठी मी लिहितो.
मानवी जीवनातील आजवरची विघातक नाती आणि त्यांनी निर्माण केलेल्या सवयी बदलता येतात. संपूर्ण मानवतेला समंजस, सर्जनशील, प्रज्ञानी आणि सुखी करणाऱ्या नातेसंबंधांची आणि सवयींची प्रस्थापना व्हावी या उद्देशाने मी लिहितो.’’
असा आपल्या निर्मितीचा उद्देश त्यांनी आपल्या ‘युगसाक्षी’ या ग्रंथात सांगितला आहे. हीच लेखनाची प्रक्रिया कवितेत त्यांनी पुढीलप्रमाणे मांडली –
‘‘जिंदगीने डोळ्यात आसवे आणि सूर्यानेच हातात लेखणी दिली.
एका हाताने ज्वालांच्या मिठ्या सोडवल्या दुसऱ्या हाताने कविता लिहिली.’’
विज्ञाननिष्ठा, बुद्धिवाद आणि सामाजिक न्याय या सर्व गोष्टी ज्या समाजाला दुर्बोधच वाटतात त्या समाजात मनोहरांच्या वाट्याला अशी तडफड येणे अपरिहार्यच आहे. जगात दुर्बोध गोष्टी अनेक आहेत. पण खूप लोकांना माणुसकीच दुर्बोध वाटते ही जगातली सगळ्यात मूलभूत समस्या आहे. तिचा संबंध एलिनेशनशी आहे, असे मनोहरांना वाटते.
शोषितांच्या दुःखांनी मनोहरांना साहित्य लिहायला लावले. दुनियेच्या आक्रंदनाने त्यांच्या साहित्यात ज्वालांचे आकार धारण केले.
जग मुळापर्यंत नासलेले आहे. Deconstruction ने हाती फार थोडे लागेल तेव्हा जगाचे मूलभूत पातळीवरून Reconstruction करण्याची गरज मनोहरांनी आपल्या साहित्यातून सांगितली आहे. सामाजिक आणि आर्थिक असे सर्व पातळ्यांवरील अमानुष शोषण त्याशिवाय नष्ट होणार नाही ही यशवंत मनोहरांची ठाम भूमिका आहे.
‘‘मी कवी दुःखांचा, अपमानित माणसांच्या हक्कांचा
मी शब्द जळता, माणुसकीच्या शोकाचा, साऱ्या अश्रूंच्या हाकांचा
मी हकीकत, मी कैफियत मरणे झेलत जगणारांची
मी जिवंत तडफडती नाडी या अस्वस्थ युगाची
मी गुन्हा करतो, भूमिका घेण्याचा, भूमिका जगण्याचा
मी वारा नव्या युगाचा आणि धरण तोडून धावतो
उडाणे मावत नाहीत पंखात माझ्या, मी युद्धाचा सांगाती
मी जिवंत नाडी या अस्वस्थ युगाची तडफडती’’
असे आपल्या ‘स्वप्नसंहिता’ या कवितासंग्रहात हा नवी दुनिया निर्मिणारांचा साहित्यिक म्हणतो.
स्वतःच्या जळणाऱ्या जिवाच्या उजेडात यशवंत मनोहरांनी अभ्यास केला. चिकित्सेच्या डोळ्यांनी त्यांनी जीवनही वाचले आणि त्याच्यासंबंधीचे साहित्यही वाचले. औरंगाबादला शिकताना खूपदा उपाशीही राहावे लागले. ते असे स्वतःच्या आणि सर्वच वंचितांच्या यातनांच्या सोबतीने जिद्दीने शिकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातून 1965 साली ते प्रथम श्रेणीत बी.ए. ऑनर्स उत्तीर्ण झाले. डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातूनच एम.ए.ला ते प्रथम श्रेणीत तिसरे आले. 1984 साली ते नागपूर विद्यापीठातून Ph.D. झाले. नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागातून 2003 साली ते निवृत्त झाले.
बुद्ध, चार्वाक, सॉक्रेटिस, मार्क्स, रसेल, सार्त्र, आंबेडकर अशा असंख्य प्रज्ञावंतांचे इत्यर्थ मनात मुरवून यशवंत मनेाहरांनी परिवर्तनाच्या संपूर्ण वैश्विक Discourse शी स्वतःला जोडून घेतले.
त्यांच्या वाट्याला आलेल्या भीषण सामाजिक आणि आर्थिक विषमतेने विश्वातील सर्वच वंचितांच्या दुःखांशी आणि शोषणमुक्तीच्या त्यांच्या लढ्याशी जोडले.
अशा यशवंत मनोहरांना कोणी मराठीचा मायकोव्हस्की म्हटले. भारतीय साहित्यातील अपूर्व विद्रोह असे त्यांच्या विद्रोहाचे वर्णन केले गेले. काहींनी त्यांना मराठी साहित्यातील वीरनायक म्हटले. कोणी त्यांना परिवर्तनाच्या दिशेने धावणाऱ्या पिढीचा साहित्यिक म्हटले.
शोषितांविरुद्ध कार्य करणाऱ्या, त्यांची दिशाभूल करणाऱ्या साहित्याशी आणि साहित्य सिद्धान्तांशी त्यांनी निर्णायक सामना केला. परिवर्तनाच्या लढाया मारण्याचे कार्य करणाऱ्या तत्त्वज्ञानांविरुद्ध, मानसशास्त्राविरुद्ध आणि धार्मिक प्रतीकांविरुद्ध त्यांनी कायम युद्ध केले. उज्ज्वल जीवनाचे स्वप्न पाहण्याचा मूलभूत अधिकार सर्वांनाच असावा. सर्वांच्याच स्वप्नांना तेजाचे पंख मिळावेत आणि उड्डाणासाठी सीमा नसलेले आकाश मिळावे यासाठी मनोहरांचे साहित्य कायम जीव पाखडत आलेले आहे शोषणविहीन जीवन. हाच या प्रतिभावंताच्या साहित्याचा बाणा आहे.
एका बाणेदार आणि स्वाभिमानी प्रतिभावंताचे हे साहित्य आहे. या बुद्धिवादी आणि प्रज्ञावंत साहित्यिकाला आपल्या भूमिकेची अडचण होईल अशी कोणतीही तडजोड मान्य नाही. त्यांच्या साहित्यातील आणि साहित्यशास्त्रातील निर्णायक सत्याची अभंगशक्ती वाचकाला अंतर्मुख करते. मोडेन पण वाकणार नाही, मरेन पण झुकणार नाही ही त्यांच्या संपूर्ण वाङ्मयीन चारित्र्याची प्रतिज्ञा आहे.
‘माझ्याजवळ आहे अख्खे जग उजळून टाकणारा उजेड’ ही अजिंक्य गर्जना त्यांच्या सुमारे बारा हजार मुद्रित पृष्ठांमधील शब्दाशब्दातून कायम उफाळत आहे.
अरुण वाघ
0 टिप्पण्या