Top Post Ad

शाळा व शाळाबाह्य मुलांची तपासणी काटेकोरपणे करावी - आयुक्त


 राज्य सरकारने हाती घेतलेल्या जागरूक पालक, सुदृढ बालक मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रातील ० ते १८ वयोगटातील मुले मुली  तसेच शाळाबाह्य मुलांची देखील तपासणी काटेकोरपणे होईल या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश  महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी (08 फेब्रुवारी) झालेल्या कृती दलाच्या बैठकीत दिले. राज्यभरात जागरूक पालक, सुदृढ बालक मोहिम सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व (ग्रामीण, शहरी व मनपा विभाग) ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत 'जागरूक पालक-सुदृढ बालक' विशेष अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने सदर अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 

               या मोहिमेत ठाणे महापालिकेतर्फे सुमारे दीड लाख मुलांची तपासणी करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शून्य ते १८ या वयोगटातील सगळ्यांची आरोग्य तपासणी, आवश्यक तेथे उपचार आणि शस्त्रक्रिया यांचे नियोजन, उपचार पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा यात कोणतीही त्रुटी किंवा दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी कृती दलाच्या बैठकीत दिले. कृती दलात, अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त अनघा कदम, उपायुक्त वर्षा दीक्षित, अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. राणी शिंदे, आयपीएचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम, आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. राम माळी आदी उपस्थित होते. 

शाळा आणि कनिष्ठ महविद्यालयातील मुलांसोबत, सिग्नल शाळा, रेल्वे स्थानक परिसरातील मुले, बांधकामाच्या साईटवरील मुले, नाका कामगारांची मुले यांची तपासणी होईल या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. 0 ते 3 या वयोगटातील मुले मुली तसेच स्थलांतरित कुटुंबातील बालके यापासून वंचित राहणार नाहीत यादृष्टीने आरोग्य केंद्रे, आशा सेविका यांनी विशेष लक्ष द्यावे, प्राथमिक अंदाजानुसार, महापालिकेने सुमारे दीड लाख मुलांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले आहे. मात्र, ही संख्या त्या ही पेक्षा वाढू शकते, असे आयुक्त बांगर यांनी कृती दलाच्या लक्षात आणून दिले. खाजगी, विना अनुदानित, अनुदानित शाळा, महापालिका शाळा, सरकारी शाळा, आश्रम शाळा, बालसुधारगृह, दिव्यांगांच्या शाळांचा या मोहिमेत असणार आहे. खाजगी शाळांनी याबाबत कोणतीही आडकाठी करू नये. या मुलांची तपासणीही वैद्यकीय पथकाने करावी अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

               या अभियानातंर्गत राज्यातील 18 वर्षावरील सर्व मुलामुलींची आरोग्य तपासणी करुन डॉक्‌टरांच्या सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्यसुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी तज्ज्ञांमार्फत संबंधितांना समुपदेशनाची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. शून्य ते 18 वयोगटातील बालके, किशोरवयीन मुलामुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करुन यामध्ये आजारी बालके आढळल्यास त्यांच्यावर त्वरीत उपचार सुरू करण्यात येतील. गरजू , आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन नजीकच्या प्राथमिक आरोग्यकेंद्रात त्यांना पाठविण्यात येईल व येथील वैद्यकीय पथकाकडून पुनश्च: तपासणीकरुन आवश्यकतेनुसार उदा. औषधोपचार, शस्त्रक्रिया आदी उपचार करण्यात येतील अशी या अभियानाची उद्दिष्टे असल्याचे आयुक्तांनी नमूद केले आहे. तसेच ज्या शस्त्रक्रिया महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात होत नाही, त्यासाठी आयएमए, खाजगी रुग्णालये याची मदत घेतली जाणार आहे. अभियानाच्या माध्यमातून 100 टक्के मुलांची तपासणी करुन त्यांचे आरोग्य चांगले रहावे हे सुनिश्चित करुन कार्यवाही करण्यात येणार आहे.

कुपोषित बालकांवर विशेष लक्ष-  शुन्य ते 6 वयोगटातील मध्यम व तीव्र कुपोषित बालके यांच्यावर वैद्यकीय पथकामार्फत विशेष लक्ष दिले जाणार आहे. यासाठी देखील विशेष कार्यक्रम आखण्यात येणार आहे. तपासणीच्या व्यतिरिक्त त्यांच्या पोषणआहाराकडे देखील कटाक्षाने लक्ष दिले जाणार आहे असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

तपासणी कुठे होईल-             सदरची आरोग्य तपासणी शासकीय व निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, खाजगी शाळा, अंध/ दिव्यांग शाळा, अंगणवाड्या, खाजगी नर्सरी / बालवाड्या, बालगृहे / बालसुधारगृहे, अनाथआश्रम, समाजकल्याण व आदिवासी विभागाची मुले व मुलींची वसतीगृहे, शाळाबाह्य मुलांमुलींची नजीकच्या शासकीय शाळा व अंगणवाडीमध्ये तपासणी करण्यात येईल असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com