त्रिपिटकातील दिघ निकायमध्ये सोळावा अध्याय हा परिनिर्वाणाचा आहे. यामध्ये म्हटले आहे की बुद्धांचे महापरिनिर्वाण झाल्यावर अग्निदहना नंतर अस्थि गोळा करून त्यांचे आठ भाग करण्यात आले. नंतर त्यावर स्तूप उभारण्यात आले. दोनशे वर्षानंतर सम्राट अशोक यांच्या राजवटीत सात स्तूपातून अस्थिकलश पुन्हा काढून बुद्धधातूच्या कुप्या घडवून भारतभर स्तूप उभारण्यासाठी सर्व दिशांना धाडण्यात आल्या. काळाच्या ओघात धम्म लयास गेल्यावर गेल्या हजारो वर्षात मौल्यवान वस्तूंसाठी अनेक स्तूप फोडण्यात आले. ब्रिटिशांच्या काळात देखील अनेक स्तूप उघडण्यात येवून त्यातील अस्थि काढून बौद्ध राष्ट्रांना बहाल करण्यात आल्या. त्यापैकी काही बुद्धधातू थायी देशाचे भिक्खू महाराष्ट्रात प्रथमच घेऊन आले आहेत. सन २०२३ मधील ही मोठी अलौकिक घटना आहे.
सिरीलंकेत देखील बुद्धांचे दंतअस्थी जेव्हां प्रथमच आले तेव्हां तेथील राजाला आनंदअश्रूंना आवर घालणे कठीण झाले. सर्व परिषदेला बरोबर घेऊन दंतधातूच्या स्वागतासाठी तो पळत सुटला. हेममाला आणि तिचा पती दंतकुमार यांच्याकडील बुद्ध दंतअस्थि पाहून त्याला गहिवरून आले. मग त्याने दंतधातूंना त्रिवार वंदन केले आणि हर्षभराने तेथूनच वाजतगाजत मिरवणूकीने त्या दंतअस्थी अनुराधापुर राज्यात आणल्या. तेव्हापासून श्रीलंकेत या बुद्ध दंतधातूची दरवर्षी जुलै ऑगस्टमध्ये वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते. रस्ते झाडून, जल शिंपडून स्वच्छ केले जातात. मशाली तयार करतात. अस्थी करंडक वाहून नेण्यासाठी सुळेधारक गजराजांना सुशोभित केले जाते. यावेळी पारंपरिक वेशभूषा करून नृत्य सादर केले जाते. तीस बहाद्दर पुरुष विजेच्या लोळाप्रमाणे चाबूकांचा कडकडाट करतात आणि मग वाद्यांच्या खणखणाटात मिरवणूक सुरू होते. हे बुद्ध दंतधातू श्रीलंकेत आल्यापासून तेथे कधीही दुष्काळ पडलेला नाही असे समजले जाते. तेराव्या शतकात महास्थविर धम्मकिर्ती यांनी 'दाठावंस' या ग्रंथाची रचना केली. यामुळे बुद्ध दंतधातूचा इतिहास जगापुढे आला.
भारतात देखील बुद्धअस्थिंचे करंडक अनेक संग्रहालयामध्ये बंदिस्त आहेत. गेल्या कित्येक वर्षात ना त्यांचे सामान्य जनतेला दर्शन झाले ना त्यांचे पूजन झाले. निदान वैशाख पोर्णिमेच्या दिवशी तरी या बुद्धधातूंचे दर्शन खुले करावयास हवे. भारताचा हा दैदिप्यमान इतिहास सर्व भारतीयांना माहीत झाला पाहिजे. तरच भारतातील सर्व समुदायात बुद्ध आणि त्यांच्या शिकवणुकी सबंधी श्रद्धा वाढीला लागेल. अनेकजण धम्माकडे आकर्षित होतील. म्हणूनच थायी देशातून आलेल्या भगवान बुद्धांच्या या पवित्र बुद्ध धातूंना मी त्रिवार वंदन करतो. त्यांच्या तरंगाने सर्व परिसर पुलकित होवो, दुःख दूर करणाऱ्या मार्गाचे आकलन सर्वांना होवो, नवीन उत्साह, चेतना सर्वाप्रति जागो आणि सर्वांचे कल्याण होवो असे मी चिंतीतो.
---संजय सावंत ( नवी मुंबई)
buddhistcaves@gmail.com
0 टिप्पण्या