सरकार हो ! जरा डोळे उघडा ?

राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या क्रूर हत्येचा समाजाच्या सर्व थरातून तीव्र शब्दात निषेध नोंदवला जात आहे,या घटनेची प्रेस कौंसिल ऑफ इंडियाने तातडीने दखल घेतली असून सरकारला या घटनेचे अहवाल सादर करायला आदेश दिले आहेत,खरं म्हणजे राजापुरातील पत्रकार अपघाताचे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले असून पत्रकारिता दाबण्याचा हा प्रकार आता खुलेआम निदर्शनास येत आहे.अनेक पत्रकार संघटनांनी या कृत्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून सरकारला धारेवर धरले हे योग्यच आहे,पत्रकारिता करतांना किती अडचणी व किती संकटाना झेलावे लागते हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही, 

राजापुरातील जनतेने सुद्धा या घटनेचा जाहीर पर्दापाश् केला असून,राजपुरातच काय पण कोकणात असले गुंड प्रवृत्तीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत अशी सरकारला तंबी दिली आहे,कोकणच्या विकासाच्या नावाखाली रिफायनरी सारखे प्रकल्प लादले जातात,मात्र,यातून जनतेच्या भल्याचे करायचे सोडून गुंड प्रवृत्तीचे दलाल पोसले जात असतील तर कोकणच्या दृष्टीने ते फारच चिंताजनक आहे ? प्रकल्पात आपले वर्चस्व प्रस्थापित होण्यासाठी  म्यानेज पद्धतीने कोणी सूड घेणार असेल तर योग्य नाही, भूमाफिया म्हणून अशा प्रकारच्या लोकांना थारा मिळत असेल तर असले प्रकल्प लोक कधीच स्वीकारण्याची शक्यता नाही ? हाच लोकांच्या मनातील ज्वलंत प्रश्न जर पत्रकारांनी उपस्थित केला तर आपल्या काळ्या साम्राज्याला सुरुंग लागेल याच भितीपोटी हत्येचा कट रचायचा हे जनक्षोभातून चव्हाट्यावर आले आहे.

राजापुरातील प्रकरणातून पत्रकारांच्या सुरक्षेचा व लोकशाहीतील पत्रकारितेचा मुद्धा पुन्हा एकदा समोर आला आहे,पंढरीनाथ नावाच्या माणसाच्या माध्यमातून हे लोकशाहीला काळिमा फासणारे कृत्य केले गेले याची चौकशी होणारच आहे, परंतु,एवढे मोठे षडयंत्र उघडकीस आले तरी सरकार गप्प आहे ! एखाद्या गावात कार्यकर्ता पादला तर लगेच सरकारला कळते,इथे कोकणात वणवा पेटलाय तरी सरकारला त्याची धग नाही ? पत्रकारिता करायची कशी, पत्रकारांनी जगायचे कसे,सरकार गप्प आहे ? चौकश्या करा,वाटल्यास पाच दहा लाख रुपयांची घोषणा करा यापेक्षा नवीन काहीच नाही ! कोरोना गेला, पत्रकार देशोधडीला लागले,संरक्षण नाही की त्यांच्या उज्वल भविष्याची कोणतीच ग्यारंटी उरली नाही,खरी वस्तुस्थिती मांडावी तर पोसलेल्या गुंडाची भीती,पत्रकारांच्या ज्वलंत प्रश्नाकडे सरकार बघणार तरी कधी ?

नारायण पांचाळ
जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र----------------------------------------------------------------
 अन्यायाविरुद्ध धडाडणारी तोफ म्हणून ओळखले जाणारे दै. 'महानगरी टाईम्स' चे झुंजार पत्रकार शशिकांत वारीशे यांची भ्याड हत्या करण्यात आली. आता या सगळ्या प्रकरणी संशयित असलेला पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरीनाथ आंबेरकर याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राज्यातील पत्रकार संघटनांकडून करण्यात आली होती. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी याप्रकरणी कुणाचा गुन्हा दाखल न झाल्यास राज्यातील पत्रकार रस्त्यावरील उतरतील असा इशारा दिला होता.या सगळ्याची दखल घेत राजापूर पोलिसांकडून  बुधवारी सकाळी हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे हे मूळचे राजापूर तालुक्यातील कशेळी येथील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, बहीण असा मोठा परिवार आहे.

 रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांची बारसु सोलगाव रिफायनरीच्या एका समर्थकाने आपल्या चारचाकीखाली चिरडून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटी तीव्र निषेध करत आहे. गेले काही महिने राजापूर तालुक्यातील बारसु सोलगांव परिसरातील जनता तेथे बळजबरीने उभारण्यात येत असलेल्या रिफायनरीच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढत आहेत. हा प्रकल्प पर्यावरणाचा जबर विनाश करणारा असून तेथील स्थानिक रहिवाश्यांची उपजीविका उध्वस्त होणार आहे. आपल्या जीवनाचे प्राणपणाने रक्षण करण्यासाठी त्यांना लढावे लागत आहे.

बुधवार दि. ८ फेब्रुवारी रोजी या परिसरात तेथील पत्रकार  शशिकांत वारिशे यांची ते जनतेच्या बाजूने बातम्या देतात म्हणून करण्यात आलेली पाशवी हत्या अतिशय धक्कादायक, दुःखद आणि कमालीची संतापजनक आहे. रिफायनरी प्रकल्पाचे एक कंत्राटदार आणि समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी ही हत्या केल्याचा आरोप आहे. या व्यक्तीचे भारतीय जनता पक्षासोबत घनिष्ट संबंध असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांच्या तपासावर राजकीय दडपण येण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनी कसल्याही दडपणाला भीक न घालता आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडत या गुन्ह्याची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत.

राज्याच्या शिंदे फडणवीस सरकारला राजकीय नीतीमत्तेची जराही चाड असेल तर त्याने तेथील जनक्षोभ ध्यानात घेऊन रिफायनरीच्या कामास त्वरित स्थगिती द्यावी. जनतेला उध्वस्त करणारे प्रकल्प तिच्या माथी मारून हत्येसारख्या पापाचे धनी होऊ नये. हत्या झालेल्या पत्रकाराच्या कुटुंबास महाराष्ट्र सरकारने पन्नास लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात येत असल्याची माहीती पक्षाचे राज्य सचिव  डॉ. उदय नारकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

------------------------------------------

भूमिका घेणारा पत्रकार कोणत्याच नेत्याला अथवा राजकीय पक्षाला आवडत नाही.. शशिकांत वारिशे यांनी तर राजकीय पक्षांचे हितसंबंध ज्या रिफायनरीत गुंतलेले आहेत त्याला विरोध करणारी भूमिका घेतली होती.. ही भूमिका भुमीपूत्रांच्या हिताची असली तरी ती दलाल आणि धनदांडगयांना पचणारी नव्हती.. एक पत्रकार समाजहिताची भूमिका घेऊन सातत्यानं त्याविरोधात आवाज उठवतो आहे, त्याच्यामुळे आपले हितसंबंध धोक्यात येत आहेत हे पाहून पित्त खवळलेले दलाल आणि हितसंबंधी यांनी शशिकांत वारिशे यांचा आवाज कायमसाठी बंद करण्याचं षडयंत्र रचलं आणि ते प्रत्यक्षात आणलं देखील..

पत्रकारांकडून समाजाच्या भरपूर अपेक्षा असतात.. त्या रास्त ही असतात.. परंतू समाजाच्या या अपेक्षा पूर्ण करताना पत्रकारांचे जेव्हा बळी जातात किंवा पत्रकारांवर हल्ले होतात तेव्हा समाजाची भूमिका काय असते?  अनेकदा असं दिसून आलंय की, समाज शांत असतो..मला काय त्याचे हीच समाजाची भूमिका असते.. रिफायनरी विरोधात सातत्यानं लिहिणारया शशिकांतची हत्या झाल्यानंतर समाजातून किंवा समाजहिताचं काम करणार्‍या संस्था, संघटनांकडून निषेधाचा सूर अजून तरी व्यक्त झालेला नाही.. आम्ही पत्रकार घटनेचा निषेध करणारच पण हा केवळ एका घटका पुरता मर्यादित विषय आहे का? तर नाही.. समाजस्वास्थय आणि माध्यम स्वातंत्र्या बरोबरच लोकशाही टिकली पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतं अशा सर्वांसाठी शशिकांतची हत्त्या हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय असला पाहिजे...."भूमिका घेणारी व्यक्ती एकटी नाही" हा संदेश जोपर्यंत राज्यकर्त्यांपर्यत पोहोचणार नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहणार असल्याने लोकहितासाठी काम करणारया व्यक्ती, संघटनांनी शशिकांतच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पुढं आलं पाहिजे..  असं आमचं आवाहन आहे. तशी विनंती देखील आहे.. असं झालं नाही तर  कोणताही पत्रकार कोणत्याच विषयावर भूमिका घेणार नाही.. मग पत्रकार भूमिका घेत नाहीत हा टाहो देखील आम्ही ऐकून घेणार नाही..

