विरोधक म्हणजे शत्रूच आणि त्यांना फक्त हरवणार नाही तर संपवूनच टाकणार अशी खालच्या दर्जाची राजकीय संस्कृती सध्या राजकारणात रुजली आहे. आज घटनात्मक संस्था आणि इथली उदार राजकारणाची परंपरा संपवण्यात येत आहे. प्रस्थापित पक्षांची निवडणूक जिंकण्याची मुख्य मदार विरोधी मतांची फाटाफूट करण्यावर असते. मुस्लिम, बौद्ध इत्यादी ज्या लोकसमूहांची मते आपल्याला मिळत नाहीत ती कोणत्याही परिस्थितीत आपल्या विरोधकांना मिळू नयेत यासाठी काहीही करायला, कितीही खर्च करायला, कोणतीही तडजोड करायला प्रस्थापित वर्ग तयार असतो. विरोधकांतील एखाद्या पक्षाशी मित्रत्वाचे संबंध जोडणारे छोटे पक्ष या बाबतीत अशा पक्षांचे संकटमोचक ठरतात. असे पक्ष विरोधी छावणीमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी आणि मतविभाजन घडवुन आणण्यासाठी उपयुक्त ठरतात. यासाठी अशा पक्षांना आपले प्यादे म्हणुन प्रस्थापित वर्ग विरोधी आघाडीत घुसवत असतो. याशिवाय लहान-सहान जातीगटाचे नेतृत्व करणारे कार्यकर्ते, प्रचंड महत्वाकांक्षी वाचावीर, फुटकळ नेते हे या प्रस्थापित वर्गाला निवडणूक जिंकण्यासाठी हवा असलेला कच्चा माल म्हणून उपयोगात येतात.
जेथे मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने आहेत त्या मतदार संघात अपक्ष म्हणुन उभे राहणारे मुस्लिम उमेदवार, जेथे बौद्ध मतदार मोठ्या संख्येने आहेत त्या मतदार संघात अपक्ष म्हणुन उभे राहणारे बौद्ध उमेदवार हे यांचे प्रायोजित असतात. त्यांना होणारा वित्तपुरवठा या वर्गाकडून होतो असे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी मतदान ओळखपत्र व आधार कार्ड घेऊन या, प्रति माणशी 2-5 हजार घ्या, दुसर्या दिवशी मतदान न केल्याची खूण म्हणुन बोटाला शाई लागलेली नाही हे दाखवा व मतदान ओळखपत्र व आधार कार्ड घेऊन जा, हा मार्ग अमलात आणला जातो. अशा प्रकारे बाजारात अगदी माफक किमतीत उपलब्ध असलेला हा मते कुजविणारा कच्चा माल योग्य प्रकारे नष्ट किंवा निष्प्रभावी केल्याशिवाय या प्रस्थापितांविरोधात निवडणूक जिंकणे सोपे होणार नाही विधिनिषेधशून्य राजकारणाचा सुरु झालेला हा भयंकर अध्याय येणाऱ्या काळासाठी प्रचंड घातक ठरणार आहे.. सत्तेसाठी वाट्टेल ते करा, पण सत्ता सोडू नका ही संस्कृती आता इथल्या तथाकथित सरंजामदारांमध्ये प्रचंड रुजली आहे. भ्रष्टाचाराचा विरोध करत सत्तेत आलेल्यांनी आता भ्रष्टाचाराचं प्रारूपच बदलून टाकलं. इतर पक्ष टेंडरांमध्ये टक्केवारी खात, हा आता अदानीच्या मदतीनं अख्खं टेंडरच गिळंकृत होत आहे. आणिबाणीत इंदिरा गांधींनी काही घटनात्मक संस्था बिघडवल्या हे खरं आहे. पण आता चांगली म्हणावी, निर्विवाद म्हणावी अशी एकही घटनात्मक संस्था विद्यमान सत्ताधाऱ्यांनी शिल्लकच ठेवलेली नाही. खोटा प्रचार, खोटे भडकाऊ व्हीडीओ काढून समाजात तेढ निर्माण करणं हा आता गुन्हा राहिलेला नाही, आता त्याला 'चाणक्यनीती' म्हणतात. पैशाच्या जोरावर ही चाणक्यनीती खुलेआम सर्वसामान्यांचा गळा घोटत आहे. मग हा पैसा येतो कुठून हा ही एक मोठ्ठा प्रश्न निर्माण होतो.
या राजकीय पक्षांना मिळणाऱा निधी कुणी दिला याबाबत सर्व माहिती जनतेला देणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयात सरकारतर्फे सांगण्यात आले होते. मात्र अद्यापही त्याची काटेकोर अंमलबजावणी होतांना दिसत नाही. कारण प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना हे नकोच आहे. कायदे केवळ कागदावरच हवेत. प्रतिभा प्रतिष्ठानला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित सीमेंट घोटाळ्यामुळे अंतुलेंचे मुख्यमंत्रीपद गेले होते हा इतिहास आहे. मात्र आता तेवढी नैतिकता शिल्लक राहिलेली नाही. आज ज्यांच्याकडे शेकडो कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडली ते मंत्री बनले आहेत. आणि समाजात आरोग्य व शिक्षणाबाबत उत्तम कार्य करणारे सत्येन जैन, मनीष सिसोदिया आणि अदानीचे नाव घेणाऱ्या संजय सिंह सारख्यांना एक रूपयाचा भ्रष्टाचार दाखवता येत नसताना देखील दीर्घकाळ तुरूंगात टाकले गेले आहे. ही अघोषित आणिबाणी सध्या देशात सुरू आहे. त्यागाने, सत्याग्रहाने झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात 'सत्यमेव जयते' हे बोधवाक्य जनमानसात रूजले. मात्र सध्यस्थितीत सातत्याने त्याविरुद्ध असणारे विचार व वर्तन सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. हे केवळ आर्थिक गैरप्रकार, अपहार व भ्रष्टाचार म्हणून घडत नाही. हे अधःपतन सर्वसमावेशक आहे. सध्याच्या बिकट परिस्थितीला आणि दुर्घटनांना, केवळ सत्य लपवणे किंवा जाणिवपूर्वक सत्य बाबींकडे दुर्लक्ष करणे कारणीभूत आहे. लोकशाहीच्या माध्यमातूनच प्रस्थापित वर्गाने हुकूमशाही आणली आहे. आणि भविष्यात ती अधिक दृढ करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. तु मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असा खेळ इथले सर्वच प्रस्थापित पक्ष करीत आहेत. बहुजन वर्ग केवळ या तीन पैशाच्या तमाशाची मजा घेत आहे. मात्र ही मजा एकदा सजा होईल याची त्याला माहिती नसावी. या गोष्टींना वेळीच आवर नाही घातला तर भविष्यात पुन्हा गुलामगिरी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आता सर्वसामान्य जनतेने प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना लोकशाहीच्याच मार्गाने उलथवून टाकायला हवे... नव्हे ती काळाची गरज आहे.
0 टिप्पण्या