डॉ.बाबासाहेब आंबेडकर बुध्द कबीर आणि फुले यांना आपले गुरु मानले हे सर्वज्ञात आहे. मात्र, ज्या आद्य अस्पृश्योध्दारक गोपाळ बाबा वलंगकर यांना समस्त महार जातीचे गुरु म्हणून गौरविले त्याबद्दल आपण कमालीचे अनभिज्ञ आहोत. अस्पृश्य समाजातील पहिले पत्रकार, पहिले साहित्यिक, पहिले राजकीय प्रतिनिधी, सामाजिक न्यायासाठी बंड करणारे पहिले विद्रोही नेतृव्त म्हणून गौरविलेल्या गोपाळ बाबा वलंगकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ आपलेच नाही तर संपूर्ण महार जातीचे गुरु म्हणून मोठया आदराने संबोधले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गोपाळ बाबा वलंगकर यांच्यात असलेले हे अतूट ऋणानुबंध आजच्या पिढीने लक्षात घेवून आवश्यक आहे.
महात्मा फुले यांच्या विचाराने प्रभावित झालेले गोपनाक विठनाक वलंगकर अर्थात गोपाळ बाबा वलंगकर या अस्पृश्य व्यक्तीने सामाजिक जागृतीची मशाल तेवत ठेवण्यासाठी 1886 साली ब्रिटिश फौजेतील बॉम्बे नेटीव्ह इन्फट्रीच्या हविलदार पदाचा राजीनामा दिला आणि दापोली येथील सैनिकी वसाहतीत स्थायिक झाले. ब्रिटिश सरकारने सेवेतून निवृत्त झालेल्या सैनिकांसाठी दापोली येथे मोठी वसाहत निर्माण केली होती. स्थानिक भाषेत या भागाला काळकाई कोंड असे म्हणतात. 1894 मध्ये सुभेदार रामजी आंबेडकर आपल्या परिवारासह महु वरुन निवृत्त झाल्यावर येथे स्थायिक झाले.
महाड मंडनगड रस्तयावर महाड पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेले रावढळ हे छोटेसे गाव गोपाळ बाबा यांची जन्मभूमी आणि कर्मभूमि असून आंबेडकरपूर्व कालखंडातील क्रांतीची मशाल याच ठिकाणी प्रज्वलित झाली. सैन्यात भरती झाल्यावर ब्रिटिश सरकारच्या वतीने सर्व सैनिक आणि त्यांच्या परिवाराची शिक्षणाची सोय करण्यात येत असे. गोपाळ बाबा वलंगकरांनी याच सैनिकी शाळेत नॉर्मल स्कुलची परीक्षा उत्तीर्ण केली. या परिक्षेत आजच्या मॅट्रिकच्या परिक्षेचा दर्जा होता. त्यांच्या फलटणीचा मुक्काम जेंव्हा जेंव्हा पुण्यात असे तेव्हा ज्योतीराव फुले यांच्या भेटीचा आणि मार्गदर्शनाचा लाभ त्यांना होई. फलटणीमध्ये दर रविवारी ज्योतीराव यांची व्याख्याने सैनिकांसाठी आयोजित केली जात असत. या भेटीतून त्यांच्यावर ज्योतीरावांच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला आणि समाजिक कार्याची प्रेरणा त्यांना मिळाली. पुढे सैन्यातील सेवेचा राजीनामा देवून आपल्या जीवन ध्येयाला वाहून घेणेसाठी ते बंधमुक्त झाले.
दापोली येथे स्थायिक झाल्यावर अस्पृश्य समाजातील महार, मांग,चांभार, ढोर इत्यादी समाजात जागृती करण्यासाठी त्यांना 1889 साली त्यांनी अनार्यदोष परिहारक मंडळी या सामाजिक संस्थेशी स्थापना केली. या संस्थेच्या वतीने अस्पृश्य मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी जोरदार संघर्ष केला. या संस्थेच्या वतीने 08 फेब्रुवारी, 1894 रोजी रेव्हेन्यू कमिशनर न्यूजंट इस्क्कायर यांना पत्र लिहिले. या पत्रावर सुभेदार रामजी आंबेडकर यांची रामनाक मालनाक अशी इंग्रजी स्वाक्षरी आहे. गोपाळ बाबा वलंगरांसोबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर हे अनार्यदोष परिहार मंडळाचे कार्य मोठया धडाडीने करत असत. या दोघांमध्ये कमालीचा स्नेहभाव असून आंबेडकर परिवारात गोपाळ बाबांना फार आदराचे स्थान होते.
