शिवसेना नाव व चिन्ह शिंदे गटाला देण्यात आल्याने मूळ शिवसेना पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या सुनावणीमध्ये शिंदेगटाच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयासमोर तोंडी सांगितले आहे की ते कोणतीही तडकाफडकी कारवाई करणार नाहीत आणि तसेच ते शाखांसह शिवसेनेच्या कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाहीत. असे असतानाही शिंदेगट ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचे काम करीत असून, कायदा, सुव्यवस्था. सार्वजनिक शांतता तसेच सामाजिक सद्भावना बिघडवण्याचा हा जाणूनबुजून होत असून आहे. याचे उदाहरण म्हणजे लोकमान्य नगर येथील ३५ वर्षे जुन्या शिवसेना शाखेचा ताबा शिंदेगटाकडून घेणे. या संदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेऊन त्यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले. खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, महिला आघाडी समिधाताई मोहिते, भास्कर बैरीशेट्टी, विभाग प्रमुख प्रशांत सातपुते, युवासेना जिल्हा समन्वयक दीपक गायकवाड, सह समन्वयक सुनील वाडेकर, हेमचंद्र राठीवडेकर, संपदा पांचाळ, महिला शहर संघटक प्रमिला भांगे, विभाग प्रमुख राजू शिरोडकर व इतर स्थानिक शिवसैनिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या निवेदनामध्ये भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने २०२३ च्या अपील क्रमांक ३९९७ मध्ये दि.२२/०२/२०२३ रोजी दिलेल्या आदेशाची माहिती देणे हा असून सर्वोच्च न्यायालयाने भारत निवडणूक आयोगाने दि.१७/०२/२०२३ च्या आदेशात परिच्छेद १३३ (IV) मध्ये दिलेले संरक्षण चालू राहील असे नमूद केलेली माहिती त्यांना दिली. खासदार राजन विचारे यांनी पोलीस आयुक्त यांची भेट घेतली असता त्यांच्यासोबत घटना घडते वेळी उपस्थित असलेले स्थानिक कार्यकर्ते होते. त्यांनी झालेला सर्व प्रकार पोलिसांना समजावून सांगितला. बाहेरून आणलेल्या कार्यकर्त्यांसह मूळ शिवसेना पक्षाचा बॅनर फाडून नवीन बॅनर लावला आहे. त्यावेळी त्यांना सदर प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित आहे याचा जाब विचारला असता शिंदेगटाच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना पक्ष आमचा आहे आम्ही काही कोर्टाचे आदेश पाळत नाही तुम्ही कोर्टामध्ये जा नाहीतर कुठेही जा असे म्हटल्याचे नमूद केले. याबाबत आजच्या झालेल्या भेटीत जोपर्यंत निकाल लागत नाहीत तोपर्यंत आमच्या सर्व शाखांना संरक्षण द्या अशी मागणी खासदार राजन विचारे यांच्याकडून करण्यात आली. तसेच प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दावा करणार असे खासदार राजन विचारे यांनी म्हंटले.
0 टिप्पण्या