Top Post Ad

बाबासाहेबांना या शांतीपूर्ण महान क्रांतीसाठी नोबेल पुरस्कार द्यावाच लागेल


 बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्षे बौध्द धम्माचा सखोल अभ्यास केल्यानंतर 1956च्या विजयादशमी दिनी नागपूरच्या नागभूमीत आपल्या लाखो पीडित-शोषित समाजासोबत बौध्द धम्माचा स्वीकार केला. त्याबाबत विपस्सनाचार्य गोएंका गुरुजी म्हणतात....  

बाबासाहेब खरोखरच बोधीसत्व होते. त्यांनी केवळ बौध्द धम्माचा गंभीरपणे अभ्यास करून त्याची निवड केली नाही, तर बाबासाहेबांनी भारतातील आणि भारताबाहेरील अनेक धर्मांचा व्यापक आणि गांभीर्याने अभ्यास केला. त्यांच्यासारख्या प्रज्ञावंत, बुध्दीमान आणि अभ्यासू व्यक्तीने तसे करणे स्वाभाविकच होते. जगातील अनेक धर्मांचा सखोल अभ्यास करूनच बाबासाहेबांनी आपल्या चिकित्सक तुलनात्मक दृष्टीने पाहिले की, बुध्दांचा धम्मच सर्वांसाठी सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच बाबांनी तथागतांच्या धम्माचा स्वीकार केला.  

विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह केलेले धर्मांतर ही संपूर्ण जगासाठी ऐतिहासिक घटना आहे . ही घटना म्हणजे जगातील एक मोठी क्रांतीच होती.  फ्रान्स, रशिया, चीन किंवा इतर कोणत्याही क्रांतीपेक्षा बाबासाहेबांनी केलेली ही क्रांती अधिक फलदायी होती. वरील सर्व क्रांत्यांमध्ये रक्तपात झाला. परंतु भारतातील या ऐतिहासिक क्रांतीमध्ये रक्ताचा एक थेंबही सांडला नाही. समाजाच्या या निर्जीव, दुबळ्या अंगाला बाबासाहेबांनी रक्तपाताशिवाय समर्थ आणि जिवंत बनविले. या महान शांतीपूर्ण क्रांतीसाठी बाबासाहेबांना भारत सरकारने `भारतरत्न' या पुरस्काराने विभूषित केले. परंतु मला वाटते की, एक ना एक दिवस विश्वाला होश येईल आणि बाबासाहेबांना या शांतीपूर्ण महान क्रांतीसाठी नोबेल पुरस्कार द्यावाच लागेल. हे होणार! लोक समझेंगे! समय आयेगा!! 

बुध्दांची शिकवण लोकांमध्ये पोचविण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले. पंरतु त्यांना पुरेसा वेळ मिळू शकला नाही. हे कार्य पुढे नेण्याचे  काम आपण सर्वांनी मिळून केले पाहिजे. जे लोक बुध्दानुयायी नाहीत त्यांच्यापर्यंत तथागतांचा धम्म पोचविण्याचे काम मी करीत आहे.  त्यांनी लाखो दलित, शोषित लोकांसोबत बौध्द धम्माचा स्वीकार केला,  ही एक अत्यंत गौरवशाली घटना आहे. ती केवळ भारतासाठी नव्हे तर सर्व जगासाठी एक आदर्श म्हणून सिध्द झाली आहे. भारतीय जनतेच्या या विशाल लोकसमूहाला शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या हीन भावनेतून बाहेर काढले आणि त्यांच्या स्वाभीमानाचा स्फुलिंग जागविला, त्याच बरोबर भारतीय समाजावर जो उच्चनिचतेचा, जातीवादाचा आणि स्पृश्य-अस्पृश्यतेच्या भेदभावाचा  जो कलंक होता तो धुवून काढला. म्हणूनच ही घटना भारतासाठी महत्वपूर्ण आहे.  प्रियदर्शी सम्राट अशोकानंतर भारतातून लुप्त झालेला बौद्धधम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा जागवला हे भारतासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण आणि गौरवशाली कार्य झाले. हे कार्य पूज्य बाबासाहेबांसारखे महामानवच करू शकत होते.  