एस.एम देशमुख

---------------------------------------------

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यातील पत्रकार काळ्या फिती लावून तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करतील.. नंतर अधिकारयांना निवेदनं देऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त करतील. मुंबईतील सर्व पत्रकार संघटना शुक्रवारी दुपारी १२ वाजता गांधी पुतळ्यासमोर काळया फिती लावून आंदोलन करतील आणि नंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन देतील. यानिमित्तानं पुन्हा एकदा राज्यातील पत्रकार संघटना एकत्र येत आपलयामधील एकजुटीचं दर्शन घडवत आहेत.
आज झालेल्या तातडीच्या ऑनलाईन बैठकीत राज्यातील पत्रकारांवर होणा-या हल्ल्याच्या संदर्भात सांगोपांग चर्चा होऊन सर्व पत्रकार, संघटनांना बरोबर घेऊन आंदोलन करावे असा निर्णय घेतला गेला. त्यानुसार राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांशी चर्चा करून उद्याच्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी या आंदोलनात राज्यातील सर्व पत्रकार तसेच संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणारऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे.. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण होत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी दिनांक १० फेब्रुवारी रोजी राज्यभर पत्रकार काळ्या फिती लावून काम करतील आणि तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करतील. हा विषय सर्व पत्रकार आणि संघटनांसाठी जिव्हाळ्याचा असल्याने स्थानिक पातळीवरील सर्व मतभेद बाजुला ठेऊन सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाने केले आहे
----------------------------------------------------------------

रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे  यांच्या मृत्यू प्रकरणात कार चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पत्रकार शशिकांत वारीसे त्यांच्या गाडीला सोमवारी (6 फेब्रुवारी) पंढरीनाथ आंबेरकर याच्या कारने जोराची धडक दिली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा कोल्हापूरला मृत्यू झाला होता. दरम्यान पत्रकार वारिसे यांनी पंढरीनाथ आंबेरकर यांच्याबाबत प्रसिद्ध केलेली बातमी आणि त्यांचा झालेला अपघात ही वेळ पाहता हा नक्की अपघात की घातपात? याची चर्चा सध्या कोकणात सुरु झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील कुंभवडे या गावचा रहिवासी.पंढरीनाथ आंबेरकर सुरुवातीच्या काळात छोटासा आंबा व्यापारी . 2017 सालानंतर मात्र आर्थिकदृष्टीने सक्षम झाला. कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्पाची घोषणा झाली आणि त्यानंतर त्याने काही जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु केले. स्वतः देखील काही जमिनी खरेदी केल्या. यामध्ये त्याला आर्थिक नफा चांगलाच झाला. दरम्यानच्या काळात टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपला व्यवसाय सुरु केला आणि वाढवला. नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाला आताची घोषणा बारसू आणि सोलगाव येथे झाली. या ठिकाणी देखील आंबेरकर याने जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु केले. तसेच स्वतःसाठी देखील काही जमिनी खरेदी केल्या. याबाबतच्या अनेक गोष्टी आपणाला राजापूर परिसरामध्ये ऐकायला मिळतात.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात  एका सभेमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आंबेरकर आणि काही जणांनी 12 नोव्हेंबर 2022 रोजी राजापूर कोर्टाच्या आवारामध्ये नरेंद्र जोशी या रिफायनरी विरोधकांच्या नेत्यावर हल्ला केला. याप्रकरणी त्याच्या विरोधात राजापूर पोलीस स्टेशन येथे कलम 143, 146, 147, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तर राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस स्टेशन येथे अश्विनी अशोक वालम शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी 14 जानेवारी 2018 रोजी कलम 143, 147, 149, 323, 504 आणि कलम 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनी वालम या कोकण रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या पत्नी आहेत. त्यांच्यासह काही महिला एकत्र आल्या होत्या. त्यावेळीही शिवीगाळ करण्यात आले आणि अशोक वालाम यांना मारण्याची धमकी देण्यात आली, असा उल्लेख या FIR मध्ये करण्यात आला

-----------------------------------------------------

 पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची निघृण हत्त्या करणार्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहात  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. रिफायनरीला विरोधाची भूमिका घेणारे   शशिकांत वारिशे यांनी एक बातमी दिल्यामुळे त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची हत्या करण्यात आली.. या बातमीचा राज्यभर निषेध होत असतानाच किरण नाईक यांनी तातडीने भेट घेऊन या प्रकरणी सरकारने लक्ष घालून आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.. त्यावर या प्रकरणी  लक्ष घालून चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे..

-------------------------------------------------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1