1888 साली त्यांनी विनंती पत्र नावाचे एक 54 पानांचे पुस्तिका तयार करुन मुंबईच्या चक्रवर्तीनी छापखान्यात छापलेले 01 ऑगस्ट 1889 रोजी रावढळ येथून प्रकाशित केली. महात्मा फुले यांची विद्यार्थीनी मुक्ता साळवे या 13 वर्षाच्या मुलीचा मांग महाराच्या दु:खाचा निबंध ज्ञानोदय म्हणून 01 मार्च, 1855 रोजी प्रकाशित झाला. या निबंधामध्ये महारा मांगाच्या दु:खासंबंधी जी परखड विधाने केलेली आहेत तितकी तर्कशुध्द मांडणी यापूर्वी झालेली दिसत नाही. मात्र विनंती पत्रात 26 प्रश्न विचारुन गोपाळ बाबा वलंगकरांनी इथल्या समाजव्यवस्थेला जाब विचारणेचे धाडस केले आहे. त्यांची तर्कनिष्ठ, बुध्दिप्रामाण्यवादी विचारसरणी या पुस्तिकेत दिसून येते. त्यांनी मांग,महार,चांभार आणि अस्पृश्य ठरविलेल्या समाजाचे धर्माने लादलेली गुलामगिरी नष्ट होऊन मानवी समानता व मानवी जगण्याला प्रतिष्ठा यासाठी हे लिखाण केलेले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बालपणी गोपाळ बाबांना पाहिले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण सुभेदार रामजी आंबेडकर आणि वलंगकर यांचा नातेवाईक घरोबा होता. तसेच सामाजिक चळवळीतील खंदे कार्यकर्तें रामजी आंबेडकर हे वलंगकरांसोबत सक्रिय होते. गोपाळ बाबा वलंगकरांच्या अनार्यदोष परिहारक मंडळाची अनेक फाईल्स, दीनबंधुचे लेख तसेच कागदपत्रे रामजी आंबेडकरांनी जपून ठेवल्यामुळे त्यांच्या ट्रंकेतून ती डॉ. आंबेडकरांना मिळाल्याचे समजते. गोपाळ बाबा वलंगकरांच्या या विनंती पत्र पुस्तिकेच्या संदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर 25 डिसेंबर, 1920 च्या मुकनायकच्या अंकात लिहितात की, “महार जातीचे गुरु हरीभक्त परायन गोपाळ बाबा वलंगकर ह्या कोकणस्त महार साधूने सर्व बहिष्कृत लोकांवरचा अस्पृश्यत्वाचा डाग साफ धुवून निघून जावा म्हणून सर्व महाराष्ट्रभर फिरुन लोकांना उपदेश केला. अनार्यदोष परिहारक समाज ठिकठिकाणी स्थापन केले. सुधारक व दीनबंधु या पत्रातून लेख व अखंड लिहिले. (हे अखंड आम्ही सवडीनुसार प्रसिध्द करणार आहोत) इतकेच नव्हे तर विजयादशमी अश्विन शके 1810 सर्वधारीनाम संवत्सरे सन 1888 यावर्षी 50 पानांचे एक विनंती पत्र प्रश्नरुपाने छापून जातीभेदावर वादविवाद करण्याकरीता तत्कालीन शंकराचार्य व इतर धर्ममार्तंड यांना आव्हान केले होते.”
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गोपाळ बाबा वलंगकरांच्या या क्रांतीकारक कार्याचा अत्यंत अभिमान वाटत असे. ते अनेकदा आपल्या भाषनात गोपाळ बाबा वलंगकरांच्या कार्याचा गौरव करीत असत. तसेच महाराष्ट्रात अस्पृश्य समाजात जी जागृती अलिकाळच्या काळात झालेली पाहायला मिळते त्याचे श्रेय ते गोपाळ बाबा यांना जाहीरपणे देतात. महाड येथील मुक्तीसंग्रामाच्या परिषदेच्या पहिल्या दिवशी दिनांक 19 मार्च 1927 रोजी अध्यक्षीय भाषनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोपाळ बाबा वलंगकरांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना अभिवादन केले आहेत. या ऐतिहासिक भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “….. अस्पृश्योन्न्तीची चळवळ प्रथम सुरु केल्याच मान जर कोणास द्यावयाचा झाला तर तो या अडचणी दुर करण्याचे काम केले असे नाही. लेखनाद्वारे जागृती करण्याचे कामही त्यांनी पुष्कळच केले. सत्यशोधक समाजाचे अध्वर्यू ज्योतीबा फुले यांचे खरे साथीदार व उत्साही शिष्यांपैकी बरेचसे या संस्थेच्या चालकांपैकी होते. एकाच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय माझ्याने राहवत नाही ते गृहस्थ म्हणजे कै. गोपाळबुवा वलंगकर हे होत. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे जी जागृती केली ती अनुपम आहे. ज्यांना ती पाहावयाची असेल त्यांनी दीनबंधुच्या जुन्या फाईल वाचुन पाहाव्यात म्हणजे कळेल.”
गोपाळ बाबा वलंगकरांनी ज्योतीराव फुलेंच्या सोबत आणि त्यांच्या नंतरही सत्यशोधक समाजाच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्याचे कार्य आजीवन केले. यासाठी त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी जावून प्रबोधन केले. अनार्यदोष परिहारक मंडळीच्या शाखा अनेक जिल्ह्यात स्थापन केल्यात. ते उत्तम कीर्तनकार होते. गोपाळ बाबा आपल्या समाजाला समजेल अशा साध्या सोप्या बोलीभाषेत प्रवर्चन करत असतात. या संदर्भात धनंजय कीर म्हणतात की, “अनार्यदोष परिहारक मंडळी आणि तिच्या सर्व सभासद चालकांनी मिळून गोपाळ बाबांच्या महाराष्ट्र दौ-याचे आयोजन केले. महाराष्ट्रातील अनेक गावात त्यांनी व्याख्याने दिली. महार-मागांना त्यांच्या परिस्थितीशी जाणीव करुन दिली. वलंगकरांच्या दौ-याला लागणारे सहाय्य ज्योतीराव करत असत. त्यांच्या संसारातही ते सहाय्य करत असत.” तत्कालीन समाजसुधारक सर नारायण चंदावरकर यांनी 1894 साली एका व्याख्यानात गोपाळ बाबा वलंगकर यांचे खंडाळा येथे झालेल्या किर्तनाविषयी माहिती देत म्हटले आहे की, संत साहित्यातील अभंगातील अनेक दाखले देत गोपाळ बाबांनी समाजातील अज्ञान, अंधश्रध्दा आणि रुढीपरंपरा प्रहार केलेले आहे.
गोपाळ बाबा वलंगकरांनी अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दीनबंधू सुधारक, इंदुप्रकाश इत्यादी वृत्तपत्रातून सातत्याने लिखाण केले. अभंग, अखंड, स्फूट लेख इत्यादी मधून समाजव्यवस्थेला जाब विचारण्याचे काम केले. ब्रिटिशांनी अस्पृश्य समाजाला सैन्य भरती बंद केली. या अन्यायाविरुध्द वलंगकरांनी 23 पानांचा अर्ज सरकारला पाठवून या विश्वासघाती कृत्याबद्दल धारेवर धरले. पुढे 1895 मध्ये महाड लोकल बोर्डाचे सरकार नियुक्त सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. यामुळे उच्चवर्णीय समाज खवळुन उठला आणि त्यांनी सरकारच्या या कृत्याचा निषेध केला. तसेच, लोकल बोर्डाच्या मिटिंगावर बहिष्कार घातला. तब्बल अडीच वर्षे हा बहिष्कार चालला.गोपाळ बाबा वलंगकरांनी 20 मार्च 1895 मध्ये लोकल बोर्डाच्या पहिल्या सभेत ठेवलेले पहिले पाऊल हे अस्पृश्यतांच्या राजकीय प्रतिनिधत्वाची नांदी ठरले ! अस्पृश्यांच्या आयुष्यात आत्मोन्नतीचा दीप अखंड प्रज्वलित करणारा हा झंझावात अखेर सन 1900 मध्ये रावढळ या क्रांतीभूमित कायमचा विसावला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात गोपाळ बाबा वलंगकरांना फार आदराचे स्थान होते. म्हणून अस्पृयोन्नतीच्या चळवळीचे श्रेय ज्योतीराव फुले यांचे शिष्य असलेल्या गोपाळ बाबा वलंगकरांना देतात. अस्पृश्यांच्या आंदोलनाची सुरुवात करण्यासाठी पंढरपुर ऐवजी महाड निवडण्यामागे जी कारणे त्यांनी सांगितली आहेत त्यापैकी या प्रांतात वलंगकर आणि त्यांच्या अ.दो.प. मंडळी केलेली सामाजिक जागृती हे एक महत्वाचे कारण होते. मुंबई असेब्लीच्या 1937 च्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वतंत्र मजुर पक्षातर्फे कुलाबा मतदार संघातून उभे असलेले सुभेदार विश्राम सवादकर यांच्या निवडणुक प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर 06 फेब्रुवारी 1937 रोजी रावढळ येथे येवून गोपाळ बाबा वलंगकरांच्या समाधीस येवून विनम्र अभिवादन करतात. आणि मग प्रचाराचा शुभारंभ झाला. फुले आणि वलंगकरांच्या सत्यशोधक चळवळीचे आम्ही वारसदार आहोत हे मोठया अभिमानाने ते सांगतात. एका टिकादाराला उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “आम्हीही सत्यशोधकीय आहोत व त्याबद्दल आम्हांस कोणत्याही त-हेचा विशाद न वाढता उलट आनंदच वाटतो. सत्यशोधकीय चळवळ म्हणजे समानतेची व सद्धर्माची चळवळ आहे असे आमचे ठाम मत आहे. आमच्या मित्रास सुचना आहेत की त्यांनी सत्यशोधक वारी आणि आपल्या जातभाईंसाठी सत्यशोधक बनविण्याचा प्रयत्न करावा.”
महात्मा फुले हे आपल्या प्रत्येक पत्राची सुरुवात “सत्यमेव जयते” या शब्दाने करत असत, तर वलंगकरांनी आपल्या लेखनाचा शेवट स्वत:स सत्यश्र्वर, सत्यश्र्वरदास या नावाने करतात. विनंतीपत्राचा शेवट देखील खरे बोलण्याने साक्षी मित्र होतो. सत्यभाषनाने न्यायाची वृध्दी होते. यास्तव सर्व वर्गाच्या साक्षीने सत्य बोलावे. या सुभाषिताने करतात. 26 जानेवारी 1950 पासून भारत देशाने सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरील धम्मचक्रांकित चार सिंह असलेली अशोकाची राजमुद्रा आपल्या देशाची राजमुद्रा म्हणून स्वीकारण्यात आली. जिच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेले आहे. डॉ. आंबेडकरांसारख्या क्रांतिदर्शी शिष्योत्तमाने आपल्या गुरुला केलेले हे चिरंतन अभिवादन किती द्रष्टेपणाचे आहे.
बुध्द, कबीर, फुले या क्रांतीप्रवाहांशी आपले अतूट नाते सिध्द करणारा आणि पुढे या प्रवाहाशी डॉ. आंबेडकर यांना कायम जोडणारा दुवा म्हणजे आद्य अस्पृशोध्दारक गोपाळ बाबा वलंगकर यांच्या विचारांची तितकीच उपयुक्तता आजही आहे. यातच त्यांच्या कर्तृत्वातील क्रांतित्व दिसून येते.
आपला इतिहास आपणस जतन केला पाहिजे. आपल्या महापुरुषाच्या चळवळीचे दस्ताऐवजीकरण करण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे. गोपाळ बाबा वलंगकर यांचे क्रांतीकार्य आणि विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. रावढळच्या आद्यक्रांती भूमीत असलेली त्यांची समाधी आपल्या वैचारिक वारासदारांच्या प्रतीक्षेत आहे. अस्पृश्य समाजावर झालेल्या अन्यायाची दाद मागायला गोपाळ बाबा वलंगकर बेडरपणे पुढे आले. त्यांच्या या क्रांतीकार्याला आपण दुर्लश करुन त्यांच्यावर अक्षम्य अन्याय करत आहोत. 19 व 20 मार्च चवदार तळे क्रांतीवीर महाडला दर वर्षी येणा-या आंबेडकरी अनुयायांची पाऊले महाडपासून अवघ्या 10 किमी अंतरावर असलेल्या रावढळच्या आद्यक्रांतीभूमीकडे गोपाळ बाबा वलंगकरांना अभिवादन करण्यासाठी ज्या दिवशी वळतील तो दिवस आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातील प्रेरणादायी दिवस ठरेल !
- डॉ.प्रेम हनवते
- प्रकल्प व्यवस्थापक (संशोधन विभाग),
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे
- मोबाईल नं. : 8888857402
- ई-मेल : hanwateprem@gmail.com
(सदर लेखक हे सबार्ल्टन या लेखन प्रवाहातील नव्या पिढीचे संशोधक असून गोपाळबाबा वलंगकरांच्या चरित्र ग्रंथाचे लेखक आहेत तसेच शिवकाळ, पेशवेकाळ आणि ब्रिटिश कालखंडातील अस्पृश्य सैनिकांच्या लष्करी पराक्रमाचे ते अभ्यासक आहेत. अभ्यासू वक्ते असलेले डॉ.प्रेम हनवते हे सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीतील समर्पित कार्यकर्ते महाराष्ट्रात ओळखले जातात.)
0 टिप्पण्या