शेजारच्या बुध्दानुयायी देशात एक मान्यता चालत आली आहे की, भगवान बुध्दांना पंचवीसशे वर्षे पूर्ण झाल्यानंतर बुध्दाची शिकवण जी भारतातून शेकडो वर्षापूर्वी लुप्त झाली होती ती आता ब्रह्मदेशात सुरक्षित ठेवली गेल्यामुळे तेथून भारतात परत येईल आणि पुन्हा भारतातून सर्व जगात पसरेल. भगवान बुध्दांच्या पहिल्या पंचविसशे वर्षांचा कालखंड 1954 मध्ये पूर्ण झाला.  दुसऱ्या पंचविसशे वर्षांचा कालखंड 1955 मध्ये सुरू झाला. ही एक सुखद योगायोगाची गोष्ट आहे की, त्यावेळी जेव्हा रंगूनमध्ये सहावी संगिती होत होती तेव्हा बाबासाहेब रंगूनला पोहचले. सहाव्या संगितीच्या काही महत्वपूर्ण बैठकांमध्ये त्यांनी भाग घेतला. तेथील बुध्दानुयायी नेत्यांसोबत चर्चा केली. माझे परम मित्र डॉ. सोनी यांच्या मांडले येथील निवासस्थानी काही दिवस राहून या महत्वपूर्ण विषयावर त्यांनी गांभीरपणे चर्चा केली आणि तेथून एक दृढ निश्चय करून ते भारतात आले. बुध्दाच्या शिकवणुकीच्या दुसऱ्या पंचवीसशे वर्षाचा प्रारंभ होता होता 1956 मध्ये त्यांनी भारतात बुध्दाच्या शिकवणुकीचा झेंडा फडकावला आणि नवजागृतीची सिंहगर्जना केली. या दृष्टीनेही बाबासाहेब एक ऐतिहासिक युगपुरूष सिध्द झाले आणि ब्रह्मदेशातून बुध्दाची शिकवण भारतात आणून एक अत्यंत महत्वपूर्ण ऐतिहासिक काम पूर्ण केले.  

मी हिंदू धर्मात मरणार नाही, ही बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिज्ञा केली होती. ती त्यांनी पूर्ण केली, पण मी संपूर्ण भारत बौध्दमय करीन ही त्यांनी केलेली प्रतिज्ञा आजही अपूर्ण आहे, ती  प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरिता त्यांच्याजवळ वेळच कुठे होता? दीक्षाभूमीवर  धम्माची दीक्षा घेतल्यानंतर फारच कमी काळ ते आपल्यात राहिले.`बुध्द आणि त्यांचा धम्म' या पवित्र ग्रंथात बाबासाहेबांनी विपश्यनेचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे -``कायानुपस्सना, वेदनानुपस्सना, चित्तानुपस्सना आणि धम्मानुपस्सना.''(पृष्ठ क्रमांक- 184-ग)  

तथागत बुध्दांची खरी शिकवण सर्व देशात आणि जगात जर पसरली व ती पसरणारच, तर ती केवळ आर्य अष्टांगिक मार्गावर चालण्याची विधी शिकविणाऱ्या विपश्यना साधनेच्या सामर्थ्यावरच पसरेल. असे पूर्वीसुध्दा झाले आणि आजही होत आहे.  सम्राट अशोक आपल्या शीलालेखात  म्हणतात की, माझ्या आधीही अनेक राजे होऊन गेले. प्रजेमध्ये धम्माचा प्रसार व्हावा, लोकांनी मातापित्यांची सेवा करावी, थोरांचा आदर, सन्मान करावा, छोट्यांवर प्रेम करावे, परस्परांमध्ये कोणत्याही तऱहेचा भेदभाव करू नये, एकमेकांचा द्वेष किंवा एकमेकांशी द्रोह करू नये, प्रेम आणि मैत्रीभावनेचे जीवन जगावे अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांच्यापैकी कोणाचाही उद्देश सफल झाला नाही. मी यशस्वी झालो त्याचे कारण एकच की, भगवान बुध्दांची वाणी लोकांपर्यंत पोचविली आणि त्यांच्याकडून विपश्यना करवून घेतली. माझ्या राज्यातील धर्माचा प्रसार, प्रचार करणारांकडून बुध्दांचा संदेश पसरविण्यातून जेवढा लाभ झाला नाही त्याच्यापेक्षा जास्त लाभ विपश्यना करवून घेतल्यामुळे झाला.''  

हे एक ऐतिहासिक सत्य 2300 वर्षापासून आमच्या देशातील शीलालेखांवर अंकित आहे. या विद्येने भारताबाहेर अनेक देशांमध्ये जाऊन बुध्दांच्या सत्य धम्माच्या प्रकाशाने लोकांचे कल्याण केले. आज त्याचप्रकारे विपश्यनेच्या सामर्थ्यावर लाखोंच्या संख्येत लोक बुध्दाच्या शिकवणीकडे वळत आहेत. केवळ भारतातच नाही तर सर्व जगात ही विद्या केवळ एखाद्या वर्गात किंवा एखाद्या साम्प्रदायात स्वीकारली जात आहे, असे नव्हे तर जगात जे जे धार्मिक साम्प्रदाय आहेत त्यांच्या अनुयायांमध्ये विपश्यना पसरत आहे. कोणत्याही सम्प्रदायाची व्यक्ती असो, कोणालाही मानणारी व्यक्ती असो, विपश्यना शिबिरात ती येताच भगवंताची शिकवण ग्रहण करण्यास  तिला काहीच अडचण येत नाही. केवळ बौध्दच नव्हे तर हिंदू, जैन, शीख, ख्रिश्चन, पारशी, मुस्लीम, यहुदी इत्यादी जगातील सर्व सम्प्रदायाचे लोक फार मोठ्या संख्येने शिबिरात भाग घेत आहेत. जगातील सर्व प्रमुख देशात विपश्यना शिबिराचे आयोजन केले जाते.  

आतापर्यंत जगामध्ये दूरदूरपर्यंत सर्व महाद्विपात आणि अनेक देशांमध्ये विपश्यनेची 110 पेक्षाही अधिक स्थायी केंद्रे निर्माण झाली आहेत. ज्या देशांत केंद्रे नाहीत अशा अनेक देशात अस्थायी स्वरूपात दहा दिवसांचे आयोजन केले जात आहे. लोकांची गर्दी वाढत आहे. लाभ मिळतो आहे. या विपश्यनेतून वेगवेगळ्या जाती धर्माचे केवळ साधकच नव्हे तर विपश्यना आचार्यसुध्दा निर्माण झाले आहेत. ते प्रचार करीत आहेत की, बुध्दांचा धम्म सर्वांसाठी आहे. कोणत्याही एका जाती किंवा वर्गासाठी नाही. सर्वजण त्याचा स्वीकार करीत आहेत. ही धम्माची सफलता आहे. भारतातील अधिकाधिक लोकांनी जर विपश्यनेचा स्वीकार केला तर जातीभेद, उच्च-नीच व स्पृश्य-अस्पृश्य भेद आपोआपच नष्ट होतील आणि डॉ. बाबासाहेब आंबेकर यांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण होईल.  

बाबासाहेबांचे आणखी एक ध्येय होते ते असे की, जे बुध्दानुयायी आहेत त्यांनी बुध्दाच्या शिकवणुकीचे, शीलाचे, समाधीचे, प्रज्ञेचे पालन केले पाहिजे, हाच आर्य अष्टांगीक मार्ग आहे. या मार्गाचे पालन केले पाहिजे. तरच लोकांसमोर बुध्दानुयायांचा एक आदर्श निर्माण होईल. जर असे केले नाही तर लोक बुध्दाच्या शिकवणुकीपासून दूर पळतील.  विपश्यना शिबिरात बुध्दानुयायी नसलेले लोक येतात. तसेच बुध्दानुयायी देखील येतात. ते बाबासाहेबांची प्रतिज्ञा पूर्ण करण्याचे काम करीत असतात. केवळ ते नावापुरते बौध्द नाहीत तर ते आपल्या जीवनात बुध्दाची शिकवण उतरविण्याची प्रतिज्ञा करतात. आणि त्या दिशेने प्रयत्नही करतात हे पाहून इतर लोकही आकर्षित होतात.  


ऑगस्ट २००७ ... